Thursday, 5 July 2018

' जिओ मेगा टू गिगा' चा ...जोरका धक्का....!

व्यवसाय करताना यश मिळवण्याचे जे मार्ग असतात त्यातील एक महत्वाचा असतो तो Surprise Factor ज्याला आपण सोप्या मराठीत ' धक्का तंत्र ' असे म्हणजे असाच एक धक्का रिलायन्स जिओ ने आज ' मेगा ते गिगा ' च्या रुपाने दिला. यामुळे येणाऱ्या काळात किती कंपन्यांना आपला गाशा गुंडाळावा लागेल किती कंपन्या कर्जात बुडतील याचा ढोबळ हिशेब आतापासूनच लावंणं सुरु आहे.

तांत्रिक प्रगतीचा वेग आता इतका प्रचंड झाला आहे की, आपण आता विज्ञानकथा प्रत्यक्षात जगत आहोत असं वाटेल. मी फेसबूकवर एक कमेंट लिहिली होती जी कुणालाही दखल घ्यावी वाटली नाही म्हणून ती डिलीट केली .. .. जानेवारी 2019 मध्ये 5-जी सेवा भारतात येईल...
अशी ती कमेंट होती.

जपान आणि अमेरिकेत तंत्रज्ञान जुनं झाल्यावर ते आपल्याकडे येईल अशी आपल्याला सवयच लागली होती ना. तसं घडलेलं असल्याने उदासीनता कळू शकते पण आता डिजीटल तंत्रज्ञानाच्या युगात काहीही शक्य झालय याची प्रचिती ' जिओ ' च्या रुपात सर्व भारतीयांना येत आहे.

थोडी पुनरुक्ती होते पण लिहितो रेडिओचा शोध लागल्यानंतर जगभरात रेडिओचे पहिले दहा कोटी श्रोते होण्यासाठी 35 वर्षांचा कालावधी लागला. टेलिव्हीजनचा शोध लागला त्यानंतर दहा कोटी दर्शकांचा आकडा गाठायला या माध्यमालाही 25 वर्षे वाट बघावी लागली. मात्र 4- जी सेवा सुरु केल्यावर दहा  कोटी ग्राहकांना
 गाठायला 'जिओ' ला केवळ 167 दिवस लागले. सध्या पंचवीस  कोटी ग्राहक त्यांनी मिळविलेले  आहेत.

आपल्या हातात गतिमान असं संदेशवहन करणारी यंत्रणा आहे यानं नवी पिढी आनंदीत आहे. देशाचा विचार करताना ही आपली देशासाठीही अभिमानाचीच बाब ठरावी अशी ही संपर्कक्रांती आहे. आपण तंत्रज्ञानात अग्रेसर आहोत हे देशाने यापूर्वीच मंगळ ग्रहाच्या मोहिमेत दाखवून दिलेले आहे. यात गतिमान विकास सर्वच क्षेत्रात बघायला मिळत आहे.

जिओ फायबर हे एकाच वेळी 1100 शहरात सुरु होईल.
सध्या लॅन्डलाईन वर 2 मेगाबाईट ते 100 मेगाबाईट प्रतीसेकंद सेवा देणाऱ्या काही कंपन्या अस्तित्वात आहेत मात्र जिओ फायबरचे डाऊनलोड 1 गीगा बाईट प्रती सेकंद आणि अपलोड 100 मेगाबाईट प्रती सेकंद राहणार आहे.

जिओ फायबर सेवेमुळे पुन्हा घरात फोन दिसायला लागेल पण हा नव्या युगाचा फोन असणार आहे. या एकाच फोनला 'जिओ' राऊटर जोडून तुम्ही घरात त्याच गतीने वाय-फाय सेवा तसेच व्हिडिओ कॉलिंग आदी सोबतच इंटरनेट टिव्हीसेवा ज्यात अमेझॉन, नेटफ्लीक्स सारख्या सेवा घेऊ शकता.

याच जिओ फायबरच्या मदतीने आपल्या टिव्हीला जिओ सेट टॉप बॉक्स जोडून आपण 600 हून अधिक हाय डेफिनेशन अर्थात एच.डी. चॅनेल्ससह इतर चॅनेल्स टी. व्ही. वर बघता येतील. जिओच्या आजच्या घोषणेनंतर अनेक कंपन्यांना आता स्पर्धेत उतरणे किंवा अस्तित्व यापैकी एका लढाईची निवड करावी लागणार हे स्पष्टच आहे. कारण याची नोंदणी झाल्यानंतर एकाच वेळी 1100 शहरांमध्ये एकदम 10 लाख जोडण्यांचा मानस जिओ ने व्यक्त केलेला आहे.

मोबाईल तंत्रज्ञान आल्यानंतर बी.पी.एल. ही एक कंपनी आरंभी होती आणि रिलायन्स देखील पण ते अनील अंबानीच्या कंपनीचे बी.पी.एल. खऱ्या अर्थाने बीपीएल ठरल्यावर प्रथम हचसंन आणि नंतर व्होडाफोन
असा विलय सुरु झाला.

बिर्ला उद्योग समुहासारख्या बडया समुहाने आपली 'आयडीया' लढवली तर मित्तलांनी एअर टेल आणली जिओच्या आगमनानंतर ' आयडीया ' संपून आता व्होडाफोन मध्ये जात आहे. अनिल अंबानीची रिलायन्स बुडल्यावर ती पुर्ण पणे जिओ अर्थात मुकेश अंबानी व पुढची पिढी आकाश अंबानींच्या ताब्यात जात आहे.

दरम्यान देशात सर्वत्र उपस्थित असलेल्या भारत संचार निगम या शासकीय कंपनीला मात्र चांगली गळती लागली. प्रथम घोटाळे नंतर निर्बंध व आता निवृत्तांची वाढती संख्या यातून बीएसएनएल स्पर्धेत असली तरी केरळ व्यतिरिक्त बाहेर अद्याप 4-जी सुरु करु शकलेली नाही. या भारत संचारला जिओचा हा भारत इंडिया जोडो म्हणजे आखरी धक्का नसला तरी स्पर्धा खूपच तीव्र होणार याचा संकेत आहे.

या जिओची ही धक्कातंत्र निती केबल चालक आणि डिश टिव्ही, एअरटेलच काय पण टाटा स्काय सारख्या बडया दिग्गजांना स्पर्धेत खेचणारी ठरणार आहे
आणि त्यांची परिक्षा पाहणारीच आहे. यात फायदा अर्थातच ग्राहकांना होईल हे नक्की.

दरम्यानचा काळ मोबाईल बूमचा काळ होता. त्यात आलेल्या छोटया-छोटया श्याम टेलिकॉम, युनिनॉर, एअरसेल अशा पावसाळी छत्र्या जणू वाहूनच गेल्या. आता जिओची टक्कर टाटा स्काय आणि हॅथवे सारख्या कंपन्यांशी आहे. त्यात जिओच सरस ठरण्याची आरंभिक चिन्ह आहेत.

नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला. असं करणारा तो पहिला मानव ठरला. त्यावेळी जे तंत्रज्ञान आणि दोन दोन खोल्या व्यापणारे संगणक वापरले गेले.
त्या संगणकापेक्षा अधिक क्षमता असणारे मोबाईल फोन सध्या ॲपल, सॅमसंग, वन प्लस सारख्या कंपन्यानी बाजारात 500 ते 1000 डॉलरमध्ये उपलब्ध करुन दिले आहे. आणि त्या मोबाईलच्या क्षमतेत दिवसेंदिवस वाढ होताना आपणास दिसते.

माझ्या मामाचं पत्र हरवलं....... म्हणत निरागसपणे अंगणात खेळणारी पिढी आज चाळीशी पार करुन सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. इतक्या मोठया प्रमाणात तंत्रज्ञानातील बदल कधी कधी गोंधळून टाकत असले तरी असे बदल अनुभवणारी ही एकमेव पिढी आहे.........आज तंत्राची गती बघताना जरा भविष्याचा वेध घ्यायचा म्हटलं तर जाणवतं की, येणारा काळ आणखी मोठे बदल घडविणारा आहे. आय टी... आय टी अर्थात माहिती तंत्रज्ञानात आज जे अभियंते कार्यरत आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

इंटरनेट, कृत्रिम बुध्दीमता अर्थात आर्टीफिशिअल इन्टलिजन्स, तसेच
डाटा सायन्स अर्थात इन्डस्ट्री 4.2 तसेच रोबॉटिक्स, मशीन, डिजिटल मार्केटींगकडे ही वाटचाल जाते. मुलांनी करिअर मेडिकल करावं की, इन्जिनिअरिंग यात वेळ घालणाऱ्या पालकांनी वेळेत याकडे लक्ष दिलं पाहिजे.

बाजारपेठ बदलत आहे. ई-कॉमर्स वाढलय, कम्पूटर गेमिंग आता मोठया इंडस्ट्रीत रुपांतरीत झालयं त्याला दिवसेंदिवस गती येते आहे. तसं तत्रज्ञान समोर येतय. विना वाहन चालक कार आज प्रायोगिक स्वरुपात असल्या तरी लवकरच त्या अनेकांचा रोजगार संपवतील अशी स्थिती आहे.

डार्विनने सर्वोत्तम तेच टिकेल असा सिध्दांत मांडला पण तो प्राणीमात्रांच्या उत्क्रांतीसाठी होता. यात सर्वोत्तम ठरलेल्या मानवानं आता खूप उंची गाठली आहे. मानवाने तयार केलेल्या मशीन आता बुध्दीमान होत आहेत..... या उत्क्रांतीचा सिध्दांत आजवर मांडला गेलेला नाही. भविष्याच्या उदरात आणखी काय दडलय याची कल्पना नाही. मेगा ते गिगा मजल गाठणारं तंत्रज्ञान आणणाऱ्या जिओने धक्का दिला तो यावर विचार करण्यासाठीच दिला असंच म्हणावं लागेल . उद्योगाच्या जगात ' जिओ और जिने दो ' असा न्याय असत नाही. काळाची पावलं न ओळखलेल्यांच्या पाऊलखुणा देखील कधीकधी सापडत नाहीत.

माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार न म्हणता विस्फोट असं जे म्हटलं जातं ते यामुळेच .... पुढे काय ची उत्सुकता लागणं वेगळ आणि त्यासाठी तयार असणं वेगळं.
जिओ च्या या नव्या प्रवासाला सर्वच जण प्रतिसाद देणार हे देखील नक्की आहे. कारण प्रत्येकाला वेगाचं वेड आहे. कदाचित वेग यायला आताच सुरुवात झालीय... Pandora's Box खुला नही है अभी......

…पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त......

- प्रशांत दैठणकर

9823199466



Tuesday, 3 July 2018

..... फ्लॅशबॅक !


सहज म्हणून नजर गेली अन् तिथं स्थिरावली...... ती मनापासून बोलत होती पण माझं मन वेगळया विश्वात पोहोचलं होतं. तिच्या बोलण्याकडे माझं लक्ष आहे असं दाखवण्याची अगदी केविलवाणी धडपड मी करीत होते. ..... माझी नजर तिच्या त्या गहिऱ्या डोळयांवर होती आणि मन कुठेतरी त्या कॉलेजच्या दिवसात भटकत होतं.

बोलता- बोलता ती थांबली आणि मी भानावर आलो. माझा मलाच प्रश्न पडला की माझं मन आज अचानक असं का भरकटलं...... तसं नाही म्हणायला मनावर कोणीच नियंत्रण ठेवू शकत नाही पण तिच्या त्या काजळाने उठून दिसणा-या   सुंदर डोळयांनी मला भूरळ घातली होती.

आयुष्याचं कोणतं वळण कुठे घेऊन जाईल ते सांगणं खरच अवघड असतं......
कॉलेजचा काळ असाच आठवावा...! खरं म्हणजे विसरच पडला नाही त्या दिवसांचा कारण ते अगदी काल जगलय इतकं ताजं आहे.

साधारण श्रावणातला तो काळ. श्रावणसरी लपंडाव खेळत होत्या.... ती कॉलेजच्या कोपऱ्यावरुन येताना दिसली आणि मी बघतच राहिलो. इतक्या अंतरावरुन तिची नजरानजर झाली आणि अवचित पावसाची सर आली.... मी जागीच थिजल्यासारखा, वरुन पाऊसधारा बरसत होत्या लक्ष मात्र तिच्यावर..... ती देखील हातातली छत्री न उघडता मस्त पावसाचा आनंद घेत होती. मलाही भिजताना बघून तिला हसू आलं....तळहातावर पाऊस झेलत ती बाजूने निघून गेली.... मी तिच्याकडे अन् ती माझ्याकडे..... बाजूने जाताना तिने झकास असं 'स्माईल' दिलं.

..... ती पहिली भेट असं म्हणता येईल. तिला पाहून मोहोरलेलं मन तिचाच पाठलाग करीत होतं....... एक वर्ष ज्युनियर होती ती....
. नजरभेटीचा हा खेळ आठवडाभर सुरु होता.

हमसे आया ना गया

तुमसे बुलाया ना गया


अशा स्थितीत आठवडा घालवल्यावर मी स्वत: हिंमत करुन तिला पायऱ्यांवर थांबवून बोलायला सुरुवात केली.... मला जाणवलं तिलाही माझ्याशी बोलायचं होतं. परिचय झाला ......वाढत गेला आणि वाढतच राहिला.... आईस्क्रीमच्या बहाण्याने रेस्टॉरन्ट मध्ये तासभर तर कधी दोन- दोन तास गप्पा मारत बसायची सवय जडली दोघांना....

आता इतक्या वर्षांनी विचार करताना माझा मलाच प्रश्न पडतो.... काय बोलायचो आपण दोन-दोन तास तिथं ... नेमके काय विषय होते गप्पांचे .... तसा तो काळ खूपच संथ होता.....ना मोबाईल ना फोन.... अशाच भेटींचा सिलसिला सुरु राहिला तो देखील जमानेसे छुपके सुरु होता.....!
मांजर डोळे मिटून दूध पिते.... पण ते साऱ्या जगाला दिसत असतं. तसं आमच्या या भेटी सर्वांना माहिती होत्या. नंतर- नंतर सर्वत्र चर्चा झाली..... Love असतं तरी ते Arrange करुन एकत्रित वाटचाल सुरु झाली.... या साऱ्या प्रवासात किती दूरवर चालत आलो हे कधी मोजलंच नाही.......!

अचानक ते सारे गुलाबी दिवस आठवले...... तिचं बोलणं थांबलं..... ती प्रतिसादाची वाट बघत होती.... अर्थात माझ्या मनातला ' फ्लॅशबॅक ' तिला थोडाच दिसणार होता..... तिच्याही नजरेत ती जादू होती.....इतक्या वर्षांनी इतकं साम्य... तीच नजर.....मी सावरुन " हं काय म्हणालात " असं म्हटल्यावर तिच्याही ध्यानात आलं की तिच्या बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं..... तिनं डोळयांवर आलेली केसांची बट अलगद कानामागे सारली ...... आता मात्र तिची नजर माझ्या डोळयात काही तरी शोधत होती आणि संमतीदर्शक हसू  आता तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं.... 
.... 
त्याक्षणी ती अधिकच सुंदर भासली.
आता मात्र .....मन वर्तमानात होतं.....! 





- प्रशांत दैठणकर

9823199466

Monday, 2 July 2018

संस्कार..... देता का संस्कार...

संस्कार ही आपल्या देशाची संस्कृती आहे असे मानले जाते. ती जगात आपल्या देशाची खरी ओळख आहे. आपल्याकडील ती 'अतिथी देवो भव' ची परंपरा असो की, एकमेकांना दिला जाणारा आदर आपण याला मानतो आणि 5 हजार वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून हे जपत आलोय. साऱ्या जगाला आपल्या देशाबाबत मोठया प्रमाणावर याबाबत कुतूहल देखील आहे.

आपण संस्कारांची चर्चा ज्यावेळी करतो त्यावेळी आपणास जाणीव असते की, संस्कार एखाद्या दुकानात किंवा मॉल मध्ये मिळत नाहीत. संस्कार ही कुटुंबात आणि मित्रांच्या संगतीत फुलणारी एक वेल असावी असं म्हणता येईल.

पालकांकडून आपले पाल्य एखाद्या अभ्यासाच्या विषयात कमजोर असेल तर शिकवणी वर्ग लावता येतात. मात्र संस्कारासाठी असे शिकवणी वर्ग देखील लावता येत नाही. मुलांना उन्हाळी किंवा दिवाळीच्या सुटीत
विविध प्रकारच्या छंद वर्गात आपण अडकवून मोकळे होतो. यात छंदाची जोपासना शक्य आहे. मात्र यातून संस्कार घडतील अशी अपेक्षा ठेवणं अतिशय चूक म्हणावं लागेल.

संस्कारी पिढी घडवण्यासाठी मुळात पालकांची पिढी संस्काराच्या वटवृक्षासारखी असली पाहिजे. सोबतच मुलं आपल्याकडे बघून अनुकरण करतात. याचीही जाणीव आपण आपल्या प्रत्येक कृतीमध्ये ठेवायला हवी. कोणताही प्राणी अनुकरणशील असतो. अशा सर्व प्राण्यांमध्ये सर्वात बुध्दीमान प्रजाती म्हणजे मनुष्यप्राणी आहे, असे आपण मान्य केलेले आहे.
मानव प्राण्याच्या जाणीवा विकसित झालेल्या आहेत. आपण सहजीवनात विश्वास ठेवतो. हत्तींचा कळप आणि मानवी समाज यात मुळात फरक हा आहे की, आपण एकमेकांप्रती आदर ठेवतो.

वडिलधाऱ्या व्यक्तीकडून संस्कार घडवण्याची गरज नसते ते दैनंदिन वागण्या-बोलण्यातून घडत असतात. ही अगदीच सहजपणे होणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी मुलांना हवी असते ती जवळीक आणि सोबतच भावनिक मोकळीक यांची.

सर्वसाधारणपणाणे मुलांना द्यायला वेळ नाही. मग यातून त्यांना गुंतवून ठेवणे हा एक मार्ग शोधला जाताना दिसतो. पूर्वी अशी चौकोनी कुटुंब पध्दती नव्हती.
अशा काळामध्ये घरात माणसांचा राबता असायचा. त्यामुळे कुणातरी एकाचे लक्ष सातत्याने असायचे. यातून जपला जाणारा स्नेहभाव आणि जिव्हाळा याची तुलना आजच्या चौकोनी कुटुंबात होवू शकत नाही.

यात संस्कार हे आपोआप घडतात, असं मान्यच केलं पाहिजे. आजकल तर एकूलता एक ही प्रवृत्ती वाढीस लागली आहे. 15 ते 20 लाखांचे पॅकेज घेणाऱ्या आय.टी.क्षेत्रीतील पती - पत्नीला पॅकेजची चिंता अधिक असल्याने मूल दत्तक घेताना आपण बघतो की, समाजात ज्यांचे कुणीच नाही अशा मुलांना दत्तक घेणे केव्हाही चांगलेच म्हणावे लागेल.

मुलाचे हट्ट पुरवण्यासाठी सर्व गोष्टी दुकानात आणि आता तर ऑनलाईन उपलब्ध आहेत. मात्र संस्कारांचे काय? संस्कार ना दुकानात मिळतात ना ते ऑनलाईन उपलब्ध असतात. संस्कार हे जाणीवेतून घडतात पण आपल्या अपूर्ण अपेक्षांचे Extension म्हणून मुलाचा वापर करताना याचा आपणास विसर पडतो. आपल्याला डॉक्टर व्हायची इच्छा होती पण ते जमलं नाही, म्हणून मुलांच्या विश्वावर आपण आपलं स्वप्न लादून मोकळे होतो आणि मोठी गल्लत होते.

काळ बदलत आहे आणि आपण काळाची पावलं ओळखली पाहिजे कारण ती ओळखली नाही तर आपली भावी पिढी भरकटणार याची आपणास जाणीव आपण ठेवावीच लागेल. काळाचा बदलाचा वेग खूप अधिक आहे त्यानुरुप आपण याचा वेध घेऊन आपणच नव्या पिढीला मार्गदर्शन करायला पाहिजे.

राजकारणात
ज्याप्रमाणे घराणेशाही आपण बघतो तीच घराणेशाही समाजात व्यवसायाच्या बाबतीत आपणास दिसते. संस्कारक्षम वयात मूलं कच्चा मातीचा गोळा असावं अशी असतात. त्यांना संस्कारातूनच घडवायचं असतं हे सूत्र आपण जाणलं पाहिजे. तसे संस्कार आणि आदर्श त्यांच्यासमोर ठेवले पाहिजेत. यातून व्यक्तीमत्व खुलतं उमलतं... वाढ योग्य झाली नाही तर झाडं जशी खुरटतात तसं व्यक्तीमत्वाचंही हेातं, याची जाण आपण ठेवायला हवी.

संस्कार देता का संस्कार.......कुणी माझ्या चिमुकल्या जिवांसाठी संस्कार देतं का ........असं म्हणून संस्कार मिळत नाहीत. कारण आजवर जगात साऱ्या वस्तू जगात विकत मिळत असल्या तरी विचार, व्यक्तीमत्व आणि संस्कार कोणत्याही दुकानात मिळत नाही.

प्रशांत दैठणकर
9823199466

Friday, 29 June 2018

वक्त होता नही... निकालना पडता है

प्रसंग,
नायिका असलेल्या माधुरी दिक्षीतला मुद्दाम त्रास देण्याचा नायक अनिल कपूर याने मुन्ना ऊर्फ महेश देशमुख मंदाकिनीला म्हणतो ... वक्त होता नही है .. निकालना पडता है .. ! चित्रपट तेजाब . 

प्रसंग लक्षात राहण्याचं कारण म्हणजे वेळ ... हो अनेकदा अनेक प्रसंगी लोकं बोलतात .. मला ते करायची इच्छा आहे पण वेळच नाही मिळत ... अर्थात आपण खूप बिझी आहोत हे सांगायचं असतं , सतत कामात राहणं आणि वेळ नसणं यांचा काय संबंध आहे हे आपण जाणतोच माझ्या आईचं एक वाक्य मला आठवतं ... इतका कुठे बिझी की जेवायलाही वेळ नाही तुझ्याकडे , तू काय राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आहेस का.?

सांगायचं हेच की वेळ नसण्याची सबब सर्वजण पुढे करताना दिसतात आणि सबबीचा एक खास गुणधर्म आहे. सबब ही कायम लंगडी असते परंतु भारतात तीच अधिक चालते ...

एक रेल्वे ताशी 60 च्या वेगाने 20 मिनिटे धावली तर किती अंतर पूर्ण केले किंवा 6 माणसे एक घर 30 दिवसात बांधतात तेच घर 9 माणसे किती दिवसात पूर्ण करतील ... अशा पध्दतीची काळ - काम - वेगाची गणितं शाळेत असताना मला स्वत:ला आवडत होती कदाचित अनेकांना आवडत नसावीत प्रत्यक्षात आयुष्यात जगात वावरताना मात्र वेळं आणि त्याचं गणित सांभाळाव लागतं ते कुणालाच आवडत नाही हे स्पष्ट आहे . वेळ म्हटल्यावर अनेक पध्दतीने याचा विचार होतो मराठी भाषा लवचिक आहे त्यामुळे याबाबतीत अधिक रंजकता आपणास बघायला मिळले.


वेळ कधी सांगून येते का ? याचा अर्थ निराळा आणि '' अशी वेळ कुणावरही येवू नये '' याचा अर्थ निराळा '' काय वेळ आणली पोरानं ''.. याचा अर्थ वेगळा ... अशा प्रकारे जसं आपण बघतो . आयुष्याचं अभिन्न अंग म्हणून वेळ हे एकक आहे. प्रश्न आहे की आपण याबाबत गांभीर्य बाळगलं नाही तर वेळच तसच करायला आपल्याला लावत.

आपल्याला वेळ नाही ही सबब आपण इतरांना देवू शकतो मात्र आपण काही जणांना वेळ दिलाच पाहिजे असं माझं स्वत:चं मत आहे. आपण आयुष्यात कशाला प्राधान्य द्यायचं याचा निर्णय आपण प्रथम घ्यावा. प्राधान्यक्रम ठरवला म्हणजे वेळेचे व्यवस्थापन शक्य होत असते. यासोबतच काही सवयीत बदल करणे काही नव्याची सुरुवात करणे आदी बाबीतून आपण वेळेचे योग्य व्यवस्थापन करुन वेळ काढू शकतो, निश्चितपणाने वेळ काढता येतो .

आपण हे लक्षात घेतलं पाहिजे 50-100 कंपन्या चालवणारी व्यक्ती आणि आपण या दोघांनाही दिवसात सारखाच वेळ असतो. तुलनेत आपल्या मागे व्याप कमी असूनही आपण स्वत:साठी तसेच कुटुंबासाठी प्राधान्यक्रमाअभावी आहे.आता स्वत:साठी वेळ द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं असं विचाराल तर सांगता येईल आरोग्य प्रथम आपण रोज स्वत:च्या आरोग्यसाठी वेळ राखीव ठेवलाच पाहिजे. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ...
अन्नाला आपण पूर्णब्रह्म म्हणतो त्याचे सेवन करताना स्थिर राहणे अपेक्षित असते. मी स्वत: जेवण करीत असताना माझी पत्नी किंवा माझी मुलं यांचा नंबर असेल तरच मोबाईल अटेन्ड करतो कारण मी घराबाहेर राहतो. दूर असतं कुटूंब . कुटुंबात असेल त्यावेळी तो प्रश्नच येत नाही. माझ्या कुटुंबात कुणीही जेवताना फोन उचलत नाही. आता मला सांगा तुम्ही सिनेमा गृहात जर फोन उचलत नाहीत तर जेवताना का उचलता. तिथं प्राधान्य त्या सिनेमाला देता ना.

जेवताना मोबाईलवर बोलणं म्हणजे स्वत:साठी वेळ न देणं होय असं मी मानतो. आम्ही शाळेत असताना मधल्या सुट्टीत काही जण डबा खात होते त्यावेळी आमचे मुख्याध्यापक द.रा.मेढेकर वर्गात आले. मुलं सर आले म्हणून उठून उभे राहिली. त्यावेळचं मेढेकर सरांच वाक्य होतं '' अरे बसा मुलांनो बसा , लक्षात ठेवा जेवताना राष्ट्रपती आले तरी जागेवर उठायचं नसतं.'' ते वाक्य शाळेतच मनावर कोरलं गेलं .. खरं आहे ते.

विवीध कार्यक्रमात एका हाताने जेवत दुस-या हाताने मोबाईल कानाला लावून अखंड बडबड करणारे अनेकजण आपणास दिसतील .. इतकं काय तातडीचं असतं ते
..
आपण आणि आपलं कुटुंब यांचा आपल्या वेळेवर पुर्ण हक्क आहे तो आपण मान्य केला पाहिजे. आपण जगतो कुणासाठी ? स्वत:साठी आणि कुटुंबासाठी तर सारी धावपळ आपण अहोरात्र करित असतो. आपला प्राधान्यक्रम इथून सुरु झाला म्हणजे आपल्या जगण्याला खरा अर्थ येईल.


आपली
खरी संपत्ती आरोग्य आहे या जाणिवेतून त्यासाठी वेळ द्या तो न दिल्यास आजारी पडाल, मग उपचार आणि दवाखाना यासाठी वेळ द्यावाच लागेल कारण शेवटी प्राधान्य त्याला प्राप्त होणार ... मग आधीच स्वत:ला वेळ देवून पुढचा वाया जाणारा वेळ आणि पैसा तुम्हाला वाचवता येईलच ना.

अनेक बाबतीत आपण पूर्वतयारी करुन मोठया प्रमाणावर वेळ वाचवू शकतो मग हा वाचवलेला वेळ आपण सत्कारणी कसा लावायचा याचाही निर्णय घेवू शकतो ... म्हणूनच म्हणतात ना वक्त होता नंही . . . निकालना पडता है ..

-- प्रशांत दैठणकर
9823199466

...............................
............................................

Thursday, 28 June 2018

हर फिक्र को धुंएमे.....!


मन हां भी करता है और ना भी करता है. अशी स्थिती आज पुन्हा नव्यानं जाणवायला लागली आणि आठवण झाली. विल्यम शेक्सपिअरच्या टू. बी. और नॉट टू बी या प्रसिध्द वाक्याची..... करावं की नाही अशी स्थिती प्रत्येकाला रोज वेगवेगळया स्थितीत गाठते..... कदाचित निर्णय घेतला लवकर आणि चुकला तर मनस्ताप...... उशीर केला आणि चुकला तर मनस्ताप..... यानं बदलतो माणसाचा मूड..

आज प्रत्येक जण धावत....का आणि कशासाठी असं विचारुन आपण आपलं हसं का करुन घ्यावं..... कशासाठी पोटासाठी खंडाळयाच्या घाटात जाई...... हे बालगीत त्याचं उत्तर आहे.....काही अंशी तेच आहे पण त्याही पलिकडे काही कारणं आहेत ज्यासाठी प्रत्येकाची वेगळी धाव सुरु आहे.

मूड का बदलतो हे आपलं आपल्याला कळत नाही असं अनेकदा होत असतं पण आपला मूड बदलला हे समोरच्याला बघता क्षणी कळतं.....
त्यांनी जाणवून दिल्यावरच आपल्याला कळणार आहे का हा बदललेला मूङ..... तसंही नाही आपल्यालाही जाणवतंच की, उशिराने का होईना......

हा मूड या धावपळीचं फलीत आहे आणि त्याचं रुपांतर अनेकदा रक्तदाब, हृदय विकार आणि तत्सम बाबीत होतं मग आपण सावरण्याचा प्रयत्न करतो...... जगण्याची धडपड मनाचे मूड नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायला लागतो.... पण जगात चंचल असणारं मन आपला हट्ट सोडत नाही. विक्रम-वेताळासारख्या गोष्टी प्रमाणे ते पुन्हा मूड बदलायला लागतं...... मग अधिकच वैताग व्हायला लागतो. मी मानसिक दोलायमानता जी स्थिती निर्माण करते ते हळूहळू असहय होवून जाते ज्याला आपण मानसिक ताण किंवा स्ट्रेस म्हणतो.

मानसिक ताण हा आजच्या जीवनशैलीचा एक घटक बनत आहे. यातून काही मार्ग निघेल का.... आहे ना मार्ग...
.स्थितप्रज्ञता हा मार्ग आहे.

Hypper होण्याची वृत्ती पाहून आजकालची पिढी ज्या भाषेत बोलते त्या भाषेत सांगायचं असेल तर म्हणावं लागेल Take a chill Pill. ... ओये ठंड रख....!

खरच मानसिक आंदोलन शांत करता येतील की नाही....... त्याचीही एक वेगळी चिंता.

आपल्याकडे माणूस आयुष्यात एकदाच धडधडून पेटतो..... तो फक्त सरणावर बाकी वेळा त्याचं परिस्थितीशी लढणं चालत राहतं. आपल्या मानसिक कुवत आणि ज्ञानाप्रमाणे आणि मग प्रत्यय येतो.
चिंता जाळी शरीर, चिंता जाळी मन
या उक्तीचा.... रोजच चिंता करणं म्हणजे रोज थोडं थोडं मरणं होय. ते टाळता आलं पाहिजे. सक्षम मन ही यशासाठीची गरज आहे. जे घडतय त्याला आपण काय आणि कशी प्रतिक्रिया देतो यावर आपल्या बाहय व्यक्तीत्वाचं रुप लोकांना दिसत..... मनात काय चालू आहे हे आपल्या स्वत:शिवाय कुणाला कळत नाही.

आत्मचिंतन आणि आत्मसंवाद उत्तम असेल तर समोर घडणाऱ्या प्रत्येक बाबतीत आपण क्षणात निर्णय घेऊ शकतो.
....
तो चुकला तरी तो आपण घेतलेला निर्णय आहे याचा अभिमान असेल तर मानसिक त्रास कमी होतो.

पौ बारा.... म्हणत आयुष्याचं प्रत्येक दान आपल्या पदरात पडण्याची अपेक्षा करायला आपण काही भारलेल्या कवडया वापरणारे कौरव आणि शकुनीमामा नाही.

मनासारखं घडलं तर आनंद वाटतो ना मग नेमकं मनाविरुध्द घडलं तर..... ठीक आहे..... होता है लाईफ मे अशी वृत्ती आपला ताण कमी करेल.

आपल्या स्वत:च्या क्षमतांची ओळख करुन घेणं अधिक महत्वाचं ते फक्त आत्मसंवादातूनच शक्य आहे.... क्षमता पुर्णपणे माहिती असतील तर ताण येत नाही.... जगात दोनच बाजू आहेत Yes or No. आपल्या क्षमतेत असेल तर आपण करु शकतो त्यात यश - अपयश याबाबत स्विकारण्याची तयारी असावी.

जी बाब क्षमतेबाहेत व इतरांवर किंवा परिस्थितीवर अवलंबून आहे ती बाब Yes झाली तर तो बोनस समजायचा. पण प्रयत्न जरुर करायचे. मनाची तयारी अगदी Try for the Best, Ready for the Worst अशी आहे. प्रश्न कर्माचा आहे, आपण कर्ते आहोत.

आयुष्यात यश मिळविणारे आणि अपयश पचवणारेच यशस्वी होतात. महत्वाकांक्षा आणि क्षमता यांची सांगड न घालता डोंगर उचलण्याचा प्रयत्न करुच नये.... मला याबाबत विचार करताना माही अर्थात कॅप्टन कूल एम.एस. धोनी नेहमी दिसतो....
. शांत.... अगदी शांत ... त्याच्या चेहऱ्यावर मनातल्या विचाराची आंदोलने खूप कमी वेळा आणि अगदी कमी प्रमाणात दिसतात त्यामुळे तो पुढे काय करणार याचा अंदाज येत नाही..... असं Unpredictable पणा यशाकडे नेतो हे साऱ्या जगानं बघितलय...

सांगायला सारे सांगतात. सकाळी व्हॉटस्ॲपवर अशा संदेशांचा पाऊस पडतो....
यह भी पल जायेगा..... मात्र संध्याकाळपर्यंत पडणाऱ्या पांचट विनोद आणि व्हिडिओचा पाऊस बघितल्यावर जाणवतं लोक तणावाखाली आहेत. तणावातला माणूसच जास्त शोधात राहतो. विनोदाच्या किमान काही क्षण तरी हसण्याची ही केविलवाणी धडपड असते.

हर फिक्र को धुएं में उडाता चला गया
मै जिंदगी का साथ निभाता गया...
...


अर्थात तणाव मुक्ती.... मूड जरुर बदलेल पण प्रतिक्रिया आणि सूर बदलला नाही पाहिजे. जगताना साधं जगलं पाहिजे. म्हणजे खूप काही करण्याची महत्वाकांक्षा विनाताण साध्य होते. अगदी हसत खेळत.....

---प्रशांत दैठणकर

9823199466

Tuesday, 26 June 2018

मेरा पती मेरा देवता ...?

मी लहानपणापासून पुराणातल्या सात चिरंजीवी ची कथा ऐकत आलोय. त्यात सर्वांना प्रकर्षाने लक्षात राहतो तो अश्वस्थामा ...
तो देखील त्याच्या भाळावरल्या जखमेमुळे ... ती जखम घेऊन जगण अशक्य अशा स्थितीत त्याला अमरत्व दिल्याने त्याच्या त्या वेदना देखील युगानुयुगे सुरु आणि वेदनांना देखील मरण नाही... कसं असेल ते जगणं...

ही जखम आठवण्याचं कारण म्हणजे वटपौर्णिमा अर्थात वड पौर्णिमा ... ती सावित्री सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी सृष्टीचा नियम बदलायला लागली आणि ते तिनं केलं.... पण आजच्या सावित्रींकडे मी बघतो तेंव्हा मला त्यांच्याही भाळावर ती जखम दिसायला लागते....!

पंरपरा कुठं सुरु झाली ठाऊक नाही... का करायची पूजा तर त्यामागे कथा आहे.... पण आजच्या सावित्रीच्या आयुष्यात असलेला व्यथेचं काय ? घरा घरात अशा सावित्रीच्या हो प्रत्येक सावित्रीच्या व्यथेचीच कथा आहे... तरी परंपरा सुरु आहे....

भला है बुरा है जैसा भी है मेरा पती मेरा देवता है.....!

हा देवता आहे ही मानून भारतीय नारी या जन्मीच्या साऱ्या वेदना उरात कवटाळत खरच मनापासून जन्मोजन्मी हाच पती मागत असतील का ? आणि लगेचच दुसरा सवाल का म्हणून मागावा. ती कलयुगातल्या सावित्रींची जखमही मग भळभळत रहाते... आपलं घरदार सोडून स्वत:चं अस्तित्व पूर्णपणे बदलून परक्या घरात आजची सावित्री येते... किती जणींना चांगली वागणूक मिळते .. कालपर्यंत न बघितलेला, त्याला सत्यवान मानायचं, त्याला देवाचं स्थान द्यायचं आणि पूजा करायची.


सतयुग केंव्हाच संपलं हे कलीयुग आहे. त्या सावित्रीचा तो सत्यवान होता... तुझा कोण आहे गं पती कलियुगात बेवडा, जुगारी, ....गुन्हेगार .... काही का असेना कुंकुवाचा धनी आहे म्हणतं त्याची पुजा करायची... त्याचं मानसिक व्यंग लपवायचं ..... कोण कसा हे सगळयांना कळत नाही म्हणूनच पत्नीला अर्धांगिनीचा दर्जा दिलाय. शब्दाने प्रत्यक्षात ती अर्धांगिनी असते का? त्याचं सारं खरेपण पोटात घालून समाजात त्याला चांगलं म्हणायचं... मेरा पती ....देवता म्हणायचं.

असं ऐकलं होतं कोणत्याही दगडाला शेंदूर पासून देव होत नाही... मुळात त्या दगडात देवपण असावं लागतं.

...सत्यवान किती आहेत आज म्हणून त्यांच्या सावित्रीनं जन्मोजन्मीची साथ मागायची ..... ती अबला आहे असं म्हणत पती-पत्नीच्या नात्यात बहुतेक कलयुगी सावित्री दुय्यम जिणं जगताहेत. Male dominant culture .. पुरुष प्रधान संस्कृती ... किती जणींना बरोबरीचा दर्जा मिळालाय आणि किती जणी केवळ.... अर्धांगिनीच्या ऐवजी अंगवस्त्र म्हणून बघितल्या जात आहेत... मग त्यांनी का म्हणायचं ... मेरा पती मेरा देवता ...?

सप्तपदीच्या प्रत्येक फेऱ्यात दिलेली वचनं ही समारंभाचा भाग आहेत का... आता तर विवाह समारंभ कमी आणि इव्हेंटच जास्त झालाय.. त्याचा फायदा घेत व्यावसायिक गणितं मांडत धुमधडाका केला जातो... DJ च्या गलक्यात कुठे ऐकू येतात ती सप्नपदीची वचने ....!

कलियुग ....घोर कलियुग ... सप्तपदीची पावलं देखील आज दारुच्या धुंदीत अडखळतच पडताना दिसतात... संसार कसा सरळ होणार नंतर...!

आपली भारतीच संस्कृती निश्चितपणे जगात सर्वात्तम आहे... ती टिकून आहे कारण इथं अर्ध्या समाजाला विवाहाच्या साखळदंडानं बांधून भिंतीला जखडलय संसार नावाच्या .... ही सक्तीची जन्मठेप आहे आणि त्या गुंगी गुडियाला बोलायला बंदी आहे... सक्ती आहे म्हणून अधिक प्रमाणात विवाहसंस्था टिकून आहे... विवाहसंस्था ही संस्कृती नव्हे.... स्त्री - पुरुष यांना समानपणे जगण्याचा अधिकार ही संस्कृती आहे.... ती विसर्जित करुन घराघरात कलयुगातली ती घरची मालकीण (?)….!


घे उंच भरारी घे.... मुक्तपणे आयुष्य जग असं सांगताना घरात 'पिंजरा' आणून ठेवणारे कमी नाहीत... आणि हा पिंजरा ... दोन्ही अर्थानं.... मग तो सत्यवान तर नक्की नाही पण ... परंपरा....!

होळीला मी बोंब मारतो, का मारतो .. माहिती नाही....! पूर्वापार चालत आलय... परंपरा.... !

त्याला सत्यवान बनता आलं नाही पण त्याला सत्यवान मानत ती सावित्री पुन्हा निघते वडाच्या त्या झाडाला रेशम धाग्यांचे गुंफण घालून साता जन्माची साथ मागायला ....

मला मात्र भळभळणारी जखम आणि तळमळणारी मनं दिसत राहतात... !

- प्रशांत दैठणकर

9823199466

Monday, 25 June 2018

Love@First Sight


आकर्षण ही बाब अशी आहे की, त्याला कोणतीही कारणमिमांसा लागू पडत नाही.....सांगायचं कारण म्हणजे 'ती ' हो आता ही ती कोण ? प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतो मात्र काही जणं टाळतात., काही जणं सहन होत नाही आणि सांगता येत नाही या स्थितीत वावरतात......काहींच्या मनात समाजाची भिती यानेकी बागुलबूवा असतो....
.आपण मात्र व्यक्त होतो अगदी मोकळेपणानं असं मला जाणवलं....

म्हणतात ना 'आरशासमोर खोटं बोलता येत नाही ' अर्थात हे सत्य असलं तरी स्वत:लाच फसवणारे इथं बहुसंख्येने आहेत, ते जर स्वत:ला खरं सांगत नसतील तर जगाला काय सांगतील ? असं चित्र दिसतं....

मीच नव्हे तर सर्वच मानतात की, आकर्षण हे नैसर्गिक,त्याला नाकारणं म्हणजे भावनीक कोंडमारा करुन घेणं म्हणता येईल. आकर्षण असणं आणि प्रत्यक्षात त्याचा लाभ होणं यासाठी सकारात्मक विचार असायला हवे.

मध्यंतरी 'सिक्रेट' नावाच्या पुस्तकाचं फॅड आलं होतं. त्यातूनच प्रेरणा घेत शाहरुखच्या तोंडी '..... शिद्दतसे...... कायनात........ ' असा भला मोठा उपदेश टाकला गेला. पण तो प्रत्यक्षात किती जणांनी अनुभवला..... देखल्या देवा......
म्हणत आमची स्वप्नं पुर्ण झाली असे सांगणे चुकीचे असले तरी बहुतेक जण ही चूक करतात. आकर्षण असलं की मन स्वप्नाळू होतं..... त्यात नकारात्मकता आली तर ते विध्वंसक देखील ठरु शकतं...... पण ते ही चालतं.

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी 'ती ' दिसायला लागते त्यावेळी समजायचं ते आकर्षणच आहे . जे नसलेल्या गोष्टीत आपलं रुप दाखवून मनाला स्वप्नं बघायला लावतं.... काही सावरतात.... काही घाबरतात तर काही आवरतं घेतात.... खऱ्या आकर्षणातून (कबूल करा की न करा ) मन झुरायला लागतं.

जगाची सुरुवातच मुळी आकर्षणातून झाली. ईव्ह आणि ॲडम आणि ते आकर्षण..... पडलेल्या सफरचंदाचं..... जग बरच प्रगत झालं आणि पुन्हा एकदा सफरचंद पडलं.....ते न्यूटनच्या माथ्यावर. त्यातून लागला शोध गुरुत्वाकर्षणाचा.... ते देखील आकर्षणच आहे..... 20 व्या शतकाच्या अखेरीस तुकडा मिसिंग असणारं सफरचंद बाजारात पडलं (खऱ्या अर्थानं) म्हणून आकर्षण थांबलं नाही... आज 'ॲपल' चं आकर्षण आहेच साऱ्या जगाला.

खरेदी करण्याची कुवत नाही पण आकर्षण आहे अशा स्थितीत असणारे कमी उत्पन्न असणारे चाहते आकर्षण मान्य न करता मनातल्या मनात झुरतात हे नक्की.... आकर्षण.... वेळ निघून गेल्यानंतरचं खूप वेगळं. पदरी पडलं पवित्र झालं म्हणत तिनं याला सांभाळायचं. आणि तूच माझी मिस युनिव्हर्स म्हणत आपण आनंदी आहोत असं दाखवायचं..... मनातली 'ती ' काही जात नाही..... मजबुरीच हो बाकी काही नाही.... पण मनातलं आकर्षण मनात रहातं अन्ं मन आतल्या आत झुरत राहतं.....

आता वयाच्या चाळीशीनंतर 'ती ' बघायची तरी कशाला ? याचं उत्तर आकर्षण..... ती आणि मी भेट फक्त दोनदा. एकदा फक्त तोंड ओळख आणि दुसऱ्या भेटीत परिचय...... काय असतं आवडण्यासारखं हे मनाला विचारावं तर कारण शोधूनही सापडत नाही..... आवडतं याला देखील आकर्षणाप्रमाणेच कारणमिमांसा नाही.

दुकानात खरेदीला गेल्यावर तीन-तीन तास बसून ये दिखाव, वो दिखावो, वो भी दिखावो असं करणाऱ्यांना विचारा ..... आवडणं हा मुळ मुद्दा असतो..... पहिल्यांदा बघताच आवडलं पाहिजे असं वाटत राहतं.... समोर एक आणि मनात एक कॉम्बिनेशन होत नाही. तुलना सुरु.....शॉपिंग सुरु..... कारण आकर्षण....

असं म्हणतात Love at First sight...... ते खरं आहे.... आकर्षणातूनच प्रेम जडतं. चाळीशी उलटल्यावर प्रगल्भता अधिक आलेली असते. यामुळे या पुढील काळात सख्ये मित्र जमवणं शक्यच होत नाही. मात्र Love at First sight चा निसर्ग नियम चुकत नाही.

माणूस हा निसर्गात आहे.... त्याला मन आहे... मनात भावना आहेत.... भावना आहेत तोवर शब्द आहेत....शब्द आहेत तोवर व्यक्त करता येतं.....करायचं कबूल की दडवून, दडपून जगायचं हा ज्याचा त्याचा सवाल आहे....
                                              आखिर जिंदगी है आपकी.... दिल भी आपका.....


 प्रशांत दैठणकर
9823199466


मानसशास्त्रात याचं उत्तम विवेचन करण्यात आलय. त्यातून आपल्याला अधिक खुलासा होईल

Love at first sight: Is it possible? Do people really meet and in moments simply know they're meant to be? New evidence suggests that yes, they do.
The idea is wonderfully romantic: Two strangers see each other "across a crowded room," there's an instant attraction, an electric spark, and suddenly they've found their match and never look back. In a world where dating often requires a lot of work — work that comes with disappointment, rejection, and uncertainty — falling in love at first sight has strong appeal.
People say it happens all the time. If you start with personal testaments, love at first sight seems like the real deal. Prince Harry reportedly experienced it, saying he knew Meghan Markle was the one for him the "very first time we met" (BBC interview).
The kind of qualities that are known to reflect love — intimacy, commitment, passion — are not particularly strong in those first moments when people say they've fallen in love at first sight. At least, these emotions are not experienced to the same degree as they are by people in established relationships. The extent to which people in relationships report feeling intimacy and commitment and passion toward their partners far exceeds reports of these emotions by people who experience love at first sight. Yet the love-at-first-sight experience appears open to these emotions to a greater extent than first meetings where love at first sight is not reported.
In sum, the science favors the romantics. Love at first sight actually is experienced by people, but it's not so much "love" or "passion," Instead, it's a strong pull or attraction that makes someone particularly open to the possibilities of a relationship (Zsoks et al., 2017).
Love at first sight can happen multiple times, and maybe the instances where it fizzles or simple never translates into a relationship are forgotten. But when love at first sight does launch a sustained relationship, the story is a great one.
Naumann, E. (2004). Love at first sight: The stories and science behind instant attraction. Sourcebooks, Inc..
Zsok, F., Haucke, M., De Wit, C. Y., & Barelds, D. P. (2017). What kind of love is love at first sight? An empirical investigation. Personal Relationships, 24, 869-885. 

Thursday, 24 May 2018

कुच्चर ओटा

चण्यापासून फुटाणे बनवताना चणे भाजण्यात येतात. या प्रक्रियेत एखादा चणा तसाच राहतो (Hard Nut) आणि फुटाणे खाताना हा दातावर आदळतो. अशा फुटाण्याच्या दाण्याला मराठवाडी भाषेत कुच्चर म्हणतात. माणसांमध्येही अशी काही माणसे असतात जी इतरांची उणी -दुणी काढणे त्यांना आवडते अशी माणसे म्हणजे कुच्चर.

गावात एखाद्या मंदिराच्या पारावर बसून रिकाम्या वेळेत गप्पा मारल्या जातात. मात्र अशा ओटयावर गावगप्पा ऐवजी केवळ कुच्चर माणसं जमली तर.. तो
कुच्चर ओटा असा एक भाग जालना शहरात आहे.

आता गाव मागे राहिला नवा जमाना नव्या पध्दती आणि गप्पांची नवी ठिकाणी. तसं भारतात रिकामटेकडयांची कमतरता नाही, त्यामुळे नव्या पिढीचं तंत्र अर्थात फेसबूक आणि व्हॉटसअप सर्वांनी स्विकारलय. या वर येणारे काही नव्हे तर बहुतांश संदेश हे ' खिल्ली ' उडविणारे अर्थात TROLL करणारे असतातं. हे ट्रॉल करणे यामुळे एका अर्थाने फेसबूक आणि व्हॉटअप चा कुच्चर ओटाच करुन ठेवल आहे. सर्वात प्रसिध्द व्यक्तीची सर्वांधिक खिल्ली उडविणे या न्यायाने हा प्रकार अहोरात्र सुरुच आहे. खिल्ली उडविणे हे पक्षनिहाय चालू असल्याचे चित्र सध्या फेसबूकवर दिसते.


#MarkZukerberg ने ज्या उद्देशाने फेसबूक सुरु होते त्यात स्पर्धेचा भाग अधिक होता आणि आता स्पर्धा वेगळया स्वरुपाची अर्थात Troll ची सुरु आहे. त्यातही काही क्षण बुध्दीमत्तेचा चांगला वापर करतात.

Troll & Petrol असा एक संदेश कुणीतरी टाकलेला बघितला.

नुकतीच झालेली कर्नाटकातील निवडणूक आणि त्यानंतरचं सत्तानाटय यावर अनेक पध्दतीचे संदेश व्हॉटसअप वर अजूनही फिरतात.

एखाद्याने पंतप्रधान मोदींबाबत चांगलं लिहिल तर त्याच्या विरोधात भक्त आहे म्हणून त्याला ट्रोल केल जातं हे सारं खूपच गंमतशीर आहे. यावरुन मला एक जुनी जाहिरात आठवली.

क्या करें कंट्रोल ही नही होंदा..!

मारुती कारची ती जाहिरात होती त्यातील छोटया सरदार प्रमाणे हे ट्रोल करणारे नवं काही लक्षात आलं की त्यावर तुटून पडतात.
या नव्या समाजमाध्यमांचा वापर चांगल्या आणि सकारात्मक पध्दतीने करणे शक्य आहे. अनेक जण तो करतात. एका लहान मुलाला हृदय शस्त्रक्रिये दरम्यान B - ve ( बि निगेटिव्ह) रक्त हवे होते. अनेकांनी या बाबतचं आवाहन फेसबूकवर बघून स्वत:ची उपलब्धता त्वरित कळवली. रक्तगट B-ve असला तरी विचारांनी B+ve आहोत हे त्यांनी दाखवलं ही औरंगाबादेतील घटना आहे.

अनेकदा चांगले विचार मांडले जातात आणि चांगल्या विचारांचं पिक या माध्यमात येत आहे असं वाटत असताना कुठूनतरी 'ट्रोल धाड' येते. आहे तो चांगुलपणा नष्ट करते.

इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि अभिव्यक्तीला वाव देणाऱ्या फेसबुक सारख्या माध्यमाचाही वापर वाढत आहे. मात्र याचा 'कुच्चर ओटा' झालेला पाहून कधी कधी वाईट वाटतं.


व्हॉटसअपवर सकाळी सकाळी येणारे संदेश ही त्या कंपनीसाठीच नव्हे तर सर्वांसाठी डोकेदुखी ठरली आहे. नववर्षाच्या क्षणी अख्खं व्हॉटसअप हँग करायचा पराक्रम भारतीयांनी करुन दाखवला होता.

भारतात सर्वाधिक पीक कोणतं येतं ? या प्रश्नाचं उत्तर 'अफवांचं पीक ' असं द्यावं लागतं. तशा अफवा हा व्हॉटसअप मधील भल्या-बुऱ्यांच्या जत्रेत सतत येत असतात.

मात्र एक गोष्ट या माध्यमांनी चांगली केलीय डॉक्टर लोकांना शांततेने काम करता यायला लागलय. ओपीडी काढताना पेशंट म्हणून येणारे अधिक 'इम्पेशटपणे' माझा नंबर कधी येणार म्हणून त्रास द्यायचे. आता हे सारे पेशन्ट या नेटवर्कची मजा घेत शांततेने बसलेले दिसतात.

नाण्याच्या दोन बाजू तसं या माध्यमांच्याही. विनंती इतकीच की याला 'कुच्चर ओटा' करु नका.



- प्रशांत दैठणकर


9823199466

Wednesday, 23 May 2018

तू तेंव्हा तशी....! तू तेंव्हा कशी....!

मोटार सायकलची गती वाढली तशी तू मला अधिकच बिलगतेस हे मला जाणवलं. त्यानंतर माझ्यातलं असणारं वेगाचं वेड अधिकच वाढलं...... तुझी माझी भेट झाली त्यानंतर पहिल्या वेळी तुला घेऊन राईडला निघालो तो दिवस मला चांगला आठवतो....!

महिना ऑगस्टचा.... अर्थात श्रावण.... ती श्रावणी धुंद करणारी हवा..... हवेत अधून मधून जाणवणारा तो गारवा, उन्हं पडलीत वाटतानाच येणारी हलकीशी ती पावसाची सर अन् सर्वत्र नजरेला सुखावणारी हिरव्या रंगाची पखरण.....सारं कसं स्वप्नवत अशा त्या श्रावणातल्या दुपारी साधारण चार साडेचारची वेळ...... तू होकार दिलास आणि बाईकवर बसलीस.

बाईक शहरी रस्त्यावरुन हायवेला लागली. सहाजिकच मी बाईकचा कान पिळत गती वाढवली. त्यावेळी बोललीस "सांभाळून रे..." मला तो सुर काळजीचा वाटला मग चटकन मी गती कमी केली. घाटातल्या वळणांवर वरुन डोंगरावरुन अधुनमधून पडणारे ते श्रावणी धारांचे तुषार झेलत घाटमाथ्यावर तू आणि मी........ कसलं एकाकीपण..... सगळी गर्दी जोडप्यांची झालेला हिरमोड आणि मग भाजलेली कणसं हातात घेऊन ड्राईव्ह करतच परतलो.

फिरायला मोकळीक असली तरी सगळीकडे गर्दी असल्यानं हवा-हवासा एकांत जरा दुर्मिळ.... मग ठरवलं नुसतीच राईड घेत जाऊ.... नको कुठं थांबायला ...... अशाच निवांत शनिवारी कॉलेज बंक करुन निघालो..... सवयीप्रमाणे माझी गती वाढली तू म्हणालीस "सांभाळून रे...." पण दुसऱ्या क्षणी तुझ्या त्या बिलगण्याची आणि निकट स्पर्शाची जाणीव झाली. पाठीवर गुदगुल्या होतात असं कुणी म्हटलं असतं तर मी त्याला मुर्खात काढलं असतं......पाठीवरल्या गुदगुदल्या अन् अंगभर रोमांच..... लाईफ बन गई.....

अनेकदा मुलीच्या नकारात होकार असतो म्हणतात..... या निमित्तानं मला चांगलं पटलं की खरच नकारात काहीसा होकार होता....... का वागत असतील बरं मुली अशा ...... मला कोडयात टाकणारा प्रश्न.....

मुलींचा स्वभाव आणि त्यांचं वागणं हे एक गुढ असतं ते जाणता आलं तर प्रेमात अधिक मजा येते.....प्रेमाचं ठीक आहे. हा गुढपणा जाणता आला तरच नेटका प्रपंच करता येतो नाही तर प्रपंचाचा पंचनामा ठरलेला.

ज्याला कळून घेणं केवळ अशक्य आहे अशा गोष्टी अनेक असतात आणि अशा गोष्टी आयुष्यात रंगत आणत असतात. तुझ्या एकाच प्रकारच्या प्रतिक्रियेचा दोन प्रसंगातला अर्थ वेगवेगळा आहे असं जाणवलं..... आता खऱ्या अर्थानं अक्कलदाढ आल्याचा अनुभव आला... हो म्हणतात ना प्यार सबकुछ सिखा देता है.

तु- आणि मी प्रवास चालू आहे अव्याहत.... अखंड तू मला आणि मी तुला चांगलं जाणलं असं वाटताना काही नवं घडतं आणि दोघांना एकमेकांची ओळख होते...... हो ओळख होते नव्याने.....

माझे सगळे मित्र म्हणतात की, मी कोणत्या क्षणी कसा वागेल याचा अंदाज करणं अशक्य आहे ते मला Unpredictable म्हणतात. काळाच्या पटलावर चालताना भूतकाळ आलेल्या अनुभवातून आलेली प्रगल्भता आणि त्या-त्या घटनेच्यावेळी असणारी मानसिक स्थिती यातून मी प्रत्येक परिस्थितीला React करतो. ते प्रत्येकजण याच पध्दतीने करतं असं मानसशास्त्र सांगतं मग मी इतरांपेक्षा वेगळा म्हणजे असा Unpredictable कसा ठरु शकतो.

हां..... नाही म्हणायला मी जरा तिरकस विचार करतो. आयुष्यात आपण नेहमी सरळ वळणाची वृत्ती असावी असे म्हणतो..... आजवर मी कोणतेही सरळ वळण बघितलेले नाही म्हणून कदाचित जरा विनोदबुध्दीचा वापर करुन आयुष्यातील रुक्षपणा टाळता यावा आणि रंजकता वाढावी यासाठी वेगळा विचार करुन मी रिॲक्ट होतो..... याला कदाचित सारे Predict करीत नसतील म्हणून मी Unpredictable असेल....!


माझ्या दृष्टीकोणातून बघशील तर या बाबतीत 'आयटम है हम दोनो' असं म्हणावं वाटतं......माझा हा स्वभाव तुझ्या स्वभावामुळे आलाय. घटना एक आणि प्रतिक्रीया प्रत्येक वेळी वेगळी देतेस तू.....

आठवतं तूला तुझ्या याच स्वभावासाठी मी म्हणायचो

तू तेंव्हा तशी....!

तू तेंव्हा कशी.....!

आयुष्य स्वच्छंद जगावं.....बंधन असतात अनेक पण यमकातला मुक्तछंद शोधणं काही अवघड नसतं. चाकोरीबध्द जगणं म्हणजे रुक्षपणा.....रुटीन.....! अगदी मनमानेल तसं न वागता देखील मनसोक्त जगता येतं की, ....तू शिकवलस एका वाक्यातून......सांभाळून रे.....! मी पुन्हा बाईकला गती देतो आणि पुन्हा तू बिलगते......! वयाचं वाढणं शरीराची स्थिती हेच खरं..... दिल तो रखो वैसा है कहो तो जवान....! समझो तो जवान..... तुला त्या बिलगलेल्या अवस्थेत श्रावण सरींच्या साक्षीने मी पुन्हा स्पीड घेतो यावेळी तारुण्यातल्या श्रावणात......!

- प्रशांत दैठणकर

9823199466

Saturday, 19 May 2018

बोंबाबोंब....!

मराठी भाषा राहणार की संपणार असा लेख दर रविवारी कोणत्या ना कोणत्या वृत्तपत्राच्या पुरवणीत दिसतोय. माझी मातृभाषा म्हणून मला वाटणारी काळजी योग्य आहे, पण त्यामध्ये भितीचा सूर दिसायला लागतो. त्यावेळी मात्र मलाच चिंता वाटायला लागते.

इतक्या वर्षांच्या प्रवासात भाषेसमोर अनेक संकटे आली. मात्र मराठी भाषा संपलेली नाही उलट मराठी भाषा संक्रमित झाली, प्रगत झाली आणि अधिक संपन्न झाली . जगाची संपर्क भाषा असणाऱ्या इंग्रजीसाठी ऑक्सफर्डचा शब्दकोष हा आधार आहे. या शब्दकोषात जगातील विविध भाषांमधील शब्द स्विकारुन इंग्रजी भाषा संपन्न होत आहे. त्याच पध्दतीने मराठी देखील इतर भाषांमधील शब्दांनी अधिक खुलत आहे.

मातृभाषा म्हणून मराठीचा अभिमान बाळगताना मराठीत असणाऱ्या काही शब्दांचे स्वभाव आणि त्यांची रंजकता मला अधिक भावते. काही शब्द दुसऱ्या भारतीय भाषात जसेच्या तसे असले तरी त्याचा अर्थ त्या भाषेत वेगळा असल्याने नानाविध गंमतीचे प्रकार देखील घडतात. या शब्दांशी खेळण्याची ताकद अनेक लेखकांमध्ये आहे व होती, त्यामुळे त्यांनी यातून मोठया प्रमाणावर विनोद निर्मीती केलेली आपणास दिसते.

शब्द हे दुधारी शस्त्र आहे. या अर्थाने की शब्दाचा अर्थ लागण्यावर आणि लावून घेण्यावर देखील अवलंबून असतो. यातून व्दैअर्थी संवाद आणि त्यातून विनोद तयार होतात. मराठी भाषा खेळवाल तशी खेळते याच्या वानगीदाखल अनेक उदाहरणे देता येतील.

सचिन पिळगावकरच्या चित्रपटांमध्ये याचा अधिक वापर आपणास दिसतो.


अशोक सराफ बंदूक घेऊन निशाणेबाजी करीत असतानाच्या एका दृष्यात ' काय हो कसा नेम आहे यांचा ? असा सवाल विचारल्यावर मार्मिकपणे पूढील वाक्यात उत्तर येतं ' त्याचा काहीच नेम नाही ! ' हा मराठी भाषेतला शब्दच्छल विनोदाची पेरणी करतो, म्हणून मराठी भाषा अधिक गोडवा राखून आहे.

ज्यांनी मराठी भाषेचा एक नागरी भाषा म्हणून वापर सुरु केला त्यांनी चिंता व्यक्त करावी याला कारण त्यांना ग्रामीण लहेजा रुचत नाही. ते 'गावंढळ' ठरवतात पण शुध्द मराठीचा आग्रह हा का केला जातो ते अनाकलनीय तुम्हाला आवडत नाही म्हणून ती भाषा मराठी राहत नाही का ?

दादा कोंडके यांनी सलग 9 चित्रपट मराठीत रौप्यमहोत्सवी दिले, त्यातली भाषा तर शुध्द नव्हती. आमचा मक्या ऊर्फ मकरंद अनासपुरे मराठवाडी शैलीचा वापर करतो म्हणून तो अधिक लोकप्रिय झालाय हे विसरता येणार नाही. अगदी नंतरही भारत गणेशपुरेने वऱ्हाडी टोन मध्ये संवादफेक जारी ठेवत यश प्राप्त केले. नागरीपणा, शुध्दता याच्या फंदात न पडता ज्या शब्दातून भावना हमखास पोहोचतात आणि जी भाषा थेट ऱ्हृदयाला भिडते ती खरी भाषा.

दहा कोसावर बदलण्याचा गुणधर्म कायम राखत मराठीत देखील प्रांतनिहाय स्वतंत्र शब्दावली. आणि शब्दफेक यांचा वापर होतो, पण ती देखील मराठीच आहे ना.

मोबाईल आणि इंटरनेटच्या वापराने भाषा आता चित्रमय वळणावर आली असा एक लेख आजच वाचण्यात आला. यात आक्षेप ईमोजी वापरावर आहे. यातून आपण मागील काळात परत जातोय की काय असा काहीसा सूर यात जाणवला.

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. एकमेकांशी संवाद साधण्यात जी भाषा वापरली जाते ती सोपी असावी. आणि दैनंदिन संवाद साधणारे शब्दप्रभू असतील आणि प्रत्येकाचा शब्द संग्रह दांडगा असेल असे अपेक्षित नाही. मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे ज्याला लिहिता वाचता येत नाही असे लोकदेखील बोलतात एकमेकांशी अगदी सहजतेने ती त्यांनी बोललेली भाषा खरी मराठी असं माझं मत आहे.

अनपढ अर्थात शिक्षणाचा गंध नाही किंवा कमी शिक्षण झालय अशांना चित्रलिपी समजायला अवघड जात नाही. म्हणून नव्या पिढीने अशा चित्रलिपीचा अर्थात ईमोजीचा वापर केल्याने कितीसा फरक पडणार आहे. अगदी प्रकांड पंडित होवून साहित्यात डॉक्टरेट मिळवली तरी आपण सुरक्षितता म्हणून नव्या तंत्रज्ञानाच्या काळात पुन्हा एकदा अंगठेबहाद्दरच झालो ना !

तुमचा वैयक्तिकपणा, आयुष्यातील खाजगीपणा जपण्यासाठी तुम्ही आज हाताचे ठसे आणि चेहरा किंवा डोळयातील बुभुळे यांचा वापर करीत आहात. त्यामुळे नव्या पिढीला मागासलेपणाकडे जाताय असं म्हणणं चुकींचं ठरेल.

भा. पो. ...... असा संदेश मोबाईलवर दिला तर अडचण आमची आहे..नव्या पिढीला याचा अर्थ कळतो आणि चटकन भावना पोहोचतात ती भा. पो. हे भाषेचं बदलतं रुप होय.

मानवी उत्क्रांतीत चित्रलिपी ते लिपी असा प्रवास घडला त्याला पुन्हा चित्रलीपीची गरज वाटतेय ही देखील एक प्रकारची उत्क्रांतीच म्हणावी लागेल. मराठी भाषेचं स्वत:चं असं वेगळेपण आहे खास गंमत आहे, त्याचा आनंद आणि रसग्रहण याकडे वळण्याची खरी गरज आहे.

एकच अक्षर वापरुन शब्द तयार होणारे दोन खास शब्द फक्त याच भाषेत आहेत...  मराठी मला त्यामुळेच श्रेष्ठ वाटते. ' तंतोतंत' हा शब्द फक्त मराठीतच आहे आणि त्यामुळेच असाच वैशिष्टपूर्ण दुसरा शब्द आपण वापरावा जरुर पण वास्तवात टाळावा. तो शब्द ..... Any guess ? .... तो शब्द आहे ' बोंबाबोंब '.

- प्रशांत दैठणकर
9823199466

Friday, 18 May 2018

सौंदर्य


सौंदर्य, असलं पाहिजे पण त्या सौंदर्याचं दर्शन झाल्यावर जे अनुभव येतात ते अतिशय वेगळे असतात.

सांग दर्पणा मी कशी दिसते ?. असं म्हणत आरशासमोर स्वत:ला न्याहाळत तास न तास बसायचं हे तरुण मुलींचं नेहमीचं आवडतं काम.

सौंदर्याच्या बाबतीत पुराणकालापासून वेगवेगळे दाखले दिलेले आहेत. आजकालचा जमाना हा चित्रपट आणि टि.व्ही. चा जमाना यामुळे सौंदर्याला अधिक महत्व आले आहे. मात्र माझं एक मत त्या दिसणाऱ्या सौंदर्याबाबत नाही.

सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं.

असं देखील म्हटलं जातं एका अर्थानं ते बरं आहे. बघणाऱ्याची नजर ज्याला पारखी नजर म्हणता येईल ती बरोबर सौंदर्य शोधून घेते. इथं सांगायचा मुद्दा हा की सौंदर्य आणि रंग यांचा संबंध नाही.

गोरी असेल तरच सुंदर असते असे नाही तर रंगानं काळया असणाऱ्या देखील सुंदर असतात. ते सौंदर्य बघण्याची तुमची दृष्टी आहे की नाही हे महत्वाचं.

सौंदर्य हे सौंदर्यच असतं पण त्याला अनेक सवयी असतात हा अनुभव आहे. पहिला साधारणसा अनुभव म्हणजे सौंदर्य हे गर्वासह येतं.

माझं म्हणणं अनेकांना पटणार नाही पण मी अनुभवानं सांगतो स्वत:च्या रुपाचं कौतूक इतरांनी करावं असं वाटणाऱ्या सौंदर्यवती अनेकदा रुपगर्विता असतात. तुम्ही सुंदर म्हटलं तर पाहिजे परंतु याची वाच्चता इतरांसमोर झाली तर त्यांना राग देखील येतो याला मी Beauty Private Limited म्हणतो. भारतीय समाज व्यवस्थेत सौंदर्य दाखविण्यापेक्षा लपवण्यावर अधिक भर दिला म्हणून असेल किंवा मानसिकता असेल पण सौंदर्याचा साधारणत: हाच प्रकार भारतात अधिक दिसतो.


सौंदर्याला आणखी एक शाप म्हणजे केवळ सौंदर्य हे आयुष्य घडवू शकत नाही. शापीत सौंदर्याची कारणं अर्थात त्या सौंदर्याचा असणारा गर्व हेच आहे.

सौंदर्याचं प्रतिक म्हणून जगाला ज्याची ओळख आहे ती इमारत म्हणजे ताजमहाल. आग्रा येथील ही इमारत सौंदर्यासोबत प्रेमाचं प्रतिक म्हणून बघितली जाते. साधारणपणे प्रेमिकेला भेट देताना व्हॅलेन्टाईनला ताजची प्रतिकृती गिफ्ट करणारे अनेक आहेत. प्रत्यक्षात हा ताजमहाल ही एक कबर आहे, याचं भान किती जणांना असतं हा खरा सवाल आहे. काही नावं डोळयापुढे आणल्यावर सौंदर्य हे शापित असतं याचा उलगडा होईल.

सौंदर्यामुळे जगणं अशक्य होईल इतकी वेळ कुणावरही येवू नये. मर्लिन मनरो, मधुबाला, दिव्या भारती, श्रीदेवी....आयुष्यभर दु:ख यातून त्रास आत्महत्या, गुढ मृत्यू...... हे नेमकं काय दर्शवतं.....

सुंदरता आणि साधेपणा याचा संगम असेल तर जगणं सोयीचं असतं असं मला वाटतं..... जस विद्या विनयेन शोभते..... तसं सौंदर्य साधेपणानं अधिक खुलत असतं.....
कुणाच्या सुंदरपणाचं कौतूक करताना भारतीय समाजात काळजी घ्यावी असं मी आवर्जून सांगेल कारण असं करणं या समाजात आजही स्विकारलं जात नाही.

ज्या देशाने जगाला कामसूत्र सारखा ग्रंथ दिला त्या देशात लैंगीकतेवर खुलपणाने चर्चा म्हणजे संकट मानलं जातं त्या देशात सौंदर्यावर बंधने अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळेच घुंघट, बुरखा आदी आजही इथं सामान्य मानले जातात.

मुळ मुद्दा सौंदर्य आणि त्यातून येणाऱ्या गर्वाचा आहे. अशा अनेक रुपगर्विता आपल्या आसपास वावरताना दिसतील.

हिंदी चित्रपटात अशा अर्थाने एक गाणं आहे. अर्थात ते गोरेपणात असणाऱ्या सौंदर्याबद्दल आहे.

किशोरदाच्या आवाजात असलेलं ते गाणं

गोरे रंग पे ना इतना गुमान कर
गोरा रंग दो दिन मे ढल जायेगा !


एक सत्य त्या गाण्यात मांडलय ते बरोबरच आहे. वाटतं वय आणि सौंदर्य याचं एक नातं आहे. वय अधिक झाल्यावर सौंदर्य बिघडतं आणि त्याच्या चिंतेत अनेक जणी जगत असतात.

माझं मत असं की, त्या-त्या वयानुसार निसर्ग जे बदल घडवतो ते स्विकारले पाहिजे, निसर्गनियम पाळला पाहिजे म्हणजे आपण अधिक सुंदर दिसतो.

स्त्री सौंदर्यासोबत चर्चा असते ती पुरुषांमधील सौंदर्याची ...... हो पुरुष देखील सुंदर असतात. आता याला इंग्रजीत दोन स्वतंत्र शब्द आहेत हा भाग वेगळा. मुलींसाठी Beautiful आणि मुलांसाठी Handsome. मराठीत मी सोंदर्य किंवा सुंदरताच शब्द वापरेन. त्याला रांगडेपणा म्हणणार नाही. प्रत्येक व्यक्ती काही पहेलवान टाईप असत नाही म्हणून काय सौंदर्याची परिभाषा बदलायची.

वाढत्या
वयात स्वत:ला आहे तसं स्विकारणारा अजीतकुमार हा दाक्षिणात्य नट म्हणजे पुरुष सौंदर्याचं प्रतिक म्हणता येईल. केस काळे करुन तरुण दिसण्याचा अट्टाहास न करता तो ज्याभूमिका करतोय त्याला मिळणारा प्रतिसाद बघता माझं म्हणणं सिध्द झालय असं मला वाटतं.....
- प्रशांत दैठणकर

9823199466