Tuesday 25 October 2011

एकच पण ती










एकच पण ती.. ना  आहे एकाकी
एकच पणती.जरी न दे लकाकी
तिमिराला लढा द्यायला ती उभी..
टिम-टिम तिचा शांत या नभी..

आकाश चांदण्यांचे असू दे किती
दूरच तारे.. दूरवरचेच हे नजारे..
अंगणी आशांचे किरण जागवित.
ही पणती जिवाला गे दे उभारे..

जिवनाच्या याच रंगाचा हा गौरव
दिवाळी त्या पणती चा गं मिरव..
जरी अल्प तरी हा एक स्वल्प..
आयुष्यातला हा हसरासा संकल्प..

गुणगुणण्या आयुष्याचे हे गीत..
निभावण्यास ही सारी जनरित..
ती लढते..वा-याशी..तिमिराशी..
उजळूनी सारे.  अंधार पायाशी

चला प्रकाशाचे गीत हे गायला
पणतीचे जीवन जगायला...
आठवण करण्या या सा-याला
चला दीपावली.. साजरी करायला



प्रशांत.. विजया, जान्हवी आणि वेदांत दैठणकर

Wish you A very Happy Dipawali

Wednesday 19 October 2011

बिना शटरची दुकानं


वर्धेत मी आलो त्याला आज 2 वर्षे पूर्ण होवून गेली आहेत. 2009 साली मी वर्धेला यायला निघालो त्यावेळी हे शहर नेमकं कसं असेल ? किती मोठं असेल ... अशा अनेक प्रश्नांची मालिका डोक्यात होती. 5 जुलै 2009 रोजी औरंगाबादहून सुरु झालेला प्रवास चालूच आहे.

वर्धेत आल्यावर या गावचं वेगळेपण मला जाणवलं. मोठ्या वृक्षाच्या सावलीत दुसरा मोठा वृक्ष जगू शकत नाही असं काहीसं वर्धेचं झालेलं आहे. नागपूर सारखं महानगर शेजारी असल्याने वर्धा म्हणावं तितकं विकसित झालेलं नाही.

गाव छोटं. टुमदार घरं आणि प्रेमळ माणसं इथ आहेत तरी काही दिवसात वर्धेचा आणखी एक चेहरा समोर आला. एक सदगृहस्थ माझ्याकडे येवून आपल्या एका संस्थेची माहिती देत होते. सामाज हितासाठी आपण कसं आयुष्य घालावं असं सांगताना त्यांच्या त्या सांगण्यामागचा हेतू जाणवत होता.

मला स्पष्टपणा आवडतो. त्या स्पष्टपणानं मी त्या इसमाला या सर्व कथनाचा हेतू काय हा थेट सवाल केला. आता थेट सवाल आल्याने त्याला माघार घेणं जमलं नाही. माझ्या सारख्या माणसाच्या संस्थेच्या कामाला महाराष्ट्र पातळीवर मान्यता मिळण्यासाठी प्रसिध्दीच्या माध्यमातून माझ्या कार्यालयाने त्याला राज्यस्तरावर न्यावं हा त्याचा हेतू त्याला सांगावाच लागला.

माझं काम अर्थातच शासकीय काम असल्यानं मी त्याला नकारच दिला. सुरुवातीच्या 3 महिन्यात अशा सहा ते सात जणांचा परिचय झाला.

वर्धा नव्या शतकात प्रवेश करीत आहे असं म्हणायचं की जगापेक्षा मागं आहे असं एकूण काय तर अर्थ तोच. याच काळात वावरताना काही कागदी योध्दे दिसले. कुणाचा पाठिंबा नाही आणि पाठबळ नाही तरी एकट्याच्या बळावर विविध कार्यालयांना निवेदनं द्यायची त्याच्या आधारे पेपरात प्रसिध्दी करुन घ्यायची असे हे कागदी योध्दे. थोड्याफार फरकानं सगळीकडेच असतात.

प्रसिध्दी मिळाली पाहिजे यासाठी निरनिराळ्या क्लुप्त्या लढविणारे अनेक जण या गावात आहेत. दरवेळी काही निराळं करणं ही खासियत. नगर पालिका असो की प्रशासन यांचा निवेदनांचा पाऊस संपत नाही. अशांना काय म्हणावं याचा विचार करताना अचानक शब्द सुचला बिनाशटरची दुकानं ...!

मध्यंतरी वाचलं होतं की स्वीट्झर्लँड मध्ये बिना शटरची दुकाने आहेत मात्र ती काच लावून बंद ठेवली जातात अशी सोय तिथं आहे.

भांडवल कागद आणि पेन, ऑफीस नको, त्याचा व्याप, भाडं, विजेचं बिल, काहीही नको. सकाळी चपला पायात सरकविल्या की पदयात्रा सुरु. या कार्यालयातून त्या कार्यालयात. आधीच्या निवेदनाचा फॉलोअप अन् दुस-या नव्या विषयाचं निवेदन द्यायचं .... आणि त्यांच्या प्रसिध्दीच्या मागे लागायचं... दुकान सुरु संध्याकाळी गुपचूप अन् पुन्हा सकाळी आपलं दुकान सुरु अशी ही सारी बिनाशटरची दुकानदारी आज समाजाचा एक अंगच बनलीय.

-प्रशांत दैठणकर

Tuesday 18 October 2011

दिन दिन दिवाळी .... !


  दिवाळी अर्थात दणक्याची दिवाळी असं काहीसं समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये झालेलं आहे. फटाक्यांचा दणदणाट झाला नाही तर ती दिवाळी कसली असं आमच्या डोक्यात कायमचं बसलं आहे परंतू दिवाळी ही आतषबाजीची आणि फटाक्यांची हल्लीच्या काळात झाली त्यापूर्वी दिवाळी ही खरी मंगलमय क्षणांचा ठेवा होती.
     पहाटेच्या अंधाराचा मुकाबला करीत अंधाराला दूर सारताना ` तमसो मा ज्योतिर्गमय `  संदेश देणा-या अन परिसर उजळून टाकणा-या पणत्यांची रांग. त्यात अंगाला रगडून-चोळून उटण्याच्या त्या सुगंधात कढत पाण्यात थंडीत कुडकुडत केलेल्या अभ्यंग स्नानानं दिवाळीची पहाट घरात यायची.
     दिवाळीची तयारी अर्थातच दस-याच्या सणापासून सुरु झालेली. चमचमणारं स्टील आता आलं. त्यावेळी फक्त धमक सोनेरी पितळी भांड्यांचा जमाना. दिवाळी येणार म्हटल्यावर सारी पितळी भांडी चिंचेचा कोळ करुन राखेच्या सहाय्यानं लख्ख सोनेरी करीत अंगणात वाळायला घालणं आणि त्याच वेळी घरात होणारी `सफेदी` अर्थात भिंती चुन्यानं रंगवण.
     दिवाळीच्या निमित्तानं सारं घर स्वच्छ स्वच्छ व्हायचं, जाळी-जळमट झटकली व साफ केली जायची घराचा कोपरा-न-कोपरा उजळला जायचा.
     दिवाळीच्या आठ दिवस आधीपासून घरात फराळाच्या पदार्थाचा दखल सुरु होत असे. चिवडा हा खासच प्रकार. त्यासाठी मुरमुरे स्वच्छ करुन घेणे अर्थात हे मुरमुरे निजामाबादी असावे याचा कटाक्ष असे. निजामबादी मुरमुरे ही खास मराठवाडी आवड.  दुसरा पदार्थ म्हणजे चकली. सोबत करंजी आणि लाडू. अख्खं घर त्या फराळाच्या तयारीत गुंतलेलं असायचं.
      अभ्यंग स्थानात ब्रेक घेऊन पंचारतीने ओवाळण्याची पध्दत. त्या वेळी ओल्या अंगाला ती थंडी बोचायची.. आणखीनच हुडडुडी भरायची. सा-या वाड्याला ऐकू जाईल अशा आवाजात रेडिओवर सुरु असलेलं नरकासूर वधाचं किर्तन समजून पक्की होती. रेडिओवर त्या नकरासूराचा वध होण्यापूर्वी अंघोळ व्हायला हवी अन्यथा आपण नरकात जाणार. अंगभर चोपडलेल्या तेलावर जोवर मोती सॅन्डल साबण फिरत नाही तोवर दिवाळीचा फिलच येत नाही. या अंघोळीला साथ असायची ती आधी अंघोळ उरकून हातात उदबत्‍ती  घेउन लवंगी फटाके उडविणा-या मोठ्या भावंडांची.
    अभ्यंगस्नान ओटोपल्यावर सर्वांनी एकत्र बसून फराळ हादडायचा आणि त्यांनतर दिवाळी अंकांचा फराळ सुरु व्हायचा, दुपारी जेवणं झाल्यावर घरातली ज्येष्ठ मंडळी आराम करीत असताना टिकलीच्या डब्या घेऊन हातोडीच्या मदतीने तर कधी बंदूकीच्या मदतीने फाट ss  फाट आवाज करुन संगळयांची झोपमोड करायची.
             
             दिन दिन दिवाळी
                गाई -म्हशी ओवाळी
                गाई- म्हशी कोणाच्या ...?
             अशी दिवाळी गाण्यानं दिवाळी सुरु व्हायची साधी रहाणी असल्यानं दिवाळीचा बडेजाव कधीच जाणवायचा नाही. कामटया आणि रंगीत ताव आणून बनवलेला तो आकाश कंदिल आणि त्या कंदील बनवण्याच्या गमती-जमती आठवत या कोजागिरीला मी माझ्या शासकीय बंगल्यावर रेडीमेड आकाशदिवा लावताना मला बालपणातली दिवाळी आठवत होतो ...  मन काळाच्या वेगानं भूतकाळात जाऊन पुन्हा एकदा दिवाळी साजरी करीत होतं.




                                           प्रशांत दैठणकर

Saturday 15 October 2011

कबूतर जा जा जा...


     एक जमाना असाही होता ज्यावेळी घरी येणा-या त्या पोस्टमनला खूप महत्व होतं हा डाकिया शिक्षित आणि लिहू व वाचू शकणारी व्यक्ती होती आणि काळही संथ असल्याने त्यावेळी घराच्या दाराला पोस्टमनची वाट असायची. अनेक घरात हा डाकिया अर्थात खाकी वर्दीतला बाबू घरातील सदस्यच होता.
     संदेश वहन ही प्रत्येकाची गरज आहे. काही संदेश हे सांकेतिक तर काही सांगितीक पण हे आवश्यक. जुना काळ होता तो संदेश देण्यासाठी खास घोडेस्वार पाठवण्याचा ज्याला दूत म्हणायचे त्याचवेळी कबूतरला प्रशिक्षित करुन त्याच्या पायात संदेशाची चिठ्ठी दिली जायची असा संदेश देणारी भाग्यश्री आणि संदेश घेणारा सलमान याच कबूतराच्या साक्षीनं ' मैने प्यार किया ' म्हणताना आपण पाहिले.
     रोमन साम्राज्यात महत्वाचा संदेश घेऊन धावणारा दूत मॅरेथॉन या गावापासून स्पार्टा या गावापर्यंत पोहोचला तो काळ आणि तो कालावधी आणि त्यामुळेच तितकंच अंतर मोजून आज जगभर धावण्याच्या स्पर्धा होतात व त्या स्पर्धांना नाव आहे मॅरेथॉन.
     राजे शिवाजींना वाचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडयांनी खिंड लढवून पावन केली. राजे गडावर सुखरुप पोहोचले असा संदेश धडाडणा-या तोफांनी दिला त्याचवेळी बाजीप्रभूने प्राण सोडले हा देखील संदेश वहनाचा एक प्रकार होता.
     महाकवी कालीदासानं रामटेकच्या डोंगरावर आपल्या प्रेमाचा संदेश मेघांना घेवून प्रेयसीकडे पाठवलं या रुपकावर मेघदूत सारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली हे सृजन संदेश वहनातूनच आले.
     डाक बाबू आणि डाकिया हे मोबाईल क्रांतीपूर्वी खरोखरच जीवनाचा अविभाज्य घटक बनले आणि सर्वात स्वस्त असा मार्ग होता तो १५ पैशांच्या पोस्टकार्डाचा. पत्राचा मायना मोठा असेल तरच आंतरदेशीय पत्र आणि त्यापेक्षा अधिक असेल तर पाकिट असा प्रवास असे परंतु 95 टक्के भारतीयांचा व्यवहार 15 पैशांच्या कार्डवर व्हायचा.
     आजही घरात तारकेटवर ज्या जीर्ण पत्रांच्या गठ्ठयात कुणाचा जन्म तर कुणाच्या नोकरीचे संदेश सापडतात. मृत्यूचा संदेश आणणारे पत्र तसे कमीच असत पण ते आल्या आल्या फाडले जात ते घरात ठेवणं देखील अशुभ होतं. तार पाठविणे हा मृत्यू कळवण्याचा अर्जंट मधील प्रकार पोस्टमनवर प्रेम करणारं घर मात्र तार आणणा-या त्या तारघराच्या कर्मचा-याच्या वर्दीनं धडकी भल्यासारखं करायचं.
        घर सोडून दुस-या ठिकाणी राहणा-यांना घरची चिठ्ठी हा अश्रुचा धागा छेडणारी असायची आजही पंकज उधासचं ' चिठ्ठी आयी है ' हे गाणं डोळ्यात पाणी आणतं.
     या डाकियाचा वापर चित्रपटात चांगला झाला आहे. डाकिया डाक लाया हे गाणं त्या काळात खूप लोकप्रिय गाणं होतं डाकिया प्रधान गाणं येणं हा त्या छोटया पण महत्वाच्या पदाचा सन्मानच होता.
     अलीकडच्या काळात जे.पी.दत्ता यांनी 'संदेसे आते है' च्या रुपाने सैन्य दलातील सैनिकांच्या भावना आणि वेदना पडद्यावर आणली होती.
     काळ बदलला आणि हे सर्व चित्र बदललं दिवाळीच्या भेटकार्डांची जागा आता ई-मेल आणि एस.एम.एस. ने घेतली. संदेश न देता संपर्कात रहायचं साधन म्हणून बहुतेक जण मोबाईल च्या 'मिसड् कॉल' चा वापर करतात. पण आजही मला नोकरी लागल्याचा संदेश देणारा आणि वेळोवेळी प्रेमाची पत्रे पोहचविणारा तो पोस्टमन वारंवार घरी यावा असं वाटत राहतं किमान दिवाळीची पोस्त मागायला तरी तो येत राहतो तेवढाच बदलत्या काळाचा तो 'मिसड् कॉल'
                                     -प्रशांत दैठणकर

Friday 14 October 2011

मनाचिये गुंती... !


      रिकामं मन सैतानाचं घर असं म्हणतात. मन हा आपल्या आयुष्यावर अधिराज्य करणारा एक अनभिषिक्त सम्राट असतो त्यामुळे आपलं आयुष्य त्याच्याच आसपास फिरत राहतं... सूचण्याचं कारण अर्थात छोटीसी बात  या हिंदी चित्रपटातील गाण्याची एक ओळ..

अचानक ये मन
किसी के जाने के बाद
करे फिर उस की याद
छोटी छोटी सी बात...

      खरच मनाची गती विश्वात सर्वाधिक अशी आहे. ध्यानधारणा करताना मनावर नियंत्रण मिळवायचं कसं याचं प्रशिक्षण दिलं जातं... मन हे चंचल आहे एक मिनिटात ते विश्वभ्रमण करुन येतं असं   म्हणतात की एका मिनिटाच्या या कालावधीत मानवी मनात 21 प्रकारचे विचार असतात.
      मन हे दुहेरी अस्तर असणारं वस्त्र आहे असं मला वाटतं आपण भौतिक रुपाने एका ठिकाणी आलो मन मात्र दुसरीकडे राहिलं या स्थितीत आपण अनेकदा स्वत:ला बघतो... शाळेत मुलांचे असं हात असल्यानं त्यांच्या डोक्यात अभ्यास शिरतच नाही अर्थात शाळेत असताना हे अनेक वर्षे अनुभवलेलं आहे.
      समाज हे मनाला घातलेलं बंधनच आहे या बंधनामुळे मन-मानेल तसं कुणालाच जगता येत नाही तरी काही जण मात्र तसं करतात.
      मन निर्मळ असतं .. पहाटेच्या वातावरणात जे पावित्र्य असतं त्या पावित्र्यासम निर्मळ मन हे फक्त मुलांचं असतं त्यांना खरं-खोट याची ओळख नसते आणि जगात कुणाची भिती देखली... अंधारात जायला मुलं घाबरत नाहीत आणि तेवत्या दिव्याची ज्योत धरायला देखील अनुभवानं चटका बसल्यावर ते सावध रहायला शिकतात तर अंधाराची 'भोकडीआपणच त्याच्या मनात वाढवलेली असते.
      शत्रू न चिंती ते मन चिंती असं म्हणतात. मन सकारात्मक कमी आणि नकारात्मक अधिक अश रुपानं चिंतन करतं त्यामुळेच कट्टर शत्रूच्या मनातही वाईट बाबी येणार नाहीत इतक्या वाईट बाबी आपणच आपल्या मनात आणत असतो म्हणूनच या मनावर नियंत्रण आणायला शिकलं पाहिजे.
      बहिणाबाई म्हणतात.
          मन वढाय वढाय
            जसं पिकातलं ढोर

      शरीराला सुखासिनतेची आवड लावणारं मनच असतं आणि एकदा ही आवड लागली की मन वारंवार त्याच गोष्टी करायला शरीराला भाग पाडत असतं.
          नाही निर्मळ मन
            काय करील साबण

      असं वचन आहे शारिरीक शुध्दी करण्यासाठी आपण साबणाने अंग धुवून टाकू शकतो मात्र आत असलेलं मन त्यानं धुतलं जात नाही त्यावर सुखासिनतेची पूटं चढतच जातात वाढत्या वयासोबत ते अधिक आग्रही आणि अधिक आडमुठ व्हायला लागतं.
      समर्थया मनाला नियंत्रित करण्यासाठी सांगतात
            'मना सज्जना भक्ती पंथेची जावे'
      मनाला चांगल्या विचाराची जोड देता आली पाहिजे भक्ती मार्ग हा त्यासाठी उत्तम उपाय हसू शकतो भक्तीत ती शक्ती निश्चितपणे आहे.
      माझे एक निवृत्त सहकारी युनुस आलम सिद्दीकी नेहमी सांगतात सुगंध हे मनाचं खाद्य आहे. ते आले की अत्तराचा फाया द्यायचे आणि म्हणायचे इसे रखा करो दोस्त अगदी बरोबर आहे. शरीराला खाद्य लागतं तसं मनालाही लागतंच ना. म्हणूनच सायंकाळी हातपाय धूवून देवापुढे उदबत्ती लावायची आणि परवचा म्हणायची.. त्या गंधित सायंसमयी पवित्रतेचा संचार होवून मन आपोआप प्रफुल्लीत होत जातं.
      आपल्याच मनाचा थांग लागत नाही अशा स्थितीत आपल्या विश्वातून बाहेर निघून    दुस-याच्या मनातलं जाणायचं म्हणजे मनकवडेपणाचं काम, असा मनकवडेपणा फार कमी जणांना जमतो.. पती पत्नीच्या नात्यात आणि मैत्रीत सहवासाने असं मन ओळखलं जातं.. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ असं उत्तर त्याला मिळत असतं इतरत्र मात्र असं फक्त मनकवडयांनाच जमतं असं म्हणावं लागेल.
      आपल्या शब्दांनी समोरच्याच्या मनाला साद घालण्याची ताकद लेखक आणि कवीत असते नृत्य असो नाटय असो की चित्रकला प्रत्येक कलेत अशी साद घालण्याची ताकद आहे म्हणूनच त्याला तसा प्रतिसाद देखील मिळतो.
      या मनाची शांती संपत चाललीय नुसतं धाव-धाव धावायचं शरीर थकून जातं तसं मनही कोमेजून जात असतं. अशा स्थितीत ती शांती परत मिळवायची तर कलेचा अणि साहित्याचा आधार घेता येतो. गाण्याची एखादी अशीच लकेर मेंदूच्या हार्ड डिस्कवर आर्काइव्ह झालेली एखादी फाईल अचानक उघडून समोर आणतं त्यावेळी मनाचा स्क्रीन रंगीन रंगीन होवून जातो.
      मनाचा हा प्रवास तसा सोपा वाटला तरी तो खूप मोठा गुंता आहे.
          रंगूनी रंगात सा-या
            रंग माझा वेगळा
            गुंतून गुंत्यात अधिक
            पाय माझा मोकळा

