Friday 19 August 2011

वृध्दाश्रम ही आपली संस्कृती नाही ...!



घर आणि घराचं घरपण यामध्ये चार भिंतीपेक्षा घरात राहणाऱ्या व्यक्तींचं महत्व अधिक असतं. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरीकरण मोठ्या प्रमाणावर व्हायला लागल्याने चाकरमानी मंडळी शहराकडे वळली. शहरात राहण्यासाठी जागेची समस्या निर्माण      झाल्यावर घरं संकुचित व्हायला सुरुवात झाली अन् या संकुचित होणा-या घरांनी मानवी मनाला संकुचितपणा प्राप्त करुन दिला.
दहा माणसांचा राबता असणाऱ्या घरातील होतकरु पिढीने हमखास दरमहा वेतनाचा पर्याय देणाऱ्या नोकरीचा आधार शोधत शहर गाठायला सुरुवात केली. साधारण 50 वर्षापूर्वी सुरु झालेली ही प्रक्रिया आजही मोठ्या प्रमाणात सुरुच आहे. शहरात लोकसंख्येची घनता वाढल्याने निवासी क्षेत्राचा तुटवडा जाणवू लागला. परिणामी जमिनीचे दर आकाशाला टेकायला लागले. माणसाच्या निवा-याची  गरज पूर्ण करण्यासाठी आकाशाला गवसणी घालणा-या इमारती बांधण्याची स्पर्धा सुरु झाली. मात्र यातही निवासी जागा अगदीच मर्यादीत असल्याने घरातील बुजूर्गांना घरात आधार मानता अडसर मानणारी संकुचित मनोवृत्ती उदयाला आली. हा भौतिकवादाच्या सर्वात भयंकर परिणाम आहे.
भारत हा संस्कृती असणारा आणि जपणारा एक आघाडीचा देश आहे. भारताची ही सर्व जगाला असणारी ओळख आज वाढत्या लोसंख्येमुळे मागे पडत आहे. आजची चाकरमानी मंडळी आणि नागरीकरणाच्या फटक्यात अडकलेली मंडळी मोठ्या प्रमाणात या नव्या समस्येला सामोरे जात आहे. स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात स्वत:चं अस्तित्व टिकविण्याची धडपड प्रत्येकजण करता दिसतो. या त्याच्या धावपळीत त्याला नव्या पिढीला घडविण्यासाठी, संस्कार करण्यासाठी वेळ राहिलेला नाही आणि अनुभवाने आपल्यापेक्षा समृध्द असणाऱ्या बुजूर्गांचा सल्ला ऐकण्याची फुरसत नाही त्यामधून जन्म झाला तो वृध्दाश्रम संस्कृतीचा भारताच्या गौरवशाली आणि समृध्द परंपरेत आणि संस्कृतीत वृध्दाश्रम कुठेच बसत नाही.
ज्या पिढीनं आपल्याला घडवलं, शिकवलं आणि आपल्या पायावर उभं राहण्याचं सामर्थ्य दिलं. प्रसंगी आपल्याहून लहान होवून हाताचं बोट धरुन, पावलं कशी टाकावीत हे शिकवलं आणि स्वत:च्या अपेक्षा आणि स्वप्नांवर पांघरुन टाकत आपल्या स्वप्नांना स्वत:पुरतं मर्यादीत ठेवून आपलं भविष्य घडविण्यासाठी स्वत:चं वर्तमान संपवलं त्या पिढीची आपल्याला अडचण होते हाच करंटेपणा आहे.                                                           
हल्ली टि.व्ही. वर ज्या मालिका चालू आहेत त्यात या वृध्दाश्रमाच्या समस्येवर ब-यापैकी चर्चा होताना दिसते. नवी  पिढी आणि जुनी पिढी यांच्यामध्ये साधारण जे अंतर राहतं त्याला `जनरेशन गॅप` म्हणता येईल. मात्र हा `गॅप` ज्यावेळी तयार केला जातो त्या `जनरेटेड गॅप`म्हणावं लागेल असा `जनरेटेड गॅप` हे वृध्दाश्रमाचं मुळ आहे.
आपण आपल्या बुजूर्गांकडून मार्गदर्शन घ्यावं कारण त्यांनी आपल्यापेक्षा अधिक पावसाळे बघितलेले असतात. त्यांच्या अनुभवाचं मोल जाणताना त्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी उपसलेल्या कष्टाचा `एव्हरेस्ट` डोळ्यासमोर आपण सातत्यानं ठेवला तर आपल्याला त्याचा कधीच अडसर वाटणार नाही उलट त्यांचा आधारच वाटेल.
आपल्याला आधार देणा-या बुजूर्गांना आपण आधार वाटला पाहिजे अशी आपली कृती असायला हवी ही मंडळी आपलं मत सोडतच नाहीत. असं आपण म्हणतो. त्यावेळी आपणही आपल्या मताबाबत हट्टी असतो ही या नाण्याची दुसरी बाजू असते दोन्ही बाजूंनी असणारी ही आग्रही भूमिका मनामध्ये दुरावा निर्माण करते आणि इथं बुजुर्गांचं म्हणणं स्वीकारण्याची तयारी नसलेली पिढी त्यांना अडसर मानायला सुरुवात करते.
विचार करा. एखादी गोष्ट तुम्हाला करायला तुमच्या बॉस ने सांगितलं आहे. मनापासून तुम्हाला तसं करण्याची इच्छा नाही अशा स्थितीत तुम्ही नोकरीचा भाग म्हणून अगदी मनाविरुध्द जाऊन ती कृती करताच की नाही, घरात असा प्रसंग आला तर मात्र तुम्ही आपलं तेच खरं ही वृत्ती ठेवता. यातून बुजूर्गांमध्ये आणि नव्या पिढीत दुरावा निर्माण होत असतो.
आपण आपली मतं इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतो हे एकमेव सत्य आहे. पण आपण तारतम्याने विचार केला तर आपली चूक आपल्या लक्षात येईल. घरात मुलं आपलं अनुकरण करतात तसं ते बुजूर्गाचंही करतात. बुजूर्ग व्यक्तींच्या विचारात असणारा प्रगल्भपणा आपण आपल्या मुलांच्या जडणघडणीत करता सामिल होईल याचा विचार करावा.
संपूर्ण आयुष्य वेचून आपल्याला जयांनी घडवलं त्या शिल्पकारांना आपण विसरता त्यांचाच अनुभवी हातांनी भावी पिढीला घडविण्याचं काम केल्यास ही वृध्दाश्रम संस्कृती निश्चितपणे हद्दपार होईल.त्यांची गत माझ्याच एका कवितेत मी मांडली होती...
 सावल्या ही कविता......................

शांत,स्तब्ध त्या सावल्या
          पेपर वाचत बसलेल्या
          पहाटवाऱ्यातला मॉर्निंग वॉक
          सायंकाळी  पारावर विसावलेल्या
खेळी  ज्यांची झाली खेळून
                   म्हणून ड्रेसिंग रुममधून मॅच बघणाऱ्या
                   अनुभवाचं शहाणपण शिकवणाऱ्या
                   यशाबद्दल थाप होवून पाठवरचे हात
                   सावलीच ती... तिला सावलीची साद
                   तुम्ही दुडूदूडू धावत असताना
                   गुडघा टेकवत तुमची सावली झालेल्या
                   अन् ही छोटी सावली  उंचावताच
                   स्वत: कमरेतून वाकलेल्या
                   त्या सावल्यांनी तुमची सावली वाढवली
                   अन् तुमच्या सावली खाली  स्वत: गेली झाकली
                   शांतपणे.. सावल्यांचा हा खेळ
                   असाच सुरु अव्याहतपणानं
                   जोवर सरत नाही .. ही सांजवेळ..
-          प्रशांत दैठणकर

No comments: