Saturday 19 January 2013

औपचारिकतेकडून औपचारिकतेकडे

       झपाट्याने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात काय  आणि कसं घडेल याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. संवाद साधनांमधील मोठी क्रांती जग जवळ आलं हे सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र आपण अधिक औपचारिकहोत आहोत आणि दुसऱ्या बाजूला खुलेपण स्वीकारत आपली स्वत:ची पर्सनल स्पेस घालवत आहोत असं फेसबुकवर बघताना जाणवतं.
            मुंबैकरांचं अधिक आयुष्य लोकलच्या प्रवासात जातं म्हणून त्या प्रवासात जिवाभावाचे मैत्र होणं त्यातून लोकलच्या उब्यात गणेशोत्सव साजरा करणं हे समजण्यासारखं आहे. पण आज फेसबुकवर जी पोस्ट दिसली ती निश्चितपणानं विचार करायला लावणारी होती.. लिहिलं होतं मैत्रिणींनो फेसबूकवर संक्रांत हळदीकुंकू कार्यक्रम ठेवला आहे...! छानच म्हणजे एकमेकांच्या घरी जाण्याचे निमित्त देखील नाकारणं असं याला म्हणावं का. नाण्याची दुसरी बाजू.. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सखींसोबत हळदीकुंकू करता येईल.
            या व्हर्च्युअल दुनियेत आपण किती गुंतायचं हा खरा सवाल आहे.. हे म्हणजे एक व्यसनच आहे. कालच गप्पांच्या ओघात सातत्याने फोनचा अडथळा आल्यावर माझे एक पत्रकार मित्र झटकन म्हणाले, साहेब या मोबाईल फोनलाही लोडशेडींग असायला पाहिजे.
            संवाद साधनं जीवनात उपयोगी आहेत हे खरं पण ही साधनं आपल्यातला औपचारिकपणा वाढविण्यासोबतच आपला प्रामाणिकपणाही संपवत आहेत... फोन वर पहिला प्रश्न असतो.. कुठे आहात..? फोन हे संपर्काचं साधन आहे ते पत्ता विचारण्याचं किंवा सांगण्याचं साधन नाही. आपणास नको त्या व्यक्तीचा फोन आल्यावर आपलं स्थान खूप दूर आहे, बाहेरगावी आहे असं खोटं सांगणं आताशा सर्वांना अंगवळणी पडलय.
            मोबाईलचा वापर प्रतिष्ठेचं लक्षण झालय मात्र पैसा नसल्यानं केवळ मिसड् कॉलवर भर देणारे अनेकजण इथं आहेत. तीच बाब फेसबूकची इथं खरा कोण हे ओळखणं खरच अवघड आहे. फेक प्रोफाईल असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्यातूनच सारे एकमेकांशी अंतर राखून असतात. सारे औपचारिक असतात.
            आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नवा वैश्विक टप्पा म्हणून फेसबूककडे बघतो मात्र औषधाच्या परिणामांसोबतच दुष्परिणामांकडेही तितक्याच सजगपणे आपण बघायला हवं असं मला वाटतं.
 
                                                                                              -प्रशांत दैठणकर

Thursday 10 January 2013

चालायचं... चालत रहायचे...!


