Thursday 20 August 2020

11 वर्षे... मी आणि फेसबुक.. एक आत्मसंवाद

  


सहज म्हणून  विचार व्यक्त केला त्यानं एक क्षण विचार करायला लावतो ते असा. समाज माध्यमे विस्तारली आणि त्याचा वापर मोठया प्रमाणात सुरु झाला.  यात चांगला वापर आणि चुकीचा वापर यावर वाद होवू शकतो. पंरतु त्याने जो विचार मांडला तो त्याही पलिकडचा होता... मुळात वापर करायचाच कशासाठी...

           या

माध्यमांनी प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी दिली आणि फेसबुक सारख्या माध्यमातून अभिव्यक्तीची त्सुनामी आली असं चित्र दिसलं. अभ्यासू व्यक्त होणं, साहित्यातून व्यक्त होण याचा प्रवाह समजण्यासारखा आहे.. प्रत्येकालाचा शब्दांची ताकद कळत नाही... तोलून मापून शब्दांचा वापर करुन व्यक्त होण प्रत्येकाला शक्य नाही. परिणामी जो जसा आहे तसा व्यक्त व्हायला लागला.

            या अभिव्यक्तीचा वापर करुन अनेकांनी आपापला 5 सहस्त्र मनसबदारी दरबार भरवला असं चित्र दिसलं. 5 हजार फ्रेन्डसची मर्यादा आहे म्हणून कुणी त्याचं वाईट वाटून घेतलं नाही. यात जणू 5 हजार जण प्रत्यक्ष आपले वाचकच आहेत मानून व्यक्त होण्याचं समाधान व्यक्त होणाऱ्याला मिळतं मात्र फेसबुकच्या अल्गोरिदम नुसार ते किती जणांपर्यंत पोहोचवायचं याचं काम संगणक करतोय याची माहितीह नेमकी कुणाला आहे आणि त्याचं भानही कुणी ठेवत नाही.

            या अल्गोरिदमने जे मोजके एकत्र भसतात (भासतात यासाठी की हे सारं आभासी आहे) ते यावर चर्चा करतात मात्र बहुसंख्य जणांनी फेसबुकचं रुपांतर चक्क चावडीत करुन टाकलय. एखाद्या गोष्टीवर सयंत आणि संयमी प्रतिक्रिया न देता येथे जजमेंटल(की मेंटल) लोकांनी आभासी न्यायालयेच जणू चालवली आहेतअसाही भास (?) होतो..सारं काही इतक्या गडबडीत केलं जातं की आपण निसर्गाचा साधा नियम देखील विसरतो.

            यावर व्यक्त होणाऱ्या अनेकांनी याचा तोटा देखील कबूल केला.. यात शर्विलक आहेत की जे इतरांचलिखाण त्याचे साधे आभार व्यक्त न करता स्वत:चे विचार म्हणून चिटकवून (कॉपी-पेस्ट) मोकळे होतात आणि दुसऱ्याच्या बुध्दीवर आणि शब्दांवरचे लाईक गोळा करीत राहतात.

            मी स्वत: यावर आज 11 वर्षे पूर्ण करीत आहे. याचाच अर्थ गेल्या 11 वर्षापासून हे माध्यम वापरत आहे. या काळात वेगवेगळया प्रकारचे विनोद येथे घडले तर काही प्रमाणात गुन्हेगारी देखील वाढलेली मी बघितली  आहे. यावर अधून मधून अश्लीलतेच्या लाटा आल्या. अश्लाघ्य लिखाण, धार्मिक तेढ निर्माण करणारं लिखाण आणि त्यातून  झालेल्या दंगली अगदी शेगांव पासून कालपरवाच्या बंगलरु मधील दंगली याची उदाहरणं आहेत.

            फेसबुक च्या आभासी जगात झालेली मैत्री अनेकांनी प्रत्यक्षात  आणली. यातून  काही जणं विवाहबंधानात अडकले अशी चांगली उदाहरणे एका बाजूला असताना फेसुबुक मैत्रीचा गैरफायदा घेऊन आर्थिक फसवणूक, बलात्कार आणि खून अशाही घटना घडल्या.. काही महाभागांनी यावर थेट प्रक्षेपण करुन मृत्यूला कवटाळलं... हा सारा भावनांचा प्रवास आणि पसारा आहे.. त्याला अंत नाही. फेसबुकवर प्रेम जुळलं या भावनेतून उस्मानाबादच्या ग्रामीण भागातील एक पठ्ठ्या थेट पाकिस्तानाच्या सिमेपर्यंत पोहोचला..समाजात घडणाऱ्या  साऱ्या  घटनांचं प्रतिबिंब इथं उमटताना दिसलं.

            एखाद्याचा मृत्यू झालाय पण त्याच्या वाढदिवसाचं नोटीफिकेशन पाहून त्याला तूम जियो हजारो साल अशा शुभेच्छा देणारेही दिसले. अशा शुभेच्छा देणाऱ्यांची किव येत नाही कारण प्रत्यक्षातलं जग आणि आभासी जग यातलं खरं अंतर हेच लोक दाखवत असतात... वास्तवात मित्र असता तर अशी शुभेच्छा दिली असती का ?

            याचे

वापरकर्ते वाढत आहेत मात्र त्याचा फायदा टेलिकॉम कंपन्या आणि जाहिरात दार यांना अधिक होतोय इंटरनेट अर्थात आंतरजाल 25 वर्षांचे झालयं पंरतु या रौप्यमहोत्सवी वाटचालीत त्याचं रुपांतर एक प्रकारच्या मायाजालामध्ये झालय वास्तवात..

            आपण काय म्हणतो याला फेसबुकनं स्टेटस असं नाव दिलं तो स्टेटस चा मुद्दा बनवणाऱ्यांना माहिती हवं की स्टेटस म्हणजे मानसिक स्थिती असा अर्थ इथं अपेक्षित आहे.

            फेसबुकच्या पोस्टचं आपणास खूप कौतूक आहे हे मान्य आहे पंरतू त्याचं क्षणभंगुरत्व आपल्याला कळलय का ? काही कालावधीनंतर तुम्हालाही स्वत:ची पोस्ट शोधावी  लागते इतका मोठा महासागर झालाय.

            फेसबुकच्या आरंभिक काळात मी सर्वांना मराठीत लिहिण्याचा आग्रह करीत होतं वाईटात काही चांगलं किमान मराठीचा प्रस्तार तरी वेगानं व्हावा ही भूमिका मा झ्या मनात होती. आज ती प्रत्यक्षात आल्याचा मला आनंद आहे. माझ्या  टाईमलाईनवर दररोज आकडेवारी देण्याचं काम फेसबूक इमाने इतबारे करित आहे.

            मी भाषांतर केलेले (इंग्रजीतून मराठीत) शब्द दरमहा सरासरी 8 ते 10 बिलीयन वेळ वापरले जातात हा माझा आनंदाचा मुद्दा आहे. मराठी भाषेवर हजार भाषण देण्यापेक्षा हे काम अधिक मोलांच आहे हे मी मानतो.


            आपण फेसबुक का वापरता याचा प्रत्येकानं विचार जरुर करावा. अनेकांनी याचा कंटाळा आला म्हणून वापर बंद केला. काही नुसतेच दर्शक तर काही नुसतच वाचक आहेत. अर्थात हा विचार सुरु करुन देणाऱ्या माझ्या खऱ्या आयुष्यातील मित्राला धन्यवाद द्यायलाच पाहिजेत.. चालताना आपलं चालण्याचं वेड इतकं प्रबळ असतं की आपण कुठवर आलोत हेच कळत नाही... यात अनेकदा भरकटण्याचा धोकादेखील असतो त्यासाठी असं 11 वर्षांच्या प्रवासाचं सिंहावलोकन करण्याची संधी या निमित्तानं या माझ्या मित्राच्या विचाराने दिली.

            आभासी जगातलं जगणं वास्तवातही घातक ठरु शकत याची जाणीव ठेवा.. फेसबुकवर जरुर व्यक्त व्हा पण जाणतेपणाने आणि हो... वास्तव आणि अभासी जग याचा घातक संबध स्पष्ट करणारा मेट्रीक्स चित्रपट जरुर बघावा तो देखील इंग्रजीतच... पुढच्या वेळी फेसबुकवर व्यक्त होण्यापूर्वी.....

प्रशांत दैठणकर

9823199466