Friday 27 December 2019

आनेवाला पल जानेवाला है..

नववर्ष दारात उभे आणि संकल्पांचा दिवस देखील नजीक आलाय. ...वर्ष कसं सरलं हे कळलं नाही हे दरवर्षी थर्टीफर्स्ट ला आपण बोलतो.. आणि नवे संकल्प करुन ते मोडण्याची तयारी देखील करतो.. या थर्टी फर्स्ट ला वर्ष संपतय असं नाही तर ही एका दशकाचीही निरोपाची वेळ आहे.

जाणाऱ्या दशकानं काय दिलं आणि काय उरलं याचा विचार करण्याचा हा काळ आहे. आयुष्याचा जमा खर्च मांडताना आपण मुळातच आर्थिक अंगाने या सर्वांकडे बघतो असं वाटतं.. भावनिक पसारा किती वाढला.. आपण तो किती मांडला आणि सावरला याचाही विचार या निमित्त्तानं व्हायला हवा.

.. बंध आणि बंधन हा एक आगळा पैलू या मावळत्या दशकाचा

अपने जब रुठते है तो कोई कारण होता है

रुठने वालोंको मनाना जरुरी है

हा जरुर मनाना चाहिये

पर कुछ रिश्ते फिर भी रुठे रहते है


दशकाची आणि जन्माची कहाणी याचप्रकारे पुढे सरकत असते.
रुसणे आणि त्यातून प्रेम व्यक्त करणे हा आपणा सर्वांचा स्वभाव गुण आहे. पण त्यात काही कळ होते हे कळलं पाहिजे.. प्रत्येक वेदनेवर काळच औषध...!

झटपट सरणारा काळ आपणाला सारं काही सहन करायला शिकवतो... विसर पडत नाही म्हणून आठवण येत नाही पण आतली वेदना थांबत नाही. काळानं हे शिकवलं जे संत आधीच सांगून गेलेले आहेत पण संत वचन कळतं पण वळत नाही कारण त्याला अनुभवाची जोड नसते.. अनुभवातून शहाणपण येतं आणि त्यातूनच श्रध्दा और सबुरी कळते हे देखील तितकच खरं.

या दशकानं काय दिलय असा विचार करताना लक्षात येते की, औरंगाबादला केंद्रस्थानी ठेवून मी गडचिरोलीच्या घनदाट जंगलापासून मुंबईच्या दाटीने वाढलेल्या सिमेंटच्या जंगलांपर्यंत प्रवास केला. दशकाची सुरुवात क्रांतीभूमी वर्धेतून झाली..अख्खा विदर्भ पाठ झाल्यानंतर दशकाच्या शेवटच्या वर्षात कोकणकडा सह्याद्री अशा सफरीवरुन आता रत्नागिरीत फेसाळल्या समुद्राच्या लाटांवर विसावलोय.

सागर.. मनाच दुसरं रुप.. भावनेच्या लाटा किनाऱ्यावर येत राहतात आदळतात आणि परत जातात म्हणतात सागर आपलं किनाऱ्यावरच प्रेम इथं व्यक्त करतो.. प्रत्येक वाट वेगळी आणि भावनांचंही तसंच काहीसं असतं त्या भावना सांभाळत रहायचं आणि काय..
या दशकाचा विचार करताना जाणवलं की काळ अतिशय गतीने बदलत आहे.. तंत्र बदलायला वेळ लागत नाही पण ते शिकायला आणि आत्मसात करीत त्यावर राज्य करायला मेहनत घ्यावी लागते. फार काही सोपं नाही हे.. एका बाजूस काळ सरकतो तर दुस-या बाजूस आपलं वय वाढत असतं आणि त्यानुसार शरिराच्या हालचालीत फरक व्हायला लागतो..
अशा काळात आपण आपल्यात एक लहानपण जपायचं असतं.. 
घरात तारूण्यात जाणा-या पिढीसोबत आपणही नव्याने तरुण व्हायचं.. मनाने आपण अभी तो मै जवान हूँ असं नुसतं गाणं म्हणून फरक पडत नाही तर आपणास त्यासाठी त्याच पद्धतीने जगायलाही लागतं
जिंदी हर कदम इक नई जंग... चला आता लढा ...

