Tuesday 25 June 2019

निस्ताच टैम्पास......


आजकाल आपण काय करतो असं विचारलं तर एकच सांगता येईल आजकाल आपणाकडे अधिकाधिक जण Time pass करतो.. यह मै नही कहता तर सारी आकडेवारी तेच दाखवत आहे. Candy Crush नावाचा एक मोबाईल गेम माझ्याकडे आहे. आज फारा दिवसांनी काही रिकामा वेळ होता म्हणून गेम खेळायला लागलो आणि मोठ्या मुष्किलीने त्याची एक लेव्हल पार केली आणि पुढची स्क्रीन पाहून धक्काच बसला.. यात रविवार ते रविवार लेव्हलचे आकडे येतात.. एक महिला आठच दिवसात 457
लेव्हल पार करून आघाडीवर असल्याचं तिथं दिसलं... इतका रिकामा वेळ असतो का लोकांकडे असा सवाल मनात आला. तसं रिकामा वेळ असणा-यांची आपल्याकडे कमतरताच नाही हे जाणवलं...

ये देश है वीर जवानोंका....

असं गाणं लहानपणी ऐकलं होतं आता ये देश है मोबाईलवालोंका अन् टैमपास करने वालोंका असं क्षणभर वाटलं... त्यातच आज एका वृत्तपत्रात उसंडू अर्थात उपसंपादकाची एक डुलकी वाचण्या आली आजचे भविष्य लिहिताना टायपिंगच्या चुकीने वेळेचा दुरूपयोग करा असं छापून आलय... लो कल्लो बात..

आपल्या देशात सर्वाधिक वेळ हा निवडणुकांच्या चर्चेत जातो असा एक अनूभव आहे आणि ग्रामीण भागात तर तो सा-यांचा आवडता छंद आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. ग्रामीण भागात आधी चावडीवर गप्पा चालत असत... आता गाव तिथं एसटी आल्यानं गप्पांची जागा बदलून ती आता एसटीच्या स्टॅंडवर सरकली आहे. त्यात मोबाईल तंत्रज्ञानाच्या विकासाने आता सा-यांना ई-चावडी आता खुली केली आहे. मोबाईलच्या मदतीने सकाळी
रांगोळी काढणारे हात आता मोबाईलच्या पॅटर्न लॉक आधी उघडतात आणि दिवस नंतर सुरू होतो असा अनुभव येत आहे.

Whatsapp वर सकाळी संदेशांचा रतीब सुरू होतो तो रात्री झोपेपर्यंत चालू राहतो. यातील अधिक संदेश न वाचताच पुढे ढकललेले आपणास दिसतील. ज्याचा जसा Net pack तसा त्याचा वापर कमी अधिक होताना दिसत होता मात्र आता 4G Technology आल्यानंतर ते बंधनही राहिलेले आपणास दिसत नाही त्यात भरीस भर म्हणून आता TikTok धुमाकूळ घालताना दिसत आहे. यात चित्रविचित्र क्लीप बनवायच्या आणि त्या Forward करायची याची स्पर्धा आपण बघत आहोत. याचं Fad इतकं वाढलं की यावर बंदी आणण्याबाबत विचार व्हावा असं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे.

या सर्व माध्यमांचा वापर आपण सर्जनशीलतेसाठी केला तर ते समजण्यासारखं आहे मात्र यातून सामाजिक तेढ निर्माण झाल्याचे देखील काही प्रकार घडले आहेत फेसबूक सारख्या माध्यमाच्या गैरवापराने काही ठिकाणी दंगलीच्या घटनादेखील घडल्या हा प्रकार अतिशय गंभीरच म्हणावा असा आहे. व्यक्त होण्यासाठीचे कोणतेही साधन हे दुधारी तलवारीसारखे असते त्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत हे नक्की. आपण इतके रिकामटेकडे आहोत का याचा देखील आपण विचार या निमित्तानं करणं गरजेचं आहे.

आपली युवाशक्ती सकारात्मक कामात वापरली गेली तर खुप काही बदल आपण घडवू शकतो यावर आपला विश्वास असायलाच हवा.

रिकामपण लाभत नाही अशांच्या रांगेत
आपण बसावं तर तिथं देखील हे मेसेजवीर बसू देत नाहीत. त्यांच्या पोश्टी आणि त्यातल्या गोष्टी कधीच संपत नाहीत ही स्थिती आहे. त्यातही नको त्या व्हिडीओ टाकणा-यांनी आणलेला तो वैताग वेगळाच. कधी कधी तर वाटतं की मोबाईल आपल्यासाठी आहे की आपण मोबाईलसाठी.