      असं मोकळं मन ठेवणं हीच सुखाच्या एव्हरेस्टची पहिली पायरी आहे
                
                       -प्रशांत दैठणकर 

Monday 10 October 2011

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो ... !


     काही माणसं प्रत्यक्षात कधी आपल्याला भेटलेली नसली आणि आपणही त्यांना कधी भेटलेलो नसतो तरी देखील ही माणसं आपल्या आयुष्यातील काही जागा घेऊन असतात अशाच काही जणांपैकी एक म्हणजे जगजित सिंह. तसं नाही म्हणायला या व्यक्तीची फक्त एकदा औरंगाबादेत भेट झाली ती कार्यक्रमादरम्यान अगदीच ओळखीपुरती झाली होती.
     रिपोर्टींग करताना कला, संस्कृती आणि चित्रपट हे विषय माझे आवडते असल्याने त्याबाबतचं रिपोर्टींग मला दिल जायचं. ताज हॉटेलमध्ये झालेला कार्यक्रमात जगजितसिंह यांची भेट झाली होती अगदीच अल्पकाळ परिचय झाला पण मैफल मात्र ऐकली होती.
     जगजीतसिंह ख-या अर्थानं रेशमी मुलायम आवाजाचा धनी माणूस. मला वैयक्तीकरित्या हा आवाज फारसा भावला नसला तरी त्या आवाजात एक आगळीच जादू होती. या आवाजाचा माझा परिचय माझ्या बालपणातला नांदेडमध्ये उन्हाळयाच्या सुट्टयांमध्ये मावशीकडे महिनाभर रहायच्या काळातला.
     नांदेड मधल्या श्याम चित्रपटगृहात आमच्या चिल्लर गॅगने 'अर्थ' नावाच्या चित्रपटात हा आवाज ऐकलेला. त्या काळी आला चित्रपट की बघायचा असा उद्योग होता. चित्रपट चांगला-वाईट हा भेदाभेद आम्ही करायचो नाही. त्या चित्रपटातलं ते गाणं ' तुम इतना जो मुस्कुरा रहे हो.. क्या गम है जिसको छुपा रहे हो..!
     त्या शब्दामधलं ते रुपक प्रचंड आवडलं होत दु:ख लपवण्यासाठी हसायचं ही कवी कल्पना मनात घर करुन बसली आणि गाणं देखील.
     जगजीतचं त्यानंतरचं आवडलेलं गाणं म्हणजे होठोंसे छु लो तुम मेरा गीत अमर कर दो..! या गाण्यातही शब्दांची जी कसरत आहे ती अतुलनीय अशीच आहे आणि त्यामुळेच ते गाणं लक्षात रहातं.
    2003 साली माझ्या मातोश्रींनी जगातून निरोप घेतला त्या वेळी त्यांना पोहोचवायला निघालो ह्या स्वर्गरथावरच्या गाण्यातून जगजीतनंच साथ दिली.. दु:खाची किनार असणारा तो क्षण आणि त्या क्षणाची ती साथ.. ते भजन कितीही चांगलं असलं तरी ते स्मृतींच्या अशा कप्प्याशी जोडलं गेलय की जगजीतच्या सूर म्हटलं की तोच क्षण आठवतो.
     असतात अशी काही अनाकलनीय नाती वैयक्तिकरित्या तो आवाज आवडत नसला तरी तो खूप उच्च दर्जाचा मखमली आवाज होता आणि तो आवाजाचा धनी देहरुपानं जगातून गेला असला तरी त्याचा आवाज कायमच कानसेनांना तृप्त करीत राहणार आहे.
प्रशांत दैठणकर

Wednesday 5 October 2011

सिमोल्लंघन सोनेरी हे ... !



          गरबा रंगत रंगत रात्री दोन अडीच वाजेपर्यंत चालण्याचा काळ अर्थात 10 वाजेचे बंधन येण्याच्या आधीचा. रंगलेला गरब्यानंतर त्या मध्यरात्रीच्या निरव अशा शांततेमध्ये गप्पा मारत शांततेचा भंग करीत घरी परतायचं आणि झोपेच्या नादी न लागता मस्तपणे गरम पाण्यात अंघोळ करायची आणि एकमेकांना आवाज देत गल्लीच्या कोप-यावर सारे जमा व्हायचे.
     त्याकाळी फोनच नव्हते तर मोबाईल आणि मिसड् कॉल ही भानगड कुठली. ग्रुपची विशिष्ट अशी एक शिट्टी होती. आणि ती सा-या गल्लीला परिचित झाली होती मग पहाटवा-यात सारी गँग गुलमंडीवरुन कर्णपु-याकडे मार्गक्रमण करायला लागायची.
     आदल्या रात्रीपासून झेंडूचा सोनेरी ढीग आणणारे शेतकरी एव्हाना सा-या रस्त्याची किनार सोनेरी करुन टाकायचे तो सोनेरी  बहर डोळ्यात साठवेपर्यंत कर्णपूरा कधी यायच हे कळायचं नाही.
     इथंही रस्त्याच्या बाजूला झेंडूची फूलं आणि आपण ज्याला सोनं म्हणतो त्या आपट्याच्या झाडाची पानं विकणारे असायचे. एव्हाना तांबडं फुटायला लागलेलं. झेंडूची ती फूले आणि आपट्याची पानं घेऊन पहाटे पहाटे तुळजामंदिरात दर्शन घ्यायचं.
     मागच्या बाजूला बालाजी मंदिरात वर्षभर उभा भव्य लाकडी रथ पून्हा कायापालट होवून सायंकाळच्या रथयात्रेसाठी सज्ज झालेला... तिथं फूलं आणि पानं वाहून परतीचा प्रवास त्यात घरी जाताना मस्त वाफळत्या चहाचा `कट ` आवश्यकच ठरायचाच.
     घरी आल्यावर साधारण 9 ते 10 वाजेपर्यंत झोपणे, तोवर स्वयंपाक रेडीच आणि मेन्यू देखील ठरलेलाच श्रीखंड आणि पूरी सोबत कांदा बटाटा भाजी सोबत भजी आणि कुरइई व पापड्या. गरमागरम जेवण चोपल्यावर पुन्हा दुपारी फुल्ल पडी मारायची.
      सायंकाळी फ्रेश होवून डोक्यावर टोपी त्यावर पहिल्या माळेला घटी पेरलेल्या गव्हाचे उगवलेले सुंदर पोपटी इवले इवले तुरे लावायचे ही आवड.     कोप-यावर रंगारगल्लीत असणा-या हिंगुलांबिका मंदिरात दर्शन घ्यायला निघायचं.
     दर्शन  घेऊन परत आल्यावर ओवाळणीचं ताट तयारच असे. त्यापूर्वी बळीराणा कापणे अर्थात दोन राक्षस प्रतिमा गव्हाच्या राशीतून तयार केलेल्या त्यापैकी एकामध्ये सोन्याची अंगठी लपवलेली असे ती अचूकपणे ओळखून त्या राक्षसाचं पोट चाकूने कापून छोट्टासा शूरपणा करायचा मग घरोघरी जाऊन सोनं लुटणं अर्थात खिसे भरुन जातील इतकी आपटयाची पानं गोळा करणं.
     औरंगाबाद 52 पुरे आणि 52 दरवाजांचं शहर याची सिमा पैठण गेटला संपे पूढे कर्णपूरा देवी चं दर्शन म्हणजे सिमा ओलांडणे अर्थात सिमोल्लंघन. दस-याची खरी मजा म्हणजे घराच्या आणि दाराला गाड्यांना झेंडूच्या माळा लावायच्या . अगदी खरं असल्याप्रमाणं ते आपट्याच्या पानाचं सोनं लुटायचं.. आणि  आठवण म्हणून माझ्या मिनूकडून ( त्यावेळचं ते प्रेम.. आता पत्नी ) मिळालेलं ते जुन्या 1986 च्या डायरीत ठेवलेलं आपट्याचं पान नुसतं पानातच नाही तर मनातही जपलं गेलय. तिचं नाव विजया आणि त्यामुळेही हा विजयादशमीचा सण खास हे वेगळं सांगण्याची गरज नको..
विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

                        - प्रशांत दैठणकर

Sunday 2 October 2011

साधेपणाचं जगणं बापूचं


रविवार, २ ऑक्टोबर, २०११
बापूंच्या आश्रमात आज लगबग नव्याने सुरु होती.. अखंडपणे सूत कातण्याचा उपक्रम सुरु झालेला.. एका बाजूला प्रार्थनेचे स्वर कानावर येत आहेत.. नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली... पालकमंत्री राजेंद्र मुळक स्वत: चरख्यावर सूत कातायला जमिनीवर बसले आहेत हे चित्र आजचे गांधी जयंतीच्या निमित्तानं बापूंचा निवास राहिलेल्या सेवाग्राम आश्रमातले आहे.

आश्रमाच्या दारातून आत जातानाच आपण साधेपणा आपोआप जगायला लागतो याचा प्रत्यय या ठिकाणी नेहमीच येतो गांधी जयंतीच्या निमित्ताने सेवाग्राम आश्रमाचा हा परिसर गर्दीने फुलला होता तरी त्यात साधेपणाची झलक स्पष्टपणे जाणवत होती.

कुटीत बापूंच्या आसनासमोरील जागेवर बसून उपस्थित सर्वांनी प्रार्थना केली. सोबत जिल्ह्याचे खासदार दत्ता मेघे व इतरांचा समावेश होता. आश्रमाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. असे आश्रम समितीचे अध्यक्ष मा.म.गडकरी यावेळी माहिती देत होते.

आपणही नकळत या वातावरणाने भारावून त्या जुन्या काळात जातो. १९३६ पासून १९४६ पर्यंतचा तो काळ बापूंचा इथं निवास होता आणि सा-या देशाचं केंद्रस्थानच वर्धा व सेवाग्राम बनलं होतं इथच प्रार्थना सभेत बापूंनी प्रथम चले जाव ची घोषणा केलेली.

अनेक चळवळींचा इतिहास इथच घडला आणि याच परिसरात अनेकांनी वास्तव्य केले. बापू नावानं जग आज त्यांना सारं जग ओळखतं... मोहनदास करमचंद गांधी यांचा बापू पर्यंतचा प्रवास खूप काही शिकवणारा आहे. महात्मा म्हणून ज्या व्यक्तीची ओळख निर्माण झाली ते महात्मा गांधी केवळ व्यक्ती नसून एक संस्थान, एक विद्यापीठ होते. भारतीय स्वातंत्र्याचं अधिष्ठान होते.

बापूंनी लावलेल्या हिंदीच्या रोपटयाचं रुपांतर आता जगातील अग्रगण्य भाषेचा वटवृक्ष होण्यापर्यंत झालय. खादीची चळवळीने ग्रामीण भागात आर्थिक सुबत्तेचा मार्ग दाखविला तर कुष्ठरोग्यांच्या सेवेने या समाजाबाहेर टाकलेल्या व्यक्तींना समाजात स्थान मिळाले.

एक ना अनेक बापूंचं कार्य याच ठिकाणी असलेल्या वास्तवात वाढतच होतं... या ठिकाणच्या प्रत्येक वास्तूला बापूंचा स्पर्श लाभलाय.

आजही आश्रमात ते साधंपण आणि तो दिनक्रम जसाच्या तसा जपला जातो. इथं नित्यनेमानं प्रार्थना होते आणि सूतकताई देखील होते. आश्रम परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम या ठिकाणी राहणारे स्वयंसेवक करतात.

एकदा बापूंच्या वाढदिवसाला त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांनी तुपाचा दिवा लावला त्यावेळी देशात अनेक घरात चूल पेटत नाही अशा स्थितीत आपण तुपाचा दिवा लावणं योग्य नाही असं बापूंनी सांगितलं होतं तेव्हा पासून साधेपणानं वाढदिवस होते आजही तो साधेपणा ठळकपणे जाणवत होत.

बापूंच्या आश्रमातून पुढील कार्यक्रमास निघताना देखील मनाचा हा भूतकाळातील प्रवास सुरुच होता.....

