Thursday 20 August 2020

11 वर्षे... मी आणि फेसबुक.. एक आत्मसंवाद

  


सहज म्हणून  विचार व्यक्त केला त्यानं एक क्षण विचार करायला लावतो ते असा. समाज माध्यमे विस्तारली आणि त्याचा वापर मोठया प्रमाणात सुरु झाला.  यात चांगला वापर आणि चुकीचा वापर यावर वाद होवू शकतो. पंरतु त्याने जो विचार मांडला तो त्याही पलिकडचा होता... मुळात वापर करायचाच कशासाठी...

           या

माध्यमांनी प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी दिली आणि फेसबुक सारख्या माध्यमातून अभिव्यक्तीची त्सुनामी आली असं चित्र दिसलं. अभ्यासू व्यक्त होणं, साहित्यातून व्यक्त होण याचा प्रवाह समजण्यासारखा आहे.. प्रत्येकालाचा शब्दांची ताकद कळत नाही... तोलून मापून शब्दांचा वापर करुन व्यक्त होण प्रत्येकाला शक्य नाही. परिणामी जो जसा आहे तसा व्यक्त व्हायला लागला.

            या अभिव्यक्तीचा वापर करुन अनेकांनी आपापला 5 सहस्त्र मनसबदारी दरबार भरवला असं चित्र दिसलं. 5 हजार फ्रेन्डसची मर्यादा आहे म्हणून कुणी त्याचं वाईट वाटून घेतलं नाही. यात जणू 5 हजार जण प्रत्यक्ष आपले वाचकच आहेत मानून व्यक्त होण्याचं समाधान व्यक्त होणाऱ्याला मिळतं मात्र फेसबुकच्या अल्गोरिदम नुसार ते किती जणांपर्यंत पोहोचवायचं याचं काम संगणक करतोय याची माहितीह नेमकी कुणाला आहे आणि त्याचं भानही कुणी ठेवत नाही.

            या अल्गोरिदमने जे मोजके एकत्र भसतात (भासतात यासाठी की हे सारं आभासी आहे) ते यावर चर्चा करतात मात्र बहुसंख्य जणांनी फेसबुकचं रुपांतर चक्क चावडीत करुन टाकलय. एखाद्या गोष्टीवर सयंत आणि संयमी प्रतिक्रिया न देता येथे जजमेंटल(की मेंटल) लोकांनी आभासी न्यायालयेच जणू चालवली आहेतअसाही भास (?) होतो..सारं काही इतक्या गडबडीत केलं जातं की आपण निसर्गाचा साधा नियम देखील विसरतो.

            यावर व्यक्त होणाऱ्या अनेकांनी याचा तोटा देखील कबूल केला.. यात शर्विलक आहेत की जे इतरांचलिखाण त्याचे साधे आभार व्यक्त न करता स्वत:चे विचार म्हणून चिटकवून (कॉपी-पेस्ट) मोकळे होतात आणि दुसऱ्याच्या बुध्दीवर आणि शब्दांवरचे लाईक गोळा करीत राहतात.

            मी स्वत: यावर आज 11 वर्षे पूर्ण करीत आहे. याचाच अर्थ गेल्या 11 वर्षापासून हे माध्यम वापरत आहे. या काळात वेगवेगळया प्रकारचे विनोद येथे घडले तर काही प्रमाणात गुन्हेगारी देखील वाढलेली मी बघितली  आहे. यावर अधून मधून अश्लीलतेच्या लाटा आल्या. अश्लाघ्य लिखाण, धार्मिक तेढ निर्माण करणारं लिखाण आणि त्यातून  झालेल्या दंगली अगदी शेगांव पासून कालपरवाच्या बंगलरु मधील दंगली याची उदाहरणं आहेत.

            फेसबुक च्या आभासी जगात झालेली मैत्री अनेकांनी प्रत्यक्षात  आणली. यातून  काही जणं विवाहबंधानात अडकले अशी चांगली उदाहरणे एका बाजूला असताना फेसुबुक मैत्रीचा गैरफायदा घेऊन आर्थिक फसवणूक, बलात्कार आणि खून अशाही घटना घडल्या.. काही महाभागांनी यावर थेट प्रक्षेपण करुन मृत्यूला कवटाळलं... हा सारा भावनांचा प्रवास आणि पसारा आहे.. त्याला अंत नाही. फेसबुकवर प्रेम जुळलं या भावनेतून उस्मानाबादच्या ग्रामीण भागातील एक पठ्ठ्या थेट पाकिस्तानाच्या सिमेपर्यंत पोहोचला..समाजात घडणाऱ्या  साऱ्या  घटनांचं प्रतिबिंब इथं उमटताना दिसलं.

            एखाद्याचा मृत्यू झालाय पण त्याच्या वाढदिवसाचं नोटीफिकेशन पाहून त्याला तूम जियो हजारो साल अशा शुभेच्छा देणारेही दिसले. अशा शुभेच्छा देणाऱ्यांची किव येत नाही कारण प्रत्यक्षातलं जग आणि आभासी जग यातलं खरं अंतर हेच लोक दाखवत असतात... वास्तवात मित्र असता तर अशी शुभेच्छा दिली असती का ?

            याचे

वापरकर्ते वाढत आहेत मात्र त्याचा फायदा टेलिकॉम कंपन्या आणि जाहिरात दार यांना अधिक होतोय इंटरनेट अर्थात आंतरजाल 25 वर्षांचे झालयं पंरतु या रौप्यमहोत्सवी वाटचालीत त्याचं रुपांतर एक प्रकारच्या मायाजालामध्ये झालय वास्तवात..

            आपण काय म्हणतो याला फेसबुकनं स्टेटस असं नाव दिलं तो स्टेटस चा मुद्दा बनवणाऱ्यांना माहिती हवं की स्टेटस म्हणजे मानसिक स्थिती असा अर्थ इथं अपेक्षित आहे.

            फेसबुकच्या पोस्टचं आपणास खूप कौतूक आहे हे मान्य आहे पंरतू त्याचं क्षणभंगुरत्व आपल्याला कळलय का ? काही कालावधीनंतर तुम्हालाही स्वत:ची पोस्ट शोधावी  लागते इतका मोठा महासागर झालाय.

            फेसबुकच्या आरंभिक काळात मी सर्वांना मराठीत लिहिण्याचा आग्रह करीत होतं वाईटात काही चांगलं किमान मराठीचा प्रस्तार तरी वेगानं व्हावा ही भूमिका मा झ्या मनात होती. आज ती प्रत्यक्षात आल्याचा मला आनंद आहे. माझ्या  टाईमलाईनवर दररोज आकडेवारी देण्याचं काम फेसबूक इमाने इतबारे करित आहे.

