Saturday 7 November 2015

तमसो मा ज्योतिर्गमय

आज दिवाळी... दिवाळी म्हटलं की खूप काही ... मुळात आयुष्याचा उत्सव करणारे तुम्ही - आम्ही शेतीप्रधान संस्कृती जपणा-या  देशात शेती झाल्यानंतर चा काळ फुरसतीचा काळ म्हणून त्यात सण - उत्सवांची रचना सृजनात्मक कामांसाठी केली. उत्सवांची परंपरा जोपासतांना त्यातील सर्वात मोठा सण अर्थात उत्सवांचा उत्सव म्हणजे महाउत्सव  असणारा हा दिवाळीचा सण


दिवाळी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात निरनिराळया अनुभव आणि अनुभूतीचा काळ पहाटवा-यात कुडकुडत अंधारात घरात आई अंगाला तेल लावून द्यायची मग त्या सुंगधी उटण्याचा दरवळ. त्या थंडीत अंगावर पडणारं ऊन-ऊन पाणी मग त्यामुळे अंगभर दाटणारी थंडी अशी दिवाळीची पहाट जागवली जायची .

दिवाळीचे फटाके आणि आपटबार हल्ली अधिक आवाज करायला लागले.... त्याकाळी केवळ साध्या आवाजी टिकल्यांचा निनाद असायचा काळाच्या ओघात त्या देखील टिकल्या नाहीत. आलेल्या पैशांच्या सधनतेतून त्याच्या जागी कानाच्या पाळयादेखील हादरवरणारे बॉम्ब आले आणि दिवाळीत सर्व ठिकाणी बॉम्बाबोंब सुरु झाली.

दिवाळी सण म्हणजे आठवणींची एक वाठवण आहे. स्वच्छ अंगण करुन टाकलेला सडा, दारासमोर रांगोळी काढणा-या सुवासिनींच्या रांगा .. कष्टानं कितीही थकल्या तरी त्या आपल्या पध्दतीनं " आली माझ्या घरी ही दिवाळी म्हणत आपली कला दाखवायच्या दिवाळी म्हटलं की दिवाळीच्या सुट्टया आणि मग बाजारातून बांबुच्या काडया आणायच्या रंगीत ताव आणि काडयांचा केलेला तो आकाश कंदील... होय आकाश कंदीलच दिवे म्हणजे चैन आणि चायनामेड दिव्यांचा माळा हल्ली आलेल्या. त्या अष्टकोनी आकाश कंदीलाची जुळवणी आणि मांडणी दिवाळी आधीचा मुख्य उद्योग होता.


दिवाळीत बागडणारं बालपण वेगळयाच धुंदीत असायचं माती कालवून तो गारा लिंपत चार पाच चिमुकल्यांची डोकी अंगणामध्ये किल्ला बनवण्यासाठी भिडायची. त्या चिमुकल्या हातांनी अल्पशा कल्पनाशक्तीवर बनवलेला तो किल्ला बघतांना सा-यांच्याच आनंदाला भरतं यायचं. दिवाळीच्या चार - पाच दिवसात तो किल्ला पणतीच्या उजेडात उजळून निघायचा आणि बिटींग द रिट्रीट करावं तसं दिवाळीला अलविदा करतांना मोठा फटाक्याचा बार करुन तो किल्ला उडवून देताना झालेला आनंद आयुष्यभराची आठवण असायचा.

काळाच्या ओघात आणि गतीत आम्ही शब्दाचे अर्थ बदलले सोबतच जगण्याचे संदर्भ देखील नकळत बदलत गेले. अठरा विश्वे दारिद्रय असं आपण म्हणतो मुळात ते अठरा -विसावे म्हणजे 18X20 अर्थात 360 दिवस या अर्थाने आहे. आणि मुळ वाक्प्रचार अठरा विसावे दारिद्रय अन् पाच दिसाची दिवाळी असा आहे. अर्थात कितीही गरिबी असली तरी ती व्यक्ती देखील पाच दिवसांची ही दिवाळी साजरी करतांना आपणास दिसतो.
शेतीप्रधान आणि खेडयात राहणारा देश स्वातंत्र्या नंतर झपाटयानं बदलला.. बापू म्हणत खेडयाकडे चला पण सगळे शहराकडे धावायला लागले. शहरात वाढलेल्या गर्दीमुळे मला सगळयांचीच धावाधाव सुरु झाली ही इतकी की आपण कशासाठी धावतोय हे कळत नाही अशा स्थितीपर्यंत सारे धावायला लागले... मी गाडी चालवण्यात इतका बीझी आहे की मला पेट्रोल भरायला थांबायची देखील फुरसत नाही. ...
असं वेडेपणानं धावणारेही यात आहेत. 
दिवाळी आपल्या जीवनशैलीचा भाग आहे. शेतात पिकलेलं धान्य आणि त्यातून आलेलं धन याचा आनंद साजरा करण्याचा हा काळ शेतकरी ज्याच्या आधाराने स्वत:चेच नव्हे तर इतरांचे उदरभरण करण्यासाठी मातीतून मोती पिकवतो त्या शेतक-यानं बघितलेल्या हिरव्या स्वप्नाच्या पूर्ततेचा हा क्षण.

वसु- बारस. दिवाळीची सुरुवात शेतीप्रधान संस्कृतीत गाय आणि तिचं वासरु यांच्या पूजनाने होणारी सुरुवात याचंच द्योतक आहे. प्रात:काळीच्या त्या गर्द तिमिरावर मात करण्या-या इवल्याशा पणतीच्या टिमटीमत्या ज्योतीची ताकद कळते आपल्यातील आळस झटकून चतुर्दशीला या क्षणाची सुरुवात करायची. दिवाळीची आमावस्या अर्थात लक्ष्मीचं पूजन. आयुष्यात आवश्यक असणा-या बाबींचं पूजन मग यामध्ये झाडूची देखील पूजा होते. स्वच्छता ही आपण आरंभापासून पूज्य मानली. आज दुर्दैव की धावताना आपण ते विसरतो आपल्या अंगणातला कचरा शेजारी टाकण्याची सवय लागली म्हणूनच आपणाला स्वच्छता अभियान राबवावे लागते. आयुष्याच्या अविभाज्य घटक म्हणून आपण याकडे बघायला
पाहिजे.
 अमावस्येनंतरचा दिवस म्हणजे नवर्षाचा अर्थात प्रतिपदेचा दिवस हा दिवस बलीप्रतिपदेचा दिवसआपण बळीराजाच्या नावे बलीप्रतिपदा म्हणून देखील साजरा करायचा. शेतक-याला आपण बळीराजा म्हणतो तेयासाठीच प्रत्येक खाणा-या तोंडाला अन्न देणारा हा अन्नदाता आज बदलेल्या निसर्गचक्राने हतबल होवून नैराश्याच्या मार्गावर आहे. यात नैराश्याच्या सिमेवरुन कडेलोट झालेले मृत्युला कवटाळताना दिसत आहेत. त्याची वेदना जाणून त्यांना साथ द्यायला पाहिजे धीर आणि मदतीला हात द्यायलाच हवा. तरच बलीप्रतीपदा आपण मनापासून साजरी करु शकतो.

जीवन -मृत्यू हे दोन बिंदू यातील प्रवास म्हणजे जीवन आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणार आहे. चिरंजीव कुणीच नाही. ना कुणी अविनाशी आहे. काळाच्या या न्यायाची आठवण करुन देणारी यमव्दितीया अर्थात भाऊबीज. आपल्या भावाचं औक्षण करुन त्याच्या जगण्याचं दान मागणारी बहीण असं हे भावाबहिणीचं नातं जपणारी दिवाळी. शहरीकरणाच्या आघाताने विभक्त झालेली कुटुंब संस्कृती आज चौरस कुटुंब पधदतीत जगतेच अशा कुटुंबात प्रत्येक घरात भाऊ -बहिण नातं आहे अशी परिस्थिती नाही त्यामुळे औपचारिकतेमुळे संकुचित होणा-या स्वभावाप्रमाणे दिवाळीहा सणही अनेक कुटुंबसांठी संकुचित होताना दिसत आहे.

सा-यांची ही दिवाळी आठवणींना साद घालते.

दिवाळी म्हणजे ... अभ्यंगस्नान आणि उटण्याचा दरवळ

दिवाळी म्हणजे ... तो मोठा गोलाकार मोती साबण

दिवाळी म्हणजे... लाडू -चिवडा नी चकली, करज्यांचा फराळ

दिवाळी म्हणजे.... आकाश दिवा नी पणत्यांची आरास

दिवाळी म्हणजे.... नव नवीन कपडयांचा पेहराव

दिवाळी म्हणजे.... पंच पक्वान्नांची मेजवानी

दिवाळी म्हणजे .... साहित्य नी दिवाळी अंकांची पर्वणी

दिवाळी हा सण सा-यांचा आवडता सण या दिवाळीत सा-या जागवत जुन्याचं कौतूक करत नव्याचं स्वागत करुन दिवाळी साजरी करुया ......

सा-यांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466