हातात जग आलय हे खरं परंतु त्याचा चांगला फेरफटका घेण्यापेक्षा YOUTUBE वर वेळ घालवणारे सर्वाधिक दिसतात. तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हा अखेर ज्याचा त्याचा सवाल आहे मात्र त्याचा वापर विधायक होतो की नाही यावर किमान पालकांचे लक्ष असले पाहिजे.
आता PUBG त वेळ घालवायला सा-यांनाच आवडेल मात्र आपण स्क्रीन टाइमची मर्यादा देखील जपली पाहिजे ना...

फेसबूकचे पडीक अशा पिढी नव्याने पुढे येत आहे. काही मिनिटांनी आपसूक नजर आणि हात मोबाईलकडे जाणारी पिढी पाहून हा उत्क्रांतीचा नवा टप्पा तर नाही ना असाही सवाल पडतो.
डार्वीनच्या सिद्धांतानुसार आपलं शेपूट नावाचा अवयव काळाच्या ओघात संपला असं म्हणावं तर आता मोबाईलच्या रूपानं नवा अवयव आला आहे असे म्हणायला हरकत नसावी. आणि या युगाचा हा नवा अवयव असं म्हणत याला मान्यता देण्याची वेळही लवकरच येईल असे दिसते.

प्रशांत दैठणकर

982319466

Thursday 20 June 2019

जब्रा फॅन.. आणि मर्लिन...!


नशिब कुणाचं कसं आणि कधी बदलेल हे सांगता येत नाही आणि सोबतच काही जण प्रसिध्दी आणि वादाचं वलय घेऊन जन्माला येतात. अशांच व्यक्तीमत्व आणि वाद यांच नातं कर्णच्या त्या कवचकुंडलासारखं असतं... त्याची कवच कुंडलं काढली गेली पण काही जणांची ती निघत नाहीत आणि जन्मानंतर मृत्यूपर्यंत वाद आणि ब-याचदा मृत्यूनंतरही त्याचा प्रवास पुढे सुरु राहतो अगदी मृत्यूनंतरही.

जगताना सौंदर्याचं परिमाण ठरलेही आणि जिला शापीत सौंदर्याची साम्राज्ञी असं म्हटलं जातं ते मेरेलीन (की मर्लिन ) मन्‍रो.. तिच्या मृत्यूचं गुढही तिच्या इतकं टिकलय आता तर तिचा पुतळा चोरुन नेण्याची घटना घडली... वाद - विवाद आणि सतत चर्चेत राहणं, अगदी मृत्यूनंतरही.

कालच तिच्याबाबतची एक पोस्ट कुणीतरी सोशल मिडियावर शेअर केली, ती बघण्यात आली... आम्ही तारे आहोतर आमचं टिमटीमणं हे दिसलंच पाहिजे अशा आशयाची ती पोस्ट होती... चाहत्यांना तेच आवडतं आणि त्यांची आवड जपण्याचं काम जे करतात त्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे "जब्रा फॅन"  अर्थात जबरदस्त फॅन हाे... कमी नाहीत. त्यातच हा शर्विलक
चाहता वेगळा म्हणावा लागेल कारण त्यानं लेडिज ऑफ हॉलीवूड गझेबो येथून चक्क करवतीने कापून हा पूतळा जागेवरुन वेगळा केला आणि चोरुन नेला.

1955 सालच्या मर्लिनच्या " द सेव्हन इयर इच " चित्रपटातील भूमिकेवरुन हा पुतळा तयार करण्यात आला होता. आयुष्यात ग्रहांची साथ किती मिळाली हे ठाऊक नाही परंतु आयुष्य संपल्यानंतरही ग्रह बदलत असतात. याचंच हे एक उदाहरण म्हणता येईल.

हॉलीवूडचं हे आरसपानी सौंदर्य असणारी व्यक्ती म्हणून मर्लिनला जिवंतपणी खूप चर्चेत राहण्याची सवय होती. आता इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर देखील त्यात काही कमतरता राहिलेली नाही हेच स्पष्ट होतय या चोरीच्या घटनेवरुन...!

