Friday, 22 July 2011

भूतकाळ....


भूतकाळ एक घासलेली सीडी
ब्ल्यू रे असो की ती डिव्हीडी
जुनीच ती...... दररोज 
रात्रंदिन ती असे घासणारी
आयुष्य हे... त्याला मर्यादा
उघड्या पडणा-या काळानंतर
भावना अन् अडकतं गीत
त्या वळणावर आजही
मग का.. लावायची फिलर..
त्यानं गाण्याचा फिल यावा का..
तरीही तबकडीनं फिरत रहावे का..
अन् हे फिरणं..गिरगिरणं..
का रे सख्या विचारू नको..
हे सारं.. तुझ्यासाठी...
फक्त तुझ्या साठीच....
 प्रशांत दैठणकर

Thursday, 21 July 2011

रवीवार... १९७७ सालचा


रविवारची ती सकाळ, सन १९७७. शहर औरंगाबाद. त्या काळी गाव खूप छोटंसं होतं. शहराची ओळख असणा-या गुलमंडीतून सिटी बस जायची असं आजच्या पिढीतील मुलांना सांगितलं तर त्यांना ते खरं वाटणार नाही. शहरात त्यावेळी सकाळ आणि संध्याकाळ असं दोन वेळ नळाला पाणी यायचं याचा आजकालच्या पिढीतील गृहीणींना सांगितलं तर त्यांना त्याचा हेवा वाटेल असा तो काळ. माझं वय सात ते आठ वर्षाचं. आठवणी ताज्या आजही....
      त्या काळात रेल्वे स्टेशनला जायचं हा खूप मोठा सोहळा होता माझ्या बालमनासाठी. टॉक..टॉक करीत ऐटीत चालणारा घोडा जुंपलेला तो टांगा. त्या टांगेवाल्याचं थाटात मोलभाव करणं. टांग्याची मजाच आगळी होती. त्या टांगेवाल्याच्या बाजूला बसण्याची धडपड असायची. उगाच घाबरत घाबरत त्या घोड्याला हात लावून पाहणं आणि टांगेवाल्याची नजर चुकवून हळूच लगामाला हात लावणं याचं थ्रिल त्या वयात डोक्यात होतं.
      रहायचं ठिकाण, दलालवाडी. शहराचा मुख्य मार्ग असणा-या टिळक पथाजवळील एक गल्ली. बाजूने वाहणारा एक मोठा नाला. नाल्याच्या पलीकडील बाजूला दोन मजली इमारत अर्थात माझी नगर पालिकेची शाळा. त्या शाळेच्या माडीवरून घर दिसायचं. दुस-या बाजूला नाला पार केल्यावर जाफरगेट भागातील आठवडी बाजाराकडे जाणारा रस्ता. आईचा हात धरून नाला पार करीत दर रविवारी भाजी आणायला जाताना गंमत वाटायची. आयुष्याला खास असा संथपणा असलेला तो काळ. आजच्या सारखी धावपळ नव्हती त्यावेळी. भाजी बाजारात जाताना कोप-यावर एक चुन्याची भट्टी होती. त्यात चुन्याने भरलेला हौद होता. इथं उगाच थांबून हा चुना नेमका कसा बनवतात हे कुतूहल मनात घेऊन मी बराच वेळ रेंगाळायचो.. आजही मन अचानक त्या भट्टीजवळ रेंगाळताना मला जाणवतं.
      रंगांची विविधता त्या काळी फारशी नव्हती. औरंगाबाद हे पांढ-या रंगाच्या भिंतींचं आणि हिरव्या ब निळ्या दारांचं साधंभोळं गाव होतं. भिंतीला टेकून बसल्यावर हमखास कपड्यांवर पांढरा रंग चढायचा. दिवाळी आली की आईची लगबग सुरू व्हायची. घरात सामान मध्यभागी जमवायचं. चुन्याच्या त्या भट्टीवरून बादलीत चुना आणायचा. रंग देण्यासाठी कारागिर वगैरे प्रकार नसायचा.. अर्थात ते परवडणारं देखील नसायचं. आईच कमरेला पदर खोचून रंग देण्याचं काम करायची. वडील माझे नाना नोकरीसाठी बाहेर दौ-यावर असल्यानं आईच सारी कामे करीत असे.
      एका लाकडी काठीला जुना कपडा गुंडाळला की झाला ब्रश तयार. आईला मदत करण्याच्या नावाखाली आपणही एक छोटा कपड्याचा तुकडा घेउन छोटा रंगकर्मी होत केलेली लुडबूड ती कौतुकानं सांभाळून घ्यायची. अख्ख अंग चुन्यानं पांढरंधोप करून घ्यायचं. किटण चढलेली कढई खरवडून साफ करावी तसं मग आई मला स्वच्छ आंघोळ घालत असे. तो गार पाण्याचा शिपका आणि ती धुलाई अगदी कालच झाली इतकी मनात ताजी आहे.
      ज्या ठिकाणी रहायचो तो नागापूरकरांचा वाडा एक मिनी चाळच होता. साधारण दहा बि-हाडं तिथं रहायची. त्या प्रत्येकाचा कोण वेगळा. काही चौकोनी काही षटकोनी तर काही अष्टकोनी. सकाळी पाणी भरताना काही शाब्दीक वादाचे प्रसंग घडले तरी सायंकाळी घरात केलेल्या भाज्यांची देवाण- घेवाण करताना एक प्रेमळ कौटुंबिक जिव्हाळा दिसायचा. दिवाळीत सारं रंगाचं काम सा-या घरात जवळपास एकाचवेळी चालायचं. त्या दिवशी शेजारच्या घरातून चहाच नव्हे तर जेवणही यायचं.
      आज मागं वळून बघताना ते सारे आता कुठे आहेत हा विचार मनात येतो. आपला हात धरून जगायला शिकविणारे माय बाप असतात, शेजारीही प्रेमळ नजरेने देखभाल कराय़चे. टोकायचे, रागवायचे पण त्यात आपलेपणा होता. आता झोप मोडते म्हणून भांडणारे आणि मुलांना अपार्टमेंटच्या पार्कींगच्या जागेतही खेळू न देणारे शेजारी बघून त्या शेजा-यांची किव करावी वाटते... खरच आपण इतकं सुंदर आयुष्य जगलो याचा आनंदही होतो...
प्रशांत दैठणकर

Tuesday, 19 July 2011

ती कुत्र्याची छत्री !

            पावसाचं आणि माणसाचं नातं खूप वेगवेगळं आहे. हल्ली मात्र त्यात बदल होताना दिसतोय. लहानपणीचा पाऊस आज पुन्हा लहान होवून झेलावा असं वाटतं. पडणा-या पावसाचे थेंब आणि त्यांनी तयार केलेलं तळं तासनतास पहावं आणि पाऊस पडायचा देखील तितका मोकळेपणानं.
     पावसाळा आला की पहिले ठेवून दिलेल्या छत्रीचा शोध सुरु व्हायचा. काळ्या कपड्याची ती छत्री सर्वांची आवडती. छत्री `स्टॅग` कंपनीचीच असावी असा आग्रह. छत्रीवर नावं लिहायची पध्दत आणि ती कशी खटकन उघडते याचं बालमनाला कौतूक वाटायचं. खराब झालेली छत्री दुरुस्त करणारे छत्रीचे कारगिरही भरपूर असायचे.
     स्टॅगचा काळ जाऊन आता स्मृतीत साठलाय छत्रीचं त्यावेळचं कौतूक न्यारं होतं. आता छत्र्यांची जागा रेनकोटनं आणि जॅकेट्सने घेतली. आणि फोल्डींगच्या छत्र्या आल्या अर्थात मुंबईत छत्रीचा वापर आज होत असला तरी तितका पाऊस औरंगाबादेत होत नसल्याने छत्रीचा वापरही अभावानेच होतो.
     पावसाळ्यात जशी छत्रीची मजा तशीच ती कुत्र्यांच्या छत्रींची देखील होती. अंगणात उगवणारी ती बुरशीजन्य अळींबी म्हणजे कुत्र्याची छत्री. आता त्यावेळचा प्रश्न आज परसदारी फोटो काढताना पुन्हा मनात डोकावला की याला कुत्र्याची छत्री का बरं म्हणत असतील ?  कुत्र्यांचा याच्याशी नेमका संबंध तो कोणता ? बर ही कुत्रा कशी धरत असेल... त्याला तर हातच नसतात.. इतकी छोटी छत्री धरलीच तरी तो भिजणारच ना... एक ना अनेक सवाल..
            अशा छत्र्या अंगणात दिसल्या की मग आमचा खेळ सुरु. खाली वाकून त्या छत्रीचं ते निराळं सौंदर्य निरखायचं आणि त्यातल्या जाळीत बघत त्याकाळी असलेल्या अल्प ज्ञानाने त्यावर चर्चा करायची.
     वाडे गेले अंगणही गेले. मोठी अपार्टमेंट्स आली. पार्कींग मध्ये चिखल नको म्हणून माती सिमेंटने झाकली त्यामुळे आता ही छत्री दिसणं सोपं नाही. माझ्या वर्धेच्या बंगल्यात मात्र खूप मोठं अंगण आणि पावसापाठोपाठ कुत्र्याच्या छत्र्या आल्या. वेदांतला ती छत्री दाखवली आणि त्यांनं मला प्रश्न केला ` बाबा याला कुत्र्याची छत्री का म्हणतात ?  अर्थात माझ्याकडे उत्तर नव्हतं.
     आयुष्य असंच.. सवयीनं आपण जगतो, वागतो अनेक वस्तू हाताळतो बोलतो. काही प्रश्नांची उकल मात्र कधीच होत नाही तसाच एक निरुपद्रवी प्रश्न म्हणजे ती कुत्र्याची छत्री !

                                -प्रशांत दैठणकर
                           000000


Thursday, 14 July 2011

सावल्या...

                   









शांत,स्तब्ध त्या सावल्या
          पेपर वाचत बसलेल्या
          पहाटवाऱ्यातला मॉर्निंग वॉक
          सायंकाळी  पारावर विसावलेल्या
खेळी  ज्यांची झाली खेळून
                   म्हणून ड्रेसिंग रुममधून मॅच बघणाऱ्या
                   अनुभवाचं शहाणपण शिकवणाऱ्या
                   यशाबद्दल थाप होवून पाठवरचे हात
                   सावलीच ती... तिला सावलीची साद
                   तुम्ही दुडूदूडू धावत असताना
                   गुडघा टेकवत तुमची सावली झालेल्या
                   अन् ही छोटी सावली  उंचावताच
                   स्वत: कमरेतून वाकलेल्या
                   त्या सावल्यांनी तुमची सावली वाढवली
                   अन् तुमच्या सावली खाली  स्वत: गेली झाकली
                   शांतपणे.. सावल्यांचा हा खेळ
                   असाच सुरु अव्याहतपणानं
                   जोवर सरत नाही .. ही  सांजवेळ

Thursday, 7 July 2011

व्यक्तीमत्वाचं अंतरंग; संभाषण... !

मानव उत्क्रांतीमध्ये सक्षम प्राणी म्हणून विकसित झाला यापुढेही सर्वोत्तम ते टिकेल असा निष्कर्ष उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडणा-या डार्वीन याने सांगितलं आहे हा नियम मानवाला लागू पडता का ? अर्थात होय असं उत्तर द्यावं लागेल.पुढे सांगायचं म्हणजे सर्वोत्तम ते काय ? आज कालच्या काळात ज्याच्याकडे ज्ञान तो सर्वोत्तम असं गणित झालय.
      ज्ञान म्हणजे माहितीचा अभ्यास करुन त्यावर प्रक्रिया करुन निघालेले निष्कर्ष. आता ज्ञान कशासाठी आणि कुठून प्राप्त करता येईल अशी समस्या असते मानव इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे तो त्याच्या संवेदना आणि अभिव्यक्तीमुळे मानवाला शब्दांनी इतरांपेक्षा वेगळं बनवलय तो बोलू शकतो स्वत:ला व्यक्त करु शकतो आणि त्यामुळेच तो व्यक्तीमत्व निर्माण करु शकतो घडवू शकतो असा अर्थ वावगा ठरणार नाही.
      व्यक्त होण्यासाठी आणि करण्यासाठी आपण संभाषणाचा वापर करतो संभाषण म्हणजे लहान मुलांच्या तोडी असणारे बोबडे बोल नव्हे. आपण समाजात वावरतो त्यावेळी इतरांच्या संपर्कात असतो. येथे आपली भाषा त्याची शुध्दता शाषेतील शैली यावरुन बाहेर पडताना त्यात असणारी मृदता, कठोरपणा, किनरेपणा, खर्ज यावरुन आपल व्यक्तीमत्व उघड होत जातं
      आपण दिसतो कसे, उंची, रंग, ठेवण आणि लकबी यावरुन जशी आपली बाह्य ओळख होते तशीच ती आपले कपडे, त्यांचा दर्जा, राहणीमान आणि सवयी यावरुन दखील व्यक्तीमत्व दर्शन घडत असते काही व्यक्ती भेटल्यावर प्रसन्न वाटणं हा त्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव असतो मात्र काही जण तोंड उघडेपर्यंतच चांगले भासतात असं विनोदानं म्हटल जात असलं तरी ते खरं आहे.
      अंगापिंडानं रुबाबदार आणि उमदी व्यक्ती पाहून प्रभाव पडला तरी त्याने संभाषण सुरु केल्यावर त्याबाबतचं मत बदलून जातं असा अनुभव अनेकदा आला असेल तो यामुळेच. नुसतं प्रभावशाली व्यक्तीमत्व पुरेसं नाही तर त्याच्या जोडीला संभाषण कला शिकणं आवयश्क आहे संभाषण कला म्हणजे अगदीच अमिताभ बच्चन सारखा आवाज नाही.
      प्रत्येकाला स्वत:चा विशिष्ट आवाज आहे. निसर्गत: जो आवाज मिळालाय त्यात कृत्रिमपणा आणण्याची गरज नाही भाषा आणि शब्दफेक ज्ञान आपण प्राप्त केलं तर पुरेसं आहे. समोरच्या व्यक्तीला आपलेपणा वाटेल अशा प्रकारे शब्द आणि वाक्यांची निवड करावी लागेल अनेकदा आपणास नकार देण्याचा प्रसंग येतो त्यावेळी आक्रमकपणा ठेवला तर त्यातून मनं दुखावतात त्या उलट दुस-या पध्दतीने नकार देणं शक्य असतं त्याचा आपण अभ्यास करायला हवा.
      सकारात्मक शब्दांचा अधिक वापरणारे बोलणे सर्वांना आधिक आवडते. आपल्याकडे बहुतेक जण संवादाची सुरुवात "नाही, त्याचं काय आहे किंवा नाही नाही नाही" अशी करतात त्याचा अर्थ आपण आपलं मत नोंदवतोय असा तरी असला तरी समोरची व्यक्ती आपलं बोलणं नाकारल जातय किंवा खोडून काढलं जातय असा घेतो मैत्रीत आपण ज्या पध्दतीने संवाद करतो ते अनौपचारिक असतात मात्र समाजात वावरताना ते तसे नसतील याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागेल.
      बोलताना साधारण होणा-या चुका म्हणजे ज्या भाषेचं ज्ञान नाही त्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करणे होय. दोन मराठी भाषिक घराबाहेर पडल्यावर हिंदीत बोलतात आणि भांडताना इंग्रजीत भांडतात हे खरं आहे. समोरची व्यक्ती इंग्रजीत बोलतेय म्हणून चुकीचं इंग्रजी बोलणारे अनेकजण माझ्या पाहण्यात आहेत अशाने आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पडत नाही याची जाणीव आपण ठेवावी.
      आपल्याला सहजतेने जी भाषा बोलता येईल त्या भाषेत आपण बोलेले पाहीजे. या पध्दतीने प्रभाव अधिक पडतो कायम गंभीर किंवा कायम विनोदी शब्दांचा वापर करणे टाळावे याचा व्यक्तीमत्वावर नकारात्मक प्रभाव पडतो. जास्त तिरकस शब्दांचा वापर करणारे आणि प्रत्येक वाक्य विनोदावारी नेणारी व्यक्ती खोटं बोलते असं मानल जातं त्यामुळे आपण बोलताना ते टाळावं बोलताना रुक्ष आणि बोजड शब्दांचा वापरही नकारात्मक मानला जातो.
      संवाद-संभाषण ही आपली वैचारिक ठेवण, अनुभव आणि प्रगल्भता दाखवते मी, पणा टाळाव असे संतवचन आहे. स्वत:बाबत जास्त बोलणे आणि आत्मस्तुती करणे हे आत्मकेंद्रीतपणाचे लक्षण आहे. अशा व्यक्तीसोबत लोक संपर्क ठेवत नाहीत हे माहिती असलं पाहिजे.
      शब्दांमधून भावना व्यक्त होत असतात त्यामुळे कशीही परिस्थती असली तरी आपलं चांगलं चाललय असं म्हणारी व्यक्ती आपल्या स्वत:सोबतच इंतरांच्या आसपास सकारात्मक उर्जा वाढवित असते. समोरच्या व्यक्तीची आस्थेवाईकपणे विचारणा करुन मगच औपचारिक संवाद सुरु व्हावेत यातून जिव्हाळा वृध्दींगत होतो.
      संभाषण ही एक कला आहे. त्यात प्राविण्य मिळवायचं शस्त्र आपण जाणून घेतलं तर आपण आपलं व्यक्तीमत्व आधिक ठळपणानं जगासमोर आणू आणि सर्वोत्तम होण्यात हा पहिला महत्वाचा धागा आहे.    
    -प्रशांत दैठणकर 

Wednesday, 6 July 2011

लेखन दिवस अर्थात 8 जुलै... !


      आपल्या मराठी भाषेचं वैशिष्टय म्हणजे आपल्या भाषेतल्या म्हणी होत. एका वाक्यात मोठं सांगण्याचं काम या म्हणीमधून होते ग्रामीण भागात लांबलचक संवाद न करता म्हणींच्या माध्यमातून संवाद म्हणजे आगळा आनंद असतो. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे 8 जुलै अर्थात लेखन दिवस.
      दिसामाजी काही लिहित जावे, प्रसंगी अखंडीत वाचित जावे असं संतवचन आहे. लिहिणाराच नसेल तर वाचणारा काय वाचणार ? आपल्या कडे लिखाणाची मोठी परंपरा आहे. ज्यावेळी कागदाचा शोध लागला त्यावेळी या लिखाणाच्या कार्याने वेग घेतला असला तरी त्यापूर्वी लिखाण होतच होते.
      लिखाणाच्या या परंपरेचा वेध घेताना अगदी पूरातन काळात गुहेत माणूस रहात असायचा त्या काळात त्याने रेखाटलेल्या चित्रांचा पहिले लिखाण म्हणून उल्लेख करावा लागेल. अभिव्यक्ती साठी त्यावेळी ते उपलब्ध साधन वापरले गेले.
      नंतरच्या काळात आयुधांच्या मदतीने दगडांवर कोरिव काम करुन शिलालेख मोठया प्रमाणावर लिहिले गेले यातही राज घराणे आणि त्यांचा गुणगैारव मोठया प्रमाणावर असे ज्या काळात वेदांचे आणि उपनिषदाचे पठण सुरु झाले त्या काळापासून त्याचे लिखाण होईपर्यंतचा प्रवास हा मौखिकच होता.
      भूर्जपत्र हे माध्यम सापडल्यानंतर मोठया प्रमाणावर ग्रंथनिर्मिती शक्य झाली तरी धातूवर लिखाण करणे, दगडांवर लिखाण करणे अशी परंपरा कायम राहिली होती. कागदाचा शोध लागल्यानंतर लिखाणाला योग्य माध्यम मिळाले असे म्हणण्यापेक्षा लिखाण हे सामान्यासाठी अभिव्यक्तीचे नवे माध्यम बनले. कागदाचा शोधानंतर लागलेला महत्वाचा शोध अर्थातच मुद्रणाचा. या दोन महत्वाच्या शोधांनी जग ख-या अर्थानं बदलून टाकलं.
      लिखाणाची इच्छा असणं आणि प्रत्यक्षात लेखन करणं प्रत्येकाला जमतं असं नाही पण, लिहिलेलं वाचणं सा-या अक्षर प्रेमींना जमतं यातूनच साहित्याची परंपरा पुढे आली विविध क्षेत्रातील ज्ञान शब्दरुपानं कागदावर आल्यानंतर त्याला पुढच्या पिढीपर्यंत नेणं सोपं झाल. यातून शिक्षण पध्दतीतही बदल घडला गुरुकुलांची परंपरा जाऊन शाळा आल्या.
      शाळेतले शिक्षक असो की, चौथ्या स्तंभाचे शिलेदार अगदी साधा अकाउन्टंन्ट देखील या लेखनाच्या बळावरच प्रगती करु शकला हे विसरता येत नाही दुसरीकडे ज्यांच्या आयुष्यात लेखनाचा संबंधच आला नाही अशा ग्रामीण क्षेत्रातही भाषा सूत्र मजबूत राहिले.
      नावात काय असं विचारणारा विल्यम शेक्सपिअर असो की आपल्या शब्दातून     वाचणा-याला खळाळून हसायला लावणारे पुलं. या लेखनाची ही जादू आता तंत्रातील प्रगतीमुळे ज्याला लिहिता येतं तो लिहित आहे. फेसबूकसारख्या समुदायानं सा-या जगाला लिहितं केलं असा निष्कर्ष वावगा ठरणारा नाही.
      ज्याला जसं जमतय, जसं सूचतय तसं कोणतीही भीड न बाळगता लिहिणारे लाखोजण या माध्यमात दिसतील. माहितीच्या महाजालात विविध क्षेत्राची माहिती याच स्वरुपात आता आपल्याला उपलब्ध आहे. वेबसाईटस् आणि ब्लॉग्सनी लेखकांना नवं माध्यम दिलय. तंत्राच्या प्रगतीनं लेखनात जसं पुढचं पाऊल पडलं तसं ते नाटय सिनेक्षेत्रातही पडलय तंत्रानं आणखी एक बदल केला तो म्हणजे संगमंचावर घडणारं नाटय घरात टिव्हीच्या पडद्यावर आणलं ज्याचा रिमोट तुमच्या हाती असतो.
      वाचन क्षेत्रात ही तंत्रज्ञानानं बदल घडवले आहेत माहितीच्या महाजालात असंख्य ग्रं‍थ आज सर्वांसाठी खुले झाले. पुढचं पाऊल म्हणजे ई-बुक रिडरच्या रुपात किंडल सारखी उपकरणं सहजरित्या ग्रंथालय बाळगायला समर्थ झाली त्यासाठी एकच सांगणं ज्याला लिहिता येतं त्यानी ते लिहावं... लेखक व्हावं
                                                                        -प्रशांत दैठणकर 

Tuesday, 5 July 2011

NATIONAL TREASURE


    देवाचा खजिना की राजाचा ?  खजिना सापडला यावरुन कधीकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता असं का म्हणायचे, याचं उत्तर सापडलं. अर्थात पद्मनाभस्वामी मंदीरात सध्या जी मोजदाद चालू आहे ती बाजार मुल्याची. खजिन्याचं, नेमकं मुल्य किमान 100 लाख कोटींवर जाईल. विषय अर्थात केरळतल्या पद्मनाथ मंदिराचा.
     आता पुढची चर्चा होणार ती त्याच्या दुर्मिळता मुल्याची... हत्ती सोन्याचा, माणसं सोन्याची अगदी अडीच किलोची सोनसाखळी सारं अजब पोत्यानं सोन्याचे दाणे आणि नाणे सोबत हिरे, माणकं आणि पाचूचे पाते काय कमाल आहे ना....
     खरा सवाल हा खजिना कुणाचा राजाचा की मंदिराचा. चढाओढीच्या स्पर्धेत चॅनेलवाल्यांनी आता कोणतं देवस्थान श्रीमंत असा नवा विषय समोर आणला आहे. मुळात आम्ही भारतीय देवभोळे त्यामुळेच तिर्थयात्रा ही आमची परंपरा. भगवंताचा झेंडा हाती घेऊन पंढरीची वारी करणारा इथला समाज. राजकीय झेंडे हाती आल्यावर दुस-या वा-या करणारी नवी पिढी सारं बदलत जाणारं समीकरण.
     तिरुपती देवस्थान श्रीमंत की वैष्णोदेवी असा सवाल टीआरपी रेटींग विचारल्यागत वाटतो. एका चॅनेलने तर त्या रकमेचा विनियोग करीत ९५ एफ-17 विमाने खरेदी करुन टाकली याला म्हणतात कोटीच्या कोटी उड्डाणं.                                            
चॅनेलवाल्यांना दळायला आणि तमाम मध्यमवर्गीयांना चघळायला एक चांगला विषय या निमित्तानं मिळालाय हे स्पष्ट आहे. किचनमधून टिव्हीवरची ती नेत्रदीपक बातमी बघताना त्या गृहिणीला मात्र आपला राहून गेला करायचा असो चपलाहार आठवला असणार.
     आता हा खजिना ट्रस्टकडे राहणार की देशाची संपत्ती म्हणून जमा होणार यावर खल सुरु होईल. योगी रामदेव बाबांच्या संपत्तीवर चॅनेल्सनी चर्चा केली त्यानंतर सत्य साईबाबांच्या संपत्तीवर चर्चा झाली. कधी काळी अशीच चर्चा ओशांच्या 99 मर्सडिज कारची झाली होती. तुम्हा आम्हाला चर्चा करायला खूपच आवडतं ना.
     यावर टिव्हीवर ` सो कॉल्ड ` आणि कधी ख-या असणा-या तज्ञाचं चर्चासत्र होईल. त्यावर एसएमएसने मतं मागितली जातील आणि लोकं पैसा खर्च करुन मतं देतीलही वेळ आणि पैसा खूप आहे ना. हे समजलं पण या मतदानात हो किंवा नाही या पर्यायाला सोडून मधला मार्ग स्वीकारणारे ते  ` तटस्थ ` का मतदान करतात हे अद्याप कळलं नाही.
                           प्रशांत दैठणकर

Monday, 4 July 2011

… साहेब रागावतील ना...!



            चिमुकल्यांचे चिमुकले बोल ऐकायला खूप चांगले वाटतात तसेच ते काही शिकविणारेही असतात असा प्रकार आपण ऐकतो पण त्याची नोंद घेत नाही असं अनेकदा होतं. आता असाच काहीसा प्रकार रविवारी म्हणजे काल घरी घडला.
     मास्टर वेदांतला त्याच्या मित्रांकडे जायचं होतं आता जायचं म्हणजे त्याला कुणीतरी नेवून सोडावं लागतं त्यानं त्यासाठी आजोबांना गळ घातली. आजोबा तयार झाले मात्र सकाळी झोपेतून उठल्यावर महाशय टिव्हीत कार्टून बघण्यात गुंगले आणि आजोबा त्यांच्या सवयीप्रमाणे सकाळी आवरुन रविवारी मित्र कंपनीला भेटण्यासाठी निघाले.
     आजोबांना तयार झालेलं बघून त्यानं सहाजिकच विचारंलं ` आजोबा तुम्ही कुठे जात आहात ?  त्यानं असं विचारलं त्यावेळी लगेच त्याच्या आईनं म्हणजे माझ्या सौ.नं. त्याला टोकलं `  ओ वेदांत असं बाहेर   जाणा-याला कुठे जाताय असं विचारु नये, त्यामुळे काम होत नाहीत.
     वेदांतनं ऐकूण तर घेतलं पण लाडीक आवाजात गा-हाणं मांडले. अगं आई आजोबा मला माझ्या फ्रेंडकडे सोडणार होते ना. त्याची आई सोबतची ही कुरकूर आजोबांच्या कानी पडली नाही मात्र तो काही गा-हाणं मांडतोय हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वेदांतला विचारलं कायरे कुठे जायचय तुला ?  त्यांचं ते वाक्य पूर्ण होतं न होतं तोच वेदांत त्यांच्याकडे वळून अगदी निरागसपणे म्हणाला ` आजोबा असं विचाराचं नसतं. अशानं कामं होत नाहीत ! घ्या ! याला म्हणतात गुरुची विद्या गुरुला. त्याचं ते वागणं अगदी निरागस होतं त्यानं हास्याची कारंजी फुटली नसती तर नवल.
     असा हा निरागसपणा आपल्याला का ठेवता येत नाही. या वयात असा सवाल पडतो. आता यावरुन मोठी कन्या जान्हवी अर्थात जानूचा एक किस्सा आठवला.
     मी माझ्या कार्यालयात प्रमुख आहे म्हणजे लोकांच्या दृष्टीने साहेब. जानू साधारण बोलायला लागलेली. तिचं बोलणं फोनवर ऐकायला छान वाटत असे त्यामुळे ऑफिसमधून मी दिवसातून एक-दोन वेळा फोन लावून बोलत असे.ती लहान आणि तिचं विश्वदेखील. मग गप्पा काय होणार जेवणं झाली का आणि काय खाणं झाले फार तर टिव्हीवर काय बघतेस इतकच. आणि तिला याचा कंटाळा येत असे.
     मी फोन लावला जानू बेटा काय करतेस ?   माझे प्रश्न सुरु साधारण मिनिटभर बोलणं झाल्यावर तिला कंटाळा आलेला. बोल ना बेटा असा माझा आग्रह सुरु. ती तिकडे वैतागली असावी. ती पटकन म्हणाली `बाबा किती बोलताय तुम्ही फोन ठेवा आता. तुमचा साहेब रागवेल ना  ! साहाजिकच मला हसू आलं होतं. पण फोन करताना आपण उगाच फोन का करावा असा प्रश्न समोर आला.
     फोनवर विनाकरण बोलणारी माणसं पाहिली की मला तिचं ते बोलणं आजही आवठवंत. फोन संपर्काचं साधन आहे. गप्पा मारायचं नाही हे तिच्या त्या चिमुकल्या बोलांनी कायमचं मनावर कोरले गेलय.

Sunday, 3 July 2011

कुटुंब व्यवस्थाच संकटात... !

व्यसनांमुळे आपल्या आयुष्यात खूप मोठं नुकसान होत आहे. याची जाणीव नसल्याने बहुतांश जण व्यसन करीत राहतात त्यात त्या व्यक्तीचं कुटुंबातील स्थान कुटुंबप्रमुखाचं असेल तर सारं कुटुंब विस्कळीत होवून जातं. तणाव हे व्यसनाधिनतेचं कारण आहे असं सांगितलं जातं मात्र त्याच्या व्यसनाने सारं कुटुंब तणावाखाली येतं याची त्याला जाणीव नसते.
     स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये तंबाखूचं व्यसन लागण्याचं प्रमाण खूप अधिक आहे. गुटखा, खर्रा या स्वरुपात तंबाखू खाण्यास मुले सुरुवात करतात. प्रारंभी हे धाडसातून केलं असलं तरी नंतर याची सवय कधी लागते याची जाणिव त्यांना राहत नाही.
     तंबाखूमुळे कर्करोग होवू शकतो अशी सूचना छापणं शासनानं गुटखा उत्पादक आणि सिगारेट उत्पादक कंपन्यांवर सक्तीचं केल आहे. या सूचना बघूनही सर्रास डोळेझाक केली जाते, इतकच नव्हे तर टंचाई झाल्याच्या काळात एक गुटखा पुडी 25 रुपयांना घेतली असं सांगणारे आहेत.
     व्यसन जडल्यावर ते लवकर सुटत नाही. पहिले माणुस दारुला पितो आणि नंतर दारु माणसाला... असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. दारुच्या अंमलाखाली तणावापासून काही काळ सुटका होत असली तरी तणावाचं मुळ कारण संपत नसतं आर्थिक संकटाच्या स्थितीत मेहनत

आणि समस्येचा मुकाबला हे दोनच पर्याय असतात. त्यावेळी दारुचा हा एकच प्याला कामाला येत नाही हे आपण गांभीर्याने समजून घ्यावं लागेल.
     दारु मानवी मेंदूत संवेदना बोथट करते त्यामुळे हा एकच प्याला घरादाराला उध्वस्त करीत असतो. दारुच्या नशेत बायका-मुलांना मारहाण होते. त्यामुळे सारं कुटुंब तणावाखाली येतं अशा घरात नवरा म्हणजे संकट असतं. मुलांना दारुडा बाप म्हणजे असून नसल्यासारखा असतो. ज्या वयात मुलांना आई-बाप आदर्श असतात त्या वयात हा बेवडा आदर्श मुलांच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होतो. त्यांचं व्यक्तीमत्व सक्षमपणे उभं राहत नाही.
     घरात एकच प्याला शिरल्यानंतर कुटुंबात आवश्यक असणारे सहाजिक सौहार्दाचे वातावरण राहत नाही. कुटुंबात राहणं आगळा आनंद असतो मात्र हा आनंद कुटुंबातील एकाही व्यक्तीला मिळत नाही. मुलांना हवा असणारा जिव्हाळा आणि प्रेमाचा ओलावा कुटुंबातून मिळत नाही. यातून कुटुंब म्हणून असणारी मुलांची भावनिक नाळ तुटते व हा आनंद इतर मार्गातून प्राप्त करण्याचा प्रयत्न मुलं करतात आणि मुलं त्या कुटुंबापासून दूर जायला लागतात.
     आपला भारत देश कुटुंब व्यवस्था जपणारा आणि जगणारा देश अशी ओळख आहे. सध्या चित्र बदलत असल्याचे दिसत आहे. दारुचे व्यसन असल्याने वैतागून आणि मारहाणीला, छळाला कंटाळून स्त्री घर सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. यातून मुलांची कुचंबणा होते आई-वडील हे नातं या एकाच प्यालाने दुरावल्याने मुलांचा विकास व्यवस्थित होत नाही.
     या व्यसनाधितेतून विवाहबाह्य संबंध निर्माण होणे, त्यातून गुन्हेगारी असाही प्रकार घडतो. दारुच्या नशेत भांडणे, मारामारी करणे यातून अनेकदा खूनासारखे गंभीर गुन्हे देखील घडतात. कुटुंब वाचवायचं असेल तर या विषयाबाबत गांभीर्याने विचार करुन व्यसनांचा नाद सोडणं आणि कुटुंब जवळ आणणं गरजेचं आहे त्यासाठी हा`एकच प्याला` सोडावाच लागेल.                                             -प्रशांत दैठणकर

Saturday, 2 July 2011

माहितीचं महाजाल ..


      तंत्राच्या प्रगतीने आता इटरनेटवर नेटीझन्सची आणि त्यांच्या समुदायाची संख्या वाढत आहे. नवी पिढी याचा मोठया प्रमाणावर वापर करीत आहे. आपणही आपल्या घरात मुलांना सतत संगणकासमोर बसलेले पहात अससाल. असं बघताना मुलं नेमकं इंटरनेटवर काय करतात याकडे काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज आहे.
      इंटरनेटचा वापर आणि गैरवापर यांचा अभ्यास करताना लक्षात येते की, कुतूहलपोटी आणि प्रसंगी सवयीने जाणून गैरवापर करणारे आहेत आपल्या मुलांबाबत आपण काळजी घ्यायला हवी. त्यासाठी आपल्यालाही संगणक साक्ष्ज्ञरता आणि इंटरनेटचं ज्ञान मिळवणं ही आता प्रत्येक पालकाची गरज आहे.
      फेसबूक सारख्या समुदायात खरे किती आणि खोटं किती हे कळणं अवघड असतं खरी ओळख दाखविणे आणि खरे वय दाखविणे हे प्रत्येकजण करतोच असे नाही. यातून ओळख निर्माण झाल्यावर  मुलींना बोलवून त्यांच्यावर अत्याचार घडल्याच्या काही गंभीर घटना गेल्या काही काळात घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर पालक या नात्याने सजग होण्याची गरज आहे.
      इंटरनेटवरुन होणारे गुन्हे अर्थात सायबर क्राईम होय सायबर क्राईम देखील गेल्या काही वर्षात वाढलेला आहे यात कोणकोणते गुन्हे आहेत याची सर्वसामान्यांना माहिती नसते आणि   ब-याचदा पोलिसांनाही नसते. आपल्या नावाचा इंटरनेटवर गैरवापर होवू शकतो हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे.
      फेसबूक सारख्या कम्युनिटीतही अश्लील गट अनेक आहेत. त्या गटांशी आपल्या कुलांचा संबंध येवू नये याबाबत आपण खबरदारी घ्यावी हे उत्तम. धाडसापोटी आणि आपला मोठेपणा मिरवण्यासाठी वाहनाची किल्ली मुलांना लहान वयात सोपविणारे अनेक पालक आहेत.मुलांना जसा धोका रस्त्यांवर आहे तसाच तो इंटरनेटवर आहे हे लक्षात ठेवा.
      मोबाईलच्या माध्यमातून अश्लील मल्टीमिडीया मेसेजेस अर्थात एमएमएस पाठविले जातात. त्यामुळे मुलांचे मोबाईल पालकांनी अधून-मधून निश्चितपणे तपासले पाहिजेत. त्यांच्या मोबाईलमध्ये असणारे वॉलपेपर आणि एमएमएस व एस एम एस देखील तपासावे. मुलांच्या तंत्रज्ञानातील आघाडीवर आनंद व्यक्त करुन तयांना ते उपलब्ध जरुर करुन द्या मात्र जबाबदार पालक या नात्याने आपणही संगणक साक्षर व्हा.
          -प्रशांत दैठणकर 

