Wednesday 25 April 2018

तो एक फोन....

 काल तिच्याशी फोनवर गप्पा झाल्या... गप्पा म्हणा की निव्वळ बोलणं होतं, काहीही म्हणता येईल. ती एक सांत्वना संदेश होता म्हणायला हरकत नाही.....  एकटं जगताना आपण एकाकी असू नये याची काळजी घेत जगणारा मी..... हो मी.   रोज नवा अंगरखा आणि चेहऱ्यावर बुरखा पांघरावा तसा चैतन्याचा मुखवटा घालून वावरत असताना कधी रुक्षपणा आला आयुष्यात कळलंच नाही.

भावनांच्या तुंबलेल्या डोहात तिचे ते शब्द म्हणजे पाण्यात दगड ठरले. अंतरंगात भावनांचे तरंग आणि त्यांची आंदोलने, त्या वर्तुळांनी एकमेकांवर आदळून निर्माण केलेली वर्तुळांची साखळी..... भावनांचा गुंता अधिकच गहिरा होत गेला.

एकटं जगणं तसं काही नवी गोष्ट नाही पण हे जगताना आपण खऱ्या अर्थाने जगतोय की काळ ढकलतोय असा सवाल आता माझ्या मनात यायला लागला होता. रोज हसरेपणाचा मुखवटा पांघरुन वावरताना आतला मुळ चेहरा किती बदलला हे कळायला मार्ग नव्हता तो चेहरा कधी तरी सकाळी आरशात स्वत:ला बघताना आणि काळजीपुर्वकरित्या न्याहाळताना जाणवे.

कधी काळी कॉलेजमधला पट्टीचा असा Music Lover. कोणत्याही गाण्यातील लकेर सुरु होताच गाणं ओळखणं, त्याचा गायक , संगीतकार आणि सिनेमा यांची माहिती गुगलपेक्षा अधिक वेगाने माझ्याकडून सर्व जण मिळवायचे नाही म्हणायला आजही ते कसब कमी झालेलं नाही. फक्त फरक इतकाच पडलाय की संगीत ऐकणं मी पूर्णपणे बंद केलय. मन प्रसन्न ठेवायला संगीत हे खूप मोठं साधन आहे असं मानलं जातं. त्यावर आधारित उपचारपध्दती देखील अस्तित्वात आहे. नैराश्यात अडकलेल्यांना जगण्याचं भान आणि जगण्याचं उमेद देण्याचं काम हे संगीत करतं असं म्हणतात.....आहे खरं आहे पण माझ्या बाबतीत मात्र वेगळाच अनुभव आताशा यायला लागला म्हणून मी संगीत ऐकणं थांबवलं.

संगीत हे भिंतीवर टांगलेल्या खुंटयांवर लटकलेल्या पिशवी सारखं असतं. प्रत्येक पिशवीत त्या त्या वयात जगलेल्या आठवणींची साठवण आहे. आठवणी हा अनमोल असा ठेवा असतो. इथंच तर खरी अडचण आहे.


आज वर्तमानात आपण कधी सहज हसत-खेळत विनोद करीत हलके-फुलके क्षण Enjoy करीत असतो आणि कानावर गाण्याची एखादी धून येते. ती त्याच क्षणी आपल्याला वर्तमानातून खुंटीवरल्या त्या पिशवीत कोंडलेल्या भूतकाळात घेऊन जाते.... आपली अवस्था मग त्रिशंकू सारखी..... शरीर वर्तमानात आणि मन भूतकाळात .... सारं त्रांगडं होवून बसतं..... म्हणून संगीत नको.

आजू बाजूला कुणी संगीत ऐकत असेल तरीही त्याचा त्रास होतो पण निसर्ग ... डोळे बंद करता येतात त्याप्रमाणे कान बंद करता येत नाहीत.

भुतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्या या जीवघेण्या आंदोलनात उद्याची वाट विसरली असे वाटताना तिच्या अनपेक्षितपणे आलेला फोन खरोखर दिशादर्शी होता.

बऱ्याचदा आपण वर्तमानाचा खुलेपणाने स्विकार करीत नाही... मनाला काय त्याला स्वच्छंद विहरणं आवडतं. मनोविज्ञान सांगत एका मिनिटात या मनात 21 प्रकारचे विचार येत आणि जात असतात त्याला मनाची चंचलता म्हणतात. त्यावर नियंत्रण अर्थात ते देखील मनालाच ठेवायला लागतं....!


फोनवरचं बोलणं संपलं तोवर मनाचा डोह शांत झाला होता..... भावना वाहून जाणं, त्याचा वेळोवळी निचरा होणं आवश्यक असतं. प्रवाही पाण्यावर तरंग उठत नाहीत. ते खळखळाट करीत येईल त्या अडथळयाला पार करीत प्रसंगी कडया कपारींवरुन झेप घेत, पडण्याची पर्वा न करता तुषार उडवत धबधब्याच्या रुपानं पडतं आणि पुढच्या मार्गाला लागतं.

तिनं फोन कधी ठेवला आठवत नाही.....मला समोर काहीच दिसत नव्हतं, कानाचा मोबाईल घामानं आणि डोळे पाण्यानं चिंब.....! हा निचरा होत गेला. बराच वेळ एकटं बसून डोळयातून पाण्याच्या धारा वाहत गेल्या.......आता मात्र एकाकी वाटत नव्हतं....!


- प्रशांत दैठणकर

9823199466

Tuesday 24 April 2018

दिवस पुस्तकांचा

 कामात गुंतत गेलं की जग विसरायला होते. बहुतप्रसंगी आपण विनाकारण व्यस्त होवून जातो. व्यस्त झाल्यावर व्यक्त होणं बंद होतं. काल सोशल नेटवर्कवर काल जागतिक पुस्तक दिनाची Post टाकताना मला जाणवलं की कामाच्या व्यापात आपलं लिखाण पुर्णच बंद झालाय.

व्यक्त व्हावं … मनातलं मांडावं यासाठी मी हा ब्लॉग सुरु केला होता पण हळू हळू लिखाण कमी होत गेलं आणि बंदच झालं. सरकारी लिखाणाशिवाय काही सूचत नाही, असं तर होत नाही. पण कामामुळे येणारा थकवा आणि मनातंल पानावर मांडायला लागणारा मूड यांचा मेळ बसत नाहीय. आपण लिहायचं ठरवतो आणि कुणीतरी व्यत्यय आणतं.. मात्र आज पुस्तक दिनी संकल्प की वाचनासोबत आपण लिहायचं देखील.

' र ' ला ' ट ' आणि ' ट ' ला ' प ' म्हणजे लिखाण असू नये त्याला काही निश्चित दिशा, शैली आणि शब्दसंग्रह व त्याचा वापर याची जोड दिली, म्हणजे लिखाण खुलायला लागतं. आपण मनापासून आणि प्रामाणिकपणाने भावना शब्दात मांडल्या तरच त्या इतरांना रुचतात असं असलं तरी लोकांना रुचेल यासाठी न लिहिता आत्मसंवाद म्हणून केलेले लिखाण उत्तम .

समाज माध्यमांमध्ये कट - पेस्ट चे प्राबल्य आहे. शर्विलकी वाढलीय आणि सर्वात खेदजनक म्हणजे प्रतिक्रियात्मक लिखाणाचं प्रमाण खूपच वाढलय असं जाणवंत . फेसबुक सारख्या माध्यमाने व्यक्त होणारे व्यासपीठ दिले आणि अभिव्यक्तीची त्सुनामी आली आता प्रश्न निर्माण झालाय ' दर्जा ' काय ? याचा आणि दर्जाहिनवृत्तीचे लिखाण त्यावर अधिक दिसते असं लिखाण वाचायला नको वाटतं. मूळ लिखाण कसं याच्या वादात मी जाणार नाही पण आताही शैलीत लिहून स्वत:ची ओळख निर्माण करणारे कमी झाले आहे.

कधी काळी फेसबुक वर मराठी लिखाण करा असा आग्रह मी धरला आणि त्या माध्यमात जवळपास सर्वच मराठी मुलुख आपल्या मायबोलीत लिहितोय हे बघून निश्चितपणे आनंद होतो.

 पुस्तक दिनी पुस्तकांची आठवण करताना अनेकांनी भावी पिढी वाचन करीत नाही असा सूर धरला आहे. याबाबत माझं स्वत:चं मत मात्र वेगळं आहे. नवी पिढी आपल्यापेक्षा अधिक जागृत आहे, जागरुक आहे फरक फक्त बदललेला तंत्रज्ञानाचा आहे. वाचन ती पिढी करते पण आता माध्यमं बदलली आहेत.

नव्या पिढीतील अनेकांचे ब्लॉगवरील लिखाण वाचताना जाणवंत की त्यांच्या लिखाणातही प्रगल्भता आहे. त्यांचे विचार देखील चांगले आहेत. मुळात व्यक्त होणं त्यांना कळतय आणि जमतय देखील.

चला अल्पसं चिंतन आवश्यकच होतं या ब्लॉगवर पुन्हा लवकर लवकर भेट होईल ही अपेक्षा.






- प्रशांत दैठणकर

9823199466