Monday, 23 July 2018

तुम तो ठहरें परदेसी . .

तुम तो ठहरें परदेसी . . . साथ क्या निभाओगे..
अल्ताफ राजाचं


 गाणं रिक्षावाल्याने लावलं होत . . त्यानं झटकन मीटर टाकून त्या रिक्षाला वेग दिला . . . रिक्षा वेगानं समोर धावत होती पण मनाचा प्रवास नेमका उलटया दिशेने सुरु झाला होता. शासकीय सेवेत येण्यापूर्वीचा तो काळ . . मी चित्रपट समिक्षा लिहायचो.

शुक्रवारचा फर्स्ट डे फर्स्ट शो . . . जागा बूक असायची आज इतक्या वर्षांनी तब्बल वीस वर्षांनी हो . .. चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर 20 साल बाद . . तो काळ आठवताना आजची त्या काळाशी तुलना आपसूकच सुरु झाली मनातल्या मनात. . !

मला आठवलं माझं औरगाबाद आठवलं. . .
काय वेगाने सरत असतो. . . आपलं शहर हे आपल्या घराइतकंच प्रिय असतं, आता हा बऱ्यापैकी भावनिक विचार झाला ज्या शहरात लहानाचे मोठे झालो त्या शहराची आठवण प्रत्येकाच्या मनात घर करुन असते. . बदलत्या काळात माझं औरगाबाद सोडून बाहेर रहावं लागलं. . फरक असता प्रत्येक गावात . . . !

इथं गडचिरोलीत बरोबर आज 22 जूलैला येवून 3 वर्षे   पूर्ण झाली . . . एक प्रकारे मी गडचिरोलीचाच झालोय इथली भाषा . . बोलायला लागलो . . नव्या व्यक्तीला वाटतं की मी गडचिरोलीचाच आहे. . पण संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची प्रतिक्रिया मात्र अगदी अल्ताफ राजाच्या गाण्यासारखीच असते..

. . . तूम तो ठहरे परदेसी . . . !

आपल्या शहरात आपण राहतो त्यावेळी आसपास मित्रमंडळी आणि परिचितांमुळे कधी एकटं . राहण्याचा प्रसंग आला नाही त्यामुळे एकाकीपणा देखील आला नाही असा अनुभव येतो. . . इथं देखील मित्रमंडळी जमली पण राहायला एकटं रहावं लागतं. . . सततच्या एकटेपणानं एकाकीपणा येवू नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागते मनाला. . . !

घर सोडून राहणारा मी काही जगात एकटा नाही . . . दर्यावर्दी  सिंदबादच्या सफरी लहानपणी वाचलेल्या त्यातली रंतकता आठवायची . .
एखादा नवा छंद जोपासायचा आपण स्वत:लाच गुंतवून ठेवायचं . . शरिरानं इथं.... मनानं तिथं... असं न करता शरीर आणि मन दोन्हीसह जाता आणि जगता आलं तर  तिथं राहणं अवघड असलं तरी ते अशक्य मात्र नाही . . . अगदी तसं जगलं तरच छानपैकी जगता येतं हा अनुभव .

9 वर्षांपूर्वी औरंगाबाद सुटलं त्यावेळी मी पूर्ण पणे औरंगाबादचा होतो नंतर प्रथम वर्धेत जाऊन मी पूर्णपणे वर्धेकर झालो. मराठवाडी भाषा आणि वऱ्हाडातली भाषा यात खूप फरक आहे. तो अवघ्या 15 दिवसात आत्मसात करण्याचं आव्हान घेतलं आणि तिथं जिंकलो . . . त्या 3 वर्षांनंतर पुढची 3 वर्षे बुलडाणा आणि आता गडचिरोली एकटे पणाची मजा वेगळी . . घर आणि गडचिरोली यातील प्रवासाची कथा आगळी . . मला स्वत:ला प्रवास करायला आवडत नाही पण करना पडता है. . . ! या प्रवासाच्या कालावधीत जिथं जाऊ तिथला होवू अशी मनाची   तयारी आपोआप होत असते. .... तशी झाली  देखील.

आपण कितीही इथले म्हणून राहिलो तरी स्थानिकांच्या मनात असलेलं ' आपलं
' परेदसीपण ' विचार करायला लावतं. . . आज ना उद्या तुम्ही जाणार ही भावना त्यांच्या मनात असल्याने म्हणावी तशी ' Attatchmont कुणी ठेवत नाही . .. हा प्रकार काहीसा रेनकोट घालून शॉवर खाली अंघोळ करण्यासारखा असतो म्हणायला पाण्याच्या धारांमध्ये तासभर उभे पण आतून आपण कोरडेच राहतो. . . हे कोरडेपण जाणवत रहातं... !

कधी कधी भावनेच्या भरात होमसीक होतो हे पण मान्य करावं लागेल अखेर आपण अन्नपाण्यापेक्षा भावनांवर अधिक जगतो ना... ! अशा वेळी जर एखांद आठवणीतलं गाण लागलं तर डोळेही पाणावतात .

चिठ्ठी आयी है वतनसे चिठ्ठी . . . !

असो की

संदेसे आते है . . . ! 

गाण्याच्या एका लकेरीत भावनांचा पसारा घरभर सांडतो. मग आपणच तो आवरायला घ्यायचा..... पण त्यातून झटकन निघता येत नाही हे देखील खरं आहे.

मी काय काय Miss केलय आजवर याचं गणित खर्चाच्या बाजूला मांडायचं
आणि मला काय काय जगायला मिळालं याची बेरीज जमेच्या बाजूला मांडायची..... या जमाखर्चात जमा कमी आणि खर्च अधिक असं होवू द्यायचं असेल तर सकारात्मक विचार ठेवून आला क्षण आनंदाने जगायचा.....!

आयुष्य ही वाटचाल आहे......मग सकारात्मक रहाण्यासाठी मन तयार करायचं....! यासाठी मराठीतील थोरांच्या सल्याचा आधार घ्यायचा....

' जे होतं ते चांगल्यासाठी '...... म्हणत वाटचाल करीत रहायचं...... काही जणांना मी गंमतीनं म्हणतो की, ' ठेविले अनंते तैसेची रहावे ' हे वाक्य माझ्यासाठीच आहे..... कारण माझ्या वडिलांचे नाव अनंत आहे.

घरापासून दूर राहणारे माझे अनेक मित्र आहेत. अगदी साता समुद्रापार म्हणतात त्या प्रमाणे ब्रिटन, दुबई, जर्मनी, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, मेक्कीको, चीन कुठे नाहीत जगाच्या कानाकोपऱ्यात ..... त्यांनाही घर आठवत असणारच... ते तर माझ्यापेक्षा किती दूर आहेत घरापासून......!

आपल्याकडे जन्मभूमी आणि कर्मभूमी असे शब्द आहेत. जन्मभूमीची ओढ असणं स्वाभाविक आहे. कर्मभूमीवर देखील प्रेम असणं आवश्यक आहे..... जुन्या काळात प्रवासाची साधनं मर्यादीत होती आणि प्रवास कठीण......खलाशी ज्या बंदरात जायचे तिथं घर करायचेच ना.....!

कोणतीही व्यक्ती असो एक गोष्ट मात्र नक्की.
...... यह भी वक्त जायेगा......!

जणू काही पॉझिटीव्हीटीची इन्जेक्शन्स घेतोय असं वाटून जातं कधी कधी...... पण गडचिरोलीत मी वेगळं आयुष्य जगतोय....... सुंदर निसर्ग...... स्वच्छ पर्यावरण.... 24 तास शुध्द प्राणवायू आणि ..... 'परदेसी' पण मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसलेलं असतानाही आपलेपणानं जपणारे मित्र........!

गडचिरोलीची स्वत:ची अशी गती आहे. सुविधा कमी.... मनोरंजन शुन्य.... मुंबई-पुण्यासारखी धावाधाव दगदग नाही..... शांत संथ प्रवाह असणार गाव..... याला शहर देखील म्हणता येणार नाही.... मुंबईच्या भौतिकवादी जगापेक्षा दुर असणारा हा भारतातला वेगळा भारत......
मनाची गती कमी करुन आपणही शांतपणे 3 वर्ष इथ पुर्ण केली.... भरपूर रिकाम वेळ आत्मचिंतन...... आत्मबोध..... मनाचा शोध याच्या जोडीला जोपासलेला फोटोग्राफीचा छंद... खूप काही वेगळेपणानं करायला मिळालं.. जगायला देखील मिळालं साऱ्यामध्ये वेळ कसा गेला.... काळ कसा संपला हे कळलच नाही.....!

पण सत्य ते सत्य ते बदलत नाही.. काळाचे काही देणे हाेते आणि या ठिकाणी येणे होते... काळ झपाट्याने कसा जातो ते कळत नाही कारण आपण त्याचा वेग जाणून जुळवूम घेतलेले आहे याची जाणीव आहे... आता हा काळ वेगाने गेला त्याचंही कारण अगदी नेमकेपणाने तेच आहे.
सवय झाली इथल्या असण्याची... इथल्या रूटीनचा ... पण  आज अचानक या गाण्याने आठवण दिली.

 खरोखरच हम तो ठहरे परदेसी......... या वेगळया जगात......!

प्रशांत दैठणकर
9823199466

Friday, 20 July 2018

पत्नी.. पती आणि ... ती


ती मला  पाहिजे . . .ती तुम्हालाही पाहिजे . . .  ती इथं सर्वांनाच पाहिजे . . . काळाच्या वेगात धावण्याचा प्रयत्न सारेच करतात, ही धावपळ जितकी वाढते तितक्य अधिक तिव्रतेने तिची गरज सर्वांना भासते.

लग्न मग ते प्रेमविवाह कॅटेगरीतलं असो की जुळवलेल . . . मधुचंद्राचा काळ संपून आयुष्यात रोजच्या गाडयाला जोडून घेतलं आणि नंतर सुरु झालं ते ' रुटीन ' यातून ...कधी कधी जवळ येणं . . . अधून . . मधून रुसवे , फुगवे . .. आयुष्य चालत राहतं अशा स्थितीत होणारी दगदग ज्यावेळी वैतागाकडे वळते त्यावेळी मात्र जाणवतं की आपल्याला
'ती ' आवश्यक आहे.

और दिल में . . ये बात इधर भी है ...और उधर भी..!

बंधन म्हणजे एक प्रकारे यमक जुळवणं असतं प्रत्येकाला यमकात जुळवणं जमतं असं नाही आणि मुक्त छंदातली मजा यमकात कुठे. . . शाळेत होतो त्यावेळी योग्य तो समास सोडून लिहावं असं सांगितलं जायचं . . आणि आपण त्याचे पालन करायचो. मात्र आयुष्यात तो प्रकार कधीच आवडला नाही. बंधन तसंही कुणाला आवडतच नाही ना.

प्रेमात पडलो. . . विवाह झाला पण काही काळानं ' ती ' हवी असं वाटायला लागलं . . . का वाटायला लागलं याचा आरंभी बोध झाला नाही पण नंतर जाणवलं. . . मलाच नव्हे तर तिलाही ' ती ' हवी आहे . . .

पती -पत्नी म्हणून सुरेख नाते जपले . . आजही खंत आहे की या नात्यात इतक्या वर्षांमध्ये दोघांनी भांडायचं राहूनच गेलं. . . परंतु दोघांनाही ' ती ' हवी असं वाटायला लागलं, त्याची स्पष्ट जाणीव झाली .
. . पती-पत्नी और वह अर्थात ती  . . म्हणजे ' पर्सनल स्पेस '  हो प्रत्येकातील स्व जपणारी ती  ' पर्सनल स्पेस '

' इंजाजत ' चित्रपटात एक सुंदर डायलॉग आहे.

शादी मरती है तो रिश्ता सडने लगता है . .!

खरच आहे. लग्न करावं की नाहि यावर प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र मत आहे.मात्र लग्न न करणारे खूप कमी आढळतात

शादी वो लडडू है
जो खाये वो पछताये
 ना खाये वो भी पछताये . .!


लग्न मनाविरुध्द झालं तर समजण्यासारखं आहे पण प्रेम करुन विवाह बंधनात अडकणाऱ्यांचं असं का होतं . .? . . या प्रश्नातच याचं उत्तर आहे. . विवाह हे एक बंधन आहे . .
. विवाह झाल्यावर अनेक बदल दोघांच्याही आयुष्यात येतात.

मला विचाराल तर मला एक विनोद आठवला यावरला . .
लग्नापूर्वी आणि लग्नानंतर काय फरक पडला आयुष्यात . . .?
लग्नापूर्वी पलंगाच्या दोन्ही बाजूंनी उतरता येत होतं . . .!

यातला विनोदाचा भाग वगळला तर हे खरं आहे की , विवाह झाल्यावर दोघांचही आयुष्य बदलतं . .!

विवाहपूर्वीची प्रेमाची गुलाबी वाटचाल तिथं नसते . . . पुरुष प्रधान संस्कृतीत जगणारे आपण आणि आपल्या समाजाने पाळलेल्या परंपरा यामुळे आपणही नकळतपणे पतीच्या भुमिकेत शिरतो त्याच वेळी ती प्रेयसीच्या भुमिकेतून पत्नीच्या भुमिकेत जाते त्यावेळी तिची विचार करण्याची पध्दत बदलते . . !

टेढा है . . . पर मेरा है अशी एक जाहिरात आली होती तसं काहीसं ती आपल्या पतीला मानत असते त्यातच पतीला परमेश्वर मानणारा आपला समाज आसपास असतो.. आपण तारूण्यातला बेफिकरपणा सोडावा असं मत ती व्यक्त करीत असते आपल्यालाही तिथं काही बंधन आलय असं वाटायला लागतं.
... तिच्या अपेक्षा वाढत असतात आणि आक्षेप देखील... या अपेक्षा आणि आक्षेपातील गोंधळामुळे ताणाचे प्रसंगही वाढतात मग तो आणि तिचं प्रेम यात काही काळातं अंतर पडायला लागतं

लग्नाच्या वेळी असणारं प्रेम दोन्ही बाजूंनी एक धुसर रेषा ओलांडून प्रभुत्ववादाकडे कधी जातं ते कळत नाही मग त्यातून प्रेमाचं असलं तरी नातं हे बंधन होवून जातं . . . माझी बायको माझ्या शब्दाबाहेर नाही असा पुरुषी अंहकार जागा झाल्यावर मग Taken For Granted अर्थात गृहित धरण्याचा प्रकार सुरु होतो आणि यातून प्रभुत्ववादाची जाणीव होवून ' घुसमट सुरु होते.

पती आणि पत्नी यांच्यात स्पर्धा नसली तरी व्यक्तीमत्वात असणारा आक्रमकपणा मग वर्चस्वात रुपांतरीत होतो . . . दोघे समसमान असणं शक्य नाही त्यामुळे दोघांपैकी एक Dominate करतं आणि दुसऱ्याची त्यात घुसमट होते . . . अशा वेळी समोरच्या व्यक्तीला ' स्व' आहे त्याचा आदर करणं दूर राहतं मग ' तिची ' गरज जाणवते अगदीच आदर्शवादी न होता समाजात डोळसपणे बघावं मग आपल्याला जाणवेल . . . घरोघरी मातीच्या चुली !
प्रत्येकाला ' पर्सनल स्पेस ' हवी असते ती प्रत्येकाला मिळेलच असं नाही . . . . प्रेमात पडून विवाह झालेल्यांमध्ये वर्चस्वाची लढाई आणि पर्सनल स्पेस ची जाणीव यामुळे आगळा प्रसंग निर्माण होतो . . . यात समंजसपणे एकमेकांना पर्सनल स्पेस देणं.. समोर च्या व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून आदर करणं जिथं जमत नाही तिथं . . .

शादी मरने के बाद , रिश्ता सडने लगता है . . . यातून मग मार्ग घटस्फोटाचा ... !

साधारणपणे प्रेमविवाह केल्यानंतर ' ही पर्सनल स्पेस नाही म्हणून सर्वाधिक घटस्फोट होतात तुलनेत पारंपरिक जुळवणी करुन झालेले विवाह टिकतात असं दिसतं . . . इथं पुरुषी वर्चस्वातून ' पर्सनल स्पेस ' वर अतिक्रमण होतं आणि आयुष्य असंच आहे . .. आपलं नशीब म्हणत स्वत:मधील ' स्व ' ला पार गाडून टाकण्यांच काम भारतीय नारी करते.. म्हणून विवाह संस्था मजबूत आहे असं माझं मत आहे....

ला ईलाज को क्या ईलाज या उक्तीप्रमाणे... त्या पूर्ण कुटुंबाच्या लेखी येणाऱ्या विवाहितेने सप्तपदीच्या वेळी होणाऱ्या होमात आपल्या ' स्व ' ची पर्सनल स्पेसची आहुती दिलेली असते . . . !

व्यक्तीला व्यक्ती म्हणून नाकारणं चुकीचं आहे परंतु आपल्यकडे हा प्रकार सर्रास होतो . . .नातं टिकलं पाहिजे हे ठिक आहे पण त्यासाठी पर्सनल स्पेस' ची आहुती देणं म्हणजे गुलामगिरीच आहे . . !
पण लक्ष कोण देतो... या न्यायानं पर्सनल स्पेस सर्रासपणे नाकारली जाते ही अत्यंत वाईट बाब आहे.

... मै तूम में समा जाऊं

तूम मुझमे समा जाओ

ही समर्पणाची भावना प्रेम करताना सांगायला आणि गायला चांगली असते जगताना मात्र याचा त्रास होतो . . . पुरुषी अहं पायी स्वत:च अस्तिव संपवून बसलेल्या अनेक जणींना समाजात बघतो त्यावेळी राहवत नाही . . . स्त्रिया देखील घर सुटलं तर पुढं काय . . ना नोकरी . . त्यातून झालेल्या अपत्यांची चिंता . . .
अपरिहार्य होवून जातं सार..... त्याच वेळी ज्यांना पर्सनल स्पेस मिळतचं नाही अशांना जगणं विसरुन मरेपर्यंत जिवंत राहणं ... ! जगत राहणं . . . वेदना देखील होतात.

किमान माझ्या आयुष्यात ही पर्सनल स्पेस मी माझ्या घरात प्रत्येकाला देवू शकलो याचं खूप मोठं समाधान वाटत राहते . .

प्रशांत दैठणकर

9823199466

Thursday, 19 July 2018

मेघा रे मेघा रे . . . .



मेघा रे मेघा रे . . . . 
. आज तू प्रेम का संदेस. . .

जितेंद्रच्या सिनेमातलं लहानपणी ऐकलेलं गांण . त्यावेळी कल्पनाच नव्हती हे काय आहे. गाण्याचे बोल कळले नाहीत पण गांण त्यावेळी वाजायचं. . . तबकडयांचा काळ होता तो. . . तबकडया अर्थात ग्रामोफोन त्यावर पैठणगेटच्या आसपास असणाऱ्या हॉटेल्समधून अनेकदा गाण्याचे सूर कानावर पडायचे आणि या तबकडयांमधील गाण्यांसाठी हॉटेंल्स मध्ये गर्दी रहायची .

गाण्यांसाठी
त्याकाळी आणखी एक पर्याय उपलब्ध्‍ होता तो म्हणजे रेडिओचा. . . . अर्थात त्या काळी तो एकच टाइमपास उपलब्ध होता सर्वांसाठी . . . टिव्ही खूप उशिराने आला आणि बघायला मिळाला. . . . शाळेत असताना कानावर पडलेले ते शब्द आपण जगणार आहोत याची जरा देखील कल्पना नव्हती.

त्यानंतर अनेक पावसाळे आले. . . पाहिले . . . जगलो . . .भिजलो. . . धूंद झालो . . प्रवास आजवर सुरुच आहे. पण गेल्या काही काळापासून यात फरक पडलाय. . . जूलै 2009 मध्ये मी विदर्भात आलो आणि आजपर्यंत इथं आहे. . . उद्याचं माहिती नाही. . . आल्या दिवसापासून त्यावेळचा पाऊस आणि आजचा पाऊस . . . तब्बल 9 वर्षे झालीत . . या काळात निसर्गाची अनेक रुंप बघितली . . इथला पाऊस बघितला इथल्या पावसात भिजलो . . काही काळ इथल्या पावसात रमलो . . . पण आठवत राहिला ती माझा तारुण्यातला पाऊस ...!

या विदर्भाचं एक वैशिष्टय आहे ते म्हणजे इथलं सौंदर्य . . .
जगात सर्वात सुंदर युवती कोठे आहेत असं विचारलं तर माझं उत्तर विदर्भ हेच आहे . . . विदर्भ कन्यांचं सौंदर्य खरोखर शब्दातीत असं आहे . . पुराणात देखील याचे दाखले आपणास सापडतात . . . विदर्भाचा राजा नल याची पत्नी दमयंती असो की प्रभू श्री कृष्णाची पत्नी रुक्मीणी या विदर्भातल्याच होत्या . . . !

रोमांच आणि रोमांस . . . हा पावसाचा खास परिणाम असतो . . . अन् इथं एकटेपणात 9 पावसाळे काढताना आठवतात त्या बालपणी कानावर पडलेल्या गाण्यांच्या
ओळी मेघा रे . . . मेघा रे . .

भविष्य . . . वर्तमान आणि भूतकाळ यात मन फिरायला लागतं ही आंदोलनं अधिक गतिमान होतात ती आकाशात मेघांनी गर्दी केल्यावर . .

अक्सर बारिश लाती है प्यार का मौसम . .

और गम की आज दूर है तुम और हम . .

पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा अंगणात पडत असला तरी तो मनाला चिंब करीत असतो.
सौदर्याची परिमाणं प्रत्येकाची वेगळी आहेत. मात्र या सर्वांपलीकडे जाऊन प्रत्येकाला आवडेल असं सौंदर्य म्हणजे सौंदर्याची परिसिमा, असं म्हणता येईल
या परिसिमेपलिकडे असणारं वादातील सौंदर्य या विदर्भात बघायला मिळालं.

पावसात सौंदर्य अधिकच खूलत आणि ते जितंक खुलत तितकं मनाला त्रास देत असतं . . कदाचित कालीदासात आणि माझ्यात हाच एक धागा असेल भावनेचा त्याला नाकारण्यात आलं होतं आणि मला स्विकारण्यात आलं . . इतकाच काय तो फरक परंतु भावनांचं काय . .?

प्रेमाची भावना जितकी अधिक त्याच्या कैक पटीत विरहाची भावना मनाला असते . . . अगदी अपरिहार्य म्हणून विरह सहन करायचा . . . मग कालीदास . . . ते मेघ आणि . . . मेघदूत विरह की सजा . . प्रश्न आणि पाऊस पडताना प्रत्येक सरी सोबत प्रश्न माझ्या अंगणात उतरतो . . .

मनात घर करतो पडणारी प्रत्येक सर . . त्या क्षणांची आठवण़ जागवणारी असते . . . पावसाचा प्रत्येक थेंब . . . भावनांनी चिंब होत जाणारं मन आणि चिंब चिंब होणारा देह . . . तो बाहेरच्या अंगणात बरसत असतो आणि मनाच्या गाभाऱ्यात भावनांचा पूर दाटलेला असतो . . . एखादया गाफील क्षणी मग हो पूर डोळयांची कवाडं लोटून बाहेर पडतो . . . ताल असतो ओठांमधून कोंडून ठेवलेल्या हुंदक्यांचा .

आषाढस्य . . सृष्टी सजली आतापर्यंतच्या पावसाने . . . ग्रीष्मात तापलेली धरणी वर्षा त्रृतूच्या आगमनाने तृप्त होण्याचा हा काळ . . धरतीनं हिरवाई ल्याली . . . त्यात आसपासच्या डोंगरांवर मेघांचे आवरण आणि त्या धरतीच्या हिरवाईवर पहाटभर पसरलेली धुक्याची दुलई . . . ज्या क्षणांना तू माझ्यासवे अन् मी तुझ्या सवे या पाऊस धारांना मोती समजून वेचलं त्या क्षणांची . .
ते क्षण . . . ते दिवस भारलेले . . मंतरलेले . .

- प्रशांत दैठणकर

9823199466

Thursday, 12 July 2018

आत्मभान..... लक्षवेधी....!



' लक्ष्य ' चित्रपटातलं गाणं मला अधून मधून आठवतं आणि विचारात गुंतवून टाकतं.......

मै ऐसा क्यूं हूं ?.... मै ऐसा ही हूं . .!

अंतर्मनात प्रश्न जागा होतो आणि विचारांना गती मिळते . . . कोहम् अर्थात मी नेमका कोण आहे , पासून मी असा का आहे ! . . . अशी प्रश्नांची डबागाडी रेल्वे रुळावरुन बुलेट ट्रेन च्या गतीने धावायला लागते. .. असं प्रत्येकाच्या मनात होत असतं . . . थोडक्यात आपण स्वत:चाच शोध घ्यायला लागतो.

प्रत्येकाला ' स्व ' अधिक आवडतो . . एखादी मुलगी समोरुन येत आहे म्हटल्यावर डोक्यावर हात फिरवून केस बरोबर आहेत ना याची खात्री आपण करतो. . . मुलींच काही वेगळं नाही बरं कुणीतरी आपल्याकडे बघितलच नाही असं घडण्याच्या स्थितीत अनेकजणी विचलीत होतात.

. . आपण बोलत जरी नसलो तरी आपल्या देहबोलीतून संवाद घडत असतो.

डोळे हे जुल्मी गडे

रोखून पाहू नका मजकडे


अर्थात नजर का मिलाना. . हिंदीत याला छान शब्द आहे . .नैन मटक्का . . आता याच नजरेने होणाऱ्या संवादातून . . . मैत्री , प्रेम , खुन्नस , कमी लेखणे आदी बाबी अगदी न बोलता घडतात.

सैराट सिेनमातला फेमस झालेला संवाद याच नजर रोखण्यावर बेतला आहे.

मी बघू की कायबी करु . . . !

आता बोलायचं तर नजरेची भाषा सर्वात चांगली भाषा . . यातून आपल्याला नकळत साद देता येते. अर्थात प्रतिसादही मिळत असतो असाच . . !

कुणी आपल्याकडे लक्ष देत नाही असं जाणवंल तर मनात विचारांचे आंदोलन सुरु होते . . . . एक प्रकारे इथं प्रत्येक जण स्वत:चं मार्केटींग करीत असतो . . .

कोणत्याही क्षेत्रात एखादी व्यक्ती प्रसिध्दी मिळवते त्यामागे खूप कारणं असतात . . . त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्याला संमती देतो . . . वानगीदाखल चित्रपटांचं उदाहरण अगदी जवळचं उदाहरण आहे. प्रत्येक जण मनोरंजनासोबतच त्यातील नायक - नायिकांमध्ये आपलं प्रतिबिबं शोधत असतात . . . ज्याला जितकं जवळ पोहचता येतं रसिकांच्या तो खरा नायक होतो, तो सूपरस्टार होतो.

माझ्यातल्या ' मी ' चं प्रतिबिब जिथं दिसतं त्याला मी आयुष्यभर जवळ करण्याच्या , मनात जपण्याचा प्रयत्न करतो.


आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण स्वत:चा शोध घेणं अधिक महत्वाचं असतं . . . मी नेमका कसा आहे . . . मी असा का आहे या प्रश्नापासून याची सुरुवात होते . . . त्या गाण्यात त्याचं स्विकारणं देखील मांडलय . . . मी हा असा आहे हे मी कबूल करणं आणि त्या ' स्व ' शी प्रामाणिक राहणं यशाच्या मार्गावरील पहिली पायरी समजतो . . . ' मी '

लहान मूल बोलू शकत नाही त्यावेळी त्याला रडता येते . . . लक्ष वेधले जावे यासाठी लहान मूल रडत असते. मी माझा मित्र अश्वीन याच्या घरी माझी कन्या जान्हवीसह गेलो होतो ज्यावेळी ती तीन वर्षांची होती.आम्ही उभयता गप्पा मारत असताना गप्पांमध्ये गुंग झालो होतो . . त्यावेळी ती रडायला लागली . . आमचं लक्ष गेलच नाही गप्पांच्या नादात . . . मग तीच मध्ये येवून जोरात म्हणाली.

माझ्याकडे लक्ष द्या ना . . . मी रडतेय ना . . . !

तिच्या या वाक्यानं सर्व जण हसले नसते तरच नवल . . . तिची ही ' लक्षवेधी ' सर्वांच्याच स्मरणात आयुष्यभर राहील.

इथं प्रत्येक व्यक्ती आपल्या देहबोली तून स्वत:चं जणू मार्केटींग करीत असते . . . आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला काय हवं असतं याबाबत अनेक जण वेगवेगळी उत्तरं देतील . . . संपत्ती , सुख , समाधान . . . माझं मत आहे. प्रत्येकाला प्रसिध्दी हवी असते . . .
कोट्टयवधींची कमाई आहे. पण समाजात आपणास कुणीच ओळखत नाही अशा व्यक्ती विविध प्रकारे स्वत:ला प्रसिध्दी मिळेल याची खबरदारी घेतात.

पोरानं नाव काढलं . तुमच्या . . . असं वाक्य कोणाच्याही माय-बापाला सुखावणांर असवं . . ती एक प्रकारे पावती असते त्यांच्या मेहनतीची . . त्यांच्या संगोपनाची ही पावती त्यांनी आयुष्यभर झेललेल्या कष्टांचा विसर पाडणारी असते . . नवी उभारी देणारी असते . .

- To get Recognized ! हे मिशन प्रत्येकामधील ' स्व ' समोर असतं . . स्वत:शी सतत संवाद साधण्याची प्रक्रिया यासाठीच महत्वाची आहे.

अजय देवगण च्या ' प्यार तो होना ही था ' या चित्रपटात त्याच्या तोंडी एक वाक्य सातत्याने दिलय . .. ' ऐसा ही हूं मै '

मी आत्मसंवादातून माझा शोध घेतो त्यावेळी मला माझी हळू हळू ओळख होते . .
मी कुठे कमी पडतो हे देखील कळायला लागतं तसेच जमेच्या बाजू देखील कळतात . . . याचा पूर्ण उलगडा होणं म्हणजे आत्मभान होय.माझ्या जमेच्या बाजू आणि मर्यादा याचा ताळेबंद मांडून मी आयुष्याची वाटचाल केली तर मला यश लवकर मिळू शकते इतकं सोपं हे गणित आहे.

खूप अभ्यास करणारेच यशस्वी होतात असं काही नाही.... यश मिळवणं हे आपल्या 'स्व' वर अवलंबून आहे. माझ्या यशाचा विचार करताना माझी तुलना मी इतरांशी का करावी.... बहुतेक जण हीच चूक करतात....

माझी तुलना फक्त माझ्याशी आणि माझी स्पर्धा माझ्याशीच आहे. कारण माझ्या सारखं दुसरं कुणी या जगात नाही..... जगातली प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. प्रत्येक व्यक्ती अव्दितीय आहे....प्रत्येकाच्या ठायी हा 'स्व' जागा झाला पाहिजे....म्हणजे माझ्या या जगात येण्याचा अर्थ मला कळेल व त्यानंतर जगण्यातली मजा वाढेल. जगात येण्याचा अर्थ मला कळेल व त्यानंतर जगण्यातली मजा वाढेल.

एक सुरेख व्यंगचित्र बघण्यात आलं,... एक माणूस देवाकडे प्रार्थना करतोय.

God Please Give me Everything to Enjoy My Life.

देवाचं उत्तर खूप मार्मिक आहे.

Idiot I have given you life to Enjoy Everything.

....... आयुष्याचं असंच असते.....

तुझे आहे तूजपाशी .....! हेच आपल्याला उमगलं तर आनंद शोधावा लागत नाही.

संपन्नता ही केवळ पैशांमध्ये असत नाही ती व्यक्ती परत्वे वेगवेगळी असते. छंद, जगण्याची मुल्ये, दृष्टीकोण, शिस्त तसेच अनुभव याबाबतीत संपन्नता असू शकते.
आपण आयुष्याचा या Angle ने कधी विचारच केलेला नाही.

आपली शिक्षण पध्दती केवळ विशिष्ट अशी बुध्दीमत्ता तपासते. हा शिक्षण पध्दतीचा सर्वात मोठा दोष आहे. यात गुणवंत असल्यानं जगणं सोपं होतं असा भ्रम आपण निर्माण करतोय असं माझं मत आहे. व्यक्तीपरत्वे त्याची बुध्दीमत्ता वेगळी असते.

आपल्याला गौतम बुध्दासारखी ज्ञानप्राप्ती होण्याची अपेक्षा नाही. ती उंची आपणास गाठता येणे अशक्य आहे. परंतु आपण 'स्व' जाणला आणि मानला तर यशाचा मार्ग सुकर व्हायला वेळ लागत नाही... किमान माणूस म्हणून चांगलं जगायला आपण शिकतो.

मै ऐसा ही हूं असं म्हणत आपण त्याला जोडून म्हटलं पाहिजे I am Unique…… अगदी आपण ज्या पध्दतीने सांगतो....... हम नही सुधरेंगे.....!
---प्रशांत दैठणकर

9823199466





Tuesday, 10 July 2018

तू ..मी अन् पाऊस...

तो जरा उशिराच आला पण आता मनापासून आला..... मृगापासून त्याची वाट बघितली .नाही म्हणायला त्यानं हजेरी लावली पण दरवेळेस रात्रीच बरसला ... आज मात्र त्यानं कसर भरुन काढली..!

पहाटवाऱ्यात त्याला अंगावर झेलायचं ठरवलं आणि पहाटेच निघालो ... मी आणि माझी हिरो होंडा .. तसा हा सिलसिला खूप जुनाच म्हणायचा .. 1994 मध्ये मी पहिली गाडी घेतली... माझा आवडता रंग अर्थात BLack याने काला ..! आणि टोकाची बाब म्हणून सांगता येईल .. माझी भाची जन्मली .. याच बाईकवरुन मी बहिणीला डिलेव्हरी साठी दवाखान्यात नेलं होतं .. भाचीचं नाव गाडीवर टाकलेल तिचं नाव श्वेता ...म्हणून ती पहिली बाईक चांगली लक्षात राहिली माझ्यासह सर्वांना देखील.

आज बाईकवर जाताना जाणवलं की बॅकसीट आज रिकामं आहे . .
. त्या वेळी पावसात भिजताना तू असायची आज मधू इथं अन् चंद्र तिथं . . . अचानक पाऊस आल्यावर आडोशाला पळणाऱ्या रस्त्यावरील गर्दीची मजा घेत मस्तपैकी पावसात भिजण्यातलं थ्रिल काही औरच . . काय वेड लागंल का या दोघांना . . . अशा प्रतिक्रिया बघत आपण आपली राईड जारी राखायची.... वेडं असतं मन आणि वय तर जास्तच वेडं असतं या वयात ..' पावसात ' त्याच्या सोबत धुंद होणं . . . नशा होती नशा. . .!

. . मग कधी तर पाऊस आला म्हणत मुद्दाम घरातून बाईेकवर राईड घ्यायला निघणं सा-यांच्या सल्ल्यांना धुडकावत घराबाहेर पडायचो .. मग तू मी आणि पाऊस तिघेही सारखाच दंगा करायचो . . सारं सारं आठवत होतं.

निसर्गाचं स्वागत करावं . . निसर्गात रमावं हे वेडच म्हणा . . .
त्या पावसात अनेकदा चिंब चिंब भिजून आलोत दोघे . . पण कधी ही पावसामुळे सर्दी झाली नाही. की या भिजण्याने आजारपण आलं नाही. . अगदी चिबं भिजल्यानं कुडकुड थंडी वाजेपर्यंत ते भरकणं
. . . Nature Cares . . . Nature Cures असं काहीसं नातं निसर्गाशी . . . बदलत्या त्रतू नुसार समरस झाल्यावरच निसर्गाचा आणि जीवनाचा खरा आनंद मिळतो . . .!

जशी तुझा साथ तशीच ती नंतर मुलं झाल्यावर मुलांचीही गट्टी जमवली आपण या पावसाची..पाऊस आल्यावर मुलांना चला भिजायला... म्हणत भिजायला घेऊन जाण्यात देखील आगळा आनंद आहे . . ज्यावेळी भिजू नका रे सर्दी होईल . . .
आजारी पडाल अशा शब्दात मुलांना धाकानं घरी ठेवणारे अनेकदा बघितले . . तो भिजण्याचा आनंद त्या पिलांच्या आयुष्यात का नसावा . .! पालक इतके कसे अरसिक असावेत... इतकं काय जपायचं सर्वांना. कदाचित त्यांनी त्यांच्या तारूण्यात असा आनंद घेतलेला नसावा असं वाटून जायचं त्यावेळी.

काल रात्रीला तो आला जणू काही तो रात्रीचा पाहुणा मुक्कामाला आलेला .. रात्री पाऊस आल्यावर माझी आई म्हणायची आला हा रात्रीचा पाहुणा आता सकाळपर्यंत पाऊस राहणार .. अगदी खरंच आहे ते याची प्रचिती आयुष्यात वारंवार येते . . . इथं बंगला जुन्या पध्दतीचा असल्यानं त्यावर पत्रे टाकलेले आहेत . . पाऊस थेंबाचा कमी अधिक होत जाणारा तालबध्द ऑर्केस्ट्रा सुरु होता रात्रभर .
. . सिमेंटचा स्लॅब मजबूत असल्यानं पावसाचा आवाजच जाणवत नाही आपल्या शहरी घरांमध्ये . . कृत्रिम पणा आणून आपण जणू सूर , ताल यांना अटकाव केलाय अशी घरं बांधून . . .!

