Friday 26 August 2016

बाकी ऑल इन द मोबाईल.......!

माणसाच्या दैनंदिन जीवनात लगबग वाढत आहे.
घडयाळाच्या काटयाशी स्पर्धा लावून प्रत्येक जण आज धावताना दिसतो. लहानपणी गणिताच्या पुस्तकात काळ-काम आणि वेग याची गणितं सोडवताना गंमत वाटत असे. प्रत्यक्षात जीवनात ती धावपळ सुरु झाल्यावर त्याचा ताण देखील जाणवायला लागतो. आणि या ताण-तणावात आता भर पडली आहे ती मोबाईल फोनची.
कधी काळी कल्पनेतील बाब असणारा हा स्वत:सोबत कुठेही नेण्याचा फोन प्रत्यक्षात आला आणि ही दळणवळण क्रांती केवळ संघर्ष साधनाची क्रांती न राहता एका वेगळया आयामात जीवनशैली बदलणारी आणि प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम करणारी बाब ठरली.

160 कोटी खातेधारक असणारे फेसबूक नावाचे संवाद माध्यम असो की नुकताच 100 कोटींचा टप्पा गाठणारे त्याचेच अपत्य असणारे ' मेसेंजर ' मग व्हॉटस्ॲप, ट्वीटर सारखी संवाद माध्यमे आणि तंत्रज्ञानानुसार भिन्न प्रतींचे मोबाईल फोन त्यांचे ब्रँन्डस आणि आमची ब्रँन्ड लॉयल्टी या सर्वांमधून एक नवी वर्णव्यवस्था निर्माण झाली आहे.

या मोबाईलमुळे शासकीय यंत्रणेने अधोरेखीत केलेली दारिद्र्य रेषा अधिकच ठळकपणे जाणवते. स्मार्ट फोनवाले एपीएल, साधे फोनवाले बीपीएल, तर साधारण 10 ते 15 हजाराचे स्मार्टफोनवाले मध्यमवर्गीय किंवा अल्पभूधारक, 15 ते 20 हजार किंमतीचे फोन वापरनारे उच्च मध्यमवर्गीय किंवा समाधानी अथवा प्रगतीशील शेतकरी आणि 'हाय एन्ड ' क्कालिटी फोन धारक म्हणजे उच्चभ्रू किंवा जमीनदार असे काहीसे प्रकार यात आपणास दिसतील. मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींच्या सिम कार्डवरुनही अशाच काहीशा नव्या वर्णाची निश्चिती केल्याची आपणास जाणवते. पोस्टपेड विथ डाटा वाली मंडळी प्रिपेड वाल्यांकडे बघताना जणू काही ही सारी बीपीएल मधली आहेत असा लूक देताना
दिसतील.

प्रिपेड वापरणे त्याचसोबत 20 रुपयांचा डाटा रिचार्ज मारणे आणि 30 रुपयांचे पेट्रोल भरुन 50-55 हजारांची बाईक चालविणे ही आजच्या तरुणाईची ओळख त्यात ग्रुपमध्ये पोस्टपेड आणि डाटा वापरणारे मुलं किंवा मुली सहाजिकच ग्रुप लिडर होतात हे कॉमन आहे.

सेवेवरुनही वर्ग भिन्नता आहे. साधारण स्पीड (2G) वापरणारे बीपीएल किंवा मध्यमवर्गात मोजतात. 3G वापरणारे उच्चभ्रु किंवा जमीनदार कॅटेगरीत येतात आणि 4G म्हणजे तर सेबेब्रिटीच ना.

आता सेवेसोबत स्पेशल नेटवर्कच्या वापरण्याच्या पध्दतीवरुनही आगळीच वर्णव्यवस्था मानली जाते. व्हॉटस्ॲपवाले पीटातले प्रेक्षक म्हणता येतील आणि फेसबूक धारक मंडळी फर्स्टक्लास मध्ये मोडते. तर ट्वीटर हॅन्डल धारी जणू बाल्कनीत बसणारी मंडळीच असावीत अशी त्रिस्तरीय रचना सध्या अस्तित्वात आहे. इन्स्टाग्राम किंवा लिंकर इन वापरनारे म्हणजे फक्त मल्टीप्लेक्सवाले ठरविले जातात.

व्यक्ती तितक्या प्रकृती त्यापध्दतीने एक सीम पासून चार सीमकार्ड 2 मोबाईल इतका लवाजमा खिशात बाळगणे तसेच श्रीमंती थाट म्हणजे सोबत बॅटरी बँक असायलाच हवी. केवळ संपर्काचं साधन असणाऱ्या या मोबाईलने अशाप्रकारे जीवनशैलीवर परिणाम टाकला आहे.

याचा कळस झाला
तो अर्थात अमेरिकेत तेंव्हा झाली साधारण महिनाभरापूर्वी कलाकार आणि दिग्दर्शक असणा-या लासव्हेगासच्या अॅरन शेर्वेनाक या वल्लीने चक्क आपला विवाह मोबाईल फोनसोबत विधिवत केला. हा विवाह आपणास जीवनशैलीवर झालेला परिणाम किती खोलवर झाला याची अनुभूती देणारा असा आहे.

चॅटींग वरुन विवाहापर्यंत पोहोचलेले अनेक आहेत आणि हाच मोबाईल अनेकांच्या घटस्फोटाचेही कारण ठरताना दिसत आहे. फेसबूकच्या ओळखी वरुन सातासमुद्रापार येऊन विवाह झाल्याच्या बातम्या जशा येतात तशा फसवणूक झालेल्यांनी आत्महत्या केल्याच्याही बातम्या समोर येताना दिसत आहे.

प्रत्येक फोनधारक दिवसात सरासरी 156 वेळा आपल्या फोनमध्ये डोकावतो असं वाचण्यात आलं. कदाचित याहीपेक्षा अधिक वेळ याची संख्या असू शकते. चांगल्या बाजूला दुसरी बाजू वाईटाची असते आणि ती इथेही आहे.

जुन्या काळात आजीच्या कथा ऐकत झोपत असतांना स्मरणात राहिलेल्या गोष्टीतल्या त्या राक्षसाचा जीव एखाद्या पोपटाच्या डोळयात असे आणि पोपटाचा तो डोळा सुरक्षित म्हणजे सारं सुरक्षित अशा भूमिकेत राक्षस येणाऱ्या प्रत्येकाला नमवत असे. आता असा प्रत्येकाचा जीव त्या मोबाईल फोनच्या रुपाने जपला जातो. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षेपेक्षा त्या फोनच्या सुरक्षेला अधिक महत्व दिले जात आहे.

पतीच्या हाती पत्नीचा फोन आणि तिच्या हाती त्याचा फोन पडू नये याची दोघेही खबरदारी घेताना दिसतील. ज्याच्या फोनला सांकेतिक 'लॉक' नाही तो खरा सज्जन आणि प्रामाणिक असं म्हणायचे दिवस आले आहेत.

मुक्त इंटरनेटचा वापर आणि संवाद माध्यमे हातातल्या फोनमध्ये आल्यापासून वेळेची बचत होत आहे. मात्र सातत्याने ' अपडेटस् ' बघणे आणि स्टेटस, डी.पी. अपडेट करणे
यातून सर्वांचा वेळ देखील वाया जाताना आपणास दिसत आहे. वेळेचा हा अपव्यय जितका चिंतेचा विषय तितकाच गहन प्रश्न मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचा आहे. फोनचा रिंगर वाजला नाही तरी नकळत फोन कडे जाणारे हात हे एकाग्रता नसणे आणि त्यातून पुढे ताण-तणाव वृध्दीकडे जाते. ज्याची पहिली पायरी ब्लड प्रेशरच्या रुपाने दिसायला लागते.

या स्मार्टफोनने पोलिसांचे काम देखील वाढले आहे. इंटरनेट तसेच मोबाईलचा वापर करुन लोकांना लुबाडणे, त्रास देणे, सामाजिक सलोखा बिघडविणे आदी कृत्ये करणारे 21 व्या शतकातील 'सायबर क्रिमिनल्स' समोर आले त्यामुळे सायबर गुन्हे शोधण्यासाठी पोलिसांना स्वतंत्रपणे मेहनत घ्यावी लागत आहे. मनिलात बसून मुंबईत गुन्हा घडवता येतो. त्यामुळे या प्रकारच्या गुन्हयांना भौगोलिक आंतरराष्ट्रीय सिमांच्या मर्यादा रोखण्यात असमर्थ ठरतात. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा कायदा सर्व देशात एकाचवेळी लागू करावा लागला.

काश्मीरमध्ये भारतीय कायदे चालत नाहीत. अशा स्थितीत हा माहिती तंत्रज्ञान कायदा भारतासोबत काश्मीरमध्ये लागु झालेला पहिला कायदा ठरला आहे. या कायद्याने विधिज्ञांना 'सायबर लॉ' असा नवा अभ्यासक्रम उपलब्ध झाला आणि सायबर गुन्हयाचे दावे लढणारे तज्ञ वकीलही घडायला लागले आहे.

मोबाईलचं विश्व हे एखाद्या मायाजालापेक्षाही मोठं आहे. वापरणाऱ्यांना त्याची पूर्ण कल्पना नाही. आपल्याकडे सेवा देण्यापासून सेवा सुरळीत राखण्यापर्यंत अनेक प्रकारचा भ्रष्टाचार घडल्याची प्रकरणं आहेत. याही परिस्थितीत जगात आपण मोबाईल क्षेत्रात अग्रेसर आहोत आणि लाखो कोटी रुपयांचा व्यवहार यात होतोय. यामुळे अब्जावधी कोटींचा व्यवसाय वाढला आहे. या आणखी दोन पैलूंची भर पडलेली आहे.

मोबाईल एका अर्थाने आता सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. 28 वर्षाच्या माझ्या माध्यम जगतातील प्रवासात मी फोन-फॅक्स पासून पेजर, वायरलेस फोन आणि इनकमिंगला 16 रुपये पासून दाखल झालेला मोबाईल हाताळला. आता स्मार्टफोन हे त्याचे उत्क्रांत स्वरुप म्हणता येईल.

चार्ल्स डार्वीनने ' सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ' असा सर्वेात्तम तेच टिकेल असा सर्वेात्तम तेच टिकेल असा मांडलेला उत्क्रांतीवाद केवळ प्राण्यानाच नव्हे तर संवाद साधनांनाही तंतोतंत लागू पडलेला मी अनुभवला आहे. कधीकाळाचं साधन टेलीग्राम आणि टेलिग्राफ बाद झालं. कौतूकाची बाब ठरलेलं एम.एम.एस. अर्थात मल्टीमिडीया संदेश यंत्रणा इंटरनेटवरील ऑर्कूट तसेच सर्वात अधिक मोबाईल बनवणारी नोकीया सारखी कंपनी यांचा उदय आणि अस्त या काळात बघायला मिळाला. आणि ही उत्क्रांती अशीच पुढे चालू राहणार हे स्पष्टच आहे.

केंद्र सरकारने आता JAM अर्थात जनधन, आधार आणि मोबाईल यांच्यावर भर दिलेला आहे. प्रत्येकाचे बॅंक खाते तसेच ओळख क्रमांक आणि मोबाईल यांची सांगड घालून जनतेला लाभापासून वंचित ठेवणाऱ्या यंत्रणेतील लागलेला 'जाम' दूर सारुन थेट सरकार आणि जनता यांच्या थेट आणि पारदर्शी संपर्क निर्माण करुन गतिमान प्रशासनसाठी या तंत्रज्ञानाचा योग्य असाच वापर केलेला दिसतो. यामुळे जनतेच्या पैशातून जनतेचे कल्याणकारी राज्य ही संकल्पना देखील यशस्वीपणे मांडली जाताना दिसत आहे.

फिनलंड सारख्या देशात जनतेची 85 टक्के कामे ही घरबसल्या मोबाईल वर होतात. तेच उद्दीष्ट घेऊन सरकार वाटचाल करीत आहे, आणि त्यादृष्टीने चांगली सुरुवात झालेली आपणास दिसते.

मोबाईल ही अत्यंत वैयक्तिक बाब ठरत असल्याने येणाऱ्या काळात मतदान याव्दारे घ्यावे असा प्रस्ताव होता. तांत्रिकदृष्ट्या आपला देश आज यात सक्षम आहे. परंतु त्या स्वरुपाची प्रगल्भता कमी आहे. तसेच आसेतूहिमाचल देशाच्या भौगोलिक रचनेमुळेही लवकर हे शक्य होईल असे दिसत नाही.

मोबाईल बाबत आणखीही खूप काही लिहिण्यासारखं आहे. अर्थात ते पुढील भागात. शेवटी संपवताना इतकच की, त्या वल्लीने मोबाईलशी विवाह केला ते एका अर्थाने खूप विचार करता चांगलच म्हणता येईल. कारण मोबाईल प्रसंगी 'सायलेंट ' मोडवर ठेवत येतो आणि कुठे जाताय ? कधी परत येणार असे प्रश्न मोबाईल कधी विचारत नाही. बाकी ऑल इन द मोबाईल.......!

प्रशांत दैठणकर
9823199466