Monday 22 October 2012

कभी कभी मेरे दिलमे...!

साऱ्या सिनेजगताला आणि सिनेरसिकांना स्वप्न दाखवणारे यश चोप्रा गेले... चॅनेलवाले न्यूज ब्रेक करीत होते आणि त्याचवेळी एक लंबा प्रवास भूतकाळाकडे मनाने सुरु केला होता. नावातच यश असणारे यश चोप्रा यांनी अतिशय सुंदर पध्दतीने प्रेमाला पडद्यावर आणलं. अनेक पिढ्यांच्या प्रेमाचे ते सारे चित्रपट साक्षीदार आहेत.

आपल्या आयुष्याला जोडणारे प्रसंग आपणास पडद्यावर दिसले आणि आपलं प्रतिबिंब त्यात जाणवलं तरच आपण तो चित्रपट जवळ करतो आणि यशजींचे सर्वच चित्रपट या कॅटेगरीत मोडत होते त्यामुळेच ते ब्लॉकबस्टर ठरले त्यांच्या चित्रपटातील जमेची बाजू म्हणजे कथानकात विभिन्न प्रकारचे केलेले  प्रयोग आणि चित्रपटाचं संगीत.

भारतीय सिनेमा संगीतप्रधान आणि रसिकांची त्याला मान्यता आहे. संगीत ऐकणं हा आमच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. कानसेनांना तृप्त करणारी गाणी चित्रपटात पेरता आली पाहिजे इतकंच. कभी कभी मेरे दिलमे... धीर गंभीर आवाजात अमिताभने व्यक्त केलेला रोमांस आणि त्यानंतर खुलणारं गाणं.

सिलसिला हा अमिताभ जया आणि रेखाचा वैयक्तिक आयुष्याचा पट आहे असं गॉसिप झालं असलं तरी असा सिलसिला घरोघरी कुठे व्यक्त कुठे अव्यक्त स्वरुपात कुटुंबांमध्ये आहे त्या समाजाचं प्रतिबिंब या निमित्ताने रुपेरी पडद्यावर उमटलं त्यामुळेच सिलसिला हिट झाला अमिताभ मधला रोमॅन्टीक हिरो यशदांनी समोर आणला त्यापूर्वी त्याला अँग्री यंग मॅन च्या प्रतिमेत सारे बघत होते. अनिल कपूरच्या टपोरी, उडाणटप्पू अशा लखन इमेजला धीर गंभीर नायक म्हणून दाखवण्याचं काम लमहे ने केलं हनी इराणी ने आपल्या पतीला अर्थात जावेद अख्तरला मागे टाकत सुंदरसं कथानक या चित्रपटाला दिलं या कथानक खरोखर काही डिफरंट असं पडद्यावर आलं होतं.

शाहरुख आणि यशजी यांची जोडी तर कुणीही विसरु शकणार नाही हा यशराजच्या करिअर मधला एक स्वप्नवत काळ होता. माधुरी, करिना, ऐश्वर्या नायिका बदलत गेल्या पण शाहरुख एका बाजूने कायम राहिला. आणि त्यांचा अखेरचा अद्याप प्रदर्शित व्हायचा जबतक है जान देखील शाहरुख सोबतच होता पुन्हा नायिका बदलली आता अनुष्का आली.

स्वप्नं तयार करणं आणि आठवणींची जपणूक करणाऱ्या मनाला कायम ताजेपणांन जगायला लावणं हे यशजींच्या यशाचं गमक... किती जगलात यापेक्षा काय जगलात हे महत्वाचं असा संदेश देणाऱ्या या महान दिग्दर्शकाला अखेरचा सलाम.

अलविदा यशजी, अलविदा....!

Prashant Daithankar
9823199466
dpacifics@gmail.com

Thursday 11 October 2012

बाबू मोशाय







बाबू मोशाय..... जहाँपनाह.. बादशाह... शहेनशाह... बादशहा खाँ.... विजय दिनानाथ चव्हान..... And on and on…. And on… सत्तरीच्या दशकात जगासमोर आलेला हा अँग्री यंग मॅन... अमिताभ हरिवंशराय बच्चन... आज सत्तरीचा झाला त्याला भावी आयुष्यात उदंड यश मिळो हीच कामना.. आज मी चाळीशी पार केल्यावर घर म्हणून विचार करतो त्यावेळी मला अमिताभ बच्चन. लता मंगेशकर सचिन तेंडूलकर हे आपल्याच घरातील सदस्य वाटतात. इतके आपण यांच्यात गुंतलो आहोत. त्यातल्या त्यात अमिताभ तर .. बोलायलाच नको.
                  त्याची पहिली भेट अर्थातच औरंगाबादच्या स्टेट सिनेमाच्या पडद्य़ावर झाली.. चित्रपट होता शोले... नंतर काळाच्या प्रवाहात वेगवेगळ्या संदर्भातून तो आपला होत गेला... संदर्भ तो यारानातील मैत्रीचा कधी होता तर कधी लक्षात रहाणा-या शराबीचा होता... महाविद्यालयीन काळात म्युझीकल फिशपाँड मध्ये एकदा एका सुंदर कन्येला.. १८ बरसकी तू होने को आयी रे... जतन कुछ करले.. चा देखील होता. आता चाळीशीत सारे आठवताना एक जाणवतं की आपण त्याला तंतोतंत फॅन म्हणून नाही तर आपल्या आयुष्याशी जोडत गेलो.. त्यात मग रेखा आणि अमिताभ यांचा .. जगताना हे सारं जाणवतं.








                     मला जे वाटतं ते असं की हा सिलसिला आवश्यक आहे. त्याच्या करिअरला ते वळण अतिशय गरजेचं होतं. त्याला अमिताभ बनविण्यासाठी ती होती. आयुष्यात प्रत्येकाला आपल्यातला हिरो बाहेर काढण्यासाठी प्रेरणा गरजेची असते आणि ती त्याची प्रेरणा होती. कान्हा कुणाचा तर तो राधेचा.. असं काही तरी हे गणित आहे. सार हाच की त्याच्या कारकिर्दीला अनोखं वळण देणारी ती होती. नाही म्हणायला अमिताभने जयासोबतही सिनेमात काम केलं पण ती केमिस्ट्री नाही जुळली.. नायकाला नायिका हवी.. ती रेखा गणेशनच होती ही बाब नाकारता येणा नाही. ही प्रेरणा कोण कुणाला, कधी, कशा माध्यमातून देईल हे सांगता येत नाही.

हा महानायक काळानुसार बदलत गेला.. कधी काळी कभी कभी चित्रपटात त्याची नायिका असणारी राखी १९८२ च्या मुशीर रियाजच्या शक्ती मध्ये त्याच्या आईच्या भुमिकेत आली.. नायकाचं मोठेपण हेच असतं.. तो आजही चित्रपटात सम्राटच आहे आणि त्याची लोकप्रियता वाढतच आहे.. आणि ती वाढतच राहणार... हीच त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा..


प्रशांत दैठणकर