. . . कॉलेज मधले तुझ्या सोबतचे दिवस . . . तेव्हाही घर असं पत्र्याचच होतं . . पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा नाद कानावर असायचा . . खिडकीतून दिसणाऱ्या त्या पत्र्यांच्या नाल्यांमधून पत्रावर पडलेल्या पाऊसधारा.... पुन्हा नव्याने मोठया होत जमिनीकडे धाव घेताना मध्येच त्याला हातावर झेलून एका हातात गरम वाफाळता चहाचा कप ठेवणं . . . कधी त्याच्या जोडीला मस्त खमंग कांद्याची भजी.. आहाहा जन्नतच ना...अजून विसरलंच नाही . . . अन् विसरणार देखील नाही.
अंगण हवं . . त्यात पावसाचं तळं साचावं . . . त्यातला तो कागदी होडयांचा खेळ . . . एखाद्या ओहोळासोबत होडी गती घ्यायची . . . मग भिजून काही अंतरावर तिला जलसमाधी . . . पुन्हा एक नवी होडी . .! अंगणं संपली आता त्यांची जागा लाद्याभरल्या कुंपणांनी घेतली आताही तळं साचतं पण ते कधी कधी शहरभर दिसतं . . . कागदी होडयांच्या जागी तुंबलेल्या त्या पाण्यात थांबलेल्या हळू हळू रांगणा-या गाडयांच्या लांबच लांब अशा रांगा दिसतात.

तुझ्या सोबत झेललेला पावसाच्या प्रत्येक थेंब अजूनही जपलाय . . मनात . आता पावसाचे हे मोती बरसायला लागल्यावर पहिले तुझीच आठवण येते . . . इथं विदर्भात चिंब भिजून आठवणीत पाऊस एकटयानं झेलला म्हणून तर कालीदासानं मेघांना आपलं दूत बनवलं होतं ना . . .!

काळ बदलला . . . आता त्या ढगांची जागा तंत्रज्ञानाच्या क्लाऊड रुपी ढगांनी घेतलीय . . . इथं पडणाऱ्या पावसाचा व्हिडिओ क्लाऊडवरुन तुला नक्कीच पाठवता येतो पण मोबाईलच्या स्क्रीनवर तो बघताना .
आणि मोबाईल टिव्हीला जोडून मोठ्या पडद्यावरही शक्य आहे बघणं ... पण खऱ्या पावसाचा फिल मात्र येत नाही . .!


मग असं चिंब चिंब भिजूनही तू नसल्यानं मन मात्र कोरडंच राहतं . . . आगळा असा रितेपणा जाणवयला लागतो . . . मग सुरु होतो तो आठवणींचा पाऊस . . . त्याचा शेवट कधी कधी डोळयातल्या पावसानं होतो . . . अगदी अनावर होतं त्यावेळी मी झटकन पावसात धाव घेतो.

मला चार्ली चं वाक्य अंतर्मनात सांगत असतं

I always Like waking in the rain , So no one Can see me crying .

मग मी देखील पावसात चालायला लागतो








Saturday, 7 July 2018

5.81 लाख कोटी रुपयांचा .. फेसबूकचा झुकरबर्ग

जनसामान्यांना मिळालेलं ते डिजीटल स्वरुपातलं व्यासपीठ आहे, हो व्यासपीठच आहे. प्रत्येक व्यक्तीचं स्वत:चं असं एक विश्व असतं आणि ती व्यक्ती त्या विश्वाच्या केंद्रस्थानी असतं. व्यक्तीच्या अंतरंगात सतत विचार सुरु असतात, कुणाच्या अंगी काही उपजत गुण असतात आणि प्रत्येकाला ते व्यक्त करण्याची संधी हवी असतं. अशी संधी अगदी अपघातानं गवसलेल्या मार्क झुकरबर्ग ने फेसबूक दिलं..... लोकांना लिहितं केलं तो मार्क याच फेसबुकच्या बळावर वॉरन बफे ला मागे टाकत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत बनलाय.
प्रत्येकातला लेखक जागवणं फेसबूकनं केलं आणि त्या माध्यमातून कोट्ट्यवधी लोकांनी आपलं आयुष्य काही प्रमाणात सार्वजनिक करायला सुरुवात केली. हे सारं घडतय जागतिक लेखन दिनाच्या पुर्वसंध्येस.

हो 8 जुलै हा जागतिक लेखन दिवस. या दिवसानिमित्त मी 2011 साली अर्थात 7 वर्षापुर्वी लेख लिहिला, ब्लॉग लिहिला होता. त्याची आठवण जागी करत पुन्हा लिहायला घेतलय.....त्या ब्लॉगमध्ये मी फक्त लेखनाचा इतिहास मांडायचा प्रयत्न केला आता याचं वर्तमान आणि जमलं तर भविष्याचा वेध घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.

फेसबूक शिवाय दिवस जात नाही अशा नव्या पिढीचा हा काळ आहे.
फेसबुकच्या वापरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. (चला खेळात नाही तर इथं नाव कमावलंय) ..... भारतात आजच्या उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार 27 कोटी लोक फेसबुक वापरत आहेत. दुसऱ्या स्थानी याचं जन्मस्थान अर्थात अमेरिका असून 24 कोटी अमेरिकन फसबूक वापरतात. (त्यातले पुन्हा तिथं वसलेले भारतीय किती ? )...... तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया 14 कोटी आणि त्यानंतर 13 कोटी ब्राझील अशी क्रमवारी आहे.

जगभरात एकूण लोकसंख्येपैकी 219 कोटी लोक फेसबूक वापरतात. फेसबूक जन्माला आलं ते 4 फेब्रुवारी 2004 रोजी. झुकरबर्गने हे केवळ विद्यापीठांतर्गत वापरासाठी बनवलेलं नेटवर्क होतं. हार्वड विद्यापीठांतर्गत याला मिळालेला प्रतिसाद पाहून अमेरिकेच्या इतर विद्यापीठात ते वापरता येईल अशी व्यवस्था 2006 मध्ये केले.

जशी याची लोकप्रियता वाढीला लागली तसा त्याचा विस्तार जगात क्रमाक्रमाने वाढत गेला. 2012 साली फेसबुकनं 100 कोटींचा टप्पा गाठला...... एव्हाना त्याला विकसित रुप प्रदान झालं होतं. आणि ते उत्पन्नाचे साधनही बनलं होत.
या सुमारास इतर भाष्यांचा समावेश तंत्रज्ञानाने शक्य केला. त्यानंतर फेसबुकची कोटी च्या कोटी उड्डाने सुरु आहेत. आज फेसबूक जगातील 140 भाषांमध्ये वापरलं जात आहे. याबाबत मायक्रोसॉफ्टशी हातमिळवणी फेसबुकच्या पथ्यावर पडली.

गेल्या 14 वर्षात विस्तार करताना फेसबूकने मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसॲप सारखी सोशल माध्यमे त्यासोबत आपल्या कंपनीत जोडली.

स्मार्ट फोन आणि 4 जीचा प्रसार झाल्यानंतर याची वाढ अधिक झपाटयानं झाली. सर्वाधिक उल्लेखनीय बाब म्हणजे फेसबुकच्या भारतातील वापर कर्त्यांपैकी आघाडीवर असणारे राज्य....
अर्थातच महाराष्ट्र राज्य आहे. (माझा मराठीचा टक्का 'बरकरार' आहे )...... महाराष्ट्रात अडीच कोटींहून अधिक फेसबूक वापरणारे आहेत.

आजच्या पिढीत याची सर्वाधिक क्रेझ दिसून येते. भारतात साधारण 85 टक्के वापरकर्ते हे 13 ते 35 या वयोगटातले आहेत.

माझ्या दृष्टीने आकडेवारी महत्वाची नाही फारशी. महत्वाचं आहे ते लिहिणं,

समर्थ रामदास स्वामी सांगून गेले आहेत.

दिसामाजी काहीतरी लिहित जावे......