प्रशांत दैठणकर

Saturday 1 October 2011

वाचन... नव्या वळणावर


वाचन संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र आजच्या संगणक युगात वाचनाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे अशी टिका सातत्याने होताना दिसते. `ग्रंथ हेचआपले खरे मित्र ` असा सुविचार केवळ शाळेच्या भिंतीवर लिहिण्यासाठी नाही.वाचन संस्कृती घटत नाही तर वाचकांची रुची बदलत आहे. याबदलाकडे आपण डोळसपणे बघायला हवं. तशी वेळ मात्र आज आली आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगामुळे नव्या वाचकांमध्ये कार्पोरंट लूक आला असल्याने मुळ साहित्याचे वाचक कमी व्हायला लागले आहेत. माध्यम विस्ताराच्या जमान्यात1982 साली दुरदर्शनचे प्रक्षेपण विस्तारले त्यानंतर चारच वर्षात घराघरात टिव्ही दिसायला लागले. या नव्या माध्यमाची `क्रेझ` इतकी होती की सर्वजण `कृषी दर्शन `सारखा कार्यक्रम देखील आवडीने बघत असत. त्यानंतर डाऊनलिंकींगच्या सुरुवातीने वाहिन्यांची संख्या वाढवत नेली. पुढचा प्रवास भाषिक वाहिन्या आणि वृत्त वाहिन्यांचाहोता. या मोठ्या प्रमाणातील बदलाने घरातील लायब्ररीची वर्गणी केबलकडे वळली.
दुसऱ्या बाजूला साहित्य आणि त्यावरील वाद-वादंग, मानापमान नाट्य यामुळेपूर्वीचा असणारा वाचक देखील आज निराश झालेला दिसतो. या सोबतच साहित्याचं व्यावसायिकरण झपाट्याने होताना दिसत आहे. या सर्वांचा परिणाम एकूणच वाचन संस्कृतीवर दिसतोय.आपण आणि आपलं करिअर याबाबत आजची तरुण पिढी चांगली जागरुक झाली आहे. सोबतच इंग्रजीचा प्रभाव वाढला आहे. यामुळे त्या स्वरुपाचं लिखाण मोठ्या प्रमाणावर वाचलं जातय. आजच्या पिढीला वि.स.खांडेकर यांच्या कथांमधील कोमल आणि निर्मळ प्रेमाच्या आणाभाका आणि तशी पात्रं वाचण्यापेक्षा यशाचा मंत्र देणा-या जिग  झिगलर आणि शिव खेरा यांच्या पुस्तकात अधिक रस असल्याचं दिसतय.
मोठ्या शहरांमधून आलेली `कॉल सेंटर्स ` मॉल्स यांच्या जोडीला आक्रमकपणे मार्केटींग करणाऱ्या वित्तीय संस्था  यामध्ये  कमालीची स्पर्धा आहे. या शर्यतीत धावताना `इन्स्टन्ट`  आणि शॉर्ट याकडे  सा-यांचं लक्ष असतं. हा बदल वृत्तपत्र  माध्यमानं चटकन टिपला अन् त्यावर हुकूम  पुरवण्यांचा मारा सुरु केल्याने सकाळी जे हातात पडतं ते चवाचतो असं म्हणणारी पिढी आज आहे. 500 पानांचा ग्रंथ वाचण्यापेक्षा त्यांना चटकन वाचता येईल असा लेख जादा आवडतो.       
वाचन संस्कृतीवर पहिला मोठा हल्ला टि.व्ही.ने केला. आठ दिवस वाचून हीसंपत नाही अशा  कादंब-या  वाचण्यापेक्षा तासाभरात दृश्य स्वरुपात `डिस्कव्हरी `चॅनेलवर येणारी डॉक्युमेंटरी त्यांना पसंत असते. हिटलर असो वा चर्चिल त्याबाबत भारतीय पुस्तकांत अभावानेच माहिती असते परंतु ती माहिती अशा वृत्तपटातून मिळत असते. या वृत्तपटांच्या विविधतेने एक प्रकारचं आगळं ग्रंथ भांडार आपणास उपलब्ध होतंय हे या पिढीनं जाणलय असं म्हणायला  हरकत नाही.
वाचन संस्कृतीवर पुढचं मोठं आक्रमण अर्थातच इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून आलेल्या सोशल नेटवर्कींगचं आहे. मोबाईल जोवर आधुनिक नव्हते तोवर एस.एम.एस. वर भाषेची वाट लावून संवाद साधणारी नवी पिढी आता वायरलेस ऍ़प्लीकेशन प्रोटोकॉल अर्थात वॅप ने व्यापलेली दिसतात. या तंत्रज्ञानानं इंटरनेट खिशातआलय त्यात फेसबूक, व्टीटर सारखी माध्यमं उपलब्ध आहेत आणि आता थ्री जी तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानं सोबत टिव्ही त्यात आला. खोली एव्हढ्या मोठ्या संगणकापासूनचा तंत्रज्ञानाचा प्रवास खिशात ६४ गिगाबाईट क्षमतेचा मोबाईल संगणक इथवर आलाय त्यामुळे आजची तरुण पिढी त्यात रेंगाळताना दिसते. तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत होतय त्यामुळे येणाऱ्या काळात `वाचन संस्कृती ` कोठे आहे याचा शोध नक्की घ्यावा लागणार असं चित्र आज आहे.
आपल्या मुलांमध्ये विविध कलागुण विकसित व्हावेत यासाठी आज पालकवर्ग धडपडताना दिसतो. त्यांच्या प्रयत्नात मुलांना रिकाम्या वेळात छंदवर्गात अडकून रहावं लागतं परिणामी मुलं गाण्याची स्पर्धा, नृत्य स्पर्धा यात बिझी होवून जातात परिणामी त्यांना वाचन करायलाच जर वेळ मिळत नसेल तर आवड निर्माण होण्याची आणि तीजोपासले जाण्याची शक्यता दूरच आहे.
शहरात वाढलेली अंतरं आणि त्यासोबतच मुलांचा शाळा आणि शिकवणीत जाणारा वेळ यातून त्यांना वाचायला मिळणारा वेळ कमी झालय. याप्रती असणारा दृष्टीकोण पालकांनी बदलला नाही तर वाचन संस्कृती टिकणार नाही. मुलांनी नेमकं कायवाचावं याचा आपण विचारपूर्वक आढावा घेऊन त्यांना तशी पुस्तकं उपलब्ध करुनद्यायला हवी. संस्कारक्षम वयात वाचनाचे संस्कार झालेच नाहीत तर पुढे त्याला याबाबत आस्थाही वाटणार नाही.
- प्रशांत दैठणकर