खळाळत्या समुद्रासारखं चैतन्य बाळगायचं ते जगण्याचं साधन आणि तेच आराधन ... भावानांचा कल्लोळ कधीही सरणारा नसतो.. तो सरणावरच सरतो म्हणून काय जगण्याचा आनंद नाही घ्यायचा...?..
 Life you get once .. Live it Fullest.. Live Happily.. Live For FAMILY.. Live for The World.. Live For Yourself.. Life you get only Once.... Remind Each Morning. Lot of  Happiness is here.. 
भावनांचं काय कधी भरती तर.... कधी ओहोटी हेच ....आयुष्य. आपण फक्त नितळ रहायचं पाण्यासारखं आणि गुणगुणत रहायचं.

पानी रे पानी तेरा रंग कैसा...!

जिसमें मिल दाे... हो जाये उस जैसा..!
 

Hat's off to the life and bye to the leaving Decade

प्रशांत दैठणकर
9823199466


Wednesday 11 December 2019

आई..




   ते नातं काही आगळं.. आई... एक शब्द नाही तर ते आयुष्य असतं आणि त्याही पलिकडचा तो साठा म्हणता येईल. ती आली त्यावेळी तिचं महत्व नाही कळालं मात्र ते तिच्या जाण्यानं अधिक कळालं आणि आजही ते जाणवतं.. काळ येतो आणि जातो मात्र तिच्या जाण्याने तिची आठवण अधिक गहिरी होत जाते.. तिच्या बोलण्याप्रमाणे ती वागली आणि तिचं जाणं हा तिचाच निर्णय होता तो तिने पुर्ण केला.

आजही तिचं ते वाक्य कानात कायम आहे.. ती ICU मध्ये होती आणि मी तिच्याशी बोलत होतो.. कुठे चाललास पशा..? ‌ मला या नावाने बोलावणारे मोजकेच.. ती तर आई होती तिचा तो हक्क होता जन्मदाती या नात्याने.. आई मी जरा घरी जाऊन येतो.. जानूला शाळेत सोडायचं आहे... त्यावर ती म्हणाली अरे नको जाऊस.. आता मी घरी येणार ना..! दहा दिवसात दोनवेळा मेंदू शस्त्रक्रिया झालेली.. आता आयुष्यभर पांगळं होऊन रहावं लागणार हे तिने जाणलं होतं.. असं जगणं हे रोज मरणं ठरणार याची तिला जाणिव एव्हाना झाली होती...

आता जगतोय आणि पुढच्या क्षणी मरण आलं पाहिजे हे तिने अनेकदा बोलून दाखवलं होतं ..
त्या क्षणी तिच्या भावना काय होत्या हे मला कळत होतं पण ती हवी होती कायम मला.. ती व्हेंटीलेटरवर होती... तिला जगवण्याचे सारे प्रयत्न सुरू होते..त्याचीही तिला जाण होती.. मी काळजावर दगड ठेवून सारं निर्विकारपणे बघत होतो.. माझ्या चेह-यावर आतली कळ दिसू नये याचा मी प्रयत्न करीत होतो मात्र ती आई होती ना.. डोळ्यातून तिला सारं कळत होतं. आणि त्याच नात्याने मला तिच्या डोळ्यातील भाव कळत होते.

दुस-या दिवशी सकाळी मी निर्णय घेतला.. डॉक्टरना मी भेटलो आणि सांगितलं की आपण तिला व्हेंटीलेटरवर कितीही दिवस जगवू शकतो हे मान्य आहे मात्र त्यानं तिच्या वेदना काही कमी होणार नाहीत .. तिला व्हेंटीलेटरवरून काढा आणि नैसर्गिकरित्या तिचा मार्ग मोकळा करा... घरातील सा-यांचा याला विरोध होता कारण आशा होती.. आईनं दिेलेलं बाळकडू मला चांगलं आठवत होतं.. आशाय.. केशनाशाय..

माझा निर्णय पक्का होता .. तिला रोज बेडवर पडून असहा्य होऊन मरणयातना देणं मला समोर दिसत होतं.. त्याही स्थितीत डॉक्टरांनी तासभर वाट वघू असा निर्णय घेतला... अवघ्या दहा मिनिटांनी मला डॉक्टरांनी बोलावलं आणि त्या यंत्रांकडे बघा..त्यांना कार्डीयाक अरेस्ट येतोय असं सांगितलं.. माझ्या डोळ्यासमोर तिचा आत्मा शरीर सोडून जात होता... बाहेर बहिण आणि इतर नातेवाईकांचा गोतावळा आणि पाणावलेले डोळे... माझे डोळे मात्र कोरडे... तिची नेत्रदानाची इच्छा पुर्ण करण्याची माझी धावपळ एव्हाना सुरू झाली... नेत्रदान झाल्यावर घरी नेण्याची वेळ आली...

जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण येणं हा प्रवास आहे
आणि तो कोणालाही चुकलेला नाही.. इथं कुणी अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही.. तिचे अंतिम संस्कार सन्मानात व्हायला पाहिजे याची धावाधाव.. चुकूनही रॉकेलचा वापर नको.. साजुक तुपात आणि चंदनात तिचे अंत्यसंस्कार झाले पाहिजे माझ्या सूचना सुरू होत्या मित्रांनी त्यानुसार व्यवस्था केली.... ती आता तिच्या मार्गावर अग्नीच्या अधीन झाली...

12 डिसेंबर आयुष्यात कायमचं कोरलं गेलं.. आता 16 वर्षे झाली... ती शरिरानं घरात नाही मात्र मनानं घरात आणि माझ्याही मनात आहे.. सा-यांच्या आठवणीत स्थिरावली आहे.... अगदी अखेरच्या क्षणापर्यंत माझे डोळे कोरडेच होते... आज मात्र लिहिताना शब्दागणिक अश्रू ओघळत आहेत..

ती जगली असती.. चमत्कार झाला असता.. अनेक भावना मनात आहेत.. मी तिचा मार्ग मोकळा केला की तिने ...?... आज ती असायला हवी होती .. 52 हे काय मरणाचं वय नाही.. आज ती असती तर काय स्थिती असती... मन विचारत रहातं आणि मी माझ्या मनाला त्यात बुडवून टाकतो...

तिचं जाणं...ओशोच्या संदेशानुसार रात्री मी जवळच्या मित्रांसोबत सेलिब्रेट केलं... घरातील नात्याच्या गोतावळ्याला ते रूचलं नाही.. मी रडलं पाहिजे यावर ते ठाम होते पण माझे डोळे त्याही क्षणी न पाणवता कोरडेच राहिले...

दिवस जात राहिले..
त्या डिसेंबरच्या अखेरीस पाकिस्तान विरूद्ध वन-डे सामना होता... सामना रंगत गेला.. आणि आपण त्या रोमांचक सामन्यात आपण चमत्त्कारीकरित्या जिंकलो.. टेरेसवर जाऊन फटाके फोडताना सा-या शहरभर होणारी आतषबाजी दिसत होती आणि माझ्यातला मी मोकळा झालो.. आज ती असायला हवी होती.. किमान दोन तास मी मोकळा होत आसवांना वाट करून देत होतो... त्या क्षणी तिचं नसणं जाणवलं.. ती नेमकी त्या क्षणी कळली..

ती बाबरीच्या आंदोलनात आयोध्येला गेली होती ..ती श्रीनगर मधील लाल चौकात तिरंगा फडकावताना तिथं होती... आज कलम 370 झालं... आयोध्या प्रकरणी निवाडा आलाय.. आज ती असती तर किती आनंदी झाली असती... आज ती असायला हवी होती..

कदाचित त्यासाठीच म्हणतात


आई... जी उरत नाही आणि पुरतही नाही

आई.. अंगाई आयुष्यात दर रात्री आठवण

आई.. ज्यांना आहे त्यांना मनापासून सांगणं.. अरे सांभाळा आणि सेवा करा कारण ती असताना कधीच कळत नाही जाणवत नाही पण ती जाते त्यानंतर कळायला लागते.. ती ... आई.. गेल्यावर सारं जग जिंकलं तरी ती परत येत नाही  Miss You Mom  असं ‍Mothers Day ला बोलणं वेेगळं आणि खरं Miss करणं वेगळं असतं.. आज ती आठवण ताजीच आहे आणि आयुष्यभर ती राहणार  हे काही वेगळं सांगायला नकोय.
आला दिवस... विसर पडला तर आठवणं वेगऴं आणि सतत आठवण न विसरणं वेगळं असतं.. त्यातील तिची Exit मात्र आता नेमकेपणाने जाणवत राहते.. मलाच नाही तर तिला कुणीही विसरणार नाही याचीही जाणिव सोबत असते...


प्रशांत दैठणकर

9823199466