Tuesday 1 January 2019

संकल्पांच्या पलिकडे...


नव्याचा आरंभ करायला नववर्षाची वाट कशाला बघायची ...इथं येणारा प्रत्येक दिवसच नवा असतो... हा क्षण सरल्यानंतरचा येणार क्षण देखील नवा असतेा तरी देखील सर्वांना वाट असते ती नव्याने काही करण्याची ...नव्या संकल्पांची पण त्या संकल्पांच्या संकल्पना आता पार बदलत्या आहेत.

मागे वळून पाहताना आठवतात ते दिवस ज्यावेळी संकल्पना केला होता रोज नव्याने काही लिहिण्याचा त्यासाठी विशेष बचत करुन आणली होती एक डायरी .. हो डायरी लिहिण्याचा संकल्प केला होता कोणे एके काळी ....नव्याचे नऊ दिवस म्हणतात त्या पध्दतीने नऊ दिवस देखील ती डायरी लिहिली नाही....दरवर्षी अशा डायऱ्या येत राहिला त्याचा खच अजूनही टेबलावर आणि माळयावर पडून आहे. ..
..त्या डायरीतली ती शब्द उमटलेली मोजकी पाने अजुनही वाट बघतात कधी तरी आपल्यावर पसरलेली धुळ झटकण्याची.

गेल्या क्षणांवर अशीच धुळ जमा होत राहाते आणि ती चढतच जाते ....क्षण सरत जातात कधी स्मृतीत तर कधी विस्मृतीत आयष्याचा हा जमा-खर्च सुरुच राहतो....कालही होता आणि तो उद्याही राहणार आहे. हे नक्की.

या जगलेल्या क्षंणामंध्ये ते अवघड वाटणारे क्षण होते जे तुझ्या आठवणीत सरता सरत नव्हते आणि

ते क्षण देखील जमा झाले जे तुझ्यासवे जगताना हातातील वाळूप्रमाणे अलगद निसटून गेले....त्या क्षणांना जमेला मांडायचा अटृहास मनात आहेत याची जाणीव आहे.

छंद डायरी लिहिण्याचा असावा म्हणून आणलेल्या डायऱ्यांच्या बाजूला पडलेल्या त्या कॉलेजमधील मोठया 200 पानी वहयांकडे नजर जाते तेव्हा जाणवतं की त्या वहयांनी अधिक आयुष्य बघितलय..... कॉलेजच्या नॉलेजच्या एकही शब्द त्या वहीत नाही पण त्यात तुझ्या आठवणीत जगलेला प्रत्येक क्षण जपला गेलाय...

तुझ्या आठवणीच म्हणायला लागेल कारण तो विरह नव्हता....त्या पानांवर ओतप्रोत सांडलेल्या त्या भावना आणि प्रसंगी आसवांचा पाऊस याची साक्ष प्रत्येक पानांवर आहे...
.ते तुझ्याविना जगलेले क्षण आजही तितकेच उत्कटपणे समोर येतात.

जितना तडपायेगी मुझको
उतनाही तडपेगी तू भी
जो आज है आरुजू मे ही
वो कल तरी आरजू होगी
ये झुठ नहीं सच है सनम....!

बरोबर आहे. त्यावेळी गंमत म्हणून लिहिलेले शब्द प्रत्यक्षात जगताना जाणवतं की ते जे काही होतं ते चूकच होतं....!
मला वेळ होता पण तू व्यस्त होतीस आणि तूला वेळ आहे आता तर मी अस्ताव्यस्त झालोय.... पार गुंतागुंत झालीय आयुष्याची .....म्हणून काही कोलमडलो नाही......! उम्मीद पर दुनिया कायम है म्हणत त्या मुक्त क्षणांचा शोध घेत रहायचं...! हे अविरत चालत रहाणं म्हणजे एखाद्या समुद्र किनाऱ्यावर चालत प्रत्येक कणाला हाता घेऊन परिस शोधण्यासारखं आहे.....!

आयुष्यात चालताना प्रत्येक कण हाती घेतला....
जगण्याच्या धुंदीत कळतच नाही की त्यात कोणता क्षण परिस होता....हातातील लोखंडाचं सोनं झालेलं.... खूप उशीरा कळलं...! जेव्हा ध्यानी आलं तेव्हा तो परिस कुठेतरी मागे राहून गेलेला होता.... आता फक्त नव्याने सुरुवात आणि नव्याने शोध आयुष्यातल्या त्या परिस क्षणांचा...!

प्रशांत दैठणकर
1 January 2019