सौंदर्याला असणारी शापीतपणाची किनार हा विषय सर्वच क्षेत्र थोडयाफार फरकाने लागू पडणारा आहे. रुपेरी पडदयावर जे दिसतं आणि घडतं त्याबाबत चर्चा होते आणि इतर बाबतीत चर्चा होताना दिसत नाही इतकच सांगता येईल परंतु सर्वच क्षेत्रात हा प्रकार आहे.

लहानपणी शिकवलेलं वाक्य आठवतं या संदर्भाने " जो आवडे सर्वांना तो ची आवडे देवाला " संदर्भ मर्लिन मन्‍रोचा आणि तिच्या पुतळयाबाबत घडलेल्या ताज्या घटनेचा असला तरी या संदर्भाने होणारे अंधानुकरण आणि त्यातून बळावणा-या अंधश्रध्दा हा देखील आहे.

आचार्य प्र. के. अत्रे यांच याकडे लक्ष वेधणारं " बुवा तेथे बाया " हे नाटक गाजलं होत. पण अनुकरणाचा हाच एक प्रकार नाही. जगाच्या इतिहासासोबत भुगोलही बदलणारा "ॲडॉल्फ हिटलर" याचे फॅन देखील मोठया प्रमाणात होते. राजकारण हे क्षेत्र देखील चाहत्यांचं आणि "जब्रा फॅन" असणा-यांच क्षेत्र आहे. याचा प्रभाव दक्षिण भारतात अधिक असल्याचं आपणास जाणवतं.

चाहतेपणाची मर्यादा आपण ठरवणारे कोण असा सवाल या निमित्तानं विचारता येतो. चित्रपटसृष्टीत वेगवेगळे अभिनेते, नायक आणि नायिका
आहेत त्या प्रत्येकाचे चाहते वेगळे आहेत आणि ज्याचे चाहते सर्वाधिक तो सूपरस्टार अर्थात चलनी नाणं असा इथला हिशेब

राजेश खन्ना असो की, अमिताभ बच्चन हे दोघेही सुपरस्टार राहिले असले तरी त्यांचे सर्वच चित्रपट तिकिटबारीवर स्विकारले गेले अशाही स्थिती नाही. या अभिनेत्यांनी राजकारणात जाण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना सपशेल नाकारण्याचा प्रकार देखील आपण अनुभवला याच्या नेमका उलट प्रवास दशिण भारतात आपणास दिसेल एम. जी. आर, जयललिता, एन.टी.रामाराव आणि अलिकडच्या काळात कमल हसन आणि रजनीकांत यांचा प्रवास रुपेरी पडदयावरुन राजकारण असा झालेला आपणास दिसेल.

एकुणच काय तर सर्वच क्षेत्रात सर्वांचा काळ बदलतजातो, आणि ग्रह बदलतात त्याप्रमाणे मृत्यूपूर्वीच नव्हे तर त्यानंतरही चर्चेत राहण्याचं किंवा ठेवण्याचं काम जगात सर्व क्षेत्रात सुरु असलेलं आपणास दिसेल
"मार्लिन" तर त्यातील शिरोमणी राहिलेली आहे... अगदी आजपर्यंत तिची लोकप्रियता कायम आहे हेच ताज्या पुतळा चोरीच्या घटनेवरुन स्पष्ट होते.

आकर्षण ही बाब नैसर्गिक आहे त्यात भिन्नलींगीआकर्षणाचा निसर्गनियम कुणालाच टाळता आला नाही. इतर प्राणी आणि मानव यात एक महत्त्वाचा फरक अर्थातच इतर प्राण्यात नर अधिक सुंदर आहे. आणि मानवात नेमका उलटा प्रकार आपणास दिसतो. याच विषयावर Men from mars, women from venus अशी सुंदर कांदबरी आहे. सां

सौंदर्य आहे तेथै आकर्षण असणारच अगदी ग्रामीण भागात सांगतात तसं धोका आहे तिथ खतरा असं काहीसं हे आकर्षणाचं गणित... याच आकर्षणाचा परमोच्च बिंदू म्हणजे असे शर्विलक असणारे "जब्रा फॅन" असतात... चाहते कोणती मर्यादा कधी ओलांडतील याचा अंदाज येण कठीण.. आणि त्याचा  अंदाज बांधून ते कसे वागतील याबाबत सांगणं देखील अवघडच आहे.
.पण चाहते असावेत आणि अधिकाधिक असावेत असा साऱ्यांचा आग्रह न दिसला तरच नवल.  आजच्या युगात सा-यांना प्रसिद्दीचं वेड आहे आणि त्याचं वलय हवं असं सा-यांनाच वाटतं.... आता ज्यांना ते मिळालं आहे त्याचं तर यानिमित्तानं कौतूक करायलाच पाहिजे ना... असे जब्रा चाहते कोणास नकोत बरं...

प्रशांत दैठणकर

9823199466

Wednesday 19 June 2019

पाऊस ... विलंबित ख्यालातला ..... !



पावसाची वाट बघणारा चातक ऐकण्यात आहे पण यंदा पावसानं इतका विलंबित ख्याल लावला की माणूस देखील चातकाइताकाच या पावसाची वाट बघायला लागला... वाट त्याच्या येण्याची असते मग त्याला उशिर होताच खूप काही विचार केला जातो.... संकल्प केले जातात आणि यंदा तरी आला थेंब साठवायचं असं ठरवलं जातं... उशिरा का होईना तो येतो आणिसारं काही धूवून टाकतो... त्याच्या वाट बघण्यातले संकल्प देखील मग त्याच्याच वर्षावात वाहून जातात.

पावसाची मजा कही आगळीच म्हणावी लागेल नाही म्हणायला त्याचे उदाहरण तर हक्काने दिले जाते... ssमी पावसाळे पाहिलेत असं सांगून आपला मोठेपणा दाखवला जातो. तिथं पावसाचं परिमाण अनुभवाशी जोडलं जातं पण अनुभव हाच आहे की इतके पावसाळे बघून देखील कुणाचीही वृत्ती बदलत नाही.

पाऊस आपल्याकडे चार महिन्यांचा पाहुणा आहे. आमच्या लहानपणी कशी झड लागायची म्हणून सांगू असं सांगणारी आज चाळीशीतून पन्नाशीकडे जाणारी पिढी त्या पावसाचं ते कोणकौतुक करताना थकत नाही पण आढयावरचं पाणी इतके वर्षे ओढयाकडे जातं राहिलं आणि आताशा त्याचं येणं कमी झालं पण त्याची ओढयाकडे धावण्याची ओढ आम्ही रोखली नाही... पावसानं जरा ओढ दिली की शेतकऱ्याचे डोळे बरसायला लागतात पंरतु काँक्रीटच्या जंगलातील तुन्हा-आम्हाला काही दिवस कौतुक आणि नंतर तो खोळंब्याचा पाऊस ठरतो.

हल्ली सोशल मिडियाचं प्रस्थ खूप वाढलय त्यामुळे त्या पावसाच्या दोन सरी बरसताच त्यावरच्या पोष्टी आणि त्यावरील कवितेच्या गोष्टींचा पाऊस या मिडीयावर दिसतो. स्मार्टफोन आणि प्रत्येक हाती आलेला इंटरनेट यामुळं पाऊस माझ्या नजरेतून म्हणत कॅमेऱ्यातून टिपलेला पाऊस मिडीयावर जास्त बरसतो. इलेक्ट्रॉनिक मिडीयाला दरवेळी यात ब्रेकींग वाली खबर गवसते त्यात आम्हीच प्रथम म्हणत मान्सूनच्या आगमनापूर्वीच त्याचा होणारा पाठलाग आणि त्यातून रंगलेली ब्रेकींग ची स्पर्धा असा प्रवास होताना दिसतो.

त्याच्या आणि तिच्यासाठी पाऊस हा केवळ भिजण्यासाठी असतो उगाच भिजून त्यानं मेसेज पाठवायचा बघ तुला माझी आठवण ... वगैरे वगैरे.. ! 
पाऊस हा सर्वात मनोहारी आणि स्मृतीत जपण्याचा काळ... पावसाच्या  थेंबांचं कोंदण घालून चमकणारे तिचे गेसू हे हिऱ्यापेक्षाही अधिक मोलाचे असतात... माणसापासून सर्व प्राणीमात्रात या वर्षाउत्सवाचा आगळाच आनंद आपणास दिसेल.

इंटरनेटच्या पसाऱ्यात आभासी जगात जगताना पावसात अवचित भिजंण खऱ्या अर्थानं वास्तवात आणणांर असत... मात्र त्या पिढीला बिरबलानं पावसावर दिलेल्या प्रश्नांच उत्त्तर ठाऊक आहे असं मला वाटत नाही 27 मधून 9 वजा केले तर शिल्लक किती याचं उत्तर झटकन मोबाईलच्या कॅलक्युलेटरवर शोधण्याचा प्रयत्न ही नीव पिढी नक्कीच करेल पंरतु ते हमखास चुकणारं आहे... 27 मधून 9 गेले तर शिल्लक शून्य राहते हे फक्त मेहनतीनं मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यालाच सांगता येईल.

पाऊस म्हणजे आंनद... पाऊस म्हणजे जीवन... ग्रीष्मात पोळलेल्या धरतीला तृषार्थ करणार कृतार्थ असा काळ पावसाच्या येण्यासोबत जागे होणाऱ्या त्याच्या यापूर्वच्या आठवणी आणि त्या आठवणींचा पाऊस... आपल्या जीवनाशी निगडीत एक सत्य आणि दूरावणांर सत्य... काळ बदलला असं का म्हणतात तर काळ स्थिर नाही तो बदलत असतो पण माणसाच्या स्वार्थी जगण्यातून त्याच्या बदलण्यात असणारा धोका आता दिसायला लागलाय.. !

मनोज कुमारच्या पानी रे पानी तेरा रंग कैसा  गाण्यात पाण्याचा बदलणारा रंग त्यांच वैश्विक रुप सांगणार आहे पण असं गाणं म्हणायचं तर तो पावसाच्या धारांमधून बरसला तर पाहिजे ना !

पावसाला येण्याची आळवणी करणारं बालपणीचं गीत या निमित्त आठवतं... ये रे ये रे पावसा म्हणताना त्याची विनवणी करताना तुला देतो पैसा  असं बाळकडू अनेक पिढयांनी पाठ केलं त्यावेळी पैसा लागणार भविष्यकाळात आपणास कुठे माहिती होत...!
आज ती वेळ कुणी आणली आहे याचं उत्तर शोधताना स्वत:ला पाण्यात न पहाता आपण स्वत:ला आरशासमोर उभं रहायची वेळ आलीय हे निश्चित.

प्रश्न इतकाच आहे की धोक्याची घंटा सातत्याने वाजतेय .आपणच कान बंद करुन बसलो आहोत नाहीतर आपल्या कानात हेडफोनचे स्पीकर लावून बसलो आहोत असं वाटतं... !

तो पावसाळा आणि त्यासाठीची पूर्वतयारी... ती छत्री घेण... आता दरवर्षी नव्याने घेण कारण छत्री दुरुस्ती करणारी मंडळी काळाच्या ओघात संपून गेली असं म्हणावं लागेल...! पाऊस हवाहवासा म्हणताना तो सुरुवातीला हवा वाटतो मग तो सतत बरसायला लागल्यावर त्याच्या रिमझिम पडण्याची मजा विसरुन आपणच त्याला आधी रिपरिप आणि नंतर पीरपीर म्हणायला लागतो.

आपण आपल्या भूमिका बदलत असलो तरी तो त्याची भूमिका बदलत नाही बरसताना या अंगणात बरसायचं आणि त्या अंगणात नाही असा भेद तो करीत नाही... आता त्यानं त्याचा धर्म सोडला नाही हेच आपल्या जगण्यासाठी महत्वाचं आहे... त्यानं कुठे बरसावं हे त्याचं काम मात्र आम्ही बंधारे बांधत जिल्हया-जिल्हयात त्याच्या या दानाचं राजकारण करतो आणि आतातर युध्दाची तयारी पण... !

                                                                                                                           सारं सोड राजा तू बरस ....
त्या बळीराजासाठी बरस... ! जो आर्जवं करतोय..
पडं रे पाण्या.... शेत माजं लई तान्हेल चातकावानी...

प्रशांत दैठणकर
९८२३१९९४६६

Tuesday 18 June 2019

राधा.... किशनकी

कृष्ण.. अनेक कंगोरे असणारं एक पात्र. पुराणात बघताना आपणास त्या पुराणात अनेक पात्र दिसतात मात्र त्या इतरांपेक्षा कृष्ण किती वेगळा होता हेच आपणाला जाणवतं. त्यानंतर कृष्णाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्‌यात असणारं वेगळं रुप आणि त्याला असणारं वलय खुपच भिन्न आहे. समरसता काय असते त्याची ती आगळी कहाणी होती असं काहीसं आपणास या बाबत सांगता येतं..

बाळकृष्णाच्या त्या खोड्या ते दूध-दही-लोणी खाण्यासाठी संवगड्यांना जमवून दहीहंडी फोडणं.. . सुदाम्याशी असणारं त्याच सखा म्हणून नातं, त्याची कहाणी वेगळी. बंधू प्रेमाचा अध्याय देखील वेगळा एका जीवनात अनेक नाती जपणं आणि ती जगणं आणि त्यातून आलेलं महाकाव्य.

अर्जुनाच्या मैत्रीत त्याचा खऱ्या अर्थानं सारथी होणे आणि एक ज्ञानी तत्वज्ञाच्या रुपामध्ये जगाला दिलेलं गीतेतून आयुष्य जगण्याचे भान आणि आयुष्याचा उलगडून दाखविलेला मार्ग सारं काही अदभूत असंच आहे असे म्हणता येईल.


या संपूर्ण प्रवासात त्याचं जोडलं गेलेलं राधेशी असणारं नातं मात्र अधिक प्रचलनात आलं.. तो राधेचा कृष्णाशी असणारा आत्मसंवाद आणि तादात्म्यभाव या नात्याला अनोखं नातं बनवणारा ठरला. त्याचं अनोखेपण हेच की कृष्णाचं नाव घेण्याआधी राधेच नाव घेतल जातं.

राधाकृष्णाचं नातं शब्दातीत आहे इतकच म्हणता येईल. राधेची समर्पणाची भावना सर्वांनी इतकी पुढे नेली की या नात्यात राधेचं नाव अग्रस्थानी आलं.

राधा ही काही कृष्णाची पत्नी नव्हती. कृष्णाची पत्नी रुक्मिणी होती मात्र रुक्मीणीसारखी सुंदर पत्नी असताना देखील राधेचं नाव कृष्णाशी नुसतंच जोडलं गेलं अस नाहीतर या नावाची उंची रुक्मीणीपेक्षा अधिक झाल्याचे आपणास जाणवते. राधा आणि कृष्ण यांच्या कथेतील कृष्णाची आणि राधेची प्रिती जी सांगण्यात येते त्याचं वर्गीकरण कसं करावं हे नेमकेपणानं सांगणं अवघड आहे इतकच म्हणता येईल.

प्लॅटॉनिक लव्ह असं म्हणावं का... ते विकारशुन्य पण भावनांनी ओतप्रोत असणारं देहातील असं स्वर्गीय प्रेम होतं अस म्हणावं.. म्हणूनच आरंभीच म्हटलं की ते सारं काही शब्दातीत आहे.

तुमच्या आमच्या आयुष्यात असं नातं येत का?
अन आलं तर आपण त्या राधा कृष्णाच्या प्रितीतील पवित्र्य आपल्या नात्यात जगतो का.. पहिल्याचं उत्तर होय असं शक्य आहे असं आहे. असं प्रेम अनेकांच्या आयुष्यात नक्कीच येते स्वभाव आवडला, नजरभेट झाली आणि प्रित जडली असं घडतं पण ते विकार विरहीत असतं नाही हे मात्र खरं...! आणि ते प्रेम प्लॅटॉनिक वगैरे तर नक्कीच नसतं इतकं खात्रीनं सांगता येतं ...

मानवी मन आणि भावना या किती गतिमान आहेत याचं उत्तर विज्ञान शोधत आहे. आजवर झालेल्या याबाबतच्या संशोधनानुसार एका मिनीटात मनात साधारणपणे 21 भिन्न्‍ विचार येवून जातात. इतकं चंचल मन असताना एकाच भावनेवर मन स्थिर करणं केवळ प्रेमात शक्य होतं का... एक सहज विचार.

राधाकृष्णाच्या कहाणीकडे अनेकदा बघताना वाटतं की खरं प्रेम कशाला म्हणायचं.. कृष्णकथेत नंतरच्या काळात कृष्णाच्या प्रेमात विष पिऊन प्राण त्यागणाऱ्या मीरा .. तिचं ते काय काय ते वेगळं होतं.. राधा तर प्रत्यक्षात कृष्णासोबत गोकुळात त्याच्या आसपास होती मीरा.. तिचं तसं नव्हतं तरी ती कृष्ण प्रेमात पडली.. आता याला साऱ्यांनी कृष्णाची भक्ती म्हणणं खचितच पटत नाही. कृष्णावरील प्रेमाने (की भक्तीने?) तिचही नाव कृष्णासोबत जोडलं गेल..


इक राधा, इक मिरा,दोनोंने श्याम को चाहा |
इक प्रेम दिवानी, इक दरस (दर्शन) दिवानी |


रुक्मीणी आणि कृष्णाच नातं आणि राधा आणि कृष्णाची प्रेम कहाणी आज वेगळ्या अर्थाने प्रचलनात आली ती प्रेमाचा त्रिकोण म्हणून वापरत आहे चित्रपट आणि टिव्ही वाहिन्यांनी वापरुन आपली कलात्मकता म्हणत व्यवसायात एका अर्थाने पोटार्थी वापरली असल्याचं दिसतं.

