Wednesday 10 June 2020

काय पाहिलंस माझ्यात...?


फोनची रिंग वाजली आणि तंद्री भंग पावली.. एकटे राहण्याची सवय असल्याने सतत टिव्ही बघणे किंवा मोबाईलवर सर्फींग करणे हा छंद जडलेला. यात अचानकपणे एखादेवेळी असं होतं की नजर टिव्ही वर असते..त्यातला एखादा प्रसंग मनाला झोका देतो
आणि नंतर नजरेपुढे टिव्हीवरील चित्रं सरकली तरी बोध काहीच होत नाही कारण विचारांची वर्तुळ फेर धरुन मनाला आपल्या सोबत घेवून नाचत असतात..अशातच फोनची रिंग वाजलेली..!

दिवसातील तिचा हा तिसरा कॉल होता..सवाल तिचा आणि मी विचारात.. काय पाहिलस माझ्यात....? आजवरच्या आयुष्याच्या प्रवासात अनेकांशी परिचय झालेला पण हा सवाल फक्त मुलीच विचारतात असा माझा अनुभव..पोरांना याच्याशी काही देणं घेणं नसतं.. बनती है तो बनती है नही तो नही इतका साधा हिशेब लावून पोरं जगतात मात्र पोरीचं काहीतरी वेगळंच असतय..!

मुलींना नेहमी वाटतं आपण सुंदर आहोत..कुणीतरी आपल्या प्रेमात पडावं..सुंदर असणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या मुलांची संख्याही कमी नाही.. असं तिचं झालं म्हणायचं.... सुंदर आहे... आवडली..सांगितलं मगं तिचा तो सवाल..काय पाहिलस माझ्यात..? आता नेमकं सांगायचे कसं.

प्रेमाचं गणित म्हणजे काही सुडोकू नाही..सुडोकू सोडवायला अवघड आहे पण प्रयत्नाने जमतं.. प्रेमाचे मात्र तसं नाही..मी नेमकेपणानं तिच्यात काय पाहिलं..तिची नजर. रोमॅटिंक भाषेत बोलायचं तर आँखे, गेसूं , नजर या उमर..चेहरा या कमर..या फिर कुछ और..!   तिला मात्र नेमकेपणानं हवय उत्तर.. नाही म्हणायला तिला आपण काय आहोत याची पूर्ण जाणीव असते.. सांग दर्पणा मी कशी म्हणत दिवसात येता-जाता आरसा हवाच असतो मग पुन्हा हा सवाल कशासाठी की , काय पाहिलस माझ्यात...?

प्रेम हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं म्हणून त्या नजरेने सौंदर्य कशात बघितलं याचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करीत असते..आता फोन वर पुन्हा तेच..विचार पुन्हा सुरु नेमकं मी काय पाहिल बरं..!

यावरुन मला प्रसंग आठवायला लागले त्यात सर्वच घरात कमी अधिक फरकाने घडणारा प्रकार म्हणजे मुलगी बघण्याचा कार्यक्रम..! विचित्र प्रथा आहे असं वाटतं हे बघणं म्हणजे काय असतं..बोलून दाखव..चालून दाखव..स्वयंपाक येतो का..गाणं गाता येतं का.. शिक्षण किती झालय..
वगैरे सवाल जरा विचित्र वाटतं हे सारं पण प्रथा म्हणून चालवलं जातं असा हा कांद्यापोह्याचा सोहळा पन्नास साठ वेळा करुन लग्न ठरवलेल्यांची जोडी बघितली तर नक्कीच प्रश्न पडतो मुलाबाबत की या माठ्याने काय पाहिलं तिच्यात..काही दिवसानं तो कन्फ्यूज माईंडसुध्दा स्वत: विचारायला लागतो पाहण्याच्या कार्यक्रमात मी नेमकं काय पाहिलं हिच्यात..!

हँडसेट खरेदी करुन चार दिवस झाल्यावर एखादा त्याही पेक्षा चांगला हँडसेट कंपनी सादर करते.. ! थांबायला पाहिजे होतं अशी चुटपूट सुरु होते आणि आहे त्याचाही आनंद मावळतो.. मुलगी बघण्याचा कार्यक्रम करुन लग्न केलेल्याला पहिल्या भांडणासोबत पडलेला प्रश्न मी काय पाहिलं हिच्यात..? 
 मग सुरु होतो तो तुलनेचा खेळ.. हिच्या पेक्षा ती चांगली होती.. ! आणि ती तर खुपच सुंदर होती..असे मनाचे खेळ रंगू लागतात..काहीही झालं तरी त्याला उत्तर सापडत.. अर्थात कुणाशीही केलं लग्न तरी हीच अवस्था होणारच..कद्दू छुरे पर या फिर छुरा कद्दू पर करना तो कद्दू को ही है.. हे त्या बुध्दूला उशीरा कळतं

कॉलेज डेज अर्थातच आमची  लॉजिक युनिव्हर्सिटी..  असंख्य फंडे त्यात आवडणारा एक

More Study More Confusion

Less Study Less Confusion

आणि आमची स्वतंत्र तिसरी महासत्ता असायची

No study no confusion.. !

पाहिले..न..मी..तुला

तू..मला..नं..पाहिले

दिसली..आवडली..प्रेम..कबूली..Done   इतकी साधी सोपी छोटीशी Love Story आयुष्यात घडलेली..! म्हणून काय नंतर पुन्हा कुणी आवडणार नाही....?  आणि प्रेमात पडणार नाही मी अशा तहाच्या करारावर सह्या करुन शरणागती पत्करली नव्हती..

पुन्हा कोणी आवडलं.. सांगावं आणि त्यात गैर काहीच नाही..मनात असणं चांगलं आणि सांगणं म्हणजे प्रतारणा असा उफराटा हिशोब ठेवणाऱ्या जगाला का घाबरायचं..! 
सांगून टाकलं लगेच...! मग पुन्हा तिचा फोन..पुन्हा सवाल..
काय पाहिलसं माझ्यात.. !

प्रशांत दैठणकर
9823199466


Monday 8 June 2020

माझिया प्रियाला प्रीत कळेना

पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महिना... माझिया प्रियाला प्रीत कळेना... माझिया प्रियाला.. सकाळी टी.व्ही.वर अपडेट्स बघताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला...सतत काही ना
काही कानावर यायची सवय म्हणून रेडिओचा कान पिळला.... आकाशवाणी रत्नागिरीवर शोभा गुर्टु यांचा आवाज आणि त्यातलं गाणं 5-6 दिवसांची सततची धावपळ विसरून फ्रेश वाटायला लागतं.

भरभरून निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या कोकणाला याच नावाच्या वादळानं अक्षरशः ओरबाडून काढलं. त्याला झोडपलं हा शब्द कमी पडेल इतकं नुकसान नजरेसमोर असताना एक खिन्नता येणं हा मनाचा स्थायीभाव त्याच स्थितीत मी वादळखुणा पाहून काल रात्र परतलो. मूड त्याच पद्धतीचा... पण गाण्यातल्या शब्दांची जादू आणि बाहेर बरसणाऱ्या पाऊस धारा यांनी वेगळ्याच विश्वात नेलं...

मुड हा मनाचा झोका कधी इकडे तर कधी तिकडे. त्याची आंदोलने चालूच असतात... शब्द त्यावर कधी फुंकर घालण्याचं काम करतात तर कधी आग फडकवण्याचं.. सारा काही शब्दांचा खेळ मात्र आज याची सकारात्मकता अधिक जाणवली... दो बूँद जिंदगी के प्रमाणे चंद अल्फाज सोच बदलने की... शब्दांची शक्ती..

आयुष्यात आपण अनुभवी असण्याचा दाखला ज्या पहिलेल्या अधिकच्या पावसाळयांनी देतो त्या पावसाळ्याला होणारी सुरुवात त्याची दोन भिन्न रूपे दाखवणारी होती.
मात्र त्याचं अस्तित्व जीवनासाठी महत्त्वाचा आहे ही जाणीव असलेलं मन त्याच्या आगमनानं आनंदीत होणं अगदीच सहाजिक...

औरंगाबाद सारख्या अवर्षणत कधीसा उपकार केल्यागत पडणारा पाऊस आणि कोकणचा पाऊस याची तुलना शक्य नाही आणि ती न केलेली बरी... एक पावसाळा कोकणात काढल्यानंतर हे जाणवलं की पाऊस काय आणि कसा ते कळण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी इथचं यायला पाहिजे.

आता पाऊस आणि प्रेम मला वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू... तारुण्यातच असं नव्हे तर प्रेमातल्या प्रत्येकांना पावसाचं येणं आणि त्याचं धुंद होऊन बरसणं हे स्वप्नवत असतं आणि स्वप्न सत्यात उतरण्याचा प्रत्यक्ष काळ अर्थात त्याचं धारांनी धुंद होऊन बरसणं सुरू होण्याचा..

प्रीतीचं गीत गाताना संदर्भ पावसाचे जुने नाहीत पण प्रत्यक्षात त्याच्या येण्यानं सुखावण्याची भावना येणार नसेल तर भिजण्यातही अर्थ नाही..

चिंब भिजलं तन माझं... मन रे राही कोरडे... त्या कोरडेपणाची ती भावना व्यक्त करताना हे गाणं आलेलं असणार...

आयुष्याचे अनेक पैलू एका वाक्यात उलगडून दाखविण्याची किमया या गाण्याच्या बोलांमधून आलीय हे देखील जाणवतं.... झालेल्या आनंदाला कारुण्याची किनार अशी शोभा देत नाही .. पण हेच जगणं आहे.

आपण रचलेला बेत पार पडेल आणि सुखरूप पार पडेल असं होत नाही.
कोणत्याही समारंभात हेच अनुभवायला मिळतं मग आयुष्य तर आशा समारंभांची आणि उत्सवांची मालिका आहे... रात गयी बात गयी म्हणत नव्याला आरंभ करताना देखील वाटत राहिलं की एक तेवढं जमलं नाही आयुष्यात... मग वाटचाल होत नाही... पावलं अडखळतात... चाल मंदावते... आणि अशाच क्षणी उभारी देणारा..

पावसात भिजणारा सुखाचा श्रावण हवा वाटते तिला प्रित कळे..ना नाही तर नाही पण तिला कळेपर्यंत आलेल्या क्षणी का जगणं सोडायचं... तक्रारींचा हा पाऊसही मग बरसतो... तिला कळली तर ती देखील लटक्या रागानं प्रतिबोल लावणारय...!

तेरी दो टकियाँ दी नौकरी में

मेरा लाखोंका सावन जाये..

प्रशांत दैठणकर
9823199466