Wednesday 26 July 2023

आनंदाच्या रेटींगचा अर्थ..

जिकडे तिकडे चोहीकडे....आनंदी आनंद गडे....
कवितेच्या ओळी आठवायचं कारण म्हणजे कुण्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष. ज्यात म्हटलय की भारत आंनदी राहण्याच्या बाबतीत जगात ११८ व्या क्रमांकावर आहे.

हे सर्वेक्षण छापताना पाकिस्तान आणि बांगलादेशसह युध्दाच्या छायेत सतत जगणा-या इस्रायल देशात देखील काय स्थिती आहे याचं वर्णन केलय आणि हे सर्व देश आनंदी देशांच्या यादीत भारतापेक्षा अधिक उत्तम आणि वरच्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे. हे सर्वेक्षण वाचल्यावर सहाजिकच आनंद ही संकल्पना नेमकी आहे काय आणि त्याची व्याख्या नेमकेपणाने कशी करण्यात आली हा सवाल मनात येतो.
आनंद ही संकल्पना व्यक्तीसापेक्ष आहे कुणाला कशात तर कुणाला कशात आनंद मिळेल हे सांगता येत नाही. त्या सर्वेक्षणाच्या पटटीत भारतीयांचा आनंद बसला नाही. हे आपण मान्य करू मात्र हा आनंद आमच्याकडे कमी नाही.

इथं तर आनंदाचे डोही आनंद तरंग...
आनंदाची अंग, अशी स्थिती असल्यानचे आपणास दिसेल. आम्हा भारतीयांच्या आनंदाचं काय विचारता की आम्ही आनंदी आहोत...हो आम्ही आनंदी आहोत आहे तसं जगण्यात आनंद मानायचा की आनंद यापेक्षा काही वेगळा असतो याचा शोध आम्ही घेत फिरतो त्यामुळेच चेह-यावरचं हसू बघून सवाल केला जातो...

.तूम इतना मुस्कुरा रहे हो..
.क्या गम है जिसको छुपा रहे हो.....

आता माझं वैयक्तिक विचाराल तर माझ्या वडिलांचे नाव अनंतराव आहे त्यामुळे मला 'ठेविले अनंते तैसेच रहावे' असं जगण्याचा पूर्ण अधिकार आहे अन्‍ इतरांचं विचाराल तर त्यांना तसं जगण्याशिवाय पर्याय नाही. यामुळेच कदाचित आपला आनंद कशात आहे याच्या शोधात आयुष्याची ही आनंदयात्रा चालत राहते आणि शोध लागला असं ज्या क्षणी अत्यानंदाने ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे अनेकांना थेट अत्यंयात्रेत हा प्रवास संपवावा लागतो.

आनंद ही जशी मनाची भावना आहे तशीच ती मनाने मानण्याची बाब आहे. आपला आनंद नेमका कशात आहे याचा परिसाप्रमाणे शोध घेत आपण चालत रहातो हातात एक लोखंडाचे कंकण घेऊन या प्रवासात वाळूतील एक एक दगड उचलून त्या कंकणाला लावत आम्ही चालत राहतो....कधी त्या कंकणाचं सोनं झालं हे कळत नाही. कळतं त्यावेळी उशीर झालेला असतो. मग सुखाचंही असच आहे आणि आनंदाचं देखील. तो क्षण हातातून कधी निसटून गेला हे कळत नाही. त्यामुळे त्याच्या जाण्याचं दु:ख घेऊन आम्ही पुन्हा शोधायला लागतो.

मोठया प्रमाणावर शहरीकरणाचा एक भाग झाल्याने आमची अवस्था यंत्रवत झाली आहे. आमची स्पर्धा आमच्यातील उत्तमपणा, चांगूलपणा यासाठी नसून आमची स्पर्धा घडयाळातील काटे आणि पैसा यांच्याशी असते.

भौतिक सुखाच्या आहारी आपण गेलो आहोत हे कळतं पण
आता खूप उशींर झाला आहे हे देखील माहिती असतं. आनंद देणा-या यंत्रांना घरात आणण्याची स्पर्धा आमची जिंदगी केव्हा 'किश्तोंपर' आणून ठेवते तेच आम्हाला कळत नाही कर्ज आणि त्याच्या ईएमआय साठी आम्ही पैसे कमावण्याची धावपळ करायला लागतो मग आनंद कशात आहे हेच लक्षात येत नाही.

रात्रीच्या गर्भातून पूर्वेला तांबडं फुटतं आणि पक्षांचा किलबिलाट सुरू होतो त्याच्या अनुभूतीत आनंद आहे...पण आमची सकाळ मात्र ट्वीटरच्या चिवचिवाटाने आम्ही करतो. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यात आनंद आहे पण आम्ही त्याला कमाईत जमेल का.. या पटटीवर तोलण्याचा प्रयत्न करतो. लहान मूल तुमच्या दोन शब्दांनीही आनंदून जातं पण त्यासाठी तुम्हाला वेळ नसतो. तुम्हाला त्याची भरपाई चॉकलेट किंवा आईस्क्रीमने करण्यात आनंद वाटतो आणि मूलं दुरावतात..कदाचित कायमची..

आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हाव हा आपला आनंद आपण मानतो मात्र त्याचा आनंद नेमका कशात आहे हे आपण विचारत नाही. कदाचित त्याला चित्रकलेत आनंद वाटेल पण नाही आम्ही घरात कुटुंब प्रमुखाची जबाबदारी 'मॅनेजर' च्या रूपात बघतो आणि कुटूंबातील सारे आपले 'एम्प्लॉयी' आहेत या भूमिकेतून मॅनेजमेंट गुरू बनतो एका अर्थाने घराचं रुपांतर आपण 'फॅक्टरीत' करतो.

घरात स्वयंपाकाच्या रूपाने कॅन्टीन, टिव्ही, आणि कॉम्प्युटरच्या रूपाने मनोरंजन आणि पॉकेटमनीच्या रुपाने पगार आपण आपल्या या एम्लॉयीला देतो आणि आपल्या इच्छेनुसार त्यांनी आनंदाचं प्रॉडक्शन द्यावं ही अपेक्षा बाळगतो तिथं त्यांना आनंद मिळत नाही
आणि आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून आपल्याला आनंद मिळत नाही.

तूमच्यासाठीच मी दिवसभर राबतो ना असं म्हणून तुम्ही तुमची पालकाची भूमिका पार पाडता पण आपण हे सारं करतोय ते आपल्या स्वत:साठी आहे हे आपण मानत नाही. आपली पुढची पिढी म्हणजे आपलाच अंश आहे याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यांच्यातील मिश्कीलपणा आपल्याला खोडी वाटते आणि आपल्या मिश्कीलीवर हमखास दाद मिळलीच पाहिले ही आपली डिमांड असते.

बहुसंख्य कुटूंबात आज थोडयाफार फरकाने हाच प्रकार दिसतो. आम्ही वयाने आणि अनुभवाने मोठे आहोत तर याचा फायदा आपल्या पुढच्या पिढीला देणे ही जबाबदारी आपलीच आहे. ही जबाबदारी पार पाडणे हा खरा आनंद.... पण इथं वेळ आहे कुणाला... आम्ही तर आनंदाचा परिस शोधण्यात बिझी आहोत ना....

ज्यांचं उत्पन्न अतिशय कमी आहे अशा लोकांना मोठया अपेक्षा असत नाहीत 'दो वक्त की रोटी' आणि त्यासाठीची धावपळ इतकं छोटं ध्येय्य त्यांना असतं. त्यामुळेच आपल्या गरिबीने पाकिस्तान आणि बांगलादेशात आनंदी लोकांची संख्या अधिक आहे असं म्हणता येईल. मानवाच्या मूलभूत गरजा रोटी, कपडा और मकान यातच त्यांचा आनंद आहे. हाच आनंद नेमकेपणे नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेल्या मनोजकुमारने आपल्या याच नावाच्या चित्रपटातील एका गाण्यात सांगितलाय..तोच खरा आनंद...