माझ्याही आयुष्यात अशी एक राधा आहे असं सांगावं असं प्रत्येक पुरुषाला वाटतं पण ते शक्य होतं नाही कारण प्रत्येकजण कृष्ण नाही ना.. आता हे सारं आठवायचं आणि शब्दात मांडायच कारण म्हणजे माझ्या आयुष्यातील राधा होय...! आता प्रत्यक्षात जगताना राधा आसपास असते हे मनमोकळेपणे सांगायला हिंमत करताना घरातल्या रुक्मीणीची किंचितशी भिती सा-यांनाच असते आणि त्यामुळेच मनातलं मनात राहतं.. त्या भावनेतून ज्या मुलीकडे आपण बघतोय त्या मुलीला देखील न सांगण्याचा इथला रिवाज आहे..त्याला वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर इतकच म्हणता येईल की भावना प्रबल असूनही आम्ही कधी कधी

हमसे आया ना गया.... और तुमसे बुलाया ना गया .....!

असं गाणा-या त्या नायकाच्या भुमिकेत आपले वीर दिसतात ....
मला याबाबत इतकंच सांगता येईल की दान निसर्गाचं आहे ते त्याला का नाकारायचं.. आहे प्रेम तर सांगून मोकळं व्हायचं..आली होती माझ्या आयुष्यात ती राधा अशीच ते मी कधी नाकारलेलं नाही आणि नाकारणार देखील नाही.. .......मनात आहे ते मी आहे तसं मांडलय ... !

राधा माझी ... आयुष्याला वेगळा अर्थ देणारी . अर्थात रुक्मीणीवरही तितकीच प्रिती आहे म्हणून तर प्रेमविवाह केलाय..! आयुष्याच्या या वळणावर हे सारं सांगताना आयुष्यात खुप जगलो .. प्रेम भरपूर केलं याचं समाधान आहे. जिदंगी से चार पल मांगकर लाये हैं.. सारे ही इंतजारमें ना चलें जायें यार .. दो तो समझनेसे पहलेही गुजर गये.. बाकी युंही ना गुजर जायें जिंदगीसे मायुस होकर.. प्यार किया है तो जताना भी जरूरी है.. वरना ये भी इक ख्वाब समझ लेना दोस्तों.. आंख खुली और बिखर जाये.. जी लो जिंदगी जी भर के..

आता लिहिलंय .. हे उमटेल त्यानंतर एकच काम

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जाऊ पुसायला .
..




प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466

Thursday 13 June 2019

बोन्साय...

ती आणि मी.... एक प्रवास आयुष्याचा....! 
आपण आपलं चालत रहायंच इतकच आपल्याला कळतं पण, हो इथ एक अल्पविराम असायलाच हवा कारण आपण चालत असताना आरंभ कुठे केलाय याचा विसर पडायला नको आणि कुठवर चालायचं चाची आठवण आपणास सातत्याने असायला हवीच ना ... ! आपल्यापैकी बहुसंख्य या चक्रात आहेत कारण क्षणभर थांबून आपण स्वत:ला विचारायला विसरुन जातो. रोजच्या रहाटगाडग्यात आपण स्वत:ला उत्तमरित्या गुंतवून घेतो आणि येत्या काळात समाधानी होवून याची अपेक्षा बाळगत जगत राहतो.. धावतो... ठेचकाळतो.... पडतो आणि पुन्हा उठून चालायला लागतो... त्या सावरण्यात आपण हळूहळू सराईत होतो आणि त्यातच आपलं मोठेपण आहे असंहीह मानायला लागतो इतकच नव्हे तर आपण किती योग्य असे आहोत, याचं वकिलपत्र घेतल्याप्रमाणे आपली भूमिका साऱ्या जगाला पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. 

आपली भूमिकाच योग्य आहे हे पटवून देताना आपण नेमकपणानं जगायचं म्हणजे काय करायचं हे विसरतो असं मला हल्ली जाणवायला जागलय...!

आपण जन्माला आलो त्याक्षणी सारं जग मोकळं असतं.. खुलं आकाश, हा धुंद करणारा गंधीत वारा आणि निसर्गानं दिलेलं दान.. ते दान निसर्ग इथं जन्माला आलेला प्रत्येकाला मिळालेलं असतं मात्र नंतरच्या काळात आर्थिक बंधनात बांधायला आरंभ होतो.

