Tuesday 23 August 2011

पहली वो मुलाकात उनसे ... !



          तिचं येणं माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारं ठरलं. ती येण्याच्या आधी आयुष्य होतं ते फक्त रंगीन आणि रंगीन मात्र ते तिच्या येण्यानं सप्तरंगी झालं.
     घाबरत घाबरत गुलमंडीवरलं मेवाड हॉटेलचं ते अर्धा दरवाजा उघडझाप करणारं केबीन दोघांनी गाठलं कुणी बघत तर नाही ना अशी भिती... आता हॉटेलमध्ये आल्यावर भिती वाटायचीच.. आयुष्यात पहिल्यांदाच कुणा मुलीसोबत मी बाहेर पडलो होतो आणि वय ते किती माझं सतरा आणि तिचं सोळा ... !
           आज मागे वळून बघताना तो प्रसंगी तितकाच ताजेपणानं जगतो... !
     दो चाय लाना  ! वेटरला सांगितलं. अगदीच अल्पवयीन तरुण तरुणी आल्यानं तो वेटर चारवेळा केबिनमध्ये डोकावून बघत होता.
     नाही म्हणायला आधीचा परिचय होताच ना. अगदीच सख्खे शेजारी. सकाळी वाड्यात नळावर पाणी भरताना भेट व्हायची...तिची पाणी भरण्याची लगबग कारण लगेच कॉलेजला जायचं असायचं... साल 1986 गणेशोत्सवाचे ते दिवस... त्यावेळी औरंगाबाद ब-यापैकी मोकळं शहर होतं. आजच्यासारखी बजबजपुरी निश्चित नसायची गुलमंडीवर.
     माझ्याशी लग्न करणार आहेस का ?  का उगाच फिरवायचा इरादा आहे  ? ती धाडकन बोलली पहिल्या भेटीत प्रेमाची कोंडी अशा प्रश्नांच्या बॉम्बने फुटेल याची मला अपेक्षा नव्हती ...
     ही त्यासाठीच तर तुला भेटायला बोलावलय... माझा जबाब.
     मग आपण उद्या कुठं भेटायचं ?  पुन्हा माझा सवाल...सांगते मी नंतर ... ती बोलली चहा संपला. हिंमतीनं तिनं पहिल्याच भेटीत विचारलेल्या प्रश्नाचं निश्चितपणानं कौतुक होतं.
     चहा संपला आणि पहिली भेट देखील.
प्रेम असंही असतं...मी प्रेमानं मलाच विचारलं पण इरादा पक्का होता...!
तिला भेटण्याचं नंतर वेडच लागलं. मी त्या काळात कुठे होतो मलाही कळायचं नाही. कॉलेजमध्ये कट्टयावर बसून गप्पा मारताना असायचो मित्रांसोबत पण मन मात्र तिला शोधत असायचं... आमच्या दोघांची कॉलेजेसही वेगवेगळी होती... ती आता काय करीत असेल... कॉलेजमधून निघाली असेल का, कधी निघेल ? ना ना प्रश्नांचा फेर माझ्या मनात असायचा.
माझं सायन्स ग्रॅज्युएशनचं ते पहिलं वर्ष आणि ती बाराव्या वर्गात...!
घरालगत घर आणि संबंधही तितकेच घरोब्याचे त्यामुळे सायंकाळी कधी एकत्र पंगत व्हायची नंतर जमे ती पत्‍त्यांची मैफल ... पत्‍त्यांच्या  आडून तो चोरुन बघण्याचा खेळ चालायचा... आपण तिला बघायचं आणि हे कुणी बघत नाही ना हे देखील बघायचं.
त्या पहिल्या भेटीला आता 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या गणेशोत्सवात पण अगदीच कालचा प्रसंग वाटतो, कालानुरुप प्रेम आणि नंतर विवाह असा प्रवास करुन आज 25 वर्षांनी परत त्या प्रसंगाला बघताना तिचा दृढपणा मनात ठसतो आणि आजही आपार प्रेम आणि त्या पलिकडचा प्रवास करीत ती निरपेक्षवृत्तीनं संसारात प्रत्येक क्षणी साथ देताना पाहून सातव्या स्वर्गात असल्याची भावना होते.
निर्णय काय आणि कोणत्या परिस्थितीत घ्यावा हे फार थोड्या जणांना कळतं दोघेही शिक्षण घेत आहेत. पुढच्या दिशा माहिती नाही... करिअर... त्यावेळी दोघांच्याही मनात विचार नव्हता होतं ते फक्त आणि फक्त प्रेम.... असच असतं प्रेम.
प्रेम जे घडावं लागत नाही... ते फक्त जडतं.... निरपेक्ष, निस्वार्थ, नि:संशय मनाचा तो निरागस संवाद असतो. ती एक निर्मळ भावना नाजूक नजरेत नितळपणे पाझरत असते. आजही प्रसंग आठवला की मी भावनिक होतो...!  डोळ्यांच्या कडा नकळत पाणावतात.. एकांतात कधी हे क्षण जेव्हा नजरेसमोर येतात त्यावेळी मी स्वत:ला थांबवू शकत नाही... हे आसू समाधानाचे, प्रेमाचे, सुखाचे... पुन्हा तुझा चेहरा बघितल्यावर मनात स्वरलकेर उमटत राहते... !
आज फिर तुमपे प्यार आया है
बेहद और बेहिसाब आया है ..!

                                                                   - प्रशांत दैठणकर

No comments: