Tuesday 30 August 2011

रस्त्यावरचा सिनेमा ...!



          गणेशोत्सव हा आमच्यासाठी ख-या अर्थानं स्वर्णीम काळ असायचा वर्षातला. सातव्या-आठव्या वर्गात असताना कळायचं तसं किती, मात्र खरा आनंद ज्याला निर्भेळ आनंद म्हणता येईल असा आनंद त्याच वयात आणि गणेशोत्सवातच मिळायचा.
     सराफा बाजारचा गणपती शहरातला सर्वात श्रीमंत गणपती मात्र त्यावेळी त्या श्रीमंतीचं फारसं कौतुक नसायचं त्यावेळी शहर इतकं पसरलं नवहतं. सकाही आवर्जून मराठवाडा लोकविजय, अजिंठा आणि लोकमत बघायचा कारण आकर्षण होतं सिनेमाचं. समर्थनगर असो की स्नेहनगर कुठं आज सिनेमा आहे याची माहिती काढून ठेवायची.
     विश्‍वास नगर, नवीन वाटतं का नाव ?  हो विश्‍वास नगर , विश्‍वास पानीपतावर गेला तसा या भागाचं नावही गेलं. विश्‍वास नगर म्हणजे लेबर कॉलनी होय. त्याच प्रमाणे कोटला कॉलनी या शासकीय कर्मचा-यांच्या वसाहती, इथं आवर्जून सिनेमा दाखवला जायचा.
     मोठ्या पटांगणात बांधलेला पडदा. त्यावर सिनेमा सुरु व्हायचा आणि त्यासोबत गाणं सुरु व्हायचं `  गाडी बुला रही है , सिटी बजा रही है ` धर्मेंद्रचा चित्रपट ` दोस्त `  आणखी एक आवडता आणि वारंवार बघितलेला चित्रपट म्हणजे मनोज कुमारचा ` रोटी कपडा और मकान `  त्यातही गंमत डावखुरा अमिताभ पडद्याच्या दुस-या बाजूने उजवा असायचा आणि गर्दी पडद्याच्या दोन्ही बाजूनी रहायची.
     पडद्यावरच्या चित्रपट चालू आपण रस्त्यावर एखादं पोतं घेऊन त्यावर मांडी घालून बसायचं ... आपण असं रस्त्यावर बसलोय यात काही वाटायचं नाही त्या वयामध्ये. ब-याचदा पावसानं ओल्या मातीवर बसायचं ती ओल अंगभर पसरायची पण सिनेमाचं ते आकर्षण उठू देत नसे.
     अगदी भरपूर वेळा पाहिलेला आणखी एक चित्रपट म्हणजे ` आम्ही जातो आमच्या गावा ` त्यातला प्रत्येक प्रसंग स्मरणात राहिलेला आहे. त्याच काळात ` हाच मार्ग एकला `  तसेच `वहिनींच्या बांगड्या `   असे चित्रपटही औरंगाबादच्या रस्त्यांवर बसून पाहिलेत.
     आज कुंभारवाडा परिसर पूर्ण गजबजलाय. तिथून मुलांसोबत जाताना जूना गणेशोत्सव आठवतो त्यावेळी मुलांना मी सांगतो बेटा इथं रस्त्यावर बसून आम्ही सिनेमा बघायचो त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया `  काय बाबा काही सांगता काय ?  अशी असते फेम, आणि पीव्हीआर मध्ये सिनेमा बघणा-यांनी अशी प्रतिक्रिया देणं सहाजिकच आहे.
     रस्त्यावरचा तो सिनेमा दाखवायचं काम माहिती कार्यालयाचे कर्मचारी करायचे. 2000 साली मी ज्यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मी औरंगाबाद येथे रुजू झालो त्यावेळी त्या माहिती कार्यालयाचा बॉस म्हणून मला प्रथम आठवण त्या रस्त्यावरच्या सिनेमाची झाली ..... काळाच्या ओघात बरच चित्र बदललं आहे पण स्मृतिचित्रातला रस्त्यावरचा सिनेमा आजही बघावा वाटतो.

Monday 29 August 2011

गणपती बाप्पा मोरया ...!



          व्यवस्थापनाचे आयुष्यातील पहिले पाठ कधी गिरवले याचा विचार करताना मला टिळकपथवर आमच्या चिमुकल्या गँगने साजरा केलेला गणेशोत्सव आठवतो. 1981-82 च्या त्या डिस्कोच्या जमान्यातला तो गणेशोत्सव.
     कुलकर्ण्यांचा राजू , नाईकांचा सुन्या, दाभाडेंचा गण्या, जोश्यांचा मक्या आणि गल्लीतली सत्या,पावा, संदीप अशी सारी आमची गँग. आपणही गणपती बसवू असं ठरवलं. लोकांकडून वर्गणी गोळा करायची गणपती आणायचा आणि आरास करायची इतकं सोप गणित होत. सुदैवानं टिळकपथावर ,(त्यावेळचा तो शहराचा मुख्य रस्ता होता)  एक रिकामं दुकान अनायासे मिळालं. आज खरच याचा हेवा वाटतो कारण औरंगाबाद सारख्या शहरात गणेश महासंघालाही दरवर्षी जागा बदलावी लागतेच.
     चार डोकी एकत्र आली, बाल बुध्दी प्रमाणं नियोजन झालं. पावती पुस्तक, न्यास नोंदणी याची माहिती आम्हाला असणं शक्य नव्हतं. मग मीच मागिल वर्षीच्या को-या पानांची बाईंडिग केलेली वही घेतली आणि आमचा मोर्चा बढई गल्लीच्या प्रत्येक घराकडे निघाला. सव्वा रुपया ही स्टॅन्डर्ड वर्गणी होती. त्याखाली वर्गणी स्वीकारायची नाही हे निश्चित. पाच रुपये वर्गणी देणारा सज्जन आणि अकरा रुपये देणारा सधन असा सोपा हिशेब. सुदैवानी आसपासच्या दुकान मालकांनी सधन असल्याचे दाखवून दिल्याने वर्गणी भरपूर जमली.
     मी घरुन हिशेबासाठी वही आणलेली, त्यामुळे पुढचे व्यवहार आपसुकच माझ्या गळ्यात टाकून सगळे मोकळे. तू आमचा कोषाध्यक्ष असं सगळ्यांनी सांगितलं. आता जबाबदारी आपणावर टाकली म्हणून मला देखील मुठभर मास चढलं. शाळेच्या दप्तर पेटीला मग गणेशोत्सवात  सुटी देवून त्या पेटीचं रुपांतर तिजोरीत करण्यात आलं. पैशांच्या व्यवहारात गडबड नको म्हणून मी ही व्यवस्था केलेली.
     गल्लीच्या मागच्या मैदानावर मोठ्या लायटींगसह मोठ्या मंडपात गणपती बसवला जायचा मंडळाचं नाव गाजलेलं आणि अनेक पुरस्कार देखील मंडळाला मिळालेले. मंडळ होतं त्रिमूर्ती गणेश मंडळ, आम्ही तास न् तास त्या नाचणा-या दिव्यांची मजा बघायचो.
     ` हरी ओम हरी `  आणि ` रंभा हो हा `  असा डिस्कोचा धिंगाणा चालायचा. आपल्या मंडळाचं नाव काय ठेवायचं यावर चर्चा सुरु असताना मी सुचवलं त्रिमूर्ती बाल गणेश मंडळ आणि ते लगेच मंजूर झालं.
     आर्थिक नियोजन व्यवस्थित असावं यासाठी मग मी स्वत: शेजारच्या चाचूच्या किराणा दुकानातून गुलाल, नारळ, पंचखाद्य आणि जरुरीच्या वस्तूंची खरेदी केली. पालोदकरांच्या रसिकराज मधून दिव्यांची माळ आणि विजेचे बल्ब आणले. मराठवाड्यात या बल्बला गोळा तर ट्यूबलाईटला नळी म्हणतात. आमच्या मराठवाड्यात पेनचं रिफिल नसतं तर पेनची कांडी आणि पेन देखील कांडीचं पेन असतं तर फाऊन्टन पेनला पत्तीचं पेन म्हणतात.
     सलग दहा दिवस सकाळ संध्याकाळच्या आरतीचं नियोजन त्यासाठी ताट तयार करणे त्याचप्रमाणे नवव्या दिवशी गणपतीसमोर सत्यनारायणाची पूजा. रात्री तिथच मुक्काम असे दहा दिवस कसे उडून गेले हे कळलंच नाही .... असा हा बाल गणेश मंडळाचा दहा दिवसाचा व्यवहार माझा पहिला व्यवस्थापनाचा धडा होता. आताही गणेशोत्सव म्हटलं की हा अनुभव नव्याने ताजा होत असतो. आणि मनातून गणेशाला वंदन करीत आपोआप शब्द ओठांवर येतात गणपती बाप्पा मोरया !

Sunday 28 August 2011

त्यांचं .. तू-तू..मै..मै.. !


महिला आज सर्व क्षेत्रात आपल्या गुणवत्तेवर पुढे जाताना दिसत आहे आणि खास भारतीय मनोवृत्तीने त्यांना खूप पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही आपणास दिसतो. यात अनेक घटक जबाबदार आहेत. मात्र कौटुंबिक पातळीवर जे कलह दिसतात त्यामध्ये स्त्री स्वत: स्त्रीच्यामार्गाने अडथळे आणण्याचा प्रयत्न करते असं चित्रण अनेक टि.व्ही. मालिका दाखवत असतात, अर्थात या दाखविण्यात अतिरेकीपणा असला तरी बहुतांशी हे सत्यदेखील आहे.
            घरातली पोर लहानाची मोठी करुन दुस-या  घरी द्यायची हे जसं प्रत्येक पालकाचं कर्तव्य मानलं जातं तसं सून म्हणून येणारी मुलगी तशीच आहे. असं मानलं जात नाही. परिणाम सासू-सून यांची अखंड चालणारी तू-तू मै-मै याला काही पर्याय आहे काय ? होय याला पर्याय आहे. मात्र त्यादृष्टीने प्रत्येक स्त्रीला आपली मानसिकता बदलावी लागेल. सूनेला मुलगी मानून जगणाऱ्या स्त्रिया आहेत. तुलनेत त्यांचं प्रमाण नगण्यच ठरतं म्हणूनच आदर्श सासू-सून हा पुरस्कार आणि बातमीचा विषय असतो.
            विवाहानंतरचं स्त्रीचं जीवन इतका कष्टप्रद असतं का ? याला दोन्ही बाजूंनी पटवून देता येत असलं तरी अंतिम सत्य हेच आहे की मनोभूमिका बदलल्या नसल्याने स्त्रिया याला अधिक कष्टप्रद करतात. सासू नेहमी खाष्ट असते अशी भूमिका अगदी भातुकलीच्या खेळातून संस्कारक्षम वयात मुलींच्या मनावर ठसविण्याचा प्रकार होतो आणि ही प्रतिमा पुसली जात नसते.
मानसशास्त्रीय दृष्टीकोणातून विचार करताना असं सांगता येतं की जन्माला आलेलं बालक पूर्णपणे निर्भय असतं. आपण भिती त्याच्या मनात जन्माला घालत असतो. त्या बालकाच्या संगोपनात आपण त्याच्या मेंदूच्या गतीला आपली गती जुळवू शकत नसल्यानं   झोपला नाहीस तर `भोकाडी` येईल असं सांगून किमान अल्पकाळासाठी स्वत:ची सुटका करुन घेतो. ही भिती त्याच्या मेंदूत एक प्रतिमा निर्माण करुन ठेवते आणि ती प्रदीर्घ काळ त्याच्यावर राज्य करते.         
            आपल मनं अर्थात आपल्या मेंदूच्या कप्प्यात असणा-या अनुभव, जाणीवा, भावना आणि उणिवा यांचा उलगडत जाणारा तरीही अनाकलनीय असा कप्पा असतो. यामध्ये बालवयात म्हणजे बालक जन्माला आल्यापासून माहिती जमा होत राहते. संगणकात होणाऱ्या डाटा एन्ट्री सारखा हा प्रकार असतो. ही माहिती देतानाच चुकीची दिली गेली तर काय होईल ! त्यावर आधारीत सर्वच माहिती चुकीची ठरत जाईल अशा स्थितीत मोठेपणी आपल्याला देण्यात आलेली माहिती चुकीची होती असं पटलं असलं तरी प्रारंभी फीड केलेल्या माहितीची प्रतिमा पुसली जात नाही आणि तिथं मनाची अवस्था दोलायमान होते. खरं काय  याचं संभ्रम निर्माण होाते. यातून कळतयं पण वळत नाही अशी स्थिती येत असते. याला जबाबदार अर्थात आरंभीची चुकीची माहिती असते. त्यामुळे संस्कारक्षम वयात बालकाची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न अत्यावश्यक असतो.
            आपल्याकडील प्रचलित लोककथा आणि लोकगीतांमध्येही सासरचं वर्णन तसं आक्षेपार्ह आहे. सासू आणि सून यांच्यात असणारं वयाचं आणि त्यामुळे असलेला जनरेशन गॅप हा मुलगा आणि त्याच्या वडिलांमधील जनरेशन गॅप इतकाच असायला हवा. मात्र विविध माध्यमांमधून स्त्रियांची असणारी सासूची भूमिका आणि प्रतिमा समाजानं बिघडून आखलेली असल्यानं ती प्रतिमा सर्व समस्या निर्माण करते.
            माता आणि मुलगी यांचा भावनिक ओलावा ही नैसर्गिक बाब आहे. आपल्या उदरातून आलेला हा हाडा-मासाचा जीव म्हणून माता मुलीचं पोषण करते. हा ओलावा सासू-सून यांच्या नात्यात कधीच येणं शक्य नाही आणि ते अपेक्षितही नाही. कालपर्यंत अपरिचित असणारी व्यक्ती आपल्या घरात आल्यावर त्या व्यक्तीसोबत भावनाची बांधिलकी निर्माण व्हायला एक विशिष्ट कालावधी जावाच लागतो.सासू-सूनच काय पण पती-पत्नीच्या नात्यातही लग्न झालय म्हणून एका रात्रीतून भावनिक बंध तयार होत नसतात. ते एकमेकांच्या विश्वास आणि परस्परातील आदराने तयार करावे लागतात.
            येणारी सून ही नव्या पिढीची प्रतिनिधीत्व करीत असते. तर सासू अनुभवानं संपन्न असतं. माझ्या सासूनं मला त्रास दिला म्हणून मी सूनेला त्रास देणारे ही रॅगिंगची दूष्टचक्रांची भूमिका कोणतीही सासू बाळगत नसते. हे देखील महत्वाचे आहे. त्याच बरोबर सासू म्हणजे कजाग आणि खाष्ट असणार ही भूमिकाही सूनेनेही ठेवू नये. सहवासात येणारे सुख-दु:खाचे प्रसंग पुढील काळात त्या दोघीतील बंध निर्माण करतात आणि याला वेळ लागणार हे सर्वांनी समजून घ्यायला हवं. जुनी पिढी आणि नवी पिढी यातील विचाराचा संघर्ष चालतच राहणार आहे. त्यात सूवर्णमध्ये साधून पूर्वग्रहदुषितपणा सोडण्याची मानसिकता स्त्रियांनी ठेवली तर प्रत्येक सासू आदर्श सासू आणि प्रत्येक सून आदर्श  सून होवू शकते.                                
- प्रशांत दैठणकर