Tuesday 26 March 2013

रंगांचा हा उत्सव


आठवते ती प्रत्येक होळी त्या वयातली ज्या वयात रंगात रंगण्याचं वेड होतं मनात. ते रंग उडवण्याचे आणि रंग उधळत त्या रंगात रंगण्याचे दिवसही अगदीच ताजे आहेत मनात. ते रंग अंगावरून उतरले असले तरी मनातून कधीच उतरणार नाहीत हे देखील तितकंच खरं हे सांगावच लागेल. बेंबीच्या देठापासून बोंबाबोंब करताना आनंद वाटायचा. दुस-या वर्गात असताना धुळवडीला मोठ्यांच्या होळीत नाचून घरी परतल्यावर काय बे असं अनाहुतपणे तोंडातून बाहेर पडल्यावर बापाने रागात पाठीवर बे एके बे .. बे दाही वीसपर्यंत रंगवलेला पाढा अनेक दिवस मिरवला.. त्याच दिवशी शिवी नावाच्या शब्दाशी आयुष्यभरासाठी काडीमोडही झाला..
      शिमगा संपला तरी रंगांचं नातं मात्र आजही कायम आहे.. अगदीच रंगिला नसलो तरी हळव्या मनाने आयुष्याचे नाना रंग आजवर बघितले आणि ते जपले.. आजवर धुळव़डीला धुंद होवून रंगात रंगणं कायमच आहे.
गोरे रंग पे ना इतना गुमान कर.. असं म्हणत आपल्या प्रितीला चिडवण्यातली मजा काही औरच आहे इतकं रंगीत मन आजही आहे. सकाळ संध्याकाळ निसर्ग खेळत असलेल्या रंगाचा खेळ असो वा दारात रोज रंगणारी रंगावली.. रंगांची साथ कायमच आहे त्याही पेक्षा रंग आपला पाठलाग करतात असं म्हणावं लागेल असं हे आयुष्य.... प्रेमात पडल्यावर हे रंगीत आयुष्य सप्तरंगी झालं आणि मनही त्या रंगांनी वेडावलं.. ते आजही कायम आहे.. तरीही इतर रंगांचं प्रेम आहे हे का याला काही उत्तर नाही. काही प्रसंग कधी कधी रंगाचा बेरंग करीत असले तरी ते मुळचे रंग पुन्हा मनाला उभारी देत असतात. आधार देत राहतात.. स्वप्नांनाही रंगीत करीत असतात.
एरव्ही नाना रंगाचा अंहंकार मिरवणारे चेहरे याच एका दिवशी समान दिसायला लागतात. आपण सर्व एकच आहोत याची जाणीव करून देणारा रंगांचा हा उत्सव.. मनाला रंगवून आत्मभान आणि आत्मपरिक्षण करायला लावणारा हा  रंगोत्सव...
रंगा या जगाच्या रंगात रंगा...
प्रशांत दैठणकर 26 मार्च 2013

No comments: