Friday 18 May 2018

सौंदर्य


सौंदर्य, असलं पाहिजे पण त्या सौंदर्याचं दर्शन झाल्यावर जे अनुभव येतात ते अतिशय वेगळे असतात.

सांग दर्पणा मी कशी दिसते ?. असं म्हणत आरशासमोर स्वत:ला न्याहाळत तास न तास बसायचं हे तरुण मुलींचं नेहमीचं आवडतं काम.

सौंदर्याच्या बाबतीत पुराणकालापासून वेगवेगळे दाखले दिलेले आहेत. आजकालचा जमाना हा चित्रपट आणि टि.व्ही. चा जमाना यामुळे सौंदर्याला अधिक महत्व आले आहे. मात्र माझं एक मत त्या दिसणाऱ्या सौंदर्याबाबत नाही.

सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं.

असं देखील म्हटलं जातं एका अर्थानं ते बरं आहे. बघणाऱ्याची नजर ज्याला पारखी नजर म्हणता येईल ती बरोबर सौंदर्य शोधून घेते. इथं सांगायचा मुद्दा हा की सौंदर्य आणि रंग यांचा संबंध नाही.

गोरी असेल तरच सुंदर असते असे नाही तर रंगानं काळया असणाऱ्या देखील सुंदर असतात. ते सौंदर्य बघण्याची तुमची दृष्टी आहे की नाही हे महत्वाचं.

सौंदर्य हे सौंदर्यच असतं पण त्याला अनेक सवयी असतात हा अनुभव आहे. पहिला साधारणसा अनुभव म्हणजे सौंदर्य हे गर्वासह येतं.

माझं म्हणणं अनेकांना पटणार नाही पण मी अनुभवानं सांगतो स्वत:च्या रुपाचं कौतूक इतरांनी करावं असं वाटणाऱ्या सौंदर्यवती अनेकदा रुपगर्विता असतात. तुम्ही सुंदर म्हटलं तर पाहिजे परंतु याची वाच्चता इतरांसमोर झाली तर त्यांना राग देखील येतो याला मी Beauty Private Limited म्हणतो. भारतीय समाज व्यवस्थेत सौंदर्य दाखविण्यापेक्षा लपवण्यावर अधिक भर दिला म्हणून असेल किंवा मानसिकता असेल पण सौंदर्याचा साधारणत: हाच प्रकार भारतात अधिक दिसतो.


सौंदर्याला आणखी एक शाप म्हणजे केवळ सौंदर्य हे आयुष्य घडवू शकत नाही. शापीत सौंदर्याची कारणं अर्थात त्या सौंदर्याचा असणारा गर्व हेच आहे.

सौंदर्याचं प्रतिक म्हणून जगाला ज्याची ओळख आहे ती इमारत म्हणजे ताजमहाल. आग्रा येथील ही इमारत सौंदर्यासोबत प्रेमाचं प्रतिक म्हणून बघितली जाते. साधारणपणे प्रेमिकेला भेट देताना व्हॅलेन्टाईनला ताजची प्रतिकृती गिफ्ट करणारे अनेक आहेत. प्रत्यक्षात हा ताजमहाल ही एक कबर आहे, याचं भान किती जणांना असतं हा खरा सवाल आहे. काही नावं डोळयापुढे आणल्यावर सौंदर्य हे शापित असतं याचा उलगडा होईल.

सौंदर्यामुळे जगणं अशक्य होईल इतकी वेळ कुणावरही येवू नये. मर्लिन मनरो, मधुबाला, दिव्या भारती, श्रीदेवी....आयुष्यभर दु:ख यातून त्रास आत्महत्या, गुढ मृत्यू...... हे नेमकं काय दर्शवतं.....

सुंदरता आणि साधेपणा याचा संगम असेल तर जगणं सोयीचं असतं असं मला वाटतं..... जस विद्या विनयेन शोभते..... तसं सौंदर्य साधेपणानं अधिक खुलत असतं.....
कुणाच्या सुंदरपणाचं कौतूक करताना भारतीय समाजात काळजी घ्यावी असं मी आवर्जून सांगेल कारण असं करणं या समाजात आजही स्विकारलं जात नाही.

ज्या देशाने जगाला कामसूत्र सारखा ग्रंथ दिला त्या देशात लैंगीकतेवर खुलपणाने चर्चा म्हणजे संकट मानलं जातं त्या देशात सौंदर्यावर बंधने अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळेच घुंघट, बुरखा आदी आजही इथं सामान्य मानले जातात.

मुळ मुद्दा सौंदर्य आणि त्यातून येणाऱ्या गर्वाचा आहे. अशा अनेक रुपगर्विता आपल्या आसपास वावरताना दिसतील.

हिंदी चित्रपटात अशा अर्थाने एक गाणं आहे. अर्थात ते गोरेपणात असणाऱ्या सौंदर्याबद्दल आहे.

किशोरदाच्या आवाजात असलेलं ते गाणं

गोरे रंग पे ना इतना गुमान कर
गोरा रंग दो दिन मे ढल जायेगा !


एक सत्य त्या गाण्यात मांडलय ते बरोबरच आहे. वाटतं वय आणि सौंदर्य याचं एक नातं आहे. वय अधिक झाल्यावर सौंदर्य बिघडतं आणि त्याच्या चिंतेत अनेक जणी जगत असतात.

माझं मत असं की, त्या-त्या वयानुसार निसर्ग जे बदल घडवतो ते स्विकारले पाहिजे, निसर्गनियम पाळला पाहिजे म्हणजे आपण अधिक सुंदर दिसतो.

स्त्री सौंदर्यासोबत चर्चा असते ती पुरुषांमधील सौंदर्याची ...... हो पुरुष देखील सुंदर असतात. आता याला इंग्रजीत दोन स्वतंत्र शब्द आहेत हा भाग वेगळा. मुलींसाठी Beautiful आणि मुलांसाठी Handsome. मराठीत मी सोंदर्य किंवा सुंदरताच शब्द वापरेन. त्याला रांगडेपणा म्हणणार नाही. प्रत्येक व्यक्ती काही पहेलवान टाईप असत नाही म्हणून काय सौंदर्याची परिभाषा बदलायची.

वाढत्या
वयात स्वत:ला आहे तसं स्विकारणारा अजीतकुमार हा दाक्षिणात्य नट म्हणजे पुरुष सौंदर्याचं प्रतिक म्हणता येईल. केस काळे करुन तरुण दिसण्याचा अट्टाहास न करता तो ज्याभूमिका करतोय त्याला मिळणारा प्रतिसाद बघता माझं म्हणणं सिध्द झालय असं मला वाटतं.....
- प्रशांत दैठणकर

9823199466

No comments: