Monday 16 January 2023

बहती हवा सा था वो.. !



कधी कधी आपणास आयुष्यात Deadlock स्थितीचा सामना करावा लागता अर्थात भावनांचा सागर मनात घेऊन चालताना अशी स्थिती सहाजिक असते. आपल्या मनाप्रमाणे सर्व घडावं असं वाटणं हे एक स्वप्न आणि ते कधीच न घडणं म्हणजे वास्तव. याला वास्तव न म्हणता मी जग त्याला स्वप्नांपलीकडे असं म्हणतो म्हणजे नकारात्मकता दूर ठेवता येते... 

स्वप्नांपलिकडलं जगताना लक्षात एकच ठेवायचं की वेदना सर्वांनाच असतात... कुणी दाखवतं.. बहुतेक सारे लपवतात.. सामाजिकतेची झूल पांघरुण आणि समाधानाचा मुखवटा घालून ही मंडळी कदाचित कृत्रिमपणे जगाकडे आणि आयुष्याकडे बघत असावीत...

गणितं भावनांची, आशा, अपेक्षा, निराशा आणि बरच काही असतात पण इथं गणितं मांडली जातात ती पैशांची.. पैशांवरुन पत जोखणं आणि त्याच आधारे गोतावळा जवळ करण्याची स्पर्धा उघडपणे सुरु असते. यात आपली स्थिती किती उत्तम हे दाखवण्याचा आटापीटा आणि सुखाची तोरण डोळयांच्या पापण्यांना लावून चेहऱ्यावर बेगडी हास्य मिरवण्यांची इथं गणना अशक्यच...

गणना शक्य आहे ती प्रामाणिक भावनांचे प्रतिबिंब चेहऱ्यावर ठेवणाऱ्यांची ... बालपण सरतं तसं मनातलं बालक अर्थात निरागसपणा जाऊन जगण्याला एक निगरगट्टपणा आणि शरिराला निब्बरपणा येतो अशा जगात भावनांचे प्रदर्शन हा विनोदाचा ठरत असता तरी ती जगण्याची शैली हा खरेपणा आहे... असं जगणं सहज सोपं असतं काल काय खोट बोललो याची आठवण ठेवावी लागत नसल्याने जगणं आणखी सुसह्य होतं... यासाठी मनातलं बालपण जपायचं... ती खरी साधी राहणी मग जग हसत हसेल तर हसू देत ना...

मारणाऱ्या हातांना अडवता येतं पण बोलणाऱ्या तोंडाना रोखता येत नाही आणि इथं गॉसिपींग करणाऱ्यांचे बहूमत आहे म्हणूनच आपलं वेगळेपण हे आपल्या मोकळेपणात आणि मोकळया मनात आहे...

आलं तसं जगणं ही वृत्ती जपणाऱ्या गर्दीत हवं तसं जगणारे किती जण आहेत याचं उत्तर प्रत्येकानं आरशात बघून देण्याचा प्रयत्न करावा.

बहती हवा सा था वो.... उडती पतंग सा था वो

कहां गया उसे..

असं जगानं म्हटलं पाहिजे असा हट्ट नाही पण तसं जगणाऱ्याला नाव ठेवत असले तरी त्याचं जगणं, असणं विसरता येत नाही किंबहुना अशा जगणाऱ्या व्यक्तीबाबत नकळत आसुया निर्माण करुन घेणारे असतात.

मला आठवणीत ठेवा असा आग्रह यासाठीच नाही की मला पूर्णपणे माहिती आहे. तुम्ही मला विसरु शकणार नाही.. आजवर अनुभवानं जाणलय की कारण शोधून अंतरं राखणारे देखील अहेतूक आणि सहेतूक शोध घेत असतात.. कृत्रिमपणा टिकत नाही आणि वास्तविकता संपत नाही हेच खरं आहे.

मुळात हे माझं असेल तर त्याला मी माझ्या व्याख्येत बसवलं पाहिजे.. इतरांच्या व्याख्येत बसवताना इतरांना आनंद वाटत असेल तर तो त्यांना लखलाभ म्हणून आपण निरपेक्ष वृत्तीनं स्वत:कडे बघणं म्हणजे आयुष्य. आपण अशा पध्दतीनं जगणं म्हणजे स्वार्थ असं कुणी म्हटल तरी चालेल कारण संतवचन आयुष्य सांगताना आधी स्वार्थ आणि नंतर परमार्थ असाच संदेश देतात.

संध्याकाळी किंचित मळभ दाटल्यावर गेल्या दिवसाचा विचार अनाहूतपणे मनात येतो... गेला दिवस मी काय केलं... इथं आल्यादिवस जगण्याचा आनदं न घेतात न बघितलेल्या आणि खात्री नसलेल्या येणाऱ्या दिवसाची चिंता करण्यात अर्थ नाही आणि ते जगणं देखील नाही

मनोभूमिका ... मन असतं कुठे शरिरात ... हा सारा मेंदुतील केमिकल लोच्या च ना... उद्याच्या वर्तमानात आपणास जगताना भावी स्वप्नं नसली तरी चालतील पण खंबीर अशी जिवंत जगलेल्या भूतकाळाची आठवण आणि त्या साठवणीची शिदोरी आवश्यक आहे

अर्थात 

दिवानों की यें बातें ..    दिवानें जानते है...

प्रशांत दैठणकर

#dpacific

Wednesday 11 January 2023

कट्टा आणि गँग हमारी एसबीवाली !



            कॉलेजच्या दिवसांची मजा खरच न्यारी असते. ख-या अर्थानं मंतरलेले असे ते दिवस. मक्या-मंग्या, सुन्या, अष्ट्या जितू, सम्या अशी एकामेकांना बोलवायची प्रथा कॉलेजात दुसरा ग्रुपदेखील होता अर्थात विषय वेगळे असले तरी कट्टा मात्र एकच असायचा ना.
     आता दुस-या गटात नित्या ज्याला वर्गमित्र दंड्या म्हणायचे तर पंक्या, पिड्या, गजू अशी ती सारी गँग. हे सारं आठवायचं कारण म्हणजे ती परंपरा इथं वर्ध्यातही पुढे चालू आहे इथं मित्रांची नावं चारु, बंटी, पप्पू अशीच आहेत. एकदा सायंकाळी घरी  बायकोसोबत बोलताना गँग सोबत आहेत असं नाव घेत सांगितलं तिकडे तिचा फिस्सकन हसण्याचा आवाज ऐकून मी चमकलो. 
     तिनं हसत हसत सांगितलं की छोटा वेदांत जो आता तिस-या वर्गात आहे. त्याला फ्रेडसची नावं विचारली तर तो सांगतो सोहम, रोहन सर्वज्ञ आणि बाबांचे मित्र बंटी आणि पप्पू मग हसू येणारच ना.
     काळ बदलला आणि माणसं तसा औपचारिकपणा वाढला. आता कट्टयावरचा आणखी एक ग्रुप म्हणजे क्रिएटीव्ह रायटर समजणा-यांचा त्यात एकमेकांना बोलावण्याची पध्दत वेगही होती अगदी सारंग प्रभाकर टाकळकर किंवा नितीश रमेश दंडवते असं पूर्ण नाव घेऊन संवाद सुरु व्हायचा  काय म्हणतात प्रवीण प्रभाकर देशमुख किंवा काय करताहेत संदीप सुधाकर पालोदकर त्यात आगळी मजा होती हे नक्की. त्यात आत्मियता होता जो आजवर टिकून आहे.
     आता मक्या म्हणजे आज मराठीचा सुपर स्टार असलेला मकरंद अनासपुरे तर मंग्या म्हणजे ` फु बाई फू ` गाजवणारा त्यावेळी नाटकांमध्ये शिरकाव केलेला छोटा दोस्त मंगेश देसाई जितू अर्थात जितेंद्र पानपाटील आणि सम्या म्हणजे समीर पाटील आणि अष्ट्या म्हणजे सुनिल अष्टपुत्रे.
     आता नाटकांच्या तालमी चालायच्या त्यावेळी असणारी नावं फक्त ग्रुपलाच माहिती असणार एक होता बाचक्या तर दुसरा बर्कले फिल्टर आता ही नाव आमच्या गँगला ओळखू येतीलच.                                      
कॉलेजच्या बाहेर सॅट, पॅट आणि रॅम्बो अशी आगळ्या गँगची नावं होती. क्रिएटिव्ह रायटरच्या ग्रुपला नावही जोरदार शोधलं होतं `` उन्माद कारण काय तर गव्हर्नमेन्ट कॉलेज असलेला सुन्या पाटीलचा जाणीवा ग्रुप.
     ते सारे ग्रुप हे फेसबूक सारखे व्हर्च्युअल ग्रुप नव्हते ते वास्तवात एकमेकांना भेटून धिंगाणा आणि तुफान मस्ती करणारे ग्रुप होते. आज फेसबूकमध्ये लिहिताना ते दिवस आठवतात. आज सारी मंडळी आपापल्या व्यापात बुडालेली कोणी पुण्यात, कोणी नाशकात कुणी दुबईला तर कुणी स्टेटस् ला  पोहचलेली या फेसबुकाच्या निमित्ताने पुन्हा कट्टा जमतोय हे विशेष.
     एखादा बर्थ डे असेल तर त्याचा खिसा कापण्यात सारी गँग वाकबगार होती पण त्यावेळी पैसेच कमी असायचे. मला पोटभर आणि मनसोक्त गप्पा व्हायच्या. आता सर्वजण कमावते आहेत पण खिसा कापणारी ती गँक आता जगभर विखुरलीय.
     पुन्हा एखादा योग येईल की सारी गँग पुन्हा त्याच कट्टयावर गप्पांचा फड रंगवायला येईल. टपरीवरचा चहा आणि टपरीवरच्या अण्णांची मजा उडवत पिलेली सिगारेट... स्मृतीचा हा कट्टा दोस्त हो हा कट्टा    सा-यांची वाट पहात आहे.

                नावाशी कुस्ती खेळत रोज
              रंगत कट्टयावरची मैफली
              चला उठा माझ्या दोस्तांनो
              ऑफ-पिरिअडची वेळ आली
              कट्टयावरुन टपरीकडे जाऊ
              कट्टयावरुन टपरीकडे जाऊ
              चहा अमेरिकन सिस्टीमने घेऊ
              टी-टी,एम-एम आजही करु
              पुन्हा नव्याने मैत्रीचा जागर करु

-  प्रशांत दैठणकर