Friday 9 August 2019

मेरे नयना सावन भादो ..... !

श्रावण... विविध रंगी श्रावण...कधी बावरा तर कधी तो गहिरा मस्त धुंद पावसाचा काळ, धुक्याची दाट दुलई घेतली आणि हिरवाईचा शालू ल्यायलेली वसुंधरा...
श्रावण असा महिना असा काळ प्रेमिकांना साद न देता शांत कसा राहिल...? अ्शा या काळात तर याला अधिक भर येत असतो...

प्रेमकुजन तसं पावसाच्या येण्यासोबतच सुरु होतं आषाढात धरती आपलं रुप पालटते आणि श्रावणात ती भरास येते... उधाणास आलेला समुद्र किनाऱ्यावर येऊन वसुंधरेला किती आपल्यात सामावून घेईल असं वाटतं त्याचा तो उताविळपणा श्रावणात सर्वाधिक. लाटामागून लाटा येत राहतात आणि पावसासोबत धरतीला तो सागरही सतत भिजवण्यात धन्यता मानतो... त्याच्या उदरातून मेघांमार्फत पाडलेलं पावसाचं दान लवकर मला परत कर .. असं काहीसं तो जणू तिला सांगत असावा.

ग्रीष्मानं पोळलेली धरती सुखावते... मग आपलं खरं रुप दाखवायला सुरुवात करते...
सुर्याच्या दाहकतेने पोळले-वाळलेले डोंगर कोरडे झालेले... पावसाचा प्रत्येक थेंब आशा होवून धरतीत सामावतो आणि निष्पर्ण होवून सूर्याला शरण गेलेले तृण जमिनीतून नव्याने कोंब होवून बाहेर येतात... जीवनाचं एक वर्तुळ पूर्ण होवून नवनिर्मितीचा क्षण सुखदायी भासतो... आनंददायी असतो.

त्याच्या वरसण्यात विविध प्रकारचे नात असतात... त्याची गती आणि लय वेगळी असते, पावसाचे थेंब हातावर झेलताना त्याला तिची आणि तिला त्याची आठवण... सारं भारुन टाकणारं असतं मंतरलेलं असतं... वळचणीला हातावर थेंब झोलताना त्याची आठवण आली की लगेच अंगणात जाऊन उभं रहायचं... चिंब भिजण्यासाठी ....त्याच्याही अंगणात पडत असेल हाच पाऊस म्हणत... तितकीच जवळीक साधण्याची संधी..

पावसाचं येणं सुरु करतं त्या आठवणींच्या पावसाला...जगलेला
क्षणांचा तो आठव झरा होवू पाझरायला लागतो आणि अचानक त्याचं रुपांतर धबधब्यात होतं... कस...?  काय..? याला उत्तर नसतं... काही प्रश्न असे असतात की त्याचं उत्तर आपण शोधायचं नसतं तर काही उत्तरं शब्दांच्या पलिकडली असतात. काहींची उकल स्पर्शातून तर काहींंची रंग आणि गंधातूनही होत असते.... काही प्र्श्नांची उत्तर आपण नकळत आपल्या नजरेतून देतो.. ‍Rather आपल्यालाही फसवून ती नजरेतून चोरली जातात ..

ते क्षण.... कमीच पडतात आठवणीत तो भिजण्यातला आनंद शरिराला ओलं करत असला तरी विरहात हा पाऊस आतल्या मनात असणारा कोरडेपणा संपवू शकत नाही... मन कोरडंच रहातं... कोरडंच रहातं... ही भावना तशी थोड्याफार फरकाने आपण कधी ना कधी अनुभवलेली असते. अर्थात त्यासाठी प्रेमात पडणं जरुरी असतं हे काही वेगळं सांगायला नको....!

मेरे नयना... सावनभादो...

फिर भी मेरा मन प्यासा...!

श्रावण असा काहिसा... न कळलेला...
पण मनापासून भावलेला... मनामनात जपलेला..

प्रशांत दैठणकर

9823199466

Friday 2 August 2019

धकधक करने लगा

दहावी असो की बारावी अगदी साधी घटक चाचणी.. त्यात आज निकाल आहे असे ज्यावेळी सांगण्यात येते त्यावेळी पोटात गोळा येतो हे नक्की. कितीही हुशार मुलगा किंवा मुलगी असो पोटातला गोळा ठरलेला. उलट जितका हुशार तितका मोठा गोळा येणार हे सांगायलाच नको. आणि हा गोळा त्या मेरी गो राऊंड मधून खाली येताना जितका येतो त्यापेक्षाही मोठा असतो. हा सार्वत्रिक असा अनुभव आहे हे वेगळं सांगायला नको. शाळा झाली आता मुलं देखील मोठी झाली या वयाच्या चाळीशीनंतरच्या काळात असा अनुभव परत येणार आहे का..? याचं उत्तर हो असं आहे... आता विचाराल की ते कसं काय हो...?

