Wednesday, 29 June 2011

पाऊस...मना मनातला, पाना पानातला !

पावसाळा आणि गाणी तसंच पाऊस आणि पक्षी अशी आगळी दुनिया आपण आपल्या आसपास घेऊन जगत असतो. त्याच्याशी संबंधित अनेक म्हणी देखील आहेत आणि पावसाशी निगडीत खूप साहित्य आहे. अन्‍ पाडणा-या प्रत्येक सरीसोबत यात नव नवी भर पडतच असते.
मी तुझ्यापेक्षा जास्त काळ पाहिला आहे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे असं सांगण्यासाठी 'मी चार पावसाळे जास्त पाहिलेत' असं म्हणण्याचा प्रघात आहे व्यक्तीच्या बडबडया स्वभावाबाबत आणि कृतीशुन्यतेबाबत 'गर्जेल ते पडेल का' ? किंवा 'गरजणारे ढग बरसत नाहीत' असा वाक्‍प्रचार आहे.
उन्हांनं काहिली झाल्यावर पावसाचे वेध सगळयांना लागतात. अशा वेळी पावसाची आतुरता दर्शविण्यासाठी 'चातकासारखी वाट बघतोय पावसाची' असा एक वाक्‍प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. चातक किंवा पावश्या नावाचा हा पक्षी पावसाच्या आगमनाचा सूचक आहे. असाच दूसरा पक्षी अर्थात आपला राष्ट्रीय पक्षी मोर होय. पावसाच्या सरी सोबत मोर आपला सुंदर पिसारा नाचवून नृत्य करतो. या नृत्याची वर्णनं अनेक काव्यातून आहे.
पाऊस जसा कवितांचा तसाच तो मेघदूत सारख्या महाकाव्याचा देखील आहे. महाकविच्या विरहाचं काव्य असा उल्लेख कालीदासांच्या मेघदूत बाबत करता येईल. मेघांना माध्यम बनवून प्रितीचा दिलेला संदेश याच पावसाचं एक रुप आहे असच म्हणता येईल.
पावसाची गाणी अनेक आहेत. श्रावणात बरसलेला निळा घन अर्थात 'श्रावणात घन निळा बरसला' हे गाणं असो की 'नभ उतरु आलं, अंग झिम्माड झालं' हे गाण शब्द आणि सुरांनी चिंब भिजलेल्या निसर्गाचं चित्र यामुळे उभ राहतं.
पावसाचा दृष्टांत वापरुन अनेक गाणी आकारास आली आहेत़, मेहबुबा चित्रपटसाठी लता मंगेशकर आणि किशेरकुमार यांनी वेगवेगळं गायलेलं गीत 'मेरे नयना सावन-भादो फिरभी मेरा मन प्यासा' पावसाची प्रतिमा यात नायक आणि नायिकेच्या भावना व्यक्त करण्यासाठी चपखलपणाने वापरली आहे.
लहानपणी पाऊस तुम्ही बघितला तो 'ये रे येरे पावसा, तुला देतो पैसा असं म्हणत. आता काळया पैशांवरुन देशात मोठी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर पावसाला पैसा का द्यावा लागतो? या नव्या प्रश्नानं जन्म घेतलाय जसं काही पैसा दिला नाही तर पाऊस पडणारच नाही असं काही आहे का? आणि हो त्याला द्यायला पैसा आहे कुठ, कारण पैसा चलनातूनच हद्दपार झालाय आता फक्त उरलाय तो बंदा रुपया.
ज्याचं घरदार पावसावर अवलंबून आहे तो बळीराजा तुम्हाला-आम्हाला पाऊस फक्त भिजायला आणि एन्जॉय करायला हवा असतो परंतु त्याला पोटापाण्यासाठी पावसाशिवाय पर्याय नसतो. त्याच्या अधीरतेत तेव्हा अधिकच भर पडते जेंव्हा पाऊस ताण देतो. त्याची ही अधीरतेची भावना 'पड रं पाण्या रं पाण्या,कर पानी, पानी .... चातकावानी' या गाण्यात व्यक्त होते. त्यातला आर्त टिपेचा सूर आपल्याही ती शेतक-याची वेदना जगायला लावतो.
लग्न करुन सासरच्या घरी राहणा-या मैत्रीणी काही काळ माहेरपणासाठी येतात आणि त्यांचा तिथला रहिवास संपल्यावर परतीचा दिवस आणि त्यात पावसाचं येणं 'आला आला वारा, संगे पावसाच्या धारा' या गाण्यात माहेर सोडण्याचं दु:ख आणि नव-याच्या संगतीनं राहण्याची नव्याने लागलेली ओढ त्यातला तो रोमांस उभा करण्यात या गाण्यात पावसाचाच वापर झालय.
पावसाचं एक वेगळं असं वर्णन यश चोप्रा कॅम्पच्या चित्रपटातील एका गाण्यात आहे. पाऊस नेमका कसा याचं हे वर्णन अप्रतिमच आहे 'घोडे जैसी चाल, हाथी जैसी दूम, ओ सावन राजा कहॉसे आये तूम' त्या पावसाचा पसारा आणि गतीचं हे वर्णन 'कोई लडकी है, जब वो हसती है, बारीश होती है घुमड घुमड घुम-घुम' त्या तिच्या हास्यानं आनंदीत पाऊस अगदी मनसोक्त बरसतो त्यासाठी ही उत्तम शब्द योजना म्हणावी लागेल.
पावसात येणा-या निरनिराळया आवाजांना शब्दात बांधलं तर त्या शब्दांसोबत पाऊसही आपल्या मनात पडतो आणि डोळे मिटले तर चित्र समोर उभं राहतं असं ताकदीनं शब्दात पाऊस शब्दात पकडलाय तो छै छप छै छपाक छै या गाण्यात आपणच पाण्यात उडया मारतोय असं चित्र उभं करणारं हे गाणं.
असा हा पाऊस लिहिला तेवढा पडत जाणार आणि त्याला गोडवा वाढत जाणार म्हणूनच सहजपणे ओळी सूचतात
पाऊस... थेंब, थेंब, ओला चिंब
पाऊस... तुफानी, वेडयासारखं पडलेला
पाऊस... कधी पडायचंच विसरलेला
पाऊस... कांद्याची भजी अन् कॉफीचा मग
पाऊस... बाल्कनीत छतावरुन हातावर नाचलेला
पाऊस... अंगणातले ओहोळ... कागदाच्या होडया
पाऊस... मना मनातला... पानापानातला
पाऊस... अडलेला... ढगात घुसून पाडलेला
पाऊस... बालपणीचा... दंगा मस्तीचा
पाऊस... तारुण्याचा कधी कारुण्याचा
पाऊस... सखा... तोरणापासून मरणापर्यतचा
पाऊस... कवितेचा... प्रेम गीतांचा
पाऊस... आग्रहाचा... कधी कधी विरहाचा
पाऊस... एक प्रित जीवनाचं गीत
पाऊस... ताल, नाद, लय... परिपूर्ण संगीत
पाऊस... एक आठवण... आठवणींचा साठवण
पाऊस... दुख-या मनाला दिलेली उसवण
पाऊस... बिलगणारा, उगाच सलगी करणारा
पाऊस... तुझ्या-माझ्या, कधी तो तुझाच
प्रशांत दैठणकर

2 comments:

Fuzu said...

wah kaka......nice1

Raghavendra Ashtaputre said...

प्रिया प्रशांत, मला पाऊस एवढा छान माहित नव्हता ! सुंदर लिखाण !