चालणं हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. चालणं कसं आणि त्यातील लकबी याबाबत एक-दोन नव्हे तर अनेक म्हणी तसेच गाणी आपणास सापडतात अगदी चटकन आठवणारं गाणं म्हणजे.. हिची चाल तुरु तुरु किंवा तितकच लोकप्रिय राहिलेलं.. नको चालूस दुडक्या चाली.. जीव होतोय वरती खाली.. चालण्याचे संदर्भ आपल्या मनात अनेक असतील.
     आशाबाईंचं चांदण्यात फिरतांना.. धरलास हात म्हणणाऱ्या प्रेमिकेच ते, चांदण्यात चालणं श्रवणीय असं आहे. मूल चालताना पहिल्यांदा बघितलेला क्षण प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो.. मूल रांगणं म्हणजेच त्याची पुढे जाण्याची धडपड आणि  चालण्याचा जोरदार प्रयत्न असतो आणि त्याचा पुढचा टप्पा पळण्याचा / धावण्याचा असतो.
     बापूंची दांडीगावार्यंतची यात्रा आणि त्यातून रुढ झालेला दांडीयात्रा हा शब्द मिठासाठीचा हा सत्याग्रह मराठीला नवा शब्द देणारा ठरला. बापू चालले आणि देश चालला आणि पुढे स्वातंत्र्य चालतच आलं असं म्हणावं लागेल.
     चालणारे आपण कसे जाणार असं विचारल्यावर 11 नंबरची गाडी असा शब्दप्रयोग गंमतीने करतात. लहानपणी आजी अंगणात चांदण्या मोजताना गोष्ट ऐकवायची त्यातला राजकुमार निबिड अरण्यातून राक्षसाच्या गुहेपर्यंत जायचा त्यावेळी त्याला असणारे दोन रस्ते एक छोटा पण संकटांनी भरलेला तर एक विना अडचणीचा आणि लांब रस्ता.. त्या अडचणीच्या रस्त्यावर चालत संकटाचा मुकाबला करीत आपणही डोळे मिटून जंगलात चालायचोच ना.
     वाहनं उपलब्ध नाहीत अशा काळात पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी काशीचा प्रवास म्हणजे काशी यात्रा ही आयुष्यातील शेवटची यात्रा म्हणूनच सर्वजण घरातून निघायचे वाटेवरले वाटसरु, पथिक कधी कधी वाटमारीचे बळी ठरायचे त्यामुळे बेरड हा साऱ्यांच्या आठवणीचा एक भाग होवून गेला आहे.
     चलते चले.लहरोंके साथ ... आदमी मुसाफिर है चालमे झटका.. लगे पचासी झटके.. अनेक अनेक गाणी हिंदी चित्रपटात आहे. काही गाणी आपल्या मनात उभं राहणाऱ्या चित्रापेक्षा वेगळी असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे रुक जा ओ जानेवाली रुक जा, मै तो राही तेरी मंजील का..या गण्यातला नायक चक्क हातातून घसरुन गेलेल्या दारुच्या बाटलीला उद्देशून हे गाणं म्हणतोय हे चित्रपट बघितल्यावरच कळतं.
     हे असं चालायचचं, चाल करुन जाणे... केवढा हा चालूपणा...! पायात-पायात चालू नको..., कसं चाललय आपलं..? चालूगिरी, चालूपणा, चवचालपणा अशा अनेक अर्थानं मराठीत यातून आलेल्या शब्दांना आपण चालवून घेतो.. कुठं कुठं तर पैसेही चालतात बघा. हे सारं चालू पुराण संपवताना एक संदेश आठवतो. तूम्ही आम्ही ठाकूर रविंद्रनाथांचा संदेश कायम स्मरणात ठेवून आयुष्याची वाट चाल करायची तो म्हणजे एकला चलो रे...!

                                                                                                            --प्रशांत दैठणकर--

Wednesday 9 January 2013

Digital Devide


जगातला हा डिजिटल दुभंग आज अँग्री यंग मॅनची आठवण करुन देणारा असाच आहे. या जगाच्या चव्हाट्यावर आपले गुण मांडण्यासोबत आपला आक्रोशही व्यक्त करण्याचा प्रयत्न नवी पिढी करते आहे आणि तोच फेसबुकच्या पानापानावर उमटलेला दिसतोय.
     ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती आता नव्या पिढीचे ज्ञानेश्वर वॉल चालवताना आपणास दिसतात. अमेरिकेत भिंतीवर रंगांची ग्राफिटी करणारी पिढी आहे त्याच पिढीला कॅनव्हास देण्याचे आणि अमर्याद कॅनव्हास देण्याचं काम फेसबूक सारखा मिडिया आणि विविध ब्लॉग्जनी केलेलं आहे.
     या माध्यमाची ताकद अमर्याद अशीच आहे. यात पालकांनी जागरुक रहायची गरज आहे. नागरिक म्हणून आपण स्वत: आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी आणि पालक या नात्यानेही माध्यम सुरक्षा असणं ती जपणं याची खबरदारी आपण घेण्याची गरज मान्य केली पाहिजे.
     सोशल मिडियाची आपल्या पुढच्या पिढीला आवश्यकता आहे. जसा भेद मोठ्या शहरातील मुले आणि ग्रामीण मुले यांच्यात आहे तसा आणखी एक भेद आता जन्माला येत आहे. केवळ इंग्रजी बोलता येत नाही म्हणून ग्रामीण भागातील मुलामुलींना कमीपणा वाटतो. मुलांना हा मिडिया उपलब्ध करुन देणं गरजेच त्यासाठीच आहे. काय साधं फेसबूक अकाऊन्ट नाही तुझं किंवा तुझं मेल अकाऊन्ट नाही किंवा स्मार्टफोन नाही असं आताच मुलं बोलताना दिसतात. आपण मुलांना इंटरनेट वापरु न दिल्यास त्यांच्यातही ही कमीपणाची भावना लवकरच निर्माण होणार आहे हे लक्षात ठेवा.
     प्रत्येक घरात टिव्ही सोबत आता कॉम्प्युटरही आवश्यक झालाय. आपल्या मुलांना आत्मविश्वास देण्यासाठी आधीच्या पिढीने काळाची पावलं ओळखून मुलांसाठी ही साधनं द्यायला हवी अन्यथा ही मुलं वैफल्यग्रस्तही होण्याचा धोका आहे. तेव्हा हा डिजिटल डिव्हाईड स्वीकारा आणि ही दरी कमी करण्याचा प्रयत्न करा इतकच सांगण.

-       प्रशांत दैठणकर