Wednesday 10 May 2017

तु.......नसताना.......!

मनाची अलगद तरल होणारी स्थिती आताशा फारशी जाणवत नाही याला अपरिहार्यता देखील म्हणता येणार नाही. परंतु वेदना होत असतानाही चालत राहावं लागणं याचा कडेलोट कुठे-कधी अन् कसा होईल हे सांगता येतच नाही. उंच उंच झेप घ्यावी, स्वच्छंदी होवून विहरावं कुणाला वाटत नाही. अशा वयात मनाची अवस्था देखील त्याच पध्दतीची असते. मात्र कधी वेळ नसतो....... कधी तू नसते.

तुझं नसणं हे तुझ्या असण्यात कळत नाही कारण नजर हसण्यावरुन कधी हटत नाही मात्र असण्यातलं सुख विरळंच म्हणावं लागतं....... मी स्वच्छंदीच राहिलो. तू मात्र प्रतिदिन वास्तवात चालत राहतेस म्हणूनच कदाचित तूझं असणं हा एक आधार असतो.

आकाशात वाऱ्याच्या झोक्यासह उंच भरारी घेणाऱ्या त्या पतंगाला देखील असाच आधार लागतो. तसा धागा तुझ्या माझ्यातला माझ्या मनात आणि एक टाके तुझ्या मनात. मधला धागा मात्र दिसत नाही जगाला..... पण विस्तीर्ण गगनभरारी घेताना देखील असाच खंबीर आधार असणं हेच आयुष्याचं खरं गाणं..... तो आधार म्हणजे तुझं असणं सखे.....!

पहाटवाऱ्यात अंगणात रिमझिम धारात नितळ सौंदर्यानं भिजणारी प्राजक्तफूलं तुझ्या आठवणी जाग्या करत दिवसाला आरंभ करुन देतात. आणि मग दिवसभर तो केसरी रंगासह खुललेल्या पांढुरक्या पारिजातकाच्या सोबतच मन देखील आठवणीत भिजत रहातं. आणि पार चिंबचिंब करुन टाकतात मला. तुझ्या आठवणी तू जवळ नसताना.......!

ग्रिष्माला आस लावणं पावसाची तसा तुझा चातक होवून पावसाची वाट बघत उन्हाच्या झळांमधून चालतो. त्याही वेळा आजूबाजूच्या स्थितीचं भान विसरुन त्याची धाव त्या तृषार्थ धरतीवर पडणाऱ्या वळवाच्या दिशेने अन् त्यानंतरच्या येणाऱ्या मृदगंधाच्या गंधाने सतत भारलेली स्थिती.... स्वच्छंदीपणा आणि वास्तव ..... असच पुढे चालायला लागतं.

खुपशा वेदना सहन करुनही आभाळ बरसत नाही तेंव्हा त्याची कमतरता न भासू देणारा आसवांचा पाऊस....... नाही बघितलास हेच चांगलं...... आधार मानणाऱ्याला आधाराच्या शोधात अंधारात एकाकी असं बसलेलं बघून तुझ्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या वेदनांचे अन् न रडता आतच कोंडून राहणाऱ्या मनातल्या त्या हुंदक्यांचे आवाज मला अजून मिट्ट काळोखात नेतील याची अनामिक भिती माझ्या मनात भरुन राहते...... अशा वेळी तुझं नसणं हे देखील एक सुखच म्हणावं.....!

मिटल्या डोळयांनी स्वप्न नक्कीच दिसतात पण जागल्या डोळयांसमोर असणाऱ्या वास्तवातल्याही स्वप्नांची काळजी.... कदाचित त्या जागल्या स्वप्नांचा विसर पडू नये म्हणून जागलेल्या नि जागवलेल्या कित्येक रिकाम्या रात्री......एकाकीपणा खोलीभरुनही शिल्लक राहतो. अशाही एकटेपणी तुझं नसणं.....!

असण्याचं तुझ्या वेड मनाला अन्ं तू नसण्याची झालेली सवय.... सवयीनं सारं वाढत राहिलं.....मन मात्र वेडं मागे राहिलं. कदाचित तू खूप पुढे निघालीस.....
मी मात्र न थकता चालतो तूला गाठण्यासाठी.

मग.... लगबग......मनाची तगमग......तुझ्या असण्यात तुला जितकं बघु शकलो नाही त्याही पेक्षा खूप अधिक तुझ्या नसण्यात जगलो...... भिंतीशी बोलत त्यांच्याच समोर भावनांचा हंडा रिता केल्यावर वाहत जाणाऱ्या भावनांची ती खळखळ....... तो ओसंड डोळयातून अलगद पापण्यांचे बांध सोडून निघालेला.

खुप अडल्या पाण्याला असहय झाल्यावर सारे अडथळे मोडून पर्वतावरुन धाव घेणारा पाण्याचा कल्लोळ....... इथं चिमुकल्या तृणांचीही मग माती होते.......पुन्हा नव्याने रुजण्यासाठी......

रुदन देई धरणीचं नवं सृजन म्हणत पुन्हा निशब्द होवून...... आठवणींची गाठोडी वळचणीला टाकत..... ताजं तवानं होवून जगण्यासाठी शोधायचा. मुखवटा चाचपडतच त्या अंधारात तू नसताना......!

सवयीचा तो मुखवटा......त्याचीच असण्याची गरज...... माझ्यातला मी लपवण्यासाठी तू नसतांना.....!



- प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466