...पालकांची कुवत इथं पाल्याला घडवते. त्याच्या ठायी असणांर
नैसर्गिक कसब आणि कौशल्य इंथ महत्वाचं ठरत नाही... पाल्याच्या शाळा प्रवेशापासून त्याच्या वस्त्र प्रावरणांवर एक Price Tag लावला जातो.. कधी या Tag च्या आसपास तर कधी त्या समाजातील रुढी आणि परंपरा व ज्यांच्या समवेत राहतो त्यांच्यात असणारी स्पर्धा यातून आपणच कसं वागायचं...कसं बोलायचं याचं "सलायन" त्या बालकाला चढवतो.... याला घडवणं म्हणालचं की अडवणं असाही सवाल मनात येतो ...! यात त्या जिवाची होणारी घालमेल आणि त्याचं गुदमरणं आपणास कळतं.. .. पण केवळ परिस्थिती ....आणि आर्थिक स्थिती म्हणत त्या वाढत्या जिवाच्या आशा- आकांक्षांना आम्ही मुरड घालत राहतो. त्यांची वेदना आपणापर्यंत पोहोचली तरी दोन क्षण अश्रु ढाळून आपण आहे त्याला रुजू करुन घेतो आणि त्यालाही ते स्विकारायला भाग पाडतो... हो त्याला आपण अपरिहार्यतेचं रुप देतो... !

अपरिहार्यता मानत वागणारा समाज अशी खुरटी पिढी घडवताना पाहून खेद वाटतो... ! ही वेळ आपणा सर्वांवर का आली आहे याचा विचार करण्यासाठी क्षणभर विश्रांती घ्यावीच लागेल... !

पालक म्हणून नवी पिढी घडवताना बाप आपलं सर्वस्व पणाला लावतो आणि आई आजन्म सेवारत राहते... हे देखील एक वास्तव... हेवास्तव नाकारता येणार नाही मात्र त्यांनाही विचाराव वाटतं की तुम्ही किमान एक क्षण स्वत:ला मुलांच्या भूमिकेतून वळून बघितल आहे का... ? त्यांना मोठं करणं...
त्याचं आयुष्य घडवण इथवर ठिक आहे.. पण त्यांना तुमच्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे याचा कधी विचार केलात का आपण ?

प्रत्येक क्षणी आयुष्य म्हणजे तडतोड हे म्हणण चुकीचं आहे...कधी त्यांच्याही भावनांना जाणलं पाहिजे , त्या भावनांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या त्या भावनांना हात घातला पाहिजे.. त्यांची साद ऐकली पाहिजे आणि त्याला प्रतिसाद दिला पाहिजे.

मुळात आई-बाप आयुष्य घडवतात ते आपले गुरु आहेत या आदरापोटी मुलं संवाद साधत नाहीत... तिथं त्यांना मैत्रीची साद घातली गेली नाही तर असे family ही भावना संपून मुलांसाठी we are being ruled झाली की त्यांच्या आशा-अपेक्षांची पंख वाढत नाहीत...जन्माला आला त्या क्षणी गरुडभरारी घेण्याची ताकद असणाऱ्या त्या चिमणपाखरांना आपण चिमणी पाखरं ठेवणार की
त्यांच्या पंखात बळ देणार याचाही विचार आपण करा असं आवर्जून सांगावं वाटतं..

आजकालच्या स्पर्धेच्या युगात असं जगावंच लागतं असं म्हणणं कितपत योग्य आहे याचादेखील आपण विचार करावा... आयुष्याला सर्व प्रकारची शिस्त आवश्यक आहे, व्यवहार कौशल्य आणि जगाचं भान आणि जगण्याचं जाण देखील त्यांना आवश्यक आहे पण त्याही पेक्षा अधिक महत्वाचं आहे ते प्रेम. एक कुटुंब म्हणून असणारी आत्मीयता आणि जिव्हाळा.. त्यासाठी आर्थिक मर्यादा असू शकत नाहीत...

आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा सरस आहे हे आपण प्रथम स्वत:शी कबूल केलं पाहिजे आपली पुढची पिढी म्हणजे आपलं दुसरं रुप हे मान्य करा मग सारं सुरळीत होईल हे नक्की... 

प्रशांत दैठणकर
९८२३१९९४६६