Friday 28 September 2018

#497.....

मानवाधिकार बळकट करणारा आणि स्त्री ला खऱ्या अर्थाने समानतेचा अधिकार प्रदान करणारा सर्वोच्च निर्णय आला आणि देशात विविध प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

कोणे एके काळी मातृसत्ताक पध्दतीचा अवलंब करणाऱ्या आपल्या देशात नंतरच्या काळात पुरुषसत्ताक पध्दती रुजली.... ती इतकी रुजली की स्त्री ही केवळ दासी असावी अशा पध्दतींन घरात कोंडली गेली हे चित्र निर्माण झालं.

नवरा म्हणेल त्याला संमती देणे अर्थात 'मम' म्हणणे जणू आवश्यकच करुन टाकलं... विवाह संस्था मजबूत आहे. असं आपण म्हणत असलो तरी त्यामागचं सत्य्‍ा आपण सांगत नाही हे देखील खरं आहे.... स्त्री चं अस्तित्व संपवून तिला केवळ आपली दासी मानणाऱ्या घरांमधून केवळ पर्याय नाहीत म्हणून ही विवाहसंस्था टिकून राहिली.

स्त्री ला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम शतकानुशतके सुरु होते....
शिक्षणाअभावी मग असहाय्य झालेली ' ती ' जगात स्वतंत्र जगण्याचा विचारच करु शकत नव्हती . म. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा मार्ग खूला केला त्यानंतर काही प्रमाणात जागरुकता निर्माण व्हायला लागली.

मात्र अगदी सत्तरच्या दशकापर्यंत 'ती' चित्रपटातून आहे तशीच मांडली गेली . . . तिने केवळ त्याच्याशी समरस व्हांव स्वत:ला संपवावं याच प्रकारचा आरसा समाजातून चित्रपटात दिसला.

'ती' स्वत:ला संपवून जगत राहिली .. 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता' ठरवली गेली या वाक्यातली नाण्याची दुसरी बाजू जगासमोर आलीच नाही. ती विवाहापर्यंत वडीलांच्या आणि भावांच्या सांगण्यानुसार वागत होती आणि लग्नानंतर पती हेच सर्वस्व ठरवण्यात आलं... तो बेवडा, जुगारी आणि गुंड असला तरी त्यालाच परमेश्वराचं स्थान देण्याचं काम समाजात झालं.

' ती ' जोवर आपला ' स्व ' संपवत नाही तोवरच नंतर मात्र या 'स्व' ला डोकं वर काढायची संधीच नव्हती...

भला है , बुरा है जैसा भी है
मेरा पती मेरा देवता है . . . !

चित्रपटातून वारंवार ' ती ' ला दासीच राहण्याची शिक्षा दिली गेली . . . !
बदलत्या काळानुसार शिक्षणाने घराचा उंबरठा ओलांडण्याची हिंमत तिच्या ठायी आली मात्र त्या स्थितीत कौटुंबिक हिंसाचार थांबला नाही.

व्यक्तीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार आहे. स्वत:ची आपली मतं आहेत . . व्यक्तीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हवं मग व्यक्ती ' तो ' असो किंवा ' ती ' ... !

प्रत्येक नातं विश्वासावर अवलंबून असतं आणि त्यात पारदर्शकता आवश्यक असते . .. ' ती ' आपल्याला व्यक्त करायला लागली तर तिला बंडखोर ठरवंल आणि हे खुळ आहेस असं हिणवलं गेलं विवाह हा शब्द हल्ली प्रचलनात आला आहे. सत्तरीच्या दशकापूर्वी त्याला शरीर संबंध योजणे असं संबोधलं जात होतं... खुल्या मानसिकतेतून दमनाची मानसिकता वेगळा मार्ग दाखवत होती.

शरीर संबंधाना नैतिकतेचे निकष लावायला सुरुवात झाली आणि तिथं 'अनैतिक संबंध' आणि त्यातून पुढे हत्या, आत्महत्या आदींचा शिरकाव झाला 'स्त्री' 'पुरुष' हे स्वतंत्र आहेत. त्यांची शारिरीक जडण घडण वेगळी आहे.
त्यांच्या भावनिक गरजा वेगळया आहेत आणि शारिरीक संबंध ही आयुष्यातील भावनिक व शारिरीक आवश्यकता आहे. ती अपरिहार्यता नाही हे मान्य करणाऱ्या वात्स्यायनाला विवाह संस्थेच्या रक्षणासाठी त्याच्याच देशातून देशाबाहेर काढलं गेलं.

'ती' ला जगण्याचा सन्मान हवा हे आपण लक्षात घेतलं नाही... त्यानं कसही जगलं तरी चालतं पण तिनं त्याच्याच दासी प्रमाणे जगायचं ... आलं ते स्विकारायच, कितीही भावनिक आणि शारिरीक वेदना झाल्या, कोंडमारा झाला तरीही  'ब्र' काढायचा नाही यात 'ती' संपत गेली.

सहमतीने एकमेकांच्या संमतीने शरीर संबंध याबाबतचा सर्वोच्च निवाडा त्याच्यापेक्षा 'ती' च्या आयुष्यात महत्वाचा आहे. विवाह संस्था टिकवून धरण्यासाठी स्वत:ला संपवणारी 'ती' केवळ मरण येत नाही म्हणून जगते असं चित्र अनेक घरांमध्ये दिसतं... त्याला काहीसं खुलं करण्याचं काम या निवाडयानं झालय...!

कोण होतास तू....काय झालास तू
कोण होतीस तू... काय झालीस तू...!

यातील मतितार्थ केवळ बदलाचे संकेत देणारा आहे. भगवद गीतेत सांगितलय 'परिवर्तन ही संसार का नियम है' काळ बदलला.. बदलल्या काळासोबत शिक्षण आणि सहजीवन याची पध्दत बदलली याचा परिणाम आयुष्याची वीण बदलण्यावर निश्चितपणे होवू शकतो... बदल स्विकारायचा की नाही...
'ती' ला किमान जगता आलं पाहिजे इतकी तरी प्रगल्भता 21 व्या शतकात यावी हीच अपेक्षा आहे.

शारिरीक संबंध आणि विवाह संस्था यांची सांगड जर जगण्यावर अडचण होत असेल तर याबाबत खुलेपणाने चर्चा व्हायलाच हवी.... वात्स्यायनाच्या देशात आजही आपण खुलेपणा स्विकारु शकलेा नाहीत म्हणजे काळ पुढे सरकला पण आपण मागे मागे जात तर नाही ना असं वाटायला लागतं.

विवाह संस्था ही आपल्या देशाची वेगळी अशी ओळख आहे. पण कोटयवधी 'ती' यात गाडल्या जात असतील तर त्याचा विचार होणे आवश्यक आहे.   
'ती' जगली पाहिजे 'ती' ला मोकळा श्वास घेता आला पाहिजे.... 'ती' आहे म्हणून 'तो' आहे म्हणून 'तो' असणं संयुक्तीक आहे. त्याच्या जीवनाला अर्थ 'ती' च्या मुळेच आहे.  "जिना इसी का नाम है"  ..  असं म्हणत सारं काही सहन करणा-या 'ती' ला आता काही तरी मोकळेपणा मिळेल आणि तिला तिचा शोध घेऊन तसं जगण्यात मदतीचा हात अाणि साथ देणा-या त्याच्यावरील गुन्हेगारीच्या भावनेतून दोघांचीही सुटका होईल.

प्रशांत दैठणकर
-9823199466