Tuesday 30 July 2019

#Happywala BirthDay...

आला आला म्हणताना तो आता दाराशी आलाय.. हो श्रावण येवू घातला आहे. कालीदासाने आपल्या मेघदूतम् मध्ये आषाढस्य प्रथम दिवसे असं लिहीलं होतं ..
आता चर्चा आहे ती आषाढस्य अंतिम दिवसे ची.  मला आठवणींची साठवणं खुली झालीय असे वाटते.. कारण देखील तसंच आहे.. आषाढ संपताना श्रावणाच्या पहिल्या प्रहरात वेदांतचा जन्म झाला... त्या क्षणाची आठवण अगदीच ताजी आहे आणि आज वेदांतचा 16 वा वाढदिवस आहे.. तारीख 30 जुलै ...

आठवणी अशाच पाठलाग करीत राहतात. ते कॉलेजचे दिवस माझे आणि आता वेदांतने कॉलेजला प्रवेश घेतला आहे.. काळ किती झपाट्याने जातो हे आपणास कळतच नाही... या सर्व प्रवासात एक खंत कायम मनात असते की मी कुटुंबासाठी वेळ देऊ शकलेलो नाही.. This is Life हे याच सबळ कारण असू शकत नाही. आपण नेमकं कशामागे धावत आलो असे कधी कधी वाटतं..

बालपण आणि त्यातला निरागसपणा आणि त्यातून पालकांना मिळणारा निखळ असा आनंद.. कादंबरीच्या पानावर वाचलेल्या त्या शब्दांप्रमाणे भासायला लागतात. .. हे निराशेची भावना नाही हे आवर्जून लिहायला पाहिजे या ठिकाणी.

आयुष्यात असतं काही आणखी.. फक्त पैसा कमावणं हे आयुष्य आहे का.. ?

विचार सुरू राहतात आणि त्यासोबत मुड बदलत जातो. घर आणि ते वाट बघणारं घराचं दार खुणावतं आणि रिकाम्या वेळात त्याचा विचार अधिक गहिरा होत असतो. त्या एकटेपणानं बरंच काही शिकवलय आणि आजही मी शिकतच आहे. एकटा असलो तरी
एकाकी पडायचं नाही हे मनाला बजावत जगणं सुरू राहतं.. सकाळी झोपेतून उठल्यावर मागील पानावरून आयुष्य पुढे चालू करताना अनेकदा खूप वेदना जाणवतात मनाला.

एकटेपणानं गाणे आणि संगीत यांची साथ सुटली .. गाण्याची कोणती लकेर एखादा नाजूक आठवणीचा दोर खेचेल आणि आपणाला वर्तमानातून कुठेतरी भूतकाळात घेऊन जाईल याची खात्री नसल्याने गाणं सुटलं तरी कानावर येणारे सूर रोखता येत नाहीत. किमान डोळे बंद करता येतात मात्र कान बंद करता येत नाहीत ना...

संगीत.. शब्द .. सूर.. ताल आणि खूप काही असणारं संगीत. कधी काळी टोळ्यांमधून स्थिरावलेला मानव नंतरच्या काळात व्यक्त व्हायला शिकण्याचा प्रयत्न करु लागला. त्याचा या व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत अनेक पाडाव आले आणि प्रत्येक वळणावर एका कलेचा शोध लागत गेला. त्याची वाटचाल आता कला प्रांतात होत होती यात सुमारे 64 कलांचा शोध मानवाला लागला त्यात सर्वात महत्वाची कला म्हणजे संगीत होय.

संगीत आयुष्यात सर्वस्व आहे असं मानणारे अनेक आहेत.
त्याखेरीज दिवस सुरू होत नाही आणि संपत देखील नाही असं जीवन जगणारे आपल्या आसपास दिसतात. खरच संगीत इतकं मह्त्वाचं आहे का असाही वाद घालत येईल.. माझं विचाराल तर मी संगीत न आवडणा-या गटात आहे. त्याला काही कारणं आहेत मात्र संगीत आयुष्यात आवश्यक आहे असे म्हणणा-यांना मी विरोध करीत नाही कारण ती त्यांची आवड आहे.

मला संगीत कधी काळी आवडत होतं मात्र आता एकटं रहायची सवय लागली असल्याने मी संगीत ऐकणे टाळतो. कारण संथ शांत तलावात दगड भिरकावल्यानंतर जसे तरंग उठतात आणि नंतर त्या तरंगांची आंदोलनं सुरु होतात आणि सारं पाणी ढवळल्या जातं तसं काहीसं या संगीत ऐकण्यामुळे होत असल्याने मी तो टाळतो ही वस्तुस्थिती आहे..
किमान माझ्या बाबतीत तर असं होतं.. माझ्या या मताला अनेक जण दुजोरा देतील याची मला खात्री आहे.

आपण चालत रहायचं न थकता

आपणच आपली समजूत काढत

आणि मनोरंजनही करायचं

आहे ते आपलं चांगल म्हणत

आला दिवस जगण्यासाठी

घडतय ते चांगल्यासाठीच म्हणायचं

स्वप्नांना मुरड घालायची त्या

आपल्याला पडलीच नाही समजून

बाकी आहे जगायचं अजून खूप..

बघायचं आहे जग अजून खूप...

प्रशांत दैठणकर

982319466