अरे हाय हाय ए मजबूरी
ये मौसम और ये दूरी
मुझे पल पल है तडपाये
तेरी दो टाकियाँदी नौकरी में
मेरा लाखोंका सावन जाये.....

मेरा लाखोंका सावन जाये

-प्रशांत अनंतराव दैठणकर



९८२३१-९९४६६

बाप नावाचा माणूस ..... !

आजवर समाजात काय घडलय किंवा समाजात काय घडतय याचा संबध स्पर्धा परिक्षांसाठी असेल तर इतिहासाच्या सनावळया अभ्यासासाठी आवश्यक असतील मात्र घरात महत्वाचा आहे तो आपल्या घराचा इतिहास... काळाच्या ओघात अंतर पडलं किंवा अंतरे वाढली ही स्थिती आज दिसत आहे. कौटुंबिक व्यवस्था मोठया स्थित्यंतरातून जात आहे. या स्थितीत अधिक महत्व आपण कुटुंबाला दिले पाहिजे... आणि या कुटुंबाचा प्रमुख म्हणून जी व्यक्ती आपली जबाबदारी मानते आणि निभावते ती व्यक्ती म्हणजे बाप नावाची शक्ती होय.

हल्ली दिवस साजरे करण्याचं फॅड आलं आहे. यानुसार फादर्स डे सारे जण साजरा करतील. फादरला छान-छानशा भेटवस्तू आणि फुलांचे बुके देतील. मात्र त्यात नेमकेपणाने किती खरेपणा आहे हे आपण तपासून घ्यायला हवं.

ससांरातील वाटचालीत आजवर त्याची भूमिका कशी बदलली आणि का बदलली याचं कारण आपण मुलांना दिलं पाहिजे...व्यक्ती वयाने मोठी न होता ती मनापासून असणाऱ्या आदरातून मोठी झाली पाहिजे... बाप हे असं एक व्यक्तीमत्व असतं.

बाप प्रसंगी माया नसेल कदाचित पंरतु बाप हा कुटुंबाची छत्रछाया नक्कीच  असतो.... स्वत:च्या इच्छा... अपेक्षा आणि आकांक्षांना गुंडाळून ठेवत मुलांसाठी मायेची ऊब देताना ती स्वत: ऊन-वारा पाऊस यांचा मारा सहन करीत फाटक्या-तुटक्या वेषात उभा अंगणात दिसतो ... तो बाप असतो. बापाची व्याख्या व्यक्तीनुरुप बदलत जाणार आहे. मात्र आपली पुढची पिढी वरच्या स्तरावर जाईल असं स्वप्न उराशी बाळगत मेहनत उपसत राहणारी व्यक्ती म्हणजे बाप माणून म्हणता येईल.

गेल्या काही पिढयांकडे बघताना जाणवतं की, बाप म्हणजे धाक ही भावना आधिच्या पिढीत होती. त्याच्या नजरेला नजर देण हे कदाचित व्हायचं...
क्वचितप्रसंगी या दोघांमध्ये संवादाचे प्रंसग यायचे त्यातही वादाला प्रथम स्थान कारण अर्थात जनरेशन गॅप...आमच्या काळात आम्ही छडी लागे छम...छम... असं म्हणत विद्याग्रहण केलं आणि तुमच्या जमाना वेगळा आहे ही बापाची भूमिका तर..... बाबा काळ खूप झपाटयाने बदलला आहे... ही नव्या पिढीची भूमिका...मग तडजोड करायची कुणी यावर अहं च्या वादातून जनरेशन गॅप सुरु होते आणि ती जनरेटेड गॅप असावी अशी जपली जाते हे देखील एक वास्तव आहे.

माझं वैयक्तिक मत हेच की , मोठयांसमोर झुकण्यात तो कमीपणा कसला ? .... याचं स्वरुपाचं सुंदर चित्रीकरण मोहबतें चित्रपटात आपणास दिसतं.... मोठया माणसानं जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती निश्चितपणे लहान होत नाही पण त्यात सोपा उपाय अर्थातच लहानांनी झुकाव...मोठयांना समजून घ्यावं..

दोन पिढयांमध्ये सर्वच बाबतीत पडणारं अंतर ही नैसर्गिक बाब आहे... यात झुकेका कौन.... ? असा सवाल दोन्ही पिढयांनी टाळला तर अधिक उत्तम होईल.....जुन्या नव्याच्या संघर्षात न पडता आहे ते नाते मनापासून स्विकारणं महत्वाचं ठरतं... जुन्या पिढीला तंत्र आणि यंत्र यातील प्रगती कळत नाही हा त्यांचा दोष
नाही. ते तंत्र त्यांच्या काळात असंत तर त्यांनीते नक्की आत्मसात केलं असतं.... डॅड तुम्हाला मोबाईल सुध्दा वापरता येत नाही असं म्हणणाऱ्या पिढीनं वास्तव जाणलं पाहिजे की त्या बापाच्या काळात साधा फोन देखील दुरापास्त होता. यात नव्या पिढीची भूमिका खूप महत्वाची आणि मोलाची ठरते. जुन्या पिढीला अद्ययावत करणं ही जबाबदारी नव्या पिढीची ठरते याची जाण आपण ठेवावी.

यात जुन्या पिढीला देखील आपली भूमिका तपासून एक पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता आहे. कारण मुलांना घडवताना त्या पिढीने जगायचं सारं तंत्र शिकवलय मात्र तंत्राच्या गतीने काळ आता इतका बदलला आहे की नव्या जगातील व्यवहाराशी जुळवून घेण्यासाठी त्यांनाही नव्या पिढीची आवश्यकता भासणार आहे. कारण हे सहजीवन आहे... समाजातील बदलांचे परिणाम दोन्ही पिढययांवर सारखेच होणार आहेत.

अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर ते ATM कार्ड वापराचं घेता येईल... ATM कार्ड वापराची भिती वाटते म्हणून तासंन तास बँकेत बसणारे पेन्शनर्स किती दिवस याला टाळू शकतील... मुलाला चालायला शिकवलं त्यावेळी जो आनंद होता त्याच आनंदाची अनुभूती आता नव्या पिढीला व्याजासह परत द्यायची ही वेळ आहे... म्हणतात ना प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या कोणत्या -ना-कोणत्या वळणावर नव्याने आणि पहिल्यांदा शिकत असतो.

आजजी पिढी तारुण्यात आहे त्यांनाही लक्षात ठेवावं लागेल की आज ते शिखरावर आहेत मात्र अंगणात आणि पाळण्यात खेळणारी त्यांची नवी पिढी लवकरच त्यांची जागा घ्यायला समोर येणार आहे. त्यामुळे कौतुकाने हुरळून जाणं आणि आपल्या ज्ञानाची फुशारकी मारणं या अगदीच क्षणभंगूर  बाबी आहेत या आयुष्याच्या प्रवासात...

तुम्हाला ज्यांनी घडवलं त्यांना बदलत्या काळानुरुप बदलण्यास मदत करणं आणि नवी पिढी घडवताना भविष्यात आपल्यालाही अनेक बाबी नव्या पिढीकडून शिकाव्या लागतील, अद्ययावत रहावं लागेल आणि भविष्यात अद्ययावत व्हावं लागेल याचं भान ठेवणं अन् जुन्यांचा नव्यांमध्ये संगम घडवणं म्हणजे खरा
Fathers day.... ठरेल.

बदल हा जगाचा स्थायीभाव आहे आणि तेच एकमेव सत्य देखील ... अर्थात हा भगवद् गीतेचा संदेश जितका मोठा बदल, तितका मोठा विरोध हे वास्तव. रेल्वे देखील रुळ बदलताना मोठा खडखडाट करते... याला दुसरा पर्याय नाही... या खडखडाटाची पर्वा न करता जुन्या पिढीची गाडी योग्य ट्रॅक वर आणणं हा आपला खरा Fathers day . Wish All fathers .........A VERY VERY  Happy Fathers Day.

प्रशांत दैठणकर
९८२३१९९४६६