Saturday 31 December 2011

Happy New Year 2012


जाता जाता हे वर्ष खरच नाही कळलं की हे असं किती चटकन हो सरलं. हा संवाद नेहमीच आपण करतो. नव्याचं स्वागत करताना आपण पटापट आपले संकल्प करायचे आणि काही काळात ते विसरायचे हे मागील पानावरुन आयुष्य पुढे चालू ठेवल्यासारखंच आहे. का म्हणून आपण संकल्प करतो हे का विचारावं. करावा आणि विसरावा हा एक सवयीचाच भाग झालाय इतकंच. आकड्यांचा हा सारा खेळ. आपलं आयुष्य या आकड्यांशी जोडलं गेलय हे मात्र खरं.
      पहिलं गेलं आणि दुसरं आलं.. काय दिलं जाणा-यानं आणि नव्याने येणा-यानं काय आणलय आपल्या पोटलीत याचा विचार करीत झिंगत रात्र काढायची सवय आता लागत आहे. ही रात्र का दारूत घालायची याचा विचार कोणीच करीत नाही. होळीला बोंबा का मारायच्या हा सवाल कोणी कधी विचारलाय का. बोंब तर सारेच मारतात तसा काहीसा हा प्रकार तर होत नाही ना असं वाटतं.
      काळ तसा कुणासाठी थांबत नाही आणि थांबला तर ते चालत नाही असं काहीसं मत माझा वर्धेतील मित्र दर्शन राऊत यानं काही वेगळ्या शब्दात लिहीलय.
      




      जिंदगी क्या है, एक काली नागीन
      लमहा लमहा सरकती जाती है..
      सोंचता हुं गर रुके तो प्यार करू
      कंबख्त.. रूकती है तो काट खाती है..
हा विचार खुपच वेगळा आहे. येणारा काळ देखील काही वेगळं घेऊन यावा ही नव्या वर्षाकडून अपेक्षा..
Wish you A Very Happy New Year 2012

Tuesday 27 December 2011

pacific sports: नागपूर एक्‍स्‍प्रेसचा दिवस

pacific sports: नागपूर एक्‍स्‍प्रेसचा दिवस: बहुचर्चित अशा मेलबॉर्न मैदानापासून भारताला कमी यश मिळालय अशा बॉक्‍सींग डे कसोटीची सुरुवात झाली. गो-या साहेबाचा हा खेळ म्‍हणज...

Thursday 22 December 2011

आठवणींची प्राजक्‍त फुलं ...!

सौजन्य मायबोली
 मन अचानक असच निघालं आणि झाटकन गेलं ते त्‍या कॉलेजच्‍या काळात. होतं असं कधी कधी. कॉलेजचा तो कट्टा मनाला खुणावत असतो आणि सवंगड्याच्‍या  बोलण्‍याचे डिटेल्‍स आठवत राहतात.
     सारंग टाकळकर, प्रवीण देशमुख, संदीप पालोदकर, अर्चना मेढेकर, दिपा राहुरीकर, भालचंद्र जावळे, सुन्‍या,मंगेश देसाई, मकरंद अनासपुरे, पंकज कुबेरकर, गजानन मांजरमकर, सुरेश बोडखे, अनिल काळे अशी नावं डोळ्यासमोर यायला लागतात. कॅम्‍पसमध्‍ये आम्‍ही सारी वस्‍ताद मंडळी. धिंगाणा करायला अग्रेसर तसेच सांस्‍कृतिक धिंगाणा करायला देखील ही सारी मंडळी आठवली इथ युवा महोत्‍सवातला जल्‍लोष बघून.
     युवक महोत्‍सव आणि त्‍याची तयारी ते नाटकांचं असणारं वेड आणि आपलीच गँग आणि आपलं कॉलेज पुढे राहील याची धडपड असायची. एका बाजूला नाटकाचा तर दुस-या बाजूला नृत्‍याचा, मग नृत्‍यात सुरेश बोडखे आणि अनिल काळे. अन्‍याचे एक डान्‍स बसवला त्‍यात मला पंजाबी नृत्‍याचं ज्ञान सल्‍याने तो सारखा चिडत राहीला आणि खांदे नेमके कसे उडवायचे हे मला काही जमलं नाही.
     अन्‍या आणि सुरेश कॉलेजची शान होते. त्‍यावेळी ब्रेक डान्‍सचं फॅड जोरात होतं आणि आणि दोघेही कमालीचे डान्‍सर. नाही म्‍हणायला अन्‍या सेाबत राहून चार स्‍टेप मला देखील शिकता आल्‍या. त्‍यावेळी अन्‍याची एसबी कॉलनीत रुम होती. ही रुम बराच काळ आमचा अड्डा होती. इथच तो ब्रेकडान्‍सचे क्‍लास चालवायचा.
     युथ फेस्‍टीव्हलला डान्‍स बसवायचं काम अन्‍याचं एका बाजूला डान्‍स आणि दुस-या बाजूला सुन्‍या, अष्‍ट्या, मक्‍या मंग्‍या, भालू यांच्‍यासोबत नाटकाची तालीम असा कॉलेजचा अर्धा काळ सांस्‍कृतिक धिंगाण्‍यात जात असे. सोबतच समीर पाटील सम्‍या , जितेंद्र पानपाटील जितू अशी मंडळी नाटकाच्‍या कंपूत होतीच.
     ते दिवस कधी कॉलेजला पोहोचतो मी असं म्‍हणायचे दिवस होते. त्‍यावेळचा क्षण न क्षण आजही ताजा आहे अगदी पहाटे पडणा-या प्राजक्‍तासारखा आठवणींची ही फूलं कधीच कोमेजणार नाहीत हे देखील सत्‍य आहे.
                                   - प्रशांत दैठणकर 

pacific sports: सौरवचं चॅपेल प्रेम ...!

pacific sports: सौरवचं चॅपेल प्रेम ...!: बॉक्‍सींग डे टेस्‍ट मॅचचे कुतूहल सर्वांनाच आहे. हे कुतूहल मैदानावर होणार असलेल्‍या खेळाचे तर आहेत त्यासोबतच मैदानाबाहेर रंगत असलेल्‍य...

Saturday 17 December 2011

pacific sports: भारत रत्‍न ...!

pacific sports: भारत रत्‍न ...!:            आणि सचिन तेंडूलकरला भारत रत्‍न देण्‍याचा मार्ग अखेर मोकळा झाला अशा आशयाच्‍या बातम्‍या आज सर्व वृत्‍तपत्रात आहे. कधी काळी याचप्रम...

Friday 16 December 2011

मला फेसबुकानं झपाटलं...


     मानसशास्‍त्र हा गुंतागुंतीचा विषय आहे आणि त्‍यातून निघणारे तर्क हा त्‍या ही पलिकडचा प्रवास असतो. भविष्‍य जाणून घेण्‍याचं कुतूहल सर्वांनाच असतं, म्‍हणतात ना उम्‍मीदपर दुनिया कायम है. ही उम्‍मीदच माणसाला जगवते आणि कधी कधी नाचवते देखील.
     याच प्रकारची पुनरावृत्‍ती आपणास नव्‍या जगाचं व्‍यासपीठ झालेल्‍या  फेसबूकवर दिसते. चार क्षण आनंदाचे आपणाला जगता आले तर उत्‍तम वाटता आले तर अधिक उत्‍तम अन् शक्‍य नसेल त्‍यावेळी बघता आले तर चांगलं या भूमिकेतून फेसबूकवर पडीक असणा-यांची संख्‍या कमी नाही.
           ज्ञानेश्‍वरांनी भिंत चालवली
           आजचे ज्ञानेश्‍वर वॉल चालवतात
           कधी ती रंगवतात प्रेमानं
           कधी कधी धुळवड करुन
           त्‍याच वॉलवर चिखल उडवणं
           न जाणत्‍यांच्‍या शब्‍दात अडकून
           मनातनं प्रेमात पडणं
           समोरच्‍याच रडक्‍या लिंक बघून
           मनापासून मग ते रडणं
           काही जणांना जमतं डेअरिंग
           आपण फक्‍त करावं शेअरिंग
                     - इति-प्रशांत
     आता फेसबूकची गंमत वाटते ती इथही भविष्‍य सांगण्‍यासाठी अनेकांनी दुकानं उघडलीत आणि त्‍यातले प्रकार रंजक आहेत.
     तुमचा फोटो बघून तुम्‍ही कसे आहात हे सांगणारे इथं आहेत.
एकदा अलाव् केलं की रोज फॉरच्‍यून कूकीज (राशीभविष्‍य) चा वरवा (रतिब)टाकणारे इथं आहेत.
     तुमचे टॉप टेन फ्रेण्‍ड तुम्‍ही नाही तर त्‍या सॉफ्टवेअरने सांगायचे. सगळा हा आभासी जगाचा खेळ, लायकीचं विचारु नका पण `लाईक` करत नाही याचा अर्थ तुम्‍हाला मॅनर्स नाहीत असा समजला जातो. मराठीत सांगायचं तर मराठी लिहा.. नाही जमत नाही म्‍हणत मराठी शब्‍द इंग्रजी लिपित लिहायचे असा अनोखा प्रकार इथं घडताना दिसेल.
           इंग्रजीच्‍या हट्टापायी
           शब्‍द शब्‍द हा पडला
           फेसबूकच्‍या नादापायी
           वृक्ष ज्ञानियांचा झडला
                  - इति प्रशांत
     असं. या फेसबूकच्‍या मराठी बाबत म्‍हणावं लागेल.
     तुम्‍ही कोणाच्‍या टॉप टेन मध्‍ये आहात हे संगणकाच्‍या पडद्यावर झळकताच तुमचा चेहरा उजळतो. स्‍टेट्स अपडेट करायची इतकी धडपड आणि घाई... घरात आईबापाशी बोलायला या वेड्यांना वेळ नाही.
     मधल्‍या काळात सा-याच समाजाला डिस्‍कोनं झपाटलं होतं आणि `इथून तिथून मिथुन` फिरायला लागले होते. आता फेसबूकनं झपाटलय फरक फक्‍त इतकाच इथ फिरत नाहीत तर सारे त्‍या स्‍क्रीनला चिटकून बसले आहेत इतकच.
                                     - प्रशांत दैठणकर

pacific sports: ऑडी हो तो रवि शास्‍त्री की ... !

pacific sports: ऑडी हो तो रवि शास्‍त्री की ... !: विंडीजचा सफाया करुन भारतीय क्रिकेट संघाने आता ऑस्‍ट्रेलिया दौ-याची वाट धरलीय. अर्धा संघ ऑस्‍ट्रेलियात दाखल देखील झालेला आहे. ऑस्‍ट्रेल...

Wednesday 14 December 2011

सायकल बघावी चालवून... !

आठवणींच्‍या सागरावर सर्फिंग करताना मन क्षणात एका लाटेवरुन दुस-या लाटेवर स्‍वार होत जातं आणि अल्‍पावधीत सुरुवात कुठे झाली हे आपण विसरतो असं काहीसं चंचल असणारं हे मन. मात्र ही चंचलता काही घटनांच्‍या बाबतीत शिथिल होते आणि मन एखाद्या लाटेवर अडकतं. रेकॉर्ड प्‍लेअरच्‍या सुईप्रमाणे एकच वाक्‍य पुन्‍हा पुन्‍हा  ऐकावं तसं काहीसं असणारं हे मन आणि काहीशा तशा घटना.
     लहानपणी होणारे अपघात हे नवीन नाही मात्र त्‍यातील गंमत-जंमत कधी कधी त्‍या अपघातांना विनोदाची किनार देते आणि प्रसंगी आठवला की मनातून हसू येतं. मी माझा छोटा दोस्‍त मनीष कुलकर्णी. आम्‍ही नव्‍याने सायकल शिकलेली सायकलवर फेरफटका मारायचा मला छंदच जडला.
     वडील ऑफिसमधून आले की त्‍यांची सायकल घेऊन गायब व्‍हायचं आणि औरंगपुरा कधी एसबीचं लाल ग्राऊंड, आमचा सराव सुरु असायचा. जरा दूर भटकायला जायचं म्‍हणून मी मनीषला सोबत घेतलं तो समोर सायकलच्‍या दांडीवर बसायचा रपेट मारत आम्‍ही खडकेश्‍वरच्‍या मंदीरापर्यंत आलो.
   खडकेश्‍वरच्‍या महादेव मंदीरात श्रावणी सोमवारला जत्राच भरायची इतर वेळी मात्र शांतता. त्‍या शांत अशा मैदानावर चार फे-या करुन आम्‍ही निघालो. येताना अंजली टॉकीज समोरचा उतार, गाडी वेग घेणारच. सायकलच्‍या दांडीवर हा मन्‍या आणि सायकल वेगानं निघालेली. पुढचा. क्षण ... !
    टॉकीज ओलांडून पूलापर्यंत आलो आणि काय झालं कळलंच नाही. चित्रपटात दाखवतात तसं स्‍लो-मोशन मध्‍ये मी हवेत जात होतो. सायकल मागिल बाजूने उंच झालेली. मी समोर पडतोय हे मला दिसत होतं आणि आम्‍ही दोघेही पडलो एक क्षण पूर्ण अंधार ......... डोळे उघडून बघतो तर आसपासचे तीन-चार जण धावत आलेले. त्‍यातील एकाने प्‍यायला पाणी आणलं होतं. त्‍यांनी आम्‍हाला धीर दिला. मला चिंता छोट्या मन्‍याला कितपत लागलय याची.
     जरा सावरुन पाणी पिऊन चार ठिकाणी खरचटलं रक्‍त आलं हे जाणून दोघेही निघालो. सायकल हातात धरुन नेटानं ढकलत घरापर्यंत पोहोचलो. सुदैवाने घरी कुणी रागावलं नाही. काही नवं करताना असं चालयचच. पडो-झडो माल वाढो अशी म्‍हण माझी आई वापरायची ... मला नेमका अपघात का झाला हाच प्रश्‍न पडलेला.
     जखमांमुळे पुढे 15 दिवस सायकल बंद झाली. मी मन्‍याला विचारत होते अरे नेमकं काय झालं की आपण असं शिर्षासन केलं सायकलवर पण मन्‍या. सांगे ना ... महिना भराने गप्‍पा मारताना मन्‍याला राहवलं नाही. त्‍यानं ते कोडं सोडवलं माझ्या डोक्‍यातलं.
     अरे यार आपण निघालो उतारावर त्‍यावेळी मला हवा कमी वाटली म्‍हणून मी समोरच्‍या चाकातली हवा चेक करायला चाकात हात घातला... मला तेव्‍हाही आणि आता प्रसंग लिहितानाही हसू फुटतं... ऐसा भी होता है. आणि प्रसंग पुन्‍हा नव्‍यानं ताजा होत जातो.
                                            पॅसिफिक

Monday 12 December 2011

आई...!












तिच्या बाबत काय लिहावं..
ती सार होती आयुष्याचा..
ती आधार होती जीवनाचा..
ती एक विश्वच होती..
ती विश्वास होती..
मला जन्म देणारी..
जन्माआधी ९ महिने..
ती माझा श्वास होती..
ती माता.. ती मंदीर होती..
आहोत तोवर हे जग..
हेच तिनं शिकवल..
त्याच तिच्या बोलांवर..
चालतोय तिच्या पावलांवर..
आठ वर्षे आठवणींची..
जाणवत राहतं मला सतत..
ती गेली ते फक्त देहानं..
मनानं ती आजही इथं आसपास..
रात्री मायेनं फिरणारा एक हात..
पाऊस पाझरतो.. या मनात..
तीचं नसणं आता सवयीचं..
चालावच लागणार इथं
शो मस्ट गो ऑन..

ती.. तिची माया अपार...
रात्री न कंटाळता ३ वाजता
गरम जेवण बनवून देणं..
आता कधी इच्छाच न राहली..
तिच्यासोबत ती मायाही गेली..
ती प्रेमाचं ते आगर..
ती वात्सल्याचा असीम सागर..
ओंजळच माझी तोकडी..
आणि रितीच राहिली घागर..
ती आई.. तीच घर..
तीचे वाट बघणारे ते डोळे..
आजही.. याद आहे तिची..
अन् तेच आता बाकी...
आयुष्यात येणं- जाणं..
चालू राहणार हा जमाखर्च..
बेरीज केली नाती.. खरी.. खोटी
ती गेली कायमची...
करून कोरी आयुष्याची पाटी..

प्रशांत १२-१२-११

Thursday 8 December 2011

अभिव्‍यक्‍तीची सुनामी ... !


          सध्‍या आपल्‍या आसपास जी परिस्थिती दिसत आहे ती माहितीच्‍या अणुस्‍फोटाचा परिणाम आहे. मुक्‍त अर्थव्‍यवस्‍था आल्‍यावर काय होवू शकतं ते आपण बघितलं आहे. त्‍याच प्रकारे माहितीचा स्‍फोट झाल्‍यावर काय घडू शकतं ते सध्‍या घडतय.
     लहान मूल म्‍हणजे जन्‍माला आलेलं बालक देखील रडण्‍याच्‍या माध्‍यमातून भावना व्‍यक्‍त करतं तसं प्रत्‍येकाच्‍या व्‍यक्‍त होण्‍याला माहिती तंत्रज्ञान क्रांतीनं नवं परिमाण दिलं. आमंत्रण-निमंत्रण या मर्यादांच्‍या पलिकडे जाऊन व्‍यक्‍तीला व्‍यक्‍त होण्‍याचं तंत्र फेसबूकनं दिलं त्‍यामुळे ही अभिव्‍यक्‍तीची सुनामी आली आहे.
     व्‍यक्‍ती तितक्‍या प्रकृती आणि प्रवृत्‍ती असं म्‍हणता येईल. नायक आहे म्‍हणून खलनायक आणि खलनायक नसेल तर नायक येणार कुठून हेच खरं. हे असं झालं की कोंबडी पहिले की अंडं पहिले. पण हे चालणार. या जगात नाण्‍याच्‍या दोन बाजू आहेत.
     या माध्‍यमाचा वापर करणारे जसे आहेत तसेच गैरवापर करणारे देखील आहेत. त्‍यात फरक फक्‍त प्रगल्‍भतेचा आहे. प्रगल्‍भता यायला वेळ आहे इतकं सांगता येईल कारण आता कुठे मुक्‍त छंदाला सुरुवात झाली आहे. यमकातून मुक्‍त छंदाकडचा प्रवास असाच अपरिपक्‍व असणार त्‍याला प्रगल्‍भ व्‍हायला वेळ लागेल पण निश्चितपणे प्रगल्‍भता येईल. तो प्रवास अद्यापही अपूरा आहे.
     समाजमन प्रगत आणि प्रगल्‍भ असेल तर काय घडू शकतं हे `फ्लॅश इव्‍हेंट ` च्‍या रुपाने लंडन, न्‍यूयॉर्कच्‍या रेल्‍वेस्‍थानकांवर नेहमीच दिसतं. आपल्‍याकडे आता कुठे याला सुरुवात झाली आहे. हजारो लोक ज्‍या अतिरेकी  हल्‍ल्‍यात मरण पावले त्‍या वर्ल्‍ड ट्रेड सेंटरवरील हल्‍ल्‍याचे प्रक्षेपण सलग आठ दिवस बीबीसी व सीएनएन वाहिन्‍या दाखवित होत्‍या मात्र एक क्षणही छिन्‍नविछिन्‍न देह किंवा रक्‍ताचा सडा न दाखवता घटनेचं गांभीर्य त्‍यांनी दाखवलं ही प्रगल्‍भता.
     विदेशात माध्‍यमं 50 च्‍या दशकातच खुला श्‍वास घेत होती त्‍यांचा प्रवास खूप मोठा आहे. आपलाही प्रवास तसा मोठा राहणार नाही. कारण आपण सर्व भारतीय जन्‍मजात बुध्‍दीमान आहोत. माध्‍यम प्राप्‍त होताच आरंभीच्‍या घाईत ही गडबड सुरु आहे त्‍यापुढे पाणी नक्‍की  स्थिरावेल आणि प्रगल्‍भता येईल.
     आयेगा वो दिन जरुर आयेगा !
                                  प्रशांत दैठणकर