Sunday 24 July 2011

झुला ... !



ते काय होतं.. मागे वळून बघताना मनाच्या दुखऱ्या कोपऱ्यातून आलेला तो आवाज.. म्हणतात वय हे वेडं असतं.. सारं कसं स्वप्नवत ... असं काही होईल हे त्या क्षणापर्यंत मनातही  नव्हते.
          एकाच क्षेत्रात आणि अगदी आसपास वावरुन देखील दोघांची साधी नजरानजर व्हावी याला वर्ष लागलं पण त्या वर्षभराच्या काळानंतर चार क्षणांच्या नजरेच्या संवादाचं  चार दिवसात प्रेमात रुपांतर होईल यावर सांगूनही विश्‍वास बसला नसता.
          तिचा तो बांधा.. चार चौघीत उठून दिसावी अशी नजरेत भरणारी उंची.. साधारण पोक्त होण्याचं वय सुरु होताना स्वत:ला मेंटेन करणाऱ्या काही मोजक्याच.. त्यापैकी ती एक तसा गर्दीतला वाटणारा असला तरी वेगळेपणानं समोर येणारा तिचा चेहरा.. आणि ते बोलके डोळे.. शब्दांची  गरजच पडली नाही सारा संवाद नजरेतून:. कोण कुणाजवळ कधी खेचलं गेलं.. दोघांनाही कळलं नाही..हा सारा प्रवासच शब्दातीत.
.. खरं कारण होतं ....  ?   याचं उत्तर शोधता येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे.
          मन.. . एक गुंफण.. नाती, मैत्र आणि भावनांची.. हा भावनांचा पसारा.. काही धागे रेशमाचे.. सूताचे तुटतात आणि गाठ पडल्यास तोडावे लागतात. रेशीमगाठ  ... मजबूत, कधी सुटणार नाही अन् तुटणारही नाही अन् सोडवताना देखील तोडायला लागत नाही.. अशा साऱ्या रेशीम मुलायम भावनांची वीण मनात सातत्याने होते मात्र.. धागा आणि भावना यांची चुकामुक.. मोठा गुंता भावनांचा.. मन आतल्या आत अधिकच गुंतत जातं.
          त्याचं ते तिला अनं तिचं ते त्याला.. अंतर राहत नसतं कोणतही.. प्रेम की वेड.. मर्यादेपलीकडे सर्व अंतरं पार करुन अंतरंगात शिरल्यावर तिथं असणारी अनामिक भिती.. अंतर देऊ नकोस मला असं विनवणी करणारं मन.. सारा भावनांचा खेळ त्याला जोड ती शब्दांची.. वय, भाषा.. सर्व अंतर पार करुन क्षणात सुरु झालेला तो आवेग.. मन सारखं त्या हिंदोळ्यावर  झुलत राहतं.. अचानक परिस सापडावा अन् .. दगडाचं सोनं व्हावं असे काहीसं .. !
          चंचल मन हेलकावे घेत राहतं.. दु:खाच्या क्षणी दु:खाच्या  वेदना निर्विकारपणे   झेलणारं.. शांत स्थिर आणि एकाग्र राहून मार्ग शोधणारं.. सुखाची चाहूल लागताच विचलित होतं.. हे स्वप्न तर नाही ना ? हे स्वप्न संपणार तर नाही ना ?  हे क्षण वाळूसारखे हातातून निसटून तर जाणार नाहीत ना.. सुख आलय म्हणून जगण्यापेक्षा त्याच्या हिरावलं जाण्याची हुरहूर सुरु राहते .. . का करतं मन असं.. जागून वाट बघितलेलं सुख आयुष्यात आल्यावर.. . त्याची अनुभूती.. पुन्हा दु:खाकडे का न्यायला लागते. मनातला संवाद.. ते हुरहुरणं मनाला आणखी चिंतेत टाकतं.. . आनंदाच्या डोहातल्या डुंबण्याच्या त्या क्षणांनी अंग अंग.. अंतरंग.. अधिकच उत्कट होतं.. कधी देखिली  ऐसी  उत्कटता.. शायद .. हाँ.. हॉ मैने प्यार किया.. तुमसे .. मैने .. !
                                                                              प्रशांत दैठणकर

Saturday 23 July 2011

ये रेशमी जुल्फे


तिचं येणं पावसाच्या सरीसारखं होतं.. भावनांच्या तापलेल्या मातीवर प्रितीचे ते चार थेंब म्हणजे मंदसा मृत्तिकांगंध देणारा शिडकावा होता.. ते आसूसलेलं मन .., क्षणार्धात ते चार थेंब आत्मसात झाले अन् त्या अनामिक प्रक्रियेतून बाहेर पडलेला दरवळ मनात घर करुन राहिला होता.
          भारलेल्या अवस्थेत आपण कधी जवळ आलो ते कदाचित दोघांनाही कळलं नाही.. प्रित अशीच असते.. तिच्यासारखी....अबोल.. तिला शब्द सूचत नसतात असं नाही तर ते शब्द मांडायचे कसे असं वाटत असतं.. !
          प्रेम.. तुमचं आमचं सेम.. नाही मित्रा जा पाडगावकरांना जाऊन सांग.. इटस् डिफरंट.. असतं .... तिची  भेट झाली  त्याच्या आधी असं काही  एकदा     झालं होतं.. ते देखील यापेक्षा वेळं आणि काळ वेगळा असल्यानं वेगळं होतं. प्रेमाची अनुभूती इतकी खोलवर वार करते हे जाणवतं असं प्रत्येक क्षणी  हो नाही.
          कॉलेज डेज.. सुहाने दिन (अन् दिवानी राते) त्या अलेक्झांडर बेलचे आभार मानावेत तितकं कमी आहे. त्यानं शोध लावल्याने आज फोन आयुष्याचं अनिवार्य  `एक्स्टेन्शन ` झालय.. चॅट ऑन एसएमएस किती चांगलं.. नाहीतर दोन भेटीतला काळ जगणं अवघड होतं.. अशक्य होतं.. हॉरिबल.. !  चॅटस् आणि त्यांचं पारायण .. अर्थात जीएनएसडब्लू ( म्हणजे गुड नाईट स्वीट ड्रीम्स ) असा संदेश झाल्यावरचं. या आजच्या लाईफचं एक्स्टेन्शन अनिवार्य आहे ते यासाठीच माय-बापाला त्याचं टेन्शन आलं ही बाब निराळी.
          प्रेम.. ऍ़टीट्यूड आणि ऍ़प्रोचच बदलून टाकतं हे मात्र खरं.. ग्रुपमधून कॉमेंट आली.. नाही तर काय यार बघ ना त्याच्याकडे.. साफसूफ राहणे सफाचट  दाढी आणि पर्सनालिटी छान दिसावी म्हणून मिट्रीवाला ` क्रु`कट करुन फिरणारा तो आज खांद्यापर्यंत रुळणारे केस घेऊन फिरतोय.. खरच लव्ह चेंजेस लाईफ.

                                                                             प्रशांत दैठणकर