Tuesday 2 February 2021

डेटॉल वाली कोई चोट नही.....!


चित्रपटातला तो प्रसंग... अचानक नायिकेचा पाय....चालता चालता त्या रस्त्यावर एका ठिकाणी  ठेचकाळतो.. वाट ती  अनोळखी असणारी वळणांची ओळख नसणारी

. ती जरा कण्हते... नायक 24 तासात जवळ आलेला आणि प्रेमात पडलेला...

कोई चोट तो नही लगी... ?

त्याचा प्रेम आणि काळजी भरलेल्या आवाजातला  तो हळवा सवाल...

डेटॉल वाली कोई चोट नही.. !    

नायिकेचं अवखळ, लाडीक पण तितकच खट्याळ उत्तर.....

प्रेमाचं चित्र रंगत जातं... रंगातला गहिरेपणा सातत्याने त्याला दिसणाऱ्या छटा... आणि पुढचा प्रवास... आयुष्याचंही असच असतं.

पाहिलेलं.... आवडलेलं आणि हवं हवं वाटणारं.... कधी मिळतं तर कधी दूरच राहतं... मग जीव झुरणी लागतो. भावना वारंवार त्याच.. एखाद्या ठिकाणी जखम व्हावी आणि त्याला जपत असताना नेमकेपणाने त्याच ठिकाणी वारंवार आघात व्हावा... सावरायचं कसं... सावरायचं किती...

एक अनुत्तरित प्रश्नांची मालिका पिंगा घालत असते आणि मनाची आंदोलनं सुरु राहतात.

...स्वत:मध्ये मग्न होवून बडबडणारा आणि प्रेमात आकंठ बुडालेला प्राण... प्राणप्रिया मिळंत नाही म्हणून...मद्याचा चषक ओठांना लावून देवदास होतो आणि आलं दु:ख आपल्या पध्दतीने दर पेग..... दर मजल... करीत रिचवित असतो.

जगणं ही कला आहे... कसब हो मात्र सर्वांना याचा बोध वेगवेगळया वयात होतो... आनंदी जगण्याचे मार्ग सांगणारे आणि जगण्याचं तत्वज्ञान सांगून मोठेपणा मिरवणारे आपल्या जगात अनेक जण आपणास दिसतील... क्षणात सुख कधी वेदनेत बदलतं ते कळत नाही... मुळात सूख ही संकल्पना तोकडी आहे ती सुरु होण्यापूर्वी संपून पुन्हा येणा-या दू:खाची नांदी असते... अशा आयुष्यात अगदी मिश्कीलपणे म्हणता आलं पाहिजे.

डेटॉलवाली कोई चोट नाही है...

इथं साध्या दु:खाने हळहळणारे खूप आहेत... आयुष्य जसा आशा अपेक्षा आणि स्वप्नांचा प्रवास आहे तसाच तो वेदनांचाही प्रवास आहे... स्वप्नांचा शोध घेताना अपेक्षा उंचवतात पण अपेक्षा भंग होवून मग वेदना होतात आणि त्या वेदना सोबत घेऊन पुढच्या प्रवासाला निघायचं असतं... वेदना कमी होणार नाहीत पण त्या वेदनांना उराशी कवटाळायचही नसंत.

आयुष्य त्या कोळी गीतात आहे ज्यात म्हटलय... 
आठशे खिडक्या नऊशे दारं..

आयुष्यात संधीचं एक दार बंद होतं त्यावेळी नव्या संधीची नवी दोन दारे उघडत असतात. आता त्या बंद झालेल्या दाराचं दु:ख मानायचं की उघडलेल्या नव्या संधीचा आनंद मानायचा.. स्वत:लाच विचाराचं दृष्टी सर्वांना आहे पण एकच गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा आहे....

. डोळे उघडून जगाकडे बघताना आपलाच चांगला आहे  असं आपण मानतो ना.. ते कितपत बरोबर आहे हे आपणास झटकन कळत नाही हे देखील खरं..

काही डेटॉल वाली चोट नहीं म्हणत जगतात.... आयुष्यात किती लांब काळ जगलोय हे महत्त्वाचं नाही ते जगलेला काळ किती चांगला घालवला हे महत्त्वाचं आहे ..... मात्र काही जण याच जगात दिसतात...अश्वत्थाम्यासारखं भळभळता माथा घेऊन.. कायम वेदना ते वेदना... जगतात...रडतात...

यारों जिंदगी हैॆ जिंदादिली जरूरी है..... 

प्रशांत दैठणकर
982319466