Tuesday 15 September 2015

Candhy Crush ची क्रेझ..

एखाद्या बाबीची आवड असणे समजू शकतो मात्र ती आवड आपली मर्यादा ओलांडून इतर बाबींवर अतिक्रमण करते त्यावेळी ती चिंतेचा बाब बनत असते. याला वेड लागलं असं म्हणता येऊ शकेल.. त्याच्याही पलिकडे जाणारी अवस्था ही पिसं लागण्याची असते.. आपल्याकडे कुत्रा पिसाळला असं जे म्हणतात ते या ठिकाणी अपेक्षित नसलं तरी त्याच अर्थाने बोललं मात्र जातं.. इंग्रजीत याला योग्य प्रकारे सांगता येते.

The is a word crazy and such kind of behavior is nothing but the crazy one..

मी आपल्या याच क्रेझ बाबत आज बोलत आहे असं समजा. आता ही क्रेझ नेमकी कशाची.. हजारो जणांची डोकेदुखी असणारी ही क्रेझ आहे. Candy crush saga game ची. सोशल नेटवर्कींगचा वापर करणारे नेटकर या Candy crush saga game मुळे त्रस्त झालेले आहेत.

मराठीत काही म्हणी खुप चांगल्या आहेत.. भीक नको पण कुत्रा आवर... अशा आशयाची एक म्हण आहे तर दुसरी .. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय.. एक ना अनेक.. वैताग आल्यावर अशाच म्हणींची आठवण फेसबूक वापरणा-यांना या Candy crush saga game मुळे आल्याशिवाय रहात नाही.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे आजच या फेसबूकचा जनक असणा-या मार्क झुकरबर्गने केलेले ताजे स्टेटस् अपडेट होय. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अमेरिका दौ-यावर जात आहेत. या काळात ते या जगप्रसिद्ध अशा सोशल नेटवर्कचे मुख्यालय असणा-या फेसबूकच्या कार्यालयालाही भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर नेमके कोणते विषय या दोघांमध्ये चर्चेला येणार याचं कुतूहल सा-या नेटकरांना आहे..


आपल्या फेसबूक फीडवर सातत्याने येणा-या Candy crush saga game च्या विनंत्याना सारेच भारतीय वैतागले आहेत हे नक्की आणि या प्रकारच्या विनंती पाठविणा-यांचा बंदोबस्त कसा करता येईल याची विचारणा मोदी यांनी झुकरबर्गना करावी असे संदेश आपल्याकडे येत आहेत असे आज स्वतः झुकरबर्ग याने स्टेटस् द्वारे अपडेट केले आहे.

या निमित्ताने विनोदाचा भाग सोडला तरी कितीजण या Candy crush saga gamच्या मागे क्रेझी आहेत याचा अंदाज आपणास येतो. सारेच रिकामटेकडे नेटवर असतात आणि हे नेट पडिक Candy crush saga game सारखे खेळ खेळून टाइमपास करीत असतात असा एक होरा मांडला जातो त्याला काही ना काही अर्थ आहे हे जाणवतं.

फेसबूकने नुकतंच जाहीर केलं होतं की एका दिवसात ७०० कोटी लोकसंख्येच्या आपल्या या जगातील १०० कोटी लोकांनी फेसबूकचा वापर केला. ही बातमी केवळ आकडेवारीची गंमत आहे असे नाही तर याला अनेक सामाजिक आणि आर्थिक पैलू आहेत.


“For the first time ever, one billion people used Facebook in a single day. On Monday, 1 in 7 people on Earth used Facebook to connect with their friends and family,” wrote Zuckerberg in a post on his personal profile.

The news is no great surprise: Facebook has been growing steadily, and in the second quarter of 2015 it averaged 968 million daily active users, and 1.49 billion monthly active users.

२८ ऑगस्ट २०१५ रोजीची ही घटना आहे. केवळ एक विद्यापीठाचा प्रकल्प करता करता मार्कने याची सुरूवात केली त्याला यामुळे नंतर ब-याच न्यायालयीन लढायांना सामोरं जावं लागलं मात्र २००४ साली झालेली ही सुरूवात आता कुठे पोहाचली आहे हे आपण बघत आहोत.. आणि याचा वापर करण्यात भारतीय आघाडीवर आहेत.

आपल्या लोकांनी तंत्राच्या वापरात अव्वल रहावं ही चांगलीच बाब आहे. तंत्राचा जसा लाभ होतो तसा तोटाही असतो नाण्याची ही दुसरी बाजू अधिक त्रासदायक असते. त्याची प्रचिती या Candy crush saga game च्या रुपाने येते.

या गेमने आता संवाद देखील बदलले आहेत. नवरा बायको एकमेकांशी बोलताना घरात दुध आहे का याची विचारणा करण्याऐवजी फोनवर आधी कोणती लेव्हल.. अशी विचारणा करताना बघून हसू येणार नाही तर नवल... बायकोची एखादी गंभीर समस्या नव-याने सोडवावी आणि तिलाही त्याचा अभिमान वाटावा या पद्धतीने बायकोची अडकलेली Candy crush saga game ची लेव्हल नवरा पुर्ण करतो... कित्ती कित्ती हे पत्नीप्रेम... मुलांचीही अवस्था काही वेगळी नाही.


या Candy crush saga game ने एक नवी वर्णव्यवस्था निर्माण केली की काय याचा संशय यायला लागतो.. दोनशे लेव्हल झाल्याचे अपडेट टाकणारे समाधान मानतात मात्र त्यांच्यापेक्षा शंभर लेव्हल पुढे असणारे त्यांना वर्ग तीनचे कर्मचारी समजून वागतात.. यांचही काही खरं नाही कारण चारशे ओलांडलेले फर्स्ट क्लास वाले त्याही पुढे आहेत आणि त्यांच्यावरील वर्णात हाय क्लास... आपल्याला एक लेव्हल पार करता आली यातच हायसं वाटणारे आम्ही पामर तर त्यांच्या खिजगणतीस नाही.. ज्यांना खेळता येत नाही त्यांनी तर हाय खाल्ली आणि आता आयसीयूत दाखल व्हावं अशा प्रतिक्रिया हे नेटकर देतात.

झपाटलेला असा एक शब्द याचे वर्णन करण्यास अपुरा आहे.. अरे बाबा तुला खेळायचे तर तू खेळ आम्हाला का त्रास विनंत्यांचा हा सवाल इतरांना आहे... पण ....तुरांनां भयं ना लज्जा तशा पद्धतीने Candy crush saga game वीरांना ना.. असा अतिरेक गेल्या काळात झालेला आपणास दिसत आहे.

असा हा सवाल आपले पंतप्रधान विचारणार की नाही हा सवाल नाही तर खरा सवाल आहे अशा प्रकारच्या विनंत्या पाठविणा-यांना कसे रोखायचे...


... आणि मग वेताळ म्हणाला विक्रमा तू बोललास.. तू बोलला मी निघालो.. असा पंचवीशीतला हा सवाल पुन्हा उद्या आपल्या पेजवर येणार की काय याच अपेक्षेत विक्रमाप्रमाणे पुढच्या कथेसाठी मी आज थांबतो.

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466


Saturday 12 September 2015

विकासाची मानसिकता ...


बदल ही संसार का नियम है अस भगवदगीतेतलं एक वचन आहे. ही संज्ञा सर्वत्र लागू होते. या बदलाची दुसरी बाजू म्हणजे विरोधाची असते. जितका मोठा बदल अधिक मोठा विरोध ही मानवी भूमिका अनुभवास येत असते.

लोककल्याणकारी संकल्पनेतील लोकांनी लोकांसाठी चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही होय. या संकल्पनेनुसार राज्य चालवताना एकत्रित झालेल्या या समाजघटकांच्या उन्नतीसाठी लोकांकडून प्राप्त करातून उपाययोजना करणे अपेक्षीत असते. ही उन्नतीसाठी करावी लागणारी प्रक्रिया म्हणजे विकास होय. आता या विकासाच्या नाण्याची दुसरी बाजू अविकसितपणा असायला हवी मात्रआजकाल त्याची दुसरी बाजू विरोधाची बनली आहे. कारण अर्थात विकास ही बदलाचीच प्रक्रिया असते.

माझ्या घराचा, वस्तीचा आणि गावाचा विकास मला नक्कीच हवा आहे असं आग्रहाने प्रत्येक व्यक्ती सांगते मात्र त्या विकासासाठी येणाऱ्या बदलांना विरोध करणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढल्याने विकास होत नाही अशी स्थिती थोडयाफार फरकाने सगळीकडे दिसते.

विकासाच्या या प्रक्रियेत जे अडथळे आहेत त्यात भूमिकेचे आकलन न होणे ही बाब महत्वाची आहे. आजची स्थिती याच "डेडलॉक" वर आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी असणारी त्यागाची भूमिका आता विस्मरणात गेली आहे. दूरदृष्टी असेल तर विकास शक्य होतो मात्र त्याच्या अभावाने short sight फायद्यासाठी होणाऱ्या विकासकामांना विरोध झाल्यामुळे विकासाची गती खुंटते आणि अल्पकालीन व दिर्घकालीन दोन्ही लाभ दूर राहतात व तेहही गेले, तुपही गेले म्हणत धुपाटणे हाती राहते व विकास झाला नाही, अन्याय होत आहे अशी ओरड करीत धोपटण्याचा कार्यक्रम सुरु होतेा.

विकास हवा पण कोणते मोल देवून ही आता परवलीची भूमिका मांडणारे समोर आले आणि त्यामधून प्रवाह अडला हे सर्वांनी ध्यानी घेतले पाहिजे. विकास घडवून आणण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही योगदान द्यावे लागत असते. काही जणांना त्याग देखील करावा लागतो मात्र प्रत्येक जण केवळ फायद्याचा विचार करीत असेल तर विकास होणारच नाही.

आपण ज्यावेळी हक्काची लढाई म्हणतो त्यावेळी आपण आपल्या कर्तव्यांचे किती पालन करतो असा सवाल आपण अंतर्मनाला करावा लागणार असल्याने आपण comfort zone न सोडण्याची भूमिका घेतोय असही जाणवेल.

आपण आपली मानसिकता काय हे तपासले पाहिजे. गरज असल्यास त्यात बदल केला पाहिजे म्हणजे बदल होईल. प्रत्येक व्यक्तीने या दृष्टीकोनातून विचार केला तरच समाजाची मानसिकता बदलेल आणि असे झाल्यानंतर आपण विकासाची पहिली पायरी गाठू. शिखर गाठायला फारसा वेळ लागणार नाही हे देखील तितकंच खरं.

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Thursday 10 September 2015

Status अपडेट करताना

काळ बदलतो आणि संदर्भ देखील बदलत्या काळात जग बदलत असतांना जे बदल येतात त्यातील अनेकांनी जाणीवही आपणास होत नसते. आपण ते दररोज जगत असतो मात्र केवळ आलं तसं जगणं ही वृत्ती असल्यानं साध्या -साध्या अशा बदलांकडे आपलं लक्ष जात नाही असाच एक बदल आणि खूप मोठा असूनही अंगळणी पडलेला बदल म्हणजे आपलं स्वत:च Status होय

आज नेटसॅन्ही म्हणण्यापेक्षा नेटक्रेझी पिढी काहीही झाल्यावर प्रथम फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कीग साईटवर Status update करतांना आपणास दिसतात. काळाच्या ओघात या शब्दाचे अवमुल्यन झाले म्हणायचे की याचा अर्थ बदलला असं म्हणायचा असा सवाल पडतो.

आपलं समाजात असणारं स्थान नेमकं काय आहे याची स्थिती म्हणजे Staus अशी मुळ धारणा मात्र आता दहा मिनिटांचा पाऊस देखील स्टेट्स अपडेटचा विषय असतो. आपल्या आसपासची नवी पिढी लोकल ते ग्लोबल असा प्रवास करित नसून ती पिढी पूर्णपणे ग्लोबल झाली आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा नेमका वापर करायचा कसा हे कुणालाच माहिती नाही त्यामुळे असं घडत असावं

चार आंधळया व्यक्तींनी हत्तीचं वर्णन करतांना हा हत्ती खांबासारखा आहे. असं म्हणणं किंवा तो दोरीसारखा भासणं हे जसं नैसार्गिक आहे. तस. हे सोशल मिडियातील स्टेट्स बाबतही घडताना दिसत आहे. मुळ इंग्रजी भाषेत Statusman किंवा Status

स्टेटस् या शब्दाला छेद देणारे अपडेटस् आपणास या साईटस् वर बघायला मिळतात. कुणाचा वाढदिवस असेल तर त्याला शुभेच्छा देण्यापासून त्या वाढदिवसाला केकचा फोटो पाठवून या (virtual) आभासी दुनियेत जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व सोहळे स्टेटस् बनलेले आपणास दिसतात. या सर्व जंत्रीत " स्टेटस " चा अर्थ आम्ही पूर्णपणे बदलून टाकला आहे.

असाच काहीसा प्रकार इतरही सोशल नेटवर्कींग माध्यमांबाबत आपणास बघायला मिळतो आहे. या एकाच गोष्टी सोबत विनाकारण पडणारा कवितांचा पाऊस हा तर एक मोठा चर्चेचा विषय आहे. अगदी र ला ट आणि ट ला प अशा स्वरुपात लिखाण करुन कविता टाकल्या जातात त्यावेळी खूप मनोरंजन होते.

यातच वेगवेगळया साईटसवर चोरी केलेली छायाचित्रे आणि कोटेशन्स आपल्या पध्दतीने अर्थ बदलून तर कधी अर्थाचा अनर्थ करीत टाकली जातात त्यावेळी आणखी हसू येतं.

तसं नाही म्हणायला काहीजण गांभीर्याने याकडे बघतात पण ते खूप कमी आहे. ठिक आहे अस असो की feeling low……. ते देखील आता एक status झालय...... चला ते पण अपडेट करु कारण अपडेट राहणं ही काळाची गरज आहे.

status चा आपल्याला अभिप्रेत अर्थ या नव्या माध्यमाने बदलून टाकलेला आपणास दिसतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण मान्य केले असले तरी त्याला वाट करुन देणे आपणास जमलं नव्हतं. अशी वाट करुन देण्याचं काम या सोशल मिडियाने केलेलं आहे. त्यामुळे अभिव्यक्तीचा प्रवाह किंवा पूर सोडा तर चक्क त्सुनामी आलेली आपणास दिसते.
 प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Friday 4 September 2015

श्रवण संस्कृती




आजकाल एक शब्द नव्याने प्रचलनात आला आहे. श्रवणसंस्कृती हा नवा नाही तर जुनाच शब्द आहे. मात्र गेल्या काही दशकात हा मागे पडला होता. श्रवण म्हणजे ऐकणे. आता हे ऐकण्याची काय संस्कृती असू शकते. मुळात केवळ ऐकणं हे मानवी स्वभावास पटणारं नाही.

एखादी व्यक्ती जर बोलत असेल तर दुसरी व्यक्ती केवळ एकत नाही. ती यक्ती त्यावर प्रतिक्रिया देते. हा झाला संवाद मात्र आपल्याकडे विद्वान व्यक्तींची संख्या कमी नाही त्यामुळे संवादावरुन वादाकडे नंतर वादविवाद आणि अखेरीस विसंवाद असा प्रवास सुरु होतो. "मी का म्हणून ऐकून घ्यायचं" असा अविर्भाव असेल तर संवाद होणार नाही आणि श्रवणसंस्कृती या शब्दाचा संबंध येणार नाही.

आजचा जमाना माहिती तंत्रज्ञान विस्फोटाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात तंत्रज्ञान स्मार्टफोनच्या रुपाने खेळतय. उचलला फोन लावला कानाला या उक्तीप्रमाणे सहजरित्या फोन उचलून लावणारी ही आजची पिढी आहे. सत्तरच्या आणि ऐंशीच्या दशकात ही स्थिती नव्हती भारतात दूरदर्शनचं जाळं विस्तारण्यापूर्वी केवळ रेडिओ हे एकच मनोरंजन आणि माहितीचं साधन होतं. त्यावेळी जी संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे श्रवण संस्कृती.

कुतूहल हा मानवाचा स्थायीभाव आहे. रेडिओच्या त्या छोटयाश्या डब्ब्यामध्ये माणसं नेमकं कुठं बसून बोलतात या कुतूहलापायी रेडिओचं पोस्टमार्टेम मी लहानपणी केलं. आपणापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि काही जणांनी ही कृती देखील केलेली असेल. त्यावेळी एक आणि एकमेव पर्याय म्हणून याला स्वीकारणं भागच होतं

त्या काळात चित्रपट गृहांची संख्या देखील मर्यादीत अशीच होती. यामुळे नाक्यांवरील हॉटेल्सवर रेडिओवर गाणी ऐकणे आणि चित्रपटातील डायलॉगच्या ग्रामोफोन तबकडया ऐकणे हा "टाइमपास" होता आता ते चित्र डोळयासमोर आल्यावर हसू येईल मात्र हे सत्य आहे.


रेडिओने निर्माण केलेल्या या संस्कृतीने रेडिओ श्रीलंका अर्थात रेडिओ सिलोन वरील अमीन सायनीच्या बिनाका गीतमालाला सर्वाधिक श्रवणीय कार्यक्रमाचे स्थान दिले होते. आजच्या भाषेत त्याला टिआरपी म्हणता येईल. गावांमध्ये सणासुदीला भरणा-या यात्रांमध्ये वाजणारे भोंगे हे यात्रांची ओळख होते.

श्रवण संस्कृतीचा एक निराळा अर्थही त्याकाळात लागू होता. कमी शिक्षित समाजात एखादया जाणकार व्यक्तीने आणि तज्ञाने दिलेली माहिती लोक ऐकायचे त्यासाठी गर्दी व्हायची. साहित्यिक क्षेत्रात याच श्रवण संस्कृतीने व्याख्यानमालांची मुहूर्तमेढ रोवली व अशा व्याख्यानमाला रुजल्या त्यातून प्र.के.अत्रे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाने श्रोत्यांना भूरळ घातली त्यामुळेच त्यांना वक्ता दशसहस्प्रेशु नामाविधान देण्यात आलं.

या व्याख्यानमालांच्या नंतरच्या काळात या श्रवणसंस्कृतीचा ताबा राजकारणाने घेतला अठरापगड जातीच्या या समाजात आसेतूहिमाचल अशा आपल्या भारत देशात राजकीय सभांच्या माध्यमातून श्रवणसंस्कृती फोफावली याचा विनियोग मात्र केवळ सत्तेसाठी झालेला दिसून येतो. नंतरच्या काळात तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे टि.व्ही. नावाचा इडियट बॉक्स घराघरात आला आणि सायंकाळी मोकळया हवेत खेळणारं तरुणपण आणि निसर्गाला साद घालत रपेट करणारं प्रौढपण घरात या इडियट बॉक्ससमोर विसावलं त्यामुळे ज्यांना खेळण्याची नितांत आवश्यकता आहे अशी खेळण्याच्या वयातही मुलं देखील खेळण विसरली. ऐकण्यासोबतच दिसण्याची ताकद असणारं हे टिव्हीचं माध्यम घराघराचा ताबा घेतं झालं.

यावेळी जी सर्वांची प्रतिक्रिया होती ती अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया चित्रपटात चांगलीच उमटली आहे. असं आपणास जाणवतं

मिलना क्या जो दिखाई ना दे

सारा का सारा सिर्फ सुनाई दे,

क्या करना है मिलके

ऐसे मिस्टर इंडियासे. 





खरच आहे. आजकालच्या स्वाईप आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या जमान्यात नुसतं ऐकण्याचं कोणतं ते कौतूक असं म्हणावं लागतं.

टिव्हीच्या अतिक्रमणानंतर श्रवणसंस्कृतीला उतरती कला लागली. राज्याला नेतृत्व देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे आदींचे नेतृत्व याच संस्कृतीने वादविवाद स्पर्धांच्या रुपाने समोर आले होते. टिव्हीचे आगमन झाल्यानंतरच्या काळातही डॉ. शिवाजीराव भोसले यांच्या ओघवत्या शब्दांची व्याख्याने ऐकायला गर्दी जमतच होती. मात्र समाजातले बदल झपाटयाने होत होते. "जुने जाऊ द्या मरणालागुनी" अशा आशयाची एक म्हण मराठीत आहे. त्याप्रमाणे सभांना आणि व्याख्यानांना होणाऱ्या गर्दीचे प्रमाण घटले. यातच दररोज मालिका अर्थात डेली सोपच्या रतीब इडियट बॉक्सवर सुरु झाला आणि त्यातून निर्माण झाली केवळ दर्शन संस्कृती.

दर्शन संस्कृतीत दूरदर्शनवरील आरंभीच्या काळात प्रक्षेपित हमलोग सारख्या मालिकेपासून ये जो है जिदंगी, खानदान, बुनियाद नंतरच्या काळात रामायण - महाभारत असा काळ गाजला या क्षणी जर कुणी म्हटलं असतं की श्रवण संस्कृती पुन्हा येणार आहे. तर त्याला उपचाराची गरज आहे. अशी प्रतिक्रिया इतरांनी दिली असती.

या स्थितीत "जुनं ते सोनं" या मराठी म्हणीचा प्रत्यय आला आणि पुन्हा एकदा श्रवण संस्कृतीला उभारी मिळाली ती एफएम रेडिओमुळे. "नव्याचे नऊ दिवस" अशी म्हण देखील यामुळेच सिध्द झाली.आपणास एका ठिकाणी अडकवून ठेवण टि.व्ही. ने साध्य केलं मात्र आपण एका जागी स्थिरावत नाही. दैनंदिन कामं करताना मनोरंजन व माहिती यासाठी रेडिओ हेच माध्यम उत्तम आहे हे नव्याने सिध्द झालं.

ऑल इंडिया रेडिओ ज्याला आपण आकाशवाणी म्हणून ओळखतो हा 86 वर्षापासून सेवा देत आहे. मात्र गेल्या दशकात आलेल्या खाजगी मनोरंजन एफएम वाहिन्यांनी सादरीकरणाच्या आधारे खूप मोठी आघाडी घेतली. यातील अर्थकारणाचा भाग बाजुला सोडला तरी एक बाब महत्वाची ती म्हणजे श्रवणसंस्कृती शाबूत आहे.

दोन व्यक्तींमधील संवादात एकानेच बोलणे म्हणजे संवाद होतच नाही. त्यात क्रिया-प्रतिक्रिया असा आलेख अपेक्षित असतो. मार्मिक पध्दतीने पती-पत्नी यांचे संवाद संबध आपल्याकडे सांगतात त्यावेळी हा संवाद


एक सवाल मै करु

एक सवाल तुम करो

हर सवाल का जवाब

सवाल ही हो.

अस असलं तरी ऐकण्याची ही नैसर्गिक सवय एक प्रकारची संस्कृती बनली आहे.

इंग्रजीत म्हणतात you should be a good listener to be become a good editor. यात इंतरांच ऐकुन घेणं अपेक्षित आहे. आपण व्यक्तीमत्व आणि त्याचा विकास यांच्या प्रवासात या श्रवण संस्कृतीच महत्व देखील जाणून घेतलं पाहिजे.

समर्थ म्हणतात दिसामाजी काही तरी लिहावे आणि पुढे प्रसंगी अखंडीत वाचित जावे असंही म्हटलयं.

वाचन म्हणजे इतरांच कथन आपण आपल्या नजरेतुन ग्रहण करणं हा देखील श्रवण संस्कृतीचाच एक पैलु आहे. त्यामुळे वेळ काढून वाचन करावं त्याहीपेक्षा महत्वाच आपण आपल्या अंतरंगाचं म्हणणं ऐकून घ्यावं.

आपल्या बाह्यरंगात आपण वेगळे आणि अंतरंगात वेगळे असतो. आपल्या मनातही संवाद होत असतो. आपल्यापैकी कितीजण तो ऐकतात? आसपासची परिस्थिती आणि आपली भूमिका याला न्याय देण्याच्या प्रयत्नात आपण आपला स्वत:चाच अंतर्मनातील आवाज ऐकत नाही हे देखील वास्तव आहे. आपण आपला आवाज ऐकणं हा या श्रवण संस्कृतीचा कळस असतो.

बॉस म्हणाला म्हणून करावं लागतं, कौटुंबिक गरजा म्हणून ऐकाव लागतं याच्या पुढे जाऊन आपला आतला आवाज ऐकणारी माणसं जग बदलतात असा अनुभव आहे.

"ऐकावे जनाचे, करावे मनाचे"

अस वचन तेच सांगत. त्याच महत्व वेगळं आहे. पण ऐकतो कोण?

ही स्थिती न आणता तांत्रिक श्रवणाच्या या संस्कृती प्रमाणेच या श्रवण संस्कृतीकडे वळण्याची हीच वेळ आहे.

--- प्रशांत अनंतराव दैठणकर

मो. 9823199466

जिल्हा माहिती अधिकारी,

गडचिरोली 



Wednesday 2 September 2015

त्रिमितीतून चौथ्या मितीकडे

आयुष्य ही अनुभवांची एक अखेरच्या क्षणापर्यंत चालणारी मालिका आहे. यात कोणता प्रसंग कसा येणार याचं नियोजन प्रत्येक व्यक्ती करते मात्र तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहणं अत्यंत अवघड असतं कारण काळ हा चौथ्या मितीत चालतो तुम्ही - आम्ही त्रिमितीच्या जगात जगतो. अगदी चित्रपट देखील त्रिमितीमध्ये बघायचा असेल तर आपणास वेगळी मेहनत घ्यावी लागते आणि वेगळया चष्म्यांचा आधार देखील घ्यावा लागत असतो.

या जगात आपण आपली प्रतिमा म्हणून जो फोटो बघतो तो देखील त्रिमितीत असत नाही त्यामुळे काळाची गती आणि चौथी मिती आपल्या आकलनापलीकडील असते हे मान्य केलेलं चांगलं. त्यामुळे आपलं आयुष्य आणि त्याचा प्रवास कदाचित अनाकलनीय होत असतो.

आपल्या हिंदू संस्कृतीत कर्माचं महत्व सांगितलं आहे. कर्म काय आहे याचही आकलन प्रत्येक व्यक्तीला होईलच असं नाही मात्र त्यापायी कर्म करण्यात कमी होत नाही. आपण जे काम करतो त्याला कर्म म्हणणार का ? नाही अर्थातच नित्य कामाला कर्म म्हणता येणार नाही. मग कर्म आहे तरी काय ? आणखी एक सवाल आणि मग सुरु होतो तो कर्माचा शोध.

कर्म ज्याला कळलं अशी व्यक्ती कोणाला म्हणायचं या प्रश्नांच उत्तर अर्थात ज्याला आपल्या जन्माचा बोध झाला आहे अशी व्यक्ती असं म्हणता येईल आपला जन्म इथं काही तरी वेगळ करण्यासाठी झाला याची जाणीव झाल्यावर काळाच्या चौथ्या मितीची ओळख होते. ते केवळ एक परिमाण नसून ती एक सिमारेषा आहे. याची जाण होते मग या त्रिमितीच्या सिमा ओलांडून चौथ्या मितीत प्रवेशाचा प्रयत्न सुरु होते. अर्थातच कालसापेक्ष जगणं विसरुन काळाच्याही पलिकडे विचार पोहोचतात हीच सृजनशीलतेची सुरुवात असते.

ज्याला काल आणि उद्या याचा प्रवास साधताना सुखदुख: जाणवत नाही अशीच माणसं सृजनातून जगाला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न करतात. यात प्रत्येक व्यक्ती यशस्वी होईलच असे नाही मात्र तसा प्रयत्न करण्यात अनेकांनी आयुष्य घालवल आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हा प्रवास दैनंदिन अनुभवाची मालिका ठरते आणि यातूनच वैराग्याची भावना येत असते.

सामान्य आणि असामान्य यातील फरक कोणता असं विचारल्यावर सांगता येईल की आयुष्यामधील या प्रवासात चढ उतार सारख्याच मानसिक पातळीवर जगण्याची क्षमता ज्या व्यक्तीत येते ती वैराग्याचा अनुभव घेते व दरक्षणी नव्या संकटांचा मुकाबला करायला तयार असते. अशी व्यक्ती असामान्य होय. आयुष्यात आनंदाने काळ व्यतीत केल्यावर काही कडू प्रसंग येतात त्यावेळी मानसिक पातळीवर तितकी सक्षम प्रतिक्रिया देणं जमत नाही म्हणून ज्याला वैफल्य येतं ती व्यक्ती सामान्य व्यक्ती होय. जन्माला येणं ही मृत्यूकडील प्रवासाची सुरुवात आहे. आलेली प्रत्येक व्यक्ती जाणार हे नक्की मात्र वैराग्यातून येणारा मृत्यू आणि वैफल्यातून येणार मृत्यू यात खूप मोठं अंतर असतं वैराग्याचा पुढील प्रवास निरपेक्ष कर्माच्या दिशेने जातो ज्यालाच कदाचित मोक्षमार्ग म्हणणे अपेक्षित असेल.

वैफल्याचा प्रवासमात्र बहुतेक प्रसंगी स्वनाश अर्थात आत्महेत्त्येकडे जाणारा असतो. जन्माला येताना प्रत्येक व्यक्तीला निसर्ग काही अपवाद वगळता सारं दान देवून टाकतो मात्र ते दान सत्पात्री पडलं की नाही हे कर्माच्या मार्गावर कळतं कर्मकांड करणं म्हणजे कर्म नाही हे सुध्दा वेगळं सांगावं लागेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात तसं

मनी नाही भाव

म्हणे देवा मला पाव......

देव अशानं पावायचा नाही रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

केवळ देव - देव करणं म्हणजे कर्मकांड होय. आपण आपल्याप्रती आणि आपल्या जीवनात असणा-या प्रत्येक व्यक्तीप्रती जपलेली भावना म्हणजे कर्म होय आपली अंगी असणारी भूतदया अर्थात प्राणीप्रेम म्हणजे कर्म होय...त्याही पलिकडला विचार करुन जगणं म्हणजे कर्म होय आणि असे कर्म करणारे कालातीत असतात... काळ बदलला तरी आपण न बदलणं हा स्थायीभाव म्हणजे कर्म होय.

प्रशांत दैठणकर