Friday, 1 July 2011

कट्टा और गँग हमारी एसबीवाली !

google
                
            कॉलेजच्या दिवसांची मजा खरच न्यारी असते. ख-या अर्थानं मंतरलेले असे ते दिवस. मक्या-मंग्या, सुन्या, अष्ट्या जितू, सम्या अशी एकामेकांना बोलवायची प्रथा कॉलेजात दुसरा ग्रुपदेखील होता अर्थात विषय वेगळे असले तरी कट्टा मात्र एकच असायचा ना.
     आता दुस-या गटात नित्या ज्याला वर्गमित्र दंड्या म्हणायचे तर पंक्या, पिड्या, गजू अशी ती सारी गँग. हे सारं आठवायचं कारण म्हणजे ती परंपरा इथं वर्ध्यातही पुढे चालू आहे इथं मित्रांची नावं चारु, बंटी, पप्पू अशीच आहेत. एकदा सायंकाळी घरी  बायकोसोबत बोलताना गँग सोबत आहेत असं नाव घेत सांगितलं तिकडे तिचा फिस्सकन हसण्याचा आवाज ऐकून मी चमकलो.
     तिनं हसत हसत सांगितलं की छोटा वेदांत जो आता तिस-या वर्गात आहे. त्याला फ्रेडसची नावं विचारली तर तो सांगतो सोहम, रोहन सर्वज्ञ आणि बाबांचे मित्र बंटी आणि पप्पू मग हसू येणारच ना.
     काळ बदलला आणि माणसं तसा औपचारिकपणा वाढला. आता कट्टयावरचा आणखी एक ग्रुप म्हणजे क्रिएटीव्ह रायटर समजणा-यांचा त्यात एकमेकांना बोलावण्याची पध्दत वेगही होती अगदी सारंग प्रभाकर टाकळकर किंवा नितीश रमेश दंडवते असं पूर्ण नाव घेऊन संवाद सुरु व्हायचा  काय म्हणतात प्रवीण प्रभाकर देशमुख किंवा काय करताहेत संदीप सुधाकर पालोदकर त्यात आगळी मजा होती हे नक्की. त्यात आत्मियता होता जो आजवर टिकून आहे.
     आता मक्या म्हणजे आज मराठीचा सुपर स्टार असलेला मकरंद अनासपुरे तर मंग्या म्हणजे ` फु बाई फू ` गाजवणारा त्यावेळी नाटकांमध्ये शिरकाव केलेला छोटा दोस्त मंगेश देसाई जितू अर्थात जितेंद्र पानपाटील आणि सम्या म्हणजे समीर पाटील आणि अष्ट्या म्हणजे सुनिल अष्टेकर.
     आता नाटकांच्या तालमी चालायच्या त्यावेळी असणारी नावं फक्त ग्रुपलाच माहिती असणार एक होता बाचक्या तर दुसरा बर्कले फिल्टर आता ही नाव आमच्या गँगला ओळखू येतीलच.
                                    
 कॉलेजच्या बाहेर सॅट, पॅट आणि रॅम्बो अशी आगळ्या गँगची 
नावं होती. क्रिएटिव्ह रायटरच्या ग्रुपला नावही जोरदार शोधलं होतं `` उन्माद कारण काय तर गव्हर्नमेन्ट कॉलेज असलेला सुन्या पाटीलचा जाणीवा ग्रुप.
     ते सारे ग्रुप हे फेसबूक सारखे व्हर्च्युअल ग्रुप नव्हते ते वास्तवात एकमेकांना भेटून धिंगाणा आणि तुफान मस्ती करणारे ग्रुप होते. आज फेसबूकमध्ये लिहिताना ते दिवस आठवतात. आज सारी मंडळी आपापल्या व्यापात बुडालेली कोणी पुण्यात, कोणी नाशकात कुणी दुबईला तर कुणी स्टेटस् ला  पोहचलेली या फेसबुकाच्या निमित्ताने पुन्हा कट्टा जमतोय हे विशेष.
     एखादा बर्थ डे असेल तर त्याचा खिसा कापण्यात सारी गँग वाकबगार होती पण त्यावेळी पैसेच कमी असायचे. मला पोटभर आणि मनसोक्त गप्पा व्हायच्या. आता सर्वजण कमावते आहेत पण खिसा कापणारी ती गँग आता जगभर विखुरलीय.
     पुन्हा एखादा योग येईल की सारी गँग पुन्हा त्याच कट्टयावर गप्पांचा फड रंगवायला येईल. टपरीवरचा चहा आणि टपरीवरच्या अण्णांची मजा उडवत पिलेली सिगारेट... स्मृतीचा हा कट्टा दोस्त हो हा कट्टा    सा-यांची वाट पहात आहे.

                नावाशी कुस्ती खेळत रोज
              रंगत कट्टयावरची मैफली
              चला उठा माझ्या दोस्तांनो
              ऑफ-पिरिअडची वेळ आली
              कट्टयावरुन टपरीकडे जाऊ
              कट्टयावरुन टपरीकडे जाऊ
              चहा अमेरिकन सिस्टीमने घेऊ
              टी-टी,एम-एम आजही करु
              पुन्हा नव्याने मैत्रीचा जागर करु
 -  प्रशांत दैठणकर