Tuesday 26 April 2016

'A date with family'

Enjoy a date with family…..! व्हॉट्स ॲपवर चॅट करताना समोरून आलेली कमेंट मला क्षणभर शुन्यात घेऊन गेली. माझी फेसबूक वरील एक ब्रिटिश मैत्रीण माझ्याशी चॅट करत असताना कसा आहेस ? कुठे आहेस ? असे साधारण प्रश्न आरंभीचे त्यानंतर मी घरी आहे म्हटल्यावर तिनं केलेली ही कॅमेंट होती. मला क्षणभर काहीच सूचलं नाही पण तिच्या त्या कमेंटमध्ये अगदीच सहजपणा होता..मला मात्र अंतर्मुख केलं त्या कमेंटने.
.

एकाच नावेतील दोन प्रवासी गप्पा मारत असतील तर त्यांच्या भावना सारख्या असतात मात्र त्या भावनांमागे मनात असणारी वेदना किती खोलवर रूतली याचा अंदाज घेणं शक्य नसतं. निग्रहाने ती भावना लपवली तरी ती कधीतरी शब्दात आणि नजरेत तरळून जाते तो क्षणिक भावनिक आवेग हे केवळ हिमनगाचं टोक असतं इतकच म्हणता यईल.

माझी ती मैत्रीण युरोपातली.... घरी केवळ संगतीला आई पण संगत देखील किती काळाची वैमानिक असल्यामुळे सकाळ लंडनमध्ये दुपार जर्मनीत आणि रात्र कुठेतरी सिडने केव्हा मेलबॉर्नमध्ये या व्यवस्थेतून घरी वेळ देणं म्हणजेच 'डेट विथ फॅमिली'..

मी देखील गेली सात वर्षे घरापासून दूर आहे. गडचिरोलीत आल्यावर या अंतराची तिव्रता अधिक जाणवते. आपल्या आयुष्यात सतत काही ना काही घडत असतं प्रसंग आनंदाचा असो की दु:खाचा प्रसंग शेअर करायला कुणी आपलं जवळ असावं असं वाटतं आज सोशल नेटवर्कींगच्या या आभासी जगात ते शेअर करण्यासाठी साधनं आहेत. घडल्या प्रसंगाचे फोटो क्षणात आपल्याला जगभर पाठवण्याइतकं तंत्र विकसित झालेलं आहे तरीही एक फरक राहतो.

लमहे चित्रपटात नायक अनिल कपूर आणि सहनायक अनुपम खैर यांच्यातील भांडणाचा प्रसंग मला इथं आठवतो. नायक अनिल रागात त्याला घर सोडून निघून जा म्हणून सांगतो त्यावर अनुपमने दिलेलं उत्तर खूप काही सांगणारे आहे. 'तुम कितना भी कहोगे तो मै नही जाऊंगा क्यों की मै जानता हूं के तुम्हे रोने के लिये एक कंधे की जरूरत पडती है! आणि नेमकेपणाने सोशल मिडीयाच्या मर्यादा इथं उघडया पडतात..

एकटं राहणं ही अपरिहार्यता असते त्यामुळेच एकटे राहणारे अनेक जण आहेत पण माझ्या दृष्टीने गर्दीत असूनही एकाकी राहण्यापेक्षा असं एकटेपण केव्हाही चांगलं.
एकटेपणाने अनेकजण 'होमसीक' होताना आपण बघतो. तो मानवी मनाचा पैलूच दाखवतो की आपल्याला आपल्या माणसांमध्ये राहणं अधिक आवडतं. प्राणी जगतात जवळपास सारे प्राणी कळप करून राहतात मात्र वाघ कळप बनवत नाही. प्रकृतीच आपणास अपवादही शिकवते.

एकटेपणातून मानसिक ताण व त्याच्याशी निगडीत समस्या येवू शकतात अनेकांना याचा त्रास होतो. मात्र सृजनासाठी हा एकटेपणा अधिक चांगला. मोठमोठे लेखक, कलाकार, चित्रकार असं एकटयाने राहून स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न यामुळेच करत असतात.

कौटूंबिक पातळीवर लग्नानंतर विशिष्ट काळाने पती-पत्नीला वेगळं रहावं लागतं त्यावेळी त्यांच्यातील प्रेम संबंध अधिक वृध्दींगत होतो असं माझं स्वत:चं मत आहे एका गाण्यात अशाच काहीशा ओळी आहेत.

.....कभी कभी दूरी भी जरूरी होती है प्रेमीयोंमे

प्यार बढने के वास्ते….!

आयुष्याच्या पटलावर हा एकटेपणा हा केवळ भौतिक अर्थाने असून होणारी वेदना ही मनाची भावना असते एकाच खोलीत आई वडील आणि दोन मुलं चार दिशांना तोंड करून एकाच बेडवर आपापल्या मोबाईलमध्ये चॅटींग करतात त्या एकटेपणाला काय म्हणावे असाही सवाल आहे.

सर्व विचार पुन्हा जिथे सुरू झाले तिथे परत येवून थांबतात आणि प्लान्स सूरू होतात. 'A date with family' चे...

-प्रशांत अनंतराव दैठणकर
९९२३१९९४६६