            मी भाषांतर केलेले (इंग्रजीतून मराठीत) शब्द दरमहा सरासरी 8 ते 10 बिलीयन वेळ वापरले जातात हा माझा आनंदाचा मुद्दा आहे. मराठी भाषेवर हजार भाषण देण्यापेक्षा हे काम अधिक मोलांच आहे हे मी मानतो.


            आपण फेसबुक का वापरता याचा प्रत्येकानं विचार जरुर करावा. अनेकांनी याचा कंटाळा आला म्हणून वापर बंद केला. काही नुसतेच दर्शक तर काही नुसतच वाचक आहेत. अर्थात हा विचार सुरु करुन देणाऱ्या माझ्या खऱ्या आयुष्यातील मित्राला धन्यवाद द्यायलाच पाहिजेत.. चालताना आपलं चालण्याचं वेड इतकं प्रबळ असतं की आपण कुठवर आलोत हेच कळत नाही... यात अनेकदा भरकटण्याचा धोकादेखील असतो त्यासाठी असं 11 वर्षांच्या प्रवासाचं सिंहावलोकन करण्याची संधी या निमित्तानं या माझ्या मित्राच्या विचाराने दिली.

            आभासी जगातलं जगणं वास्तवातही घातक ठरु शकत याची जाणीव ठेवा.. फेसबुकवर जरुर व्यक्त व्हा पण जाणतेपणाने आणि हो... वास्तव आणि अभासी जग याचा घातक संबध स्पष्ट करणारा मेट्रीक्स चित्रपट जरुर बघावा तो देखील इंग्रजीतच... पुढच्या वेळी फेसबुकवर व्यक्त होण्यापूर्वी.....

प्रशांत दैठणकर

9823199466  


Wednesday 10 June 2020

काय पाहिलंस माझ्यात...?


फोनची रिंग वाजली आणि तंद्री भंग पावली.. एकटे राहण्याची सवय असल्याने सतत टिव्ही बघणे किंवा मोबाईलवर सर्फींग करणे हा छंद जडलेला. यात अचानकपणे एखादेवेळी असं होतं की नजर टिव्ही वर असते..त्यातला एखादा प्रसंग मनाला झोका देतो
आणि नंतर नजरेपुढे टिव्हीवरील चित्रं सरकली तरी बोध काहीच होत नाही कारण विचारांची वर्तुळ फेर धरुन मनाला आपल्या सोबत घेवून नाचत असतात..अशातच फोनची रिंग वाजलेली..!

दिवसातील तिचा हा तिसरा कॉल होता..सवाल तिचा आणि मी विचारात.. काय पाहिलस माझ्यात....? आजवरच्या आयुष्याच्या प्रवासात अनेकांशी परिचय झालेला पण हा सवाल फक्त मुलीच विचारतात असा माझा अनुभव..पोरांना याच्याशी काही देणं घेणं नसतं.. बनती है तो बनती है नही तो नही इतका साधा हिशेब लावून पोरं जगतात मात्र पोरीचं काहीतरी वेगळंच असतय..!

मुलींना नेहमी वाटतं आपण सुंदर आहोत..कुणीतरी आपल्या प्रेमात पडावं..सुंदर असणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या मुलांची संख्याही कमी नाही.. असं तिचं झालं म्हणायचं.... सुंदर आहे... आवडली..सांगितलं मगं तिचा तो सवाल..काय पाहिलस माझ्यात..? आता नेमकं सांगायचे कसं.

प्रेमाचं गणित म्हणजे काही सुडोकू नाही..सुडोकू सोडवायला अवघड आहे पण प्रयत्नाने जमतं.. प्रेमाचे मात्र तसं नाही..मी नेमकेपणानं तिच्यात काय पाहिलं..तिची नजर. रोमॅटिंक भाषेत बोलायचं तर आँखे, गेसूं , नजर या उमर..चेहरा या कमर..या फिर कुछ और..!   तिला मात्र नेमकेपणानं हवय उत्तर.. नाही म्हणायला तिला आपण काय आहोत याची पूर्ण जाणीव असते.. सांग दर्पणा मी कशी म्हणत दिवसात येता-जाता आरसा हवाच असतो मग पुन्हा हा सवाल कशासाठी की , काय पाहिलस माझ्यात...?

प्रेम हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं म्हणून त्या नजरेने सौंदर्य कशात बघितलं याचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करीत असते..आता फोन वर पुन्हा तेच..विचार पुन्हा सुरु नेमकं मी काय पाहिल बरं..!

यावरुन मला प्रसंग आठवायला लागले त्यात सर्वच घरात कमी अधिक फरकाने घडणारा प्रकार म्हणजे मुलगी बघण्याचा कार्यक्रम..! विचित्र प्रथा आहे असं वाटतं हे बघणं म्हणजे काय असतं..बोलून दाखव..चालून दाखव..स्वयंपाक येतो का..गाणं गाता येतं का.. शिक्षण किती झालय..
वगैरे सवाल जरा विचित्र वाटतं हे सारं पण प्रथा म्हणून चालवलं जातं असा हा कांद्यापोह्याचा सोहळा पन्नास साठ वेळा करुन लग्न ठरवलेल्यांची जोडी बघितली तर नक्कीच प्रश्न पडतो मुलाबाबत की या माठ्याने काय पाहिलं तिच्यात..काही दिवसानं तो कन्फ्यूज माईंडसुध्दा स्वत: विचारायला लागतो पाहण्याच्या कार्यक्रमात मी नेमकं काय पाहिलं हिच्यात..!

हँडसेट खरेदी करुन चार दिवस झाल्यावर एखादा त्याही पेक्षा चांगला हँडसेट कंपनी सादर करते.. ! थांबायला पाहिजे होतं अशी चुटपूट सुरु होते आणि आहे त्याचाही आनंद मावळतो.. मुलगी बघण्याचा कार्यक्रम करुन लग्न केलेल्याला पहिल्या भांडणासोबत पडलेला प्रश्न मी काय पाहिलं हिच्यात..? 
 मग सुरु होतो तो तुलनेचा खेळ.. हिच्या पेक्षा ती चांगली होती.. ! आणि ती तर खुपच सुंदर होती..असे मनाचे खेळ रंगू लागतात..काहीही झालं तरी त्याला उत्तर सापडत.. अर्थात कुणाशीही केलं लग्न तरी हीच अवस्था होणारच..कद्दू छुरे पर या फिर छुरा कद्दू पर करना तो कद्दू को ही है.. हे त्या बुध्दूला उशीरा कळतं

कॉलेज डेज अर्थातच आमची  लॉजिक युनिव्हर्सिटी..  असंख्य फंडे त्यात आवडणारा एक

More Study More Confusion

Less Study Less Confusion

आणि आमची स्वतंत्र तिसरी महासत्ता असायची

No study no confusion.. !

पाहिले..न..मी..तुला

तू..मला..नं..पाहिले

दिसली..आवडली..प्रेम..कबूली..Done   इतकी साधी सोपी छोटीशी Love Story आयुष्यात घडलेली..! म्हणून काय नंतर पुन्हा कुणी आवडणार नाही....?  आणि प्रेमात पडणार नाही मी अशा तहाच्या करारावर सह्या करुन शरणागती पत्करली नव्हती..

पुन्हा कोणी आवडलं.. सांगावं आणि त्यात गैर काहीच नाही..मनात असणं चांगलं आणि सांगणं म्हणजे प्रतारणा असा उफराटा हिशोब ठेवणाऱ्या जगाला का घाबरायचं..! 
सांगून टाकलं लगेच...! मग पुन्हा तिचा फोन..पुन्हा सवाल..
काय पाहिलसं माझ्यात.. !

प्रशांत दैठणकर
9823199466


Monday 8 June 2020

माझिया प्रियाला प्रीत कळेना

पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महिना... माझिया प्रियाला प्रीत कळेना... माझिया प्रियाला.. सकाळी टी.व्ही.वर अपडेट्स बघताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला...सतत काही ना
काही कानावर यायची सवय म्हणून रेडिओचा कान पिळला.... आकाशवाणी रत्नागिरीवर शोभा गुर्टु यांचा आवाज आणि त्यातलं गाणं 5-6 दिवसांची सततची धावपळ विसरून फ्रेश वाटायला लागतं.

भरभरून निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या कोकणाला याच नावाच्या वादळानं अक्षरशः ओरबाडून काढलं. त्याला झोडपलं हा शब्द कमी पडेल इतकं नुकसान नजरेसमोर असताना एक खिन्नता येणं हा मनाचा स्थायीभाव त्याच स्थितीत मी वादळखुणा पाहून काल रात्र परतलो. मूड त्याच पद्धतीचा... पण गाण्यातल्या शब्दांची जादू आणि बाहेर बरसणाऱ्या पाऊस धारा यांनी वेगळ्याच विश्वात नेलं...

मुड हा मनाचा झोका कधी इकडे तर कधी तिकडे. त्याची आंदोलने चालूच असतात... शब्द त्यावर कधी फुंकर घालण्याचं काम करतात तर कधी आग फडकवण्याचं.. सारा काही शब्दांचा खेळ मात्र आज याची सकारात्मकता अधिक जाणवली... दो बूँद जिंदगी के प्रमाणे चंद अल्फाज सोच बदलने की... शब्दांची शक्ती..

आयुष्यात आपण अनुभवी असण्याचा दाखला ज्या पहिलेल्या अधिकच्या पावसाळयांनी देतो त्या पावसाळ्याला होणारी सुरुवात त्याची दोन भिन्न रूपे दाखवणारी होती.
मात्र त्याचं अस्तित्व जीवनासाठी महत्त्वाचा आहे ही जाणीव असलेलं मन त्याच्या आगमनानं आनंदीत होणं अगदीच सहाजिक...

औरंगाबाद सारख्या अवर्षणत कधीसा उपकार केल्यागत पडणारा पाऊस आणि कोकणचा पाऊस याची तुलना शक्य नाही आणि ती न केलेली बरी... एक पावसाळा कोकणात काढल्यानंतर हे जाणवलं की पाऊस काय आणि कसा ते कळण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी इथचं यायला पाहिजे.

आता पाऊस आणि प्रेम मला वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू... तारुण्यातच असं नव्हे तर प्रेमातल्या प्रत्येकांना पावसाचं येणं आणि त्याचं धुंद होऊन बरसणं हे स्वप्नवत असतं आणि स्वप्न सत्यात उतरण्याचा प्रत्यक्ष काळ अर्थात त्याचं धारांनी धुंद होऊन बरसणं सुरू होण्याचा..

प्रीतीचं गीत गाताना संदर्भ पावसाचे जुने नाहीत पण प्रत्यक्षात त्याच्या येण्यानं सुखावण्याची भावना येणार नसेल तर भिजण्यातही अर्थ नाही..

चिंब भिजलं तन माझं... मन रे राही कोरडे... त्या कोरडेपणाची ती भावना व्यक्त करताना हे गाणं आलेलं असणार...

आयुष्याचे अनेक पैलू एका वाक्यात उलगडून दाखविण्याची किमया या गाण्याच्या बोलांमधून आलीय हे देखील जाणवतं.... झालेल्या आनंदाला कारुण्याची किनार अशी शोभा देत नाही .. पण हेच जगणं आहे.

आपण रचलेला बेत पार पडेल आणि सुखरूप पार पडेल असं होत नाही.
कोणत्याही समारंभात हेच अनुभवायला मिळतं मग आयुष्य तर आशा समारंभांची आणि उत्सवांची मालिका आहे... रात गयी बात गयी म्हणत नव्याला आरंभ करताना देखील वाटत राहिलं की एक तेवढं जमलं नाही आयुष्यात... मग वाटचाल होत नाही... पावलं अडखळतात... चाल मंदावते... आणि अशाच क्षणी उभारी देणारा..

पावसात भिजणारा सुखाचा श्रावण हवा वाटते तिला प्रित कळे..ना नाही तर नाही पण तिला कळेपर्यंत आलेल्या क्षणी का जगणं सोडायचं... तक्रारींचा हा पाऊसही मग बरसतो... तिला कळली तर ती देखील लटक्या रागानं प्रतिबोल लावणारय...!

तेरी दो टकियाँ दी नौकरी में

मेरा लाखोंका सावन जाये..

प्रशांत दैठणकर
9823199466

Thursday 30 April 2020

ऋषी कपूर ... Timelass पोस्टर बॉय...!



समय रहतें ही समय का पता नही चलता...
गुजरता हैं वक्त तो हर लमहा याद आता हैं..
prashant
काही असंच झालंय किंवा त्याची सुरूवात झाली कालपासून. कालची सकाळ उजाडली ती मुळी इरफान खानच्या निधनाच्या वार्तेने आणि आज सकाळी ऋषी कपूरच्या निधनाची बातमी... आला तो जाणारच आणि त्याला पर्याय असत नाही मात्र कोण कधी जाईल याची खात्री नाही आणि सारं काही चांगलं आहे असं वाटत असताना एखाद्यानं जाणं नक्कीच धक्का देणारं असतं... तो अनुभव आपण वारंवार घेतो आणि तो येतच राहणार असं वाटतं. आता या जाणा-यांना विदा करायला गर्दी मात्र दिसणार नाही कारण ते कोरोनाचं संकट आहे.

आपणाकडे
आयुष्यात काय कमावलं याचं गणित आपल्या अंतिम संस्काराला किती जण येतात यावर मांडलं जातं असाही एक रिवाज आहे. आता येणं आणि जाणं यातलं अंतर अगदीच कमी कालावधीचं असलं तरी यात मरणानंतर जगणारे अनेक जण आहेत आणि त्यात कलाकार ही व्यकती येते. जगण्याचं खरं मर्म हे म़ृत्यूनंतर आपलं नाव कायम ठेवण्यात अधिक आहे हे सांगायला नको वेगळं.

ऋषी कपूर मनात बसला तो त्याच्या अमर अकबर  अॅन्थनी मधल्या अकबरच्या भुमिकेतून .. कारण अर्थात तोच लहानपणी पाहिलेला त्याचा पहिला चित्रपट होता. त्याच बॉबी आला त्यावेळी वय काही कळण्याचं नव्हतं आणि त्यावेळी पाहून कोणी आवडावी अशी परिस्थीतीही नव्हती.. मी आजवर जे ऋषी कपूरचे चित्रपट पाहिले त्यातून जी भुमिका समोर आली ती म्हणजे नव्या नायिकांना चित्रपटात लॉन्च करायचं आणि त्यांना पहिल्या चित्रपटात यशस्वी करायचं तर ऋषी कपूरसोबत भुमिका द्यावी हेच उत्तम ... तो तितका ग्लॅमरस प्रतिमा जपणारा नायक होता.

कपूर घराण्याचा वारसा असला तरी त्याला पहिल्या संधी पलिकडे काहीच उपलब्ध नव्हते. शोमन राज कपूरने आपला ड्रीम प्रोजक्ट असणा-या मेरा नाम जोकर चित्रपटात ऋषी कपूरला ती संधी दिली होती. राजकपूरच्या लहानपणीचा रोल जराशा तरूण दिसणा-या या आपल्या मुलाला देऊन राजकपूर यांनी खरं तर त्यावेळी कॉस्ट कटींग केली होती.. मेरा नाम जोकर तिकिटबारीवर कमाल करू शकला नाही. प्रदीर्घ लांबी आणि दोन मध्यांतरे असणा-या या चित्रपटाने राजकपूरच्या कारकीर्दीला पूर्णविराम लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

अपयशाने खचून न जाता राजकपूर यांनी नवा मार्ग शोधला आणि तो होता प्रेमकथेचा...
समाजिक आशय बाजूला ठेवून आता केवळ तिकिटबारीवर नजर होती. चित्रपट होता बॉबी... नवी सोळा वर्षाची नायिका डिम्पल कपाडियाची निवड झाली आणि नायक होता त्यावेळचा हार्टथ्रॉब राजेश खन्ना... चित्रपट काढताना राजेश खन्नाला देण्याइतकी मानधनाची रक्कम राजकपूर यांच्याकडे नव्हती आणि पुन्हा एकदा कॉस्ट कटींग करत ऋषी कपूरला कास्ट करण्यात आलं आणि चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडला... अशा प्रकारे ऋषी कपूर अपघाताने सिनेमात आला असला तरी 1973 पासून 2019 पर्यंत या नायकाने आपली आगळी ओळख निर्माण केली... जपली आणि ठसाही उमटवला.

नायिकांचा नायक या अर्थाने ऋषी कपूरची अधिक ओळख आहे असं माझं मत आहे. पहिल्या चित्रपटात डिम्पल कापडिया नंतर त्याचा प्रवास सुरुच राहिला. आधी चित्रपटात आणि नंतर आयुष्यात नायिका बनलेली नीतू सिंग .. ऋषी कपूर आणि नीतू सिंगची जोडी त्या काळात खूप गाजली होती.

नायिकांचा नायक या भूमिकेतून सरगम चित्रपटात जयाप्रदासोबतची त्याची जोडी देखील खूप गाजली हा चित्रपट नवे विक्रम नोंदवणारा चित्रपट होता. मुकी नायिका आणि त्याचा डफलीवाला.. गाजला.

दरम्यान मल्टीस्टार चित्रपटात त्याने अमिताभ बच्चन सोबत केलेली अकबरची भूमिका आणि त्याचं ते .. तय्यब अली प्यार का दुश्मन.. हाय हाय हाय गाणं
आणि परदा हैं परदा ही कव्वाली लोकप्रिय ठरली.. अमिताभ बच्चन सोबत त्याचे जे चित्रपट आले आणि गाजले त्यात कभी कभी तसेच अमर अकबर अॅन्थनी नंतर नसीब तसेच अमिताभ बच्चनसाठी दुसरं जीवन देणा-या अपघातकाळातील कुली आणि भारत आणि रशियाच्या कलाकारांनी बनविलेला अजुबा यांचा उल्लेख करता येईल. 27 वर्षांच्या कालावधीनंतर त्या दोघांनी एकत्र भूमिका केलेला नॉट आउट 102 हा चित्रपट ( 2018 ) शेवटचा होता. या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालं नसलं तरी याची चर्चा खूप झाली.

त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकताना आपणास जाणवेल की नव्या नायिकांचा नायक का म्हणता येईल. सरगम- जयाप्रदा,
कर्ज- टिना मुनीम, प्रेमरोग- पद्मिनी कोल्हापूरे, हिना - झेबा बख्तियार आणि सर्वात अधिक गाजलेला दिवाना- दिव्या भारती.  दिवाना हा चित्रपट जसा शाहरूख खानचा पहिला चित्रपट होता तसाच तो दिव्या भारतीचा देखील पहिलाच चित्रपट होता. त्याआधी तिने तमिळ चित्रपटात भुमिका केल्या होत्या मात्र हिंदीत तिला ओळख याच दिवाना चित्रपटामुळे मिळाली.  ऋषी कपूरची भुमिका या दोघांपेक्षा अधिक गाजली.

याखेरीज नायिकांच्या उतरत्या काळात ज्या नायिकांनी ऋषी कपूरसोबत चित्रपट केले त्यांनाही त्याच्या इमेजचा फायदाच झाला. नगिना- श्रीदेवी, बोल राधा बोल- जुही चावला..

चित्रपटात आपली आगळी ओळख बनविणा-या या नायकाने शेवटच्या काळात आपली इमेज तोडून भुमिका केल्या यातली ऋत्विक रोशन नायक असणा-या अग्नीपथ चित्रपटातील त्याची भूमिका सर्वांचं लक्ष वेधणारी ठरली.

त्याच्या चित्रपटाच प्रवास कसा होता असं सांगायचं तर तो झुठा कहींका पासून झुठा कहींका असा होता असं म्हणता येईल. नीतू सिंग सोबतचा त्याचा हा चित्रपट 1979 साली आला होता. यातील गाणी खूप गाजली आणि चित्रपट देखील चर्चेत होता त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी याच नावाने चित्रपट आला ज्यात देखील त्याची भुमिका होती.
आपल्या चित्रपट प्रवासात ऋषी कपूरने एक चित्रपट दिग्दर्शित केला तो होता आ अब लौट चले.. आणि यात राजेश खन्नाची भुमिका होती. ज्या चित्रपटात राजकपूरने राजेश खन्नाला नायक घेऊन बॉबी काढायचा ठरवला त्यात ऋषी कपूरला संधी मिळाली आणि त्याच ऋषी कपूरने दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात राजेश खन्ना.. अर्थात राजेश खन्ना या चित्रपटात चरित्र नायक होता आणि यात नायकाची भुमिका विनोद खन्नाचा मुलगा अक्षयला
मिळाली होती आणि नायिका होती ऐश्वर्या राय.

पृथ्वीराज आणि राजकपूर यांचा वारसा समर्थपणे चालवणा-या या नायकाने आपली जागा रसिकांच्या मनात निर्माण केली ती कायमची कारण त्याने जे चित्रपट दिले ते आजही सा-यांच्या स्मरणात राहणारे आहेत .. त्यापैकी सर्वोत्तम होता तो त्याचा चांदनी हा चित्रपट.. सफेद साडीत वावरणारं ते श्रीदेवीचं तारुण्य आणि एव्हरग्रीन ऋषी कपूर.. त्यातली गाणी आणि कथानक गेल्या 30 वर्षात जे आयकॉनिक चित्रपट आले त्यातला हा प्रेमाचा आयकॉन ठरलेला चित्रपट.. यात विनोद खन्नाचीही भुमिका होती... आज त्या दोघांच्या पाठोपाठ ऋषी कपूरचाही जीवनपट संपला ही रसिकांसाठी वाईट बातमी आहे... मात्र इहलोकाची यात्रा संपली असली तरी चांदनी आणि त्यासारख्या इतर चित्रपटांचं गारूड निर्माण करणा-या ऋषी कपूरने रूपेरी पडद्यावर मात्र आपल्या मृत्यूनंतरही आपलं नाव राहणार अशी कामगिरी केलीय.. लाखोंच्या या हरदील अजीज अदाकारास अलविदा....



प्रशांत दैठणकर

9823199466

Tuesday 21 April 2020

मरणाचे भय अन् जगण्याचे भान...!

....पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा... सुधीर फडके यांनी गायलेलं एक अजरामर असं गीत आणि चिंतन करायला लावणारे त्याचे बोल आज आवर्जून आठवतात कारण अर्थात कोव्हीड- 19 यानेकी कोरोना

कुणीतरी एक छान वाक्य लिहिलय समाज माध्यमांवर ज्या दिवशी आपण या ग्रहावर काही काळाचे पाहुणे आहोत त्याची जाणीव मानवाला होईल त्यादिवशी त्याच्या जगण्याला प्रारंभ होईल अन् त्याच्या जगण्यात निसर्गा बाबत असणारा आदर वाढेल.

सूर्य तर नित्यनेमाने उगवतो त्याचं कुणाला कौतुक नसतं . तो जगण्याचा एक भाग होऊन जातो .मात्र ज्या दिवशी त्याला ग्रहण लागतं त्यादिवशी
साऱ्यांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते... प्रकर्षाने जाणवणं काय म्हणतात ते या दिवशी असतं.

चंद्राच्या काय ते वेगळेच Citylight च्या धुरळ्यात त्याकडे लक्ष असतं कुणाचं. पण लहान लहानपणी गावी सुट्टीत जायचो त्यावेळी सांजची जेवण झाल्यानंतर अंगणभर बसलेल्या सतरंजीवर पडून टिपूर चांदणं बघायचो, सोबत आजीच्या गोष्टी असायच्या असं चांदणं नंतर अभावानं बघायला मिळालं... चंद्र... त्याची आठवण तारुण्यातील प्रेमातल्या त्या मंतरलेल्या दिवसांची बाकी वेळा आयुष्याच्या धावपळीत किती जणांना वेळ आहे चंद्र बघायला. फोटोग्राफीची आवड म्हणून किमान पौर्णिमेच्या चंद्राचा फोटो घेतला जातो बाकी मात्र सगळाच अर्धचंद्र निसर्गाला...

आपण
आपल्याच विश्वास गुंतून पडल्यावर वास्तवातील विश्वाकडे लक्षच जात नाही. त्यात भरीस भर म्हणून आता आभासी विश्व त्यात शिरलय. या आभासी विश्वाने अर्थात Virtual Reality ने माणसाला जवळ आणलंय की दूर केलय यावर संशोधनच करावं लागणार आहे.

तंत्रज्ञानानं जग जवळ आणलं, दूर अंतरावरील व्यक्तीला आपण हातातल्या मोबाईलवर बघून गप्पा मारू शकतो, इतकी प्रगती झाली असली. तरी त्यातला कोरडेपणा, रुक्षपणा वाढत आहे हे देखील खरं, नाही म्हणायला औषधाला शिल्लक असणारे दोन-चार मित्र आपण आयुष्यात बाळगतो... याला बाळगतो असंच म्हणावं लागेल. निरागस मैत्र असण्याचा काळ संपल्यानंतर ती मैत्री फक्त Give and Take पुरतीच उरते. नेते मंडळी जसे कार्यकर्ते बाळगून असतात तसं आपण मित्र बाळगतो हेच खरं.
मित्रांसोबत महिन्याकाठी एखादी गप्पांची मैफल हमखास ठरलेली, आता त्यालाही कोरोनाने अटकाव केला आहे.

कोरोनाचं भय साऱ्यांनाच आहे पण वाईटातही काही चांगलं बघायला हवं ना.. कारोनामुळे साऱ्यांना घरातच राहावं लागतय, यामुळे माणसं किमान स्वतःविषयी आणि कुटुंबाविषयी विचार करायला लागले आहेत.

आत्मकेंद्रित राहणारी व्यक्ती आत्मसंवाद करायला लागल्यावर त्याला जगाची जाणीव नव्याने होणारच ना.माझ्यातल्या मी पणात मग्न असणारी माणसं आता या लॉकडाऊनमुळे अति मी पणात अडकली आणि अति तिथं माती या न्यायानं स्वतःचं स्वतःवर असणार प्रेम किती चूक याची जाणीव होणं आणि कुटुंबातील व्यक्ती व जगातील इतर समाज व निसर्गाचे भान येणं याला या कोरोनाने सुरुवात करून दिली असे म्हणायला हरकत नसावी.

नद्यांचं पाणी नितळ झालय, हवा शुद्ध झालीय, दूरपर्यंत असणारे डोंगर दिसायला लागलेत, प्रदूषण आणि कचरा कमी झाला आहे. इतर प्राण्यांचे अस्तित्व मोकळेपणानं दिसतय असे एक ना अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका अर्थाने आपल्यातील प्रत्येकाला मृत्युच्या भीतीने जगण्याचं भान आलयं... यातूनच इतरांचा सन्मान येणार आहे. इथं तुझंही काही नाही आणि माझही... सब है भूमी गोपाल की... असा वैश्विक दृष्टिकोन या संकटाने दिलाय.



प्रशांत दैठणकर
9823199466


Monday 20 April 2020

माका म्युझीक नाको रे...

मन सैरभैर... का अचानक व्हावे. काय ठाऊक असा सवाल आणि मन मनाच्या डोहातलं सारं ढवळून निघतं... अलगद एखादा भावनेचा खडा हे सारं ढवळून काढतो.. मग मन शांत व्हायला बराच काळ जातो... म्हणूनच कधी कधी नकोशी वाटतात काही गाणी..

संगीत मनाला उभारी देतं असं कुणीही आणि कितीही ओरडून सांगितलं तरी ते मला तरी किमान मान्य नाही. शुष्क झालेल्या त्वचेवर नखाने ओरखडा उमटावा तसं ही गाणी मनावर ओरखडे काढत असतात.

रणरणत्या उन्हात तापलेल्या डांबरी रस्त्यावर सारं शांत असताना एखादा टुकार वाहनचालक विना सायलेन्सर ची गाडी दामटवताना जो कानाला त्रास होतो होईल त्याच तिव्रतेचा त्रास मनाला अशा एखाद्या गाण्यामुळे होतो.

ते क्षण दुःखाचे होते का ?
तर तसं नाही ते क्षण आनंदाची होते पण त्याची आज अचानक आलेली आठवण दुःखात का टाकत असेल असाही विचार मनात येतो.

उसके खेल निराले... अर्थात मनाचे खेळ आणि भावनांचा घोळ हा खूप अनाकलनीय प्रकार आहे. मुळात मन हे शरीराचा भौतिकार्थाने भाग नसणारं परंतु साऱ्या शरीरावर नियंत्रण ठेवणारा अजब असं अंग आहे.

सारा का सारा सिर्फ सुनाई दे .... 
 या प्रकरणातला शरीरातला मिस्टर इंडिया म्हणजे हे मन... बरं त्या मिस्टर इंडिया ला किमान लाल रंगात बघायची सोय तरी होती. इथं मनाचा गुंताच वेगळा... त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करताना तेच आतून ओरडतं..

ये लाल रंग कब मुझे छोडेगा

मेरा गम कब तलक......


मनाचा शोध आणि त्याचा बोध हा अज्ञाताचाच प्रवास आहे.
वेगळ्या भाषेत सांगायचं तर त्याचा शोध संगीतातल्या ८ व्या सुरात शोध किंवा इंग्रजीतील 27 व्या अल्फाबेट चा शोध घेण्यासारखं आहे.

मन शोधताना त्याचा लहरीपणा प्रथम समोर येतो... लहरीपणा ज्याला सोप्या मराठीत मूड म्हणता येईल. तसंही आपण मौसमी पावसाच्या क्षेत्रात म्हणजे लहरी निसर्गाच्या क्षेत्रात राहतो... निसर्गाची कोणती लहर, काय लहर करेल याचा भरवसा नाही. त्यामुळे त्याच्याही येण्याचा आनंद कमी आणि धास्ती अधिक असते.... आता त्याचं काय कमी तर बहुतेकांच्या Better half चाही एक स्वभाव मुडी असतो आणि उरलेली कसर इतरांच्या लहरीपणामुळे लक्ष देण्यात भरून काढली जाते.

मन स्थिर ठेवायचं तर मनोनिग्रह महत्त्वाचा असतो... मन शांत करणं हे डायटिंग सारखं असतं नेमकं डायटिंग ठरवावं त्यावेळी चमचमीत पदार्थ खुणवायला लागतात.... पाणीपुरीचा गाडा नजरेसमोर तरळतो आणि आपसूक तोंडाला पाणी सुटतं...

मनाच्या खोड्या मन शांत करताना सुरू होतात. पिपाणी वाजवणाऱ्या समोर लहान मुलांनी खिजवत चिंचेचे बोटूक चोखावे तसं शांत होताना मन अधिक अशांत होतं... 
क्या करे क्या ना करे... कैसे मुश्किल म्हणून 
हाय !.......................................  करण्याखेरीज आपल्या हाती काहीच नसतं..

संगीत हा जगण्यात काळाच्या समांतर चालणारा प्रवास आहे आणि आदमी मुसाफिर है.... तो आते जाते रस्ते में यादे सोडून जातो.... या आठवणींच्या खुंटीवर या गाण्याची गाठोडी टांगली जातात आणि म्हणूनच ते गाणं लागलं की ती खुंटी स्पर्शली जाऊन त्या आठवणींची साठवण उधळली जाते आणि मन क्षणार्धात वास्तवातून भूतकाळात जातं.... याची गती प्रकाशाच्या गतीपेक्षाही अधिक असल्याने मन सावरण्यापूर्वी पसरलेलं असतं.

संगीत साधना....
Music थेरपी.... आणि खूप काही ज्याला ज्यात आनंद वाटतो तो त्याने आपला आपला मिळवावा.... पण Maximum Time संगीत आठवण कमी आणि अडचण अधिक असल्याचा माझा वैयक्तिक अनुभव आहे...

आपलं मन आपण मांडाल तर स्वागतच पण माझं मन मत स्वीकाराच असा आग्रह आणि अट्टहास मुळीच नाही. प्रत्येकजण वेगळ्या विश्वात प्रवास करीत असलं तरी अनुभवांचा प्रवास आणि अनुभूती सारखीच                                 
   अर्थात...हमसे आया ना गया 

उनसे बुलाया ना ... गया 

 बघा  काही आठवतय काही आपल्या आयुष्यातलं... ?


प्रशांत दैठणकर

9823199466

Friday 3 April 2020

स्मृतींची ग्रहणे

तीच सळसळ पिंपळपानांची... अंगणभर पसरत जाणारा त्याचा आवाज आणि सोबतीला तो रातराणीचा दरवळ.. दिवस ते अभ्यासाचे आणि परिक्षांचे तसेच आज ते आठवणीत राहिलेल्या तुझ्या त्या प्रेमाचे .. निमित्त होतं ते अभ्यासाचं आणि तो बहाणा होत हे तुलाही कळत होतं.. तू अबोला धरलास तरी तुझे बोलके डोळे सारं सांगत होते.. ते ताजे झाले पुन्हा आज रात्री जाग अचानक आल्यावर.. कसे आणि किती झरझर सरले ते आज आठवतंय.. अनेक क्षण येतात आयुष्यात ज्यावेळी आपण गाफिल राहतो आणि ते निघून गेल्यावर हातात सोनं पाहून निराश झालेल्या ते परिस शोधणा-यासारखी आपली अवस्था होत असते.. हातात लोखंडाचं सोनं झालेलं पण चालण्याच्या नादात परिसाचं भान राहिलं नाही..
ते आयुष्याला सोनं करणारे क्षण हाती कधी येवून गेले ते कळलं नाही मात्र आयुष्याचं सोनं झालं हे खरं आहे.....

काही दिवस असेच असतात की जे आठवणीत पुन्हा पुन्हा जगले जातात आणि ते आयुष्याचा प्रेरणास्रोत म्हणून कायम मनाच्या एका कोप-यात आपली जागा ठेवून असतात. याच दिवसांना पायाभरणीचे दिवस म्हणावे लागेल.. कारण ते दिवस मंतरलेले नक्कीच नव्हते.. बालपणातून तारूण्यात आल्यानंतरचा सारा काळ मात्र मंतरलेला होता. ते वेड.. ती धुंदी सारं काही वेगळं होतं त्याच्याही आठवणी वेगळ्या आहेत आणि त्यानेही मनाचा एक कप्पा आपल्या ताब्यात घेतला आहे...

अगदी काहीच काम नाही अशावेळी आपणाकडे घर आवरायला घेतात आणि कालानुरूप उपयोग संपलेल्या वस्तूंचा कचरा काढण्याचं काम सुरू होतं.... मनही जरा शांत झालं की ते देखील असं आवरावं आणि अडगळ झालेल्या भावनांचा निचरा करावा .. कधी तो कुणाला सांगून तर कधी त्या कोंडलेल्या भावनांना आपणच आपल्याशी संवाद साधत एकटेपणात डोळ्यातून आसवांच्या वाटे त्याचा निचरा करीत रहावं.. विस्मरण ही मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे.. विस्मरण नसतं तर डोक्यात भावनांनी गर्दी करून जगणं मुश्कील केलं असतं..
असं असलं तरी काही भावना मनाला चिकटून राहण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही वेळीच आपण वेगळी वाट करून मनातून काढलं पाहिजे म्हणजे नव्या सृजनाला त्यात जागा मिळेल...

दैनंदिन आयुष्यात आपण फारसा गंभीर विचार करीत नाही ते रोजचं अंगवळणी पडलेलं जगणं असतं तरी देखील आपण गंभीरपणे जगतो असं अनेकजण म्हणतात त्याचा नेमका अर्थ आणि त्याचा बोध अनेकदा होत नाही हे खरं.. आपण मात्र आयुष्यातील ते काही मनापासून जगलेले दिवस आणि त्यांच्या आठवणींची साठवण यावर आयुष्याची वाटचाल करायची असते असं माझं मत आहे.

आज ग्रीष्माची चाहूल लागल्यावर मन पुन्हा त्या दिवसांकडे धाव घेतं आणि तो क्षण जसाच्या तसा नजरेसमोर उभा राहतो जणू मधल्या काळात आपण काहीच जगलो नाही असा किंवा त्या क्षणांची ताकद इतकी विलक्षण असते की मधला काळ त्यामुळे झाकोळला जावा... अशी स्मृतींची ग्रहणे अधून मधून आयुष्यात येतात तो आयुष्याचा एक भागच म्हणावा... ते आनंददायी वाटलं ती ते तितकसं नसतं याची मनाला जाणीव आतून असते.. ही मळभ दाटण्याची स्थिती संपल्यावर पुन्हा पुढच्या क्षणी आयुष्यात रूजू होताना जरा जडच जातं म्हणा...
ती गाणी खुणावतात आणि त्या लकेरी कानात रूंजी घालत राहतात .. मन वेडं .. ON CROSSROADS .. जरा थबकतं आणि ती आठवण विसरून ( ? ) जगण्याचा प्रयत्न सुरू करतं...

येणारा दिवस सारखा नसतो हे देखील आपल्याला एक वरदान आहे त्यात कामकाजाचा नेहमीचा तोच- तो पणा ( ROUTINE ) कंटाळा आणणारा असला तरी आपण त्यातून नाविन्याचा शोध घ्यायला पाहिजे.. आपण तो घेत नाही यालाच कंटाळाही अंगवळणी पडणं म्हणता येईल. रोजची सकाळ नवी आणि वेगळी असते तसाच दिवस आणि ऋतूप्रमाणे सृष्टी बदलत असते.. आपण किती बदलतो तो महत्वाचं आहे.. आठवणींचा आधार कि भार याचाही सारासार विचार आपल्याला करावा लागेल. मी माझं आयुष्य सुंदर बनवणार हे रोज मी सकाळी आरशासमोर उभं राहून मलाच सांगतो.. कारण माझा आनंद हा माझा आहे.. इतरांना काय कळतं की मी कसा आहे... ते फक्त अंदाज बांधत असतात..

स्मृतींची ग्रहणे ही याच साठी महत्वाची 
आहेत असं मला वाटतं...
काही काळासाठीचा झाकोळ उरलेलं आयुष्य उजळणारा असेल तो हवाच आहे... हा देखील मनाच्या या अगम्य प्रवासाचा एक आवश्यक असा थांबा आहे.. म्हणूनच ते दिवस तसेच्या तसे आठवल्यावर शरीराचं वय वाढलं असलं तरी मन अद्यापही त्याच वयात आहे .. ते चौथ्या मितीत आहे.. एकाच वेळी वास्तवातलं वय जगताना ते तरूणही आहे आणि त्याचं बालपणही संपलेलं नाही याची जाणीव होतं.... स्मृतीपटल कोरा होत जाताना एक नवा आशेचा उजेड दिसू लागतो.
. नव्याने जगण्याचा आणि आनंदी जगण्याचा संदेश देणारा आणि मग....... नवं सृजन करणारा काळ सुरू होतो पुन्हा नव्याने

प्रशांत दैठणकर
98231 99466 



Friday 27 March 2020

LOCKDOWN...! #Stay_Home_Stay_Safe

आयुष्य एक प्रकारे Pause वर आलय अशी काहीशी स्थिती या Lockdown ने आज आणली आहे. मी खूप Busy म्हणणा-या ( की दाखवणा-या ) सा-यांसाठी हा काळ नक्कीच विचार करायला लावणारा आहे. हीच संधी आहे माझ्यातला मी पणा बाजूला ठेवून मी नेमका काय हे शोधण्याची.. आत्मचिंतनाची.. Urgent काय आणि काय नाही याचा परिचय देणारा हा काळ आहे..खूप Urgent आहे असे म्हणणारे आज त्याचेच विडंबन करताना आपणास दिसतील.. एक प्रकारे हे आव्हान आपणास जाणून आपले स्थान या जगात नेमकेपणाने काय आहे याचाही बोध होईल. जान है तो जहान है हे मात्र खरं.

काळाच्या ओघात धावत राहणा-यांना आता जाणवत असेल की आपण जगायला विसरलो होतो.. असं म्हणतात की मरणाची भिती असेल तर जगण्याचं महत्व कळतं... समाज माध्यमांवर होत असणारे अनेकांचे खुलासे तर हेच दाखला देत आहेत की... ते जगणं किती नाटकी होतं.. योगायोगाने आज जागतिक रंगभूमी दिन आहे.. जिंदगी जिंदादिली का नाम है .. मुर्दादिल क्या खाक जिया करते है हे कोणाशा चित्रपटातलं वाक्य या निमित्तानं आठवलं.. जगण्यावर मंथन करण्याची एक संधीच जणू आज म़ृत्यूच्या भितीने सर्वांना दिली आहे.

बाबू मोशाय...
हम तो रंगमंच की कठपुतलीया है.. जिसकी डोर उपरवालेके हाथोंमें है ... कब कौन कहां उठ जाय ये किसी को नही पता... राजेश खन्नाचा तो गाजलेला संवाद... आणि त्याच चित्रपटाचा रिफाईन रिमेक असणारा कल हो ना हो... त्यातही तेच .. हर पल यहां जी भर जियो.. . आपल्या विचारांना यातून चित्रपट बघताना जे जाणवलं होतं ते आज प्रत्यक्षात अनुभवण्याचा हा काळ आहे असं मला वाटतं.. आयुष्याची क्षणभंगुरता एकप्रकारे यातून दिसते आणि घराघरात बसलेली प्रत्येक व्यक्ती ते अनुभवते आहे याची मला या क्षणी खात्री आहे.. यावर टिंगल टवाळी करणारे व्हिडीओ त्याची साक्ष देतात .. अति हतबलता आणि असहाय्यता विनोदाला जवळ करते.. यासाठीच आपण विनोदाचा आसरा घेतला की नाही हे प्रत्येकाने आपल्याच मनात डोकावून आपल्यालाच विचारावं...

अनेक जण छंद म्हणून प्राणी पाळतात ..
त्यांना मिरवतात देखील पण सतत एकाच ठिकाणी अडकून राहणं म्हणजे काय याचा देखील अनुभव याच काळात अनेकांना येणार आहे. आपल्याकडे भूतदया हा शब्द मराठीत आहे त्याचा अर्थ दया असाच आहे .. कैद असा नाही याचा अनेकांना बोध करून देणारा हा काळ ठरणार आहे याची प्रचिती एक दोन मित्रांच्या संवादातून मिळाली आहे आतापर्य़ंत...

आयुष्य म्हणजे खळाळतात प्रवाह असतो.... नदी वाहत राहते आणि सागरास मिळते ते आयुष्य असतं... ती संथावते पण प्रवाहीत असते. आणि हा प्रवाह एकाच जागी स्थिरावला तर त्याचा डोह होतो... आणि सारंच खुटत जातं.. आज या Lockdown च्या निमित्ताने त्या स्थिरावण्याचाही अनुभव याच काळात येणार आहे.. पण सुदैव हेच की हा ब्रेक खूप छोटा आहे आणि आयुष्य खूप मोठं.. आपण जगलो तरच पुढचं जग दिसेल या जाणिवेतून काही काळ ब्रेक भेटला आहे तर त्याचा आत्ममंथनासाठी वापर करून आपण नव्याने जगण्यासाठी तयारी करायला पाहिजे.. उगाच घराबाहेर पडण्याचं धा़डस आपणासाठी आणि समाजासाठी ही धोक्याचं आहे.. जपा ..

दगदग होते असं आपण नेहमी सागंतो .. धकाधकीचं आयुष्य आहे असंही सांगतो.. क्षणाची उसंत न घेता धावत राहतो.. यात प्रवासात आपण किमान तास दोन तास रिकामे असतो मात्र त्यावेळी आपलं मन जगाचा मागोवा घेत असतं त्यामुळे त्या वेळेचा सकारात्मक उपयोग न होता आपण ताण वाढवत असतो .. आता ना धावपळ ना दगदग सारं काही निवांत .. यात निसर्गाचं रूप बघा त्याची साद ऐकून त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा.. आपल्या कुटुंबासाठी काही ‍Quality Time मिळालाय या जाणीवेतून त्यांना वेळ द्या.. खूप चांगलं वाटेल.. नाही त्याचं स्वप्न बघणं  विसरून आहे ते #Njoy करा...

जिंदगी ..इक पहेली भी है...


प्रशांत दैठणकर

9823199466