आता या लिखाणाला सुरुवातीला काही धरबंध नव्हता आणि त्यामुळे अनेकदा मारामारी, दंगल असे प्रकार भारतात घडलेले आहे. पण आता फेसबुकने यावर काही निर्बंध आणले आहेत.... काय नाकारायचं आणि काय स्विकारायचं याचा अधिकार अबाधित ठेवत त्याची अंमलबजावणी करीत आहे.

दुसऱ्या बाजूला लिहिणारे देखील लवकर प्रगल्भ होत आहेत असंही चित्र आहे. त्यात मैत्री नाकारणे किंवा एखाद्याला प्रतिबंध करणे अशा सुविधांनी आता फेसबूक देखील ' सेफ ' बनत आहे. दिवसागणिक यात नवनविन बदल येत आहेत.

' मला स्वप्न देखील मराठीत पडतात ' असं नाना पाटेकरचं वाक्य मला आवडतं.....आपल्या भावना व्यक्त करायला मातृभाषेत कधीच मर्यादा येत नाहीत. आणि त्यामुळे अनेक नवे लेखक, कवी समोर येत आहेत.

साहित्य ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे.
त्यांना पटलं तरच तुमचं लिखाण प्रसिध्द होईल असा काळ फेसबूकनं इतिहासजमा करुन मराठी साहित्यासाठीही मोठा इतिहास घडवलाय असं मला वाटतं. या फेसबुकवर कला-क्रीडा-साहित्य मनोरंजन यांचा रतिब आपणास बघायला मिळतो याला मी अभिव्यक्तीची ' त्सुनामी ' असं म्हणतो.

नाण्याच्या दोन बाजू त्यामुळे फेसबुकचा वापर करुन गुन्हे घडवणारेही इथं आहेत..... चोर हो.... भागोगे तो पकड लुंगा म्हणत अशांना पकडण्यास महाराष्ट्रात सायबर  सज्ज आहे. पण आपणही व्यक्तीगत सुरक्षा कुंपण घातलं पाहिजे म्हणजे फसवले जाण्याची शक्यता उरत नाही.

फेसबुकच्या रुपाने वाड:मय चोर देखील सरसावले आहेत. त्यामुळे लिखाण करणाऱ्यांना जरा चिंता आहे... पण यामुळे लिखाण थांबलं नाही पाहिजे.

फेसबुकनं काय दिलं हे बघताना मार्क झुकरबर्गला 14 वर्षांच्या त्याच्या तपस्येचं फळ काय मिळालं तर ती त्याची न मोजता येईल इतकी संपत्ती आहे.
शुक्रवारी 6 जून रोजी फेसबुकचा शेअर 203.23 अमेरिकन डॉलर प्रति शेअर थांबला (भारतीय चलन 13975.11 रुपये ) फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्ग यांच्या मालकीचे अर्थात स्वत: नावे शेअर्स आहेत. तब्बल 41 कोटी 61 लाख 45 हजार 32.....! (सारं कोर्टीतच ना.....!)

मार्कनं बर्कशायर हॅथवे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफेला मागे टाकलं. आज मार्कच्या संपत्तीचं मुल्य आहे 81.6 बिलीयन डॉलर्स अर्थात 5.81 लाख कोटी रुपये आता हे लाख..कोटी म्हणजे किती शुन्य..... सहज पडलेला प्रश्न.... कारण भारतानं जगाला 'शुन्य ' दिलय ना...!

बॉरन बर्फ पेक्षा मार्कची संपत्ती 2,565 कोटींनी अधिक झाली आहे. अर्थात वॉरन बफें जितका उत्तम गुंतवणूकदार आहे तितकाच तो दानशूर ही आहे. त्याने तीन महिन्यापुर्वी 290 दशलक्ष डॉलर दान म्हणून दिल्यानं बफेची संपत्ती काहीशी घटली आहे. आता ही दानाची रक्कम भारतीय चलनात केवळ 3.44 लाख कोटी फक्त इतकी आहे. हे सांगायलाच पाहिजे
(.... आम्हाला दानवीर म्हणून कर्ण एकटाच माहिती....! आणि आम्ही रक्तदान करतो तेंव्हा स्वत:ला कर्णापेक्षाही श्रेष्ठ समजायला लागते ते वेगळं)

आम्ही लेखक.... सारस्वत हो.... सरस्वती आणि लक्ष्मीचं जमलय काय कधी... जिथं सरस्वती बसते तेथे लक्ष्मीचा निवास नसतो..... हे म्हणजे लेखक मानधनात अन मानपानात खूश आणि प्रकाशक अन वितरक विमानात खूश असं काहिसं गणित.

असू देत... आपण लिहितोय.... व्यक्त होतोय याचं समाधान तो लाखो कोटी रुपयांपेक्षा अधिक मानतो आम्ही..... एक लाईक म्हणजे एक मिलियन आणि 10 कॉमेंट म्हणजे एक बिलीयनचा आनंद देतो......

त्यामुळे .... लिखते रहो....!

- प्रशांत दैठणकर

9823199466



Thursday, 5 July 2018

' जिओ मेगा टू गिगा' चा ...जोरका धक्का....!

व्यवसाय करताना यश मिळवण्याचे जे मार्ग असतात त्यातील एक महत्वाचा असतो तो Surprise Factor ज्याला आपण सोप्या मराठीत ' धक्का तंत्र ' असे म्हणजे असाच एक धक्का रिलायन्स जिओ ने आज ' मेगा ते गिगा ' च्या रुपाने दिला. यामुळे येणाऱ्या काळात किती कंपन्यांना आपला गाशा गुंडाळावा लागेल किती कंपन्या कर्जात बुडतील याचा ढोबळ हिशेब आतापासूनच लावंणं सुरु आहे.

तांत्रिक प्रगतीचा वेग आता इतका प्रचंड झाला आहे की, आपण आता विज्ञानकथा प्रत्यक्षात जगत आहोत असं वाटेल. मी फेसबूकवर एक कमेंट लिहिली होती जी कुणालाही दखल घ्यावी वाटली नाही म्हणून ती डिलीट केली .. .. जानेवारी 2019 मध्ये 5-जी सेवा भारतात येईल...
अशी ती कमेंट होती.

जपान आणि अमेरिकेत तंत्रज्ञान जुनं झाल्यावर ते आपल्याकडे येईल अशी आपल्याला सवयच लागली होती ना. तसं घडलेलं असल्याने उदासीनता कळू शकते पण आता डिजीटल तंत्रज्ञानाच्या युगात काहीही शक्य झालय याची प्रचिती ' जिओ ' च्या रुपात सर्व भारतीयांना येत आहे.

थोडी पुनरुक्ती होते पण लिहितो रेडिओचा शोध लागल्यानंतर जगभरात रेडिओचे पहिले दहा कोटी श्रोते होण्यासाठी 35 वर्षांचा कालावधी लागला. टेलिव्हीजनचा शोध लागला त्यानंतर दहा कोटी दर्शकांचा आकडा गाठायला या माध्यमालाही 25 वर्षे वाट बघावी लागली. मात्र 4- जी सेवा सुरु केल्यावर दहा  कोटी ग्राहकांना
 गाठायला 'जिओ' ला केवळ 167 दिवस लागले. सध्या पंचवीस  कोटी ग्राहक त्यांनी मिळविलेले  आहेत.

आपल्या हातात गतिमान असं संदेशवहन करणारी यंत्रणा आहे यानं नवी पिढी आनंदीत आहे. देशाचा विचार करताना ही आपली देशासाठीही अभिमानाचीच बाब ठरावी अशी ही संपर्कक्रांती आहे. आपण तंत्रज्ञानात अग्रेसर आहोत हे देशाने यापूर्वीच मंगळ ग्रहाच्या मोहिमेत दाखवून दिलेले आहे. यात गतिमान विकास सर्वच क्षेत्रात बघायला मिळत आहे.

जिओ फायबर हे एकाच वेळी 1100 शहरात सुरु होईल.
सध्या लॅन्डलाईन वर 2 मेगाबाईट ते 100 मेगाबाईट प्रतीसेकंद सेवा देणाऱ्या काही कंपन्या अस्तित्वात आहेत मात्र जिओ फायबरचे डाऊनलोड 1 गीगा बाईट प्रती सेकंद आणि अपलोड 100 मेगाबाईट प्रती सेकंद राहणार आहे.

जिओ फायबर सेवेमुळे पुन्हा घरात फोन दिसायला लागेल पण हा नव्या युगाचा फोन असणार आहे. या एकाच फोनला 'जिओ' राऊटर जोडून तुम्ही घरात त्याच गतीने वाय-फाय सेवा तसेच व्हिडिओ कॉलिंग आदी सोबतच इंटरनेट टिव्हीसेवा ज्यात अमेझॉन, नेटफ्लीक्स सारख्या सेवा घेऊ शकता.

याच जिओ फायबरच्या मदतीने आपल्या टिव्हीला जिओ सेट टॉप बॉक्स जोडून आपण 600 हून अधिक हाय डेफिनेशन अर्थात एच.डी. चॅनेल्ससह इतर चॅनेल्स टी. व्ही. वर बघता येतील. जिओच्या आजच्या घोषणेनंतर अनेक कंपन्यांना आता स्पर्धेत उतरणे किंवा अस्तित्व यापैकी एका लढाईची निवड करावी लागणार हे स्पष्टच आहे. कारण याची नोंदणी झाल्यानंतर एकाच वेळी 1100 शहरांमध्ये एकदम 10 लाख जोडण्यांचा मानस जिओ ने व्यक्त केलेला आहे.

मोबाईल तंत्रज्ञान आल्यानंतर बी.पी.एल. ही एक कंपनी आरंभी होती आणि रिलायन्स देखील पण ते अनील अंबानीच्या कंपनीचे बी.पी.एल. खऱ्या अर्थाने बीपीएल ठरल्यावर प्रथम हचसंन आणि नंतर व्होडाफोन
असा विलय सुरु झाला.

बिर्ला उद्योग समुहासारख्या बडया समुहाने आपली 'आयडीया' लढवली तर मित्तलांनी एअर टेल आणली जिओच्या आगमनानंतर ' आयडीया ' संपून आता व्होडाफोन मध्ये जात आहे. अनिल अंबानीची रिलायन्स बुडल्यावर ती पुर्ण पणे जिओ अर्थात मुकेश अंबानी व पुढची पिढी आकाश अंबानींच्या ताब्यात जात आहे.

दरम्यान देशात सर्वत्र उपस्थित असलेल्या भारत संचार निगम या शासकीय कंपनीला मात्र चांगली गळती लागली. प्रथम घोटाळे नंतर निर्बंध व आता निवृत्तांची वाढती संख्या यातून बीएसएनएल स्पर्धेत असली तरी केरळ व्यतिरिक्त बाहेर अद्याप 4-जी सुरु करु शकलेली नाही. या भारत संचारला जिओचा हा भारत इंडिया जोडो म्हणजे आखरी धक्का नसला तरी स्पर्धा खूपच तीव्र होणार याचा संकेत आहे.

या जिओची ही धक्कातंत्र निती केबल चालक आणि डिश टिव्ही, एअरटेलच काय पण टाटा स्काय सारख्या बडया दिग्गजांना स्पर्धेत खेचणारी ठरणार आहे
आणि त्यांची परिक्षा पाहणारीच आहे. यात फायदा अर्थातच ग्राहकांना होईल हे नक्की.

दरम्यानचा काळ मोबाईल बूमचा काळ होता. त्यात आलेल्या छोटया-छोटया श्याम टेलिकॉम, युनिनॉर, एअरसेल अशा पावसाळी छत्र्या जणू वाहूनच गेल्या. आता जिओची टक्कर टाटा स्काय आणि हॅथवे सारख्या कंपन्यांशी आहे. त्यात जिओच सरस ठरण्याची आरंभिक चिन्ह आहेत.

नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला. असं करणारा तो पहिला मानव ठरला. त्यावेळी जे तंत्रज्ञान आणि दोन दोन खोल्या व्यापणारे संगणक वापरले गेले.
त्या संगणकापेक्षा अधिक क्षमता असणारे मोबाईल फोन सध्या ॲपल, सॅमसंग, वन प्लस सारख्या कंपन्यानी बाजारात 500 ते 1000 डॉलरमध्ये उपलब्ध करुन दिले आहे. आणि त्या मोबाईलच्या क्षमतेत दिवसेंदिवस वाढ होताना आपणास दिसते.

माझ्या मामाचं पत्र हरवलं....... म्हणत निरागसपणे अंगणात खेळणारी पिढी आज चाळीशी पार करुन सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. इतक्या मोठया प्रमाणात तंत्रज्ञानातील बदल कधी कधी गोंधळून टाकत असले तरी असे बदल अनुभवणारी ही एकमेव पिढी आहे.........आज तंत्राची गती बघताना जरा भविष्याचा वेध घ्यायचा म्हटलं तर जाणवतं की, येणारा काळ आणखी मोठे बदल घडविणारा आहे. आय टी... आय टी अर्थात माहिती तंत्रज्ञानात आज जे अभियंते कार्यरत आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

इंटरनेट, कृत्रिम बुध्दीमता अर्थात आर्टीफिशिअल इन्टलिजन्स, तसेच
डाटा सायन्स अर्थात इन्डस्ट्री 4.2 तसेच रोबॉटिक्स, मशीन, डिजिटल मार्केटींगकडे ही वाटचाल जाते. मुलांनी करिअर मेडिकल करावं की, इन्जिनिअरिंग यात वेळ घालणाऱ्या पालकांनी वेळेत याकडे लक्ष दिलं पाहिजे.

बाजारपेठ बदलत आहे. ई-कॉमर्स वाढलय, कम्पूटर गेमिंग आता मोठया इंडस्ट्रीत रुपांतरीत झालयं त्याला दिवसेंदिवस गती येते आहे. तसं तत्रज्ञान समोर येतय. विना वाहन चालक कार आज प्रायोगिक स्वरुपात असल्या तरी लवकरच त्या अनेकांचा रोजगार संपवतील अशी स्थिती आहे.

डार्विनने सर्वोत्तम तेच टिकेल असा सिध्दांत मांडला पण तो प्राणीमात्रांच्या उत्क्रांतीसाठी होता. यात सर्वोत्तम ठरलेल्या मानवानं आता खूप उंची गाठली आहे. मानवाने तयार केलेल्या मशीन आता बुध्दीमान होत आहेत..... या उत्क्रांतीचा सिध्दांत आजवर मांडला गेलेला नाही. भविष्याच्या उदरात आणखी काय दडलय याची कल्पना नाही. मेगा ते गिगा मजल गाठणारं तंत्रज्ञान आणणाऱ्या जिओने धक्का दिला तो यावर विचार करण्यासाठीच दिला असंच म्हणावं लागेल . उद्योगाच्या जगात ' जिओ और जिने दो ' असा न्याय असत नाही. काळाची पावलं न ओळखलेल्यांच्या पाऊलखुणा देखील कधीकधी सापडत नाहीत.

माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार न म्हणता विस्फोट असं जे म्हटलं जातं ते यामुळेच .... पुढे काय ची उत्सुकता लागणं वेगळ आणि त्यासाठी तयार असणं वेगळं.
जिओ च्या या नव्या प्रवासाला सर्वच जण प्रतिसाद देणार हे देखील नक्की आहे. कारण प्रत्येकाला वेगाचं वेड आहे. कदाचित वेग यायला आताच सुरुवात झालीय... Pandora's Box खुला नही है अभी......

…पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त......

- प्रशांत दैठणकर

9823199466