Wednesday 26 July 2023

आनंदाच्या रेटींगचा अर्थ..

जिकडे तिकडे चोहीकडे....आनंदी आनंद गडे....
कवितेच्या ओळी आठवायचं कारण म्हणजे कुण्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष. ज्यात म्हटलय की भारत आंनदी राहण्याच्या बाबतीत जगात ११८ व्या क्रमांकावर आहे.

हे सर्वेक्षण छापताना पाकिस्तान आणि बांगलादेशसह युध्दाच्या छायेत सतत जगणा-या इस्रायल देशात देखील काय स्थिती आहे याचं वर्णन केलय आणि हे सर्व देश आनंदी देशांच्या यादीत भारतापेक्षा अधिक उत्तम आणि वरच्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे. हे सर्वेक्षण वाचल्यावर सहाजिकच आनंद ही संकल्पना नेमकी आहे काय आणि त्याची व्याख्या नेमकेपणाने कशी करण्यात आली हा सवाल मनात येतो.
आनंद ही संकल्पना व्यक्तीसापेक्ष आहे कुणाला कशात तर कुणाला कशात आनंद मिळेल हे सांगता येत नाही. त्या सर्वेक्षणाच्या पटटीत भारतीयांचा आनंद बसला नाही. हे आपण मान्य करू मात्र हा आनंद आमच्याकडे कमी नाही.

इथं तर आनंदाचे डोही आनंद तरंग...
आनंदाची अंग, अशी स्थिती असल्यानचे आपणास दिसेल. आम्हा भारतीयांच्या आनंदाचं काय विचारता की आम्ही आनंदी आहोत...हो आम्ही आनंदी आहोत आहे तसं जगण्यात आनंद मानायचा की आनंद यापेक्षा काही वेगळा असतो याचा शोध आम्ही घेत फिरतो त्यामुळेच चेह-यावरचं हसू बघून सवाल केला जातो...

.तूम इतना मुस्कुरा रहे हो..
.क्या गम है जिसको छुपा रहे हो.....

आता माझं वैयक्तिक विचाराल तर माझ्या वडिलांचे नाव अनंतराव आहे त्यामुळे मला 'ठेविले अनंते तैसेच रहावे' असं जगण्याचा पूर्ण अधिकार आहे अन्‍ इतरांचं विचाराल तर त्यांना तसं जगण्याशिवाय पर्याय नाही. यामुळेच कदाचित आपला आनंद कशात आहे याच्या शोधात आयुष्याची ही आनंदयात्रा चालत राहते आणि शोध लागला असं ज्या क्षणी अत्यानंदाने ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे अनेकांना थेट अत्यंयात्रेत हा प्रवास संपवावा लागतो.

आनंद ही जशी मनाची भावना आहे तशीच ती मनाने मानण्याची बाब आहे. आपला आनंद नेमका कशात आहे याचा परिसाप्रमाणे शोध घेत आपण चालत रहातो हातात एक लोखंडाचे कंकण घेऊन या प्रवासात वाळूतील एक एक दगड उचलून त्या कंकणाला लावत आम्ही चालत राहतो....कधी त्या कंकणाचं सोनं झालं हे कळत नाही. कळतं त्यावेळी उशीर झालेला असतो. मग सुखाचंही असच आहे आणि आनंदाचं देखील. तो क्षण हातातून कधी निसटून गेला हे कळत नाही. त्यामुळे त्याच्या जाण्याचं दु:ख घेऊन आम्ही पुन्हा शोधायला लागतो.

मोठया प्रमाणावर