Monday 10 October 2016

सिमोल्लंघन दसऱ्याचे........!

दसरा अर्थात एक पूर्ण मुहूर्त असणारा हा दिवस. अनेक अख्यायिका आपण ऐकत आलो त्यानुसार राम रावण युध्दात रावणाचा अंत झाला तो हा दिवस म्हणून या दिवशी रावण दहन करायचं....... वाईटावर चांगल्याचा विजय असं याचं स्वरुप आणि त्याला प्रतिकात्मक रुपाने आपण रावण दहन करुन साजरा करतो. त्या विजयाचं प्रतिक असणारी ही विजया दशमी. 
पांडव वनवासात असताना एक वर्ष अज्ञातवास भोगायचा होता. त्यावेळी त्यांनी आपली शस्त्र शमीच्या झाडावर ठेवली होती. त्या शमीच्या अर्थात आपटयाच्या पानांना सोनं समजून वाटायचं म्हणजे सोनं लुटायचं त्या सोन्याचा हा दसरा.
दसऱ्याला शस्त्रपूजा करायची. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारी तुळजापूरची भवानी माता. तिच्या मंदिरात नऊ रात्री गोंधळ " उधं गं अंबे उध " म्हणत जागवायच्या. माहूरच्या रेणुका मातेची प्रतिदीन पूजा करीत रोज एक माळ अर्पण करायची आणि जोगवा म्हणायचा ही मोठी धार्मिक परंपरा आणि त्यापुजेत मातीच्या कुंडीत लावलेल्या धानाचे लुससुशीत तुरे घेऊन आजच्या दिवशी गावची सिमा ओलांडायची ते झालं सिमोल्लंघन.
आज या आयटीच्या जमान्यात सारे संदर्भ बदलत आहेत. त्यातही धार्मिकतेमधून सांस्कृतिक वारसा वृध्दींगत होतोय. गुजरातचा गरबा अर्थात देवी समोरचा जागर असो की, बंगाल मधील दुर्गापूजा आज यांचा प्रसार साऱ्या देशातच नव्हे तर सातासमुद्रापार झालेला आपणास दिसतो.
समाज म्हणून गरजेने एकत्र आलेला मानवप्राणी कालानुरुप विकसित झाला आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्याने मोठया प्रमाणावर तांत्रिक प्रगती झाली. यातून माणसा-माणसातील अंतर मात्र वाढताना दिसतय. आम्हीच आम्हाला वेळेच्या आणि वाईट अशा रुढी परंपरांच्या सिमांमध्ये जखडून ठेवलय असं जाणवतं.
दसरा साजरा करतांना सिमोल्लंघनाची संकल्पना आपण खऱ्या अर्थाने पार पाडायची असेल तर याकडे नव्या दृष्टीकोणातून बघितलं पाहिजे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जगाचं स्वरुप आता ग्लोबल व्हिलेज असं झालय. या परिस्थितीत प्रत्येकाने आता सिमोल्लंघन करावं ते नव्या पध्दतीचं.
आज गरज आहे
ती आरोग्य संपन्न पिढीची. गरज आहे ती मानसिक दृष्टया मजबुत तरुणाईची. नुसतं लोकसंख्या अधिक असून भागणार नाही तर त्यातील प्रत्येकाने " ब्रेड बटर " ची सिमा ओलांडून समृध्दीकडे जाण्याची , संपन्न होण्याची . " ब्रेड -बटर " मध्ये अडकून वयाच्या 60 व्या वर्षी हाती काहीच उरत नाही. मात्र आपल्या अंगभूत गुणांना विकसित केलं तर आपणही उद्यमी होवू शकतो. आपण संपन्न आणि समृध्द झालो तरच देश संपन्न होणार आहे.
सिमेवरील सैनिकांनी जागता पहारा ठेवून देशाचं रक्षण करायचं आणि आपण काही नाही असा विचार करणाऱ्या प्रत्येकाला आपलं सिमोल्लंघन करुन राष्ट्रासाठी उभं राहण्याचा संकल्प करावा लागेल. रोजी- रोटी पलिकडे जाण्याचा विचार आज करावा असं मला वाटतं. अमेरिकासारख्या देशाने आर्थिक महासत्तेचा दर्जा प्राप्त केला त्याला कारण तिथे संपत्ती अथात वेल्थची संकल्पना आहे. क्षमतेइतकच काम करायचं नाही तर पूर्ण क्षमतेने झोकून देऊन काम करायचं ही मानसिकता आणणं हे खरं सिमोल्लंघन.
चला या शुभमुहूर्तावर वैचारिक संपन्नतेसाठी शाब्दीक सोनं आपण देऊ आणि आपण खऱ्या अर्थानं हा सण साजरा करु.
विजयादशमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.......
प्रशांत अनंतराव दैठणकर
विजया प्रशांत
जान्हवी प्रशांत
वेदान्त प्रशांत
Follow me on my blog
www.dpacific.blogspot.com 
twitter
@prashantvijaya
E-mail-
dpacifics@gmail.com