Wednesday 17 April 2019

....हा खेळ आकड्यांचा


माझी नेमकी ओळख काय ?


या प्रश्नाचा धांडोळा घेऊन उत्तर शोधतो. त्यावेळी मी स्वत:ला अभिमन्यूच्या स्थितीत बघतो. मी अभिमन्यू आणि इथं चक्रव्यूव्ह असतं ते आकडयांचं..मी स्वत: आरशात स्वत:ला शोधण्याऐवजी स्वत:ला आकडयांमध्ये आकड्यांमध्ये अडकलेला बघतो. 

हा आकड्यांचा खेळ कधी सुरु झाला.. अगदी त्या अभिमन्यूच्या जन्मापूर्वी कृष्णाने सांगतानाच झाला असेल कदाचित.. आई दवाखान्यात तपासणीला जाते त्यावेळी केस पेपर नंबर अर्थात एक आकडा.. मी बघतो की माझ्या जन्मापूर्वी या आकड्यांचे गर्भसंस्कार अपरिहार्य ठरले. 


जन्म झाला.. किती पाऊंन्ड वजन..पुन्हा आकडा .. बेड क्रमांक... वार्ड क्रमांक...जन्म तारिख आणि जन्माची वेळ..आकड्यांचा प्रवास सुरु होतो. जन्म घेतलेली वेळ, त्यावेळीची ग्रहांची स्थिती अशी आकडेमोड करीत जन्मपत्रिका बनवणे इथनं आकड्यांचा  गुंता सुरु होतो. 

प्रथम वारसं... नाव ठेवणे अर्थात चांगल्या अर्थाने हो पण बारशासाठी मुहूर्त शोधणे म्हणजे पुन्हा आकड्यातून आकड्याकडे .. मग शाळा... इथं प्रथम मनाला जाणवतं पण त्याचा अर्थ कळत नाही त्यावेळी... प्रथम क्रमांक यायलाच हवा असा प्रथम आग्रह आणि नंतर धोषा सुरु होतो. मला वाटतं की ही लादली जाणारी पहिला क्रमांकाची अपेक्षा भविष्यातील ब्लड प्रेशरची पेरणी ठरते.. वर्गात पुढे जाताना एक शैक्षणिक वर्ष आहे तो केवळ आकडा असं न होता तो वाढता ताण होत जातो... वाढदिवस तो देखील एक आकडा पण तिथं आकडा ओलांडताच अपेक्षा, स्वप्नं आणि स्पर्धा असं एक दुष्टचक्र सुरु होतं. 

आयुष्यात पुढे पुढे जाताना आकडे आकडे आणि त्यांचे सारे संदर्भ बदलून जात असतात... उत्साह भरणारे वाटले तरी काहींसाठी हेच आकडे नैराश्याकडे पुढे वैफल्यावस्थेकडे नेणारे असतात. या नैराश्याचा कडेलोट बहुसंख्य प्रसंगात आत्महत्येकडे नेणारा ठरतो. 

नंतर आकडयांचा हा प्रवास थांबतच नाही कधी माझी ओळख माझा मोबाईल क्रमांक असते. प्राण गेला तरी हरकत नाही पण मी माझा मोबाईल क्रमांक बदलणार नाही इतकं प्रेम त्या आकडयावर जडतं आणि आकडा बदलला म्हणजे जणुकाही जगबुडीच झाली असं वाटायला लागतं. 

आकडयांचा गुंता वाढतच जाणार असतो वीज हवी तर वीज वितरण कंपनीचा क्रमांक, बँकेत खातं मग तो वेगळा क्रमांक, आयकर... तो वेगळा आणि आधार क्रमांक देखील वेगळा अशा या आकडयांच्या चक्रव्यूव्हात मग वाहन परवाना, मतदार यादी, घरपट्टी घर क्रमांक... रेल्वेचा  पीएनआर आणि विमानाचा पीएनआर क्रमांक वेगळा... तिकीट वेटींग वर असेल तर बदलत जाणारा आरक्षण क्रमांक वेगळा. 

हा आकडयांचा खेळ एका बाजूला रंगत असताना अधिकच गुंता करणारी 7.10 ची फास्ट, 7.17 ची फास्ट...फलाट क्रमांक ... हा खेळ अधिकच गहिरा होतो. हे झालं मेट्रोचं.. ग्रामीण भागात शेतीचा 7/12 आणि नमुना 8अ वेगळे तर वादाच्या बाबतीत शेतीची मोजणी.... पुन्हा आकडे.. आकडे आणि आकडे. 

मराठवाडयात काही भागात वीज कनेक्शन चोरुन थेट घेण्याचा प्रकार आढळला अर्थात... तो देखील आकडा टाकून घ्यावा लागे.. 

आकड्यांचे अनेक पैलू सोनं मोजणं (गूंजभर) हिऱ्याची शुध्दता कॅरटमध्ये... सारे आकडे वेगळे तर रतन खत्री कल्याण खुलता/बंद होता मटक्याचा आकडा वेगळा... ! 
आता तर जमाना खूप पुढे आला आहे कारण हा जमानाच मुळी डिजिटलचा आहे... 
आकड्यातून ... आकड्यांकडे आणि पुढेही आकड्यांचा जाळी..  आपण  याच आकड्यांशी खेळत कधी लढत अभिमन्यू ..... व्हायचं...लढत रहायचं.. प्राण असेपर्यंत.. 

प्रशांत अनंत दैठणकर
9823199466