Tuesday 14 August 2012

विलासराव....

माणूस कसा असावा याचं उदाहरण म्हणजे विलासराव देशमख असं म्हणता येईल.विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी औरंगाबादला बदलीवर गेलो. माझी बदली तातडीच्या कारणाने झाली आणि लगोलग मला तिथं उपसंचालकपदाचा पदभार दिला गेला.
     मी औरगाबादमध्ये सततच्या दौ-यांमधून आणि कॅबिनेट बैठकांमधून विलासरावांच्या आसपास वावरलो.पत्रकार परिषदांच्या निमित्तानं अधिक जवळून परिचय झाला. एक राजस आणि लाघवी व्यक्तीमत्वाचे धनी मुख्यमंत्री म्हणून वावरायचे अतिशय रुबाबात पंरतु कधी आवाज चढला नाही पण जरब होती. आदरपूर्वक वचक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे विलासराव असं म्हणता येईल.
     एकदा खरिपाच्या बैठकीनंतर वाल्मीत पत्रकार परिषद घ्यायची होती. त्यावेळी पत्रकार संघाच्या काही सदास्यांनी विनापरवानगी प्रमुख पाहुणे म्हणून विलासरावांचे नाव टाकले.आणि आग्रह केला. मात्र कार्यक्रम पत्रिकेत कार्यक्रमच नसल्याने विलासरावांना तिथं जाणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी स्पष्ट नकार दिला.
     तिथल्या एका कक्षात विलासराव आराम करत असताना बाहेर पत्रकारांनी घोषणाबाजी सुरु केली. मी आत- बाहेर अशा स्थितीत होतो. मी विलासरावांना विनंती केली की कार्यक्रमाला जाता आलं तर चांगल होईल त्यांनी पुन्हा नकार दिला. माझ्या चेह-यावरचे भाव बघून त्यांनी मला जवळ बोलावले आणि आश्वासकपणानं म्हणाले चिंता नको करु.काय ते तुझी तक्रारच करतील ना खातं माझ्याकडेचे आहे. तक्रार माझ्याकडेच येणार तू काळजी नको करु. मी निर्धास्त झालो.त्यांच्या शब्दातला धीर मनाला सुखावून गेलो.
     सायंकाळी राजस्थानी विद्यार्थी वसतीगृहाचं उद्घाटन होतं तिथं राजेद्र दर्डा आधी पोहाचले ते देखील राज्यमंत्री होते. त्यांच्या माझ्या मोबाईलवर फोन आला की कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे तिथं डी. पी.खराब झाल्याने लाईट गेले आहेत.मी लगेचच विलासरावांना सांगितलं की किमान अर्धातास कार्यक्रम उशीरा होणार आहे. तेंव्हा पत्रकारांच्या कार्यक्रमास जाणं शक्य आहे. तेव्हा पत्रकारांच्या कार्यक्रमास जाणं शक्य आहे कृपया कार्यक्रमास जाऊ म्हणजे पत्रकार मंडळी खूश होतील.
     विलासरावांनी घडयाळ बघत लगेच होकार दिला आणि गाडयांचा ताफा मसापकडे निघाला. त्यांचे वक्तृत्व दिलखुलास आणि रंजक असायचं त्यांनी भाषणाला सुरुवातच मुळी....नारायण नारायण... ! आणि अर्धा तास जोरदार फटकेबाजी करीत पत्रकांराना खडे बोलही सुनावले. तसेच विनोदाची पेरणी करीत सर्वांना हसविले. आपणही वृत्तपत्र काढलं त्याचे किस्से त्यांनी ऐकवले. राजेंद्र दर्डांचा फोन येईपर्यंत हे भाषण सुरु राहिले. असं दिलखुलास व्यक्तीमत्व आज आपल्यात नाही त्यांना आर्वीत शेवटचं भेटलो त्यावेळी आपल्या नेहमीच्या पध्दती अरे तू इथं ... कसा मजेत ना असं विचारलं. इतक्या काळात ७ वर्षांचा खंड पडला तरी ओळख त्यांनी ठेवली याचा मला आनंद वाटला.
 ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना
- प्रशांत दैठणकर

Thursday 2 August 2012

“ इक राधा इक मीरा.. दोनोंने श्याम को चाहा..

अंतर क्या दोनोंकी प्रितमें बोलों...? ”

गाण्याच्या या ओळी आठवण्याचं कारण अगदीच वेगळं.. औरंगाबादहून मी बुलडाण्याला येत होतो. जेवणासाठी चिखली येथे एका हॉटेलमध्ये पोहोचलो. छानपैकी जेवण झालं. तडका दाल आणि तंदूर रोटी हे माझं आवडतं भोजन. जेवण झालं आता मस्तपैकी पान खाण्याचं ठरवलं. पानाच्या टपरीवर त्याला पान सांगून उभा होतो. एक शाळकरी मुलगा टपरीवर आला.

‘मीरा आहे का ?’ अशी त्याने विचारणा केली... पानटपरी चालकाने त्याला “नही है…!” असं राष्ट्रभाषिक उत्तर दिलं.... लगेच त्या पोराने “ मग राधा आहे का? “ असा सवाल केला.. दुकानदाराने आपला सूर कायम ठेवत “ वो भी नही है “ असे उत्तर दिले.

त्या दोघांचा हा संवाद संपला. तो पोरगा लगेच दुस-या पानटपरीकडे निघाला. एव्हाना माझं कुतूहल जागं झालं होतं. राधा काय मीरा काय... मी त्या टपरीचालकाला विचारलं. त्याचं उत्तर ऐकून मी चाटच झालो. राधा आणि मीरा ही बंद पाकिटात विकल्या जाणा-या धनाडाळ प्रॉडक्टची नावे होती... राधा आणि मीरा यांचं श्रीकृष्णवरलं प्रेम सा-यांना माहिती आहे.. पण पानटपरीवर विकल्या जाणा-या पाकिटांवर ही नावं याचा धक्काही बसला... दुस-या खेपेत मला राधा आणि मीरा शेजारी शेजारी पाकिटांच्या माळांच्या रूपात लटकताना दिसल्यावर मी लगेच त्याचा फोटो काढला.

कोणी कशाचे नाव काय ठेवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र यातून होणा-या गमती.. विसंगती.. विनोद याचं भानही आपण ठेवलं पाहिजे असं वाटतं.

नागपूर शहरात एक कपड्याचे दुकान आहे त्याचं नावं विसंगती आणि विनोद यांचा संगम आहे.. दुकानाचं नाव आहे... “ दिगंबर वस्त्रालय... “ ये हुई ना बात... बुलडाणा जिल्ह्यात धाड या गावाजवळ एक पाटी बघितली... “ गणपती वॉशिंग सेंटर “.... औरंगाबादकडे जाताना मेराचौकी गावाजवळ एक हॉटेल आहे त्याचं नाव आहे हॉटेल आठवण.... औरंगाबादेत एक दातांचा दवाखाना आहे श्रीराम चौकाजवळ... त्या डॉक्टरचं मला कौतुक वाटतं... त्या डॉक्टरांनी दवाखान्याचं नाव ठेवलं आहे “ एकदंत दातांचा दवाखाना “... आता बोला.. शेक्सपियर भारतात आला तर नक्की पुन्हा म्हणेल.... What’s in the NAME..!

प्रशांत दैठणकर
२ ऑगस्ट २०१२