चाळीशी नंतर आरोग्याच्या समस्या डोकं वर काढायला लागतात. वयाची धुंदी कमी होवू आपण स्थिरावतो त्यावेळी साधा होणारा पाणीबदल देखील त्रास द्य़ायला पुरेसा असतो. तारूण्यात असणारी ती धडाडी कमी होते. त्या काळात पाऊस बरसतोय याचा आनंद घ्यायला मुद्दाम बाइक घेऊन पावसात बाहेर पडणारे आता साध्या पावसाच्या आनंदाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. या पावसात भिजलं तर होणारी सर्दी आणि पुढच्या आजारांचं चित्र नजरेसमोर येत असतं..

शरिराची गाडी उताराला लागण्याचा हा काळ.
यात जरा आजारपण आलं तर दवाखान्यात जावं लागतं डॉक्टर मग रक्त तपासा असं सांगतात आणि आपल्या चकरा तपासणीकडे सुरू होतात. Fasting आणि Post Meal तपासणी करायची असते. सोबतच किडनी आणि लिव्हर यांची ही फंक्शन टेस्ट सोबत सांगितलेली असते... साधारण दोन तासांनी नाश्ता करुन पुन्हा एकदा लॅब गाठणे आणि तीच प्रक्रिया .. रिपोर्ट कधी येणार तर ते सायंकाळी येणार असतात तो कागद काय लिहून हातात पडेल याची चिंता सुरु होते.

धकधक करने लगा मोरा जियरा डरने लगा... अशी काहीशी ती अवस्था आपली होऊन जाते.. आणि तो कागद हातात घेताना पोटात चांगलाच गोळा येतो.. This Very Normal बरं...
हा मुळात मानवी स्वभावच आहे.

वर्तमानात जगताना त्या भविष्यात काय़ आहे याची उत्सुकता सा-यांनाच असते तो निसर्ग नियम आहे. त्याला सोप्या भाषेत भविष्यात काय मांडून ठेवलय माहिती नाही असंही म्हणता येईल.. अनामिकाची ओढ असंही याला सांगता येईल त्यात आपल्या अपेक्षांप्रमाणे निकाल येण्याची खात्री नसल्याने हा पोटात गोळा येण्याचा प्रकार होत असतो. आणि नेमकी मनाची हीच कमजोरी हा अनेकांचा पोटापाण्याचा व्यवसाय झाला आहे Rather आजचं युग याचाच फायदा घेताना सगळीकडे आपणास दिसेल.

आपली सकाळ कशी सुरू होते.. ? जरा आठवा साधारणपणे सर्व चॅनेल आपला दिवस राशी भविष्याने सुरू करुन देतात.. हो की नाही. चांगलं घडण्याची आशा सा-यांनाच आहे त्यात आपला वाटा उचलून या चॅनल्सनी किमान दिवसाची सुरूवात तर चांगली करून दिलेली असते ही जमेची बाजू.. जे घडायचं ते घडणारच असतं ते घडतं मात्र आपण आशेचा किरण शोधत असतो प्रत्येक क्षणी हे खरं... माझी आई एक मराठीत असणारी म्हण नेहमी सांगत असे... आशाय.केशनाशाय...

आशा आहे म्हणूनच जगण्यात आनंद आहे असे सांगणारे काही कमी नाहीत बरं.
उम्मीद पर दुनिया कायम है असं म्हणतात ते यासाठीच. मात्र याबाबत माझं मत नेमकं उलट आहे. आलं ते स्वीकारणारा माणूस जगात अधिक सुखात जगतो त्यामुळे मला ते आवडतं.. कदाचित आईच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आजही असेल पण माझ्या दृष्टीने तीच वास्तविकता आहे. आपण डोळे उघडे ठेऊन जगतो असं असलं तरी आपण सजग असत नाही . वास्तव आपण सतत नाकारायचा प्रयत्न करतो... रात्री रंगवलेली स्वप्ने वास्तवात येतील या आशेवर आपण जगतो.

या जगात यश मिळवायचे असेल तर आपण उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघावीत आणि त्याला सत्यात आणण्याचे अहोरात्र प्रयत्न करावेत असे अपेक्षित आहे.. आपण उलटा प्रवास करतोय.. जगताना कठीण प्रसंग येणारच.. त्याचा आपण किती संधी म्हणून वापर करतो यावर यशाचा मार्ग असतो... सतत चांगलं घडण्याची अपेक्षाच मुळात चुकीची आहे. 24 तासांच्या आपल्या दिवसात अर्धी रात्र असते आणि अर्धा दिवस असतो.. आणि आपण काही अंटार्टीकवर राहत नाही हे समजून घेतले
पाहिजे.

वयानुसार होणारे बदल हा निसर्ग नियम आणि तो आपणाला दर क्षणाला म्हातारं करणारा न ठरता तो प्रगल्भ करणारा ठरला तर अधिक उत्तम.



प्रशांत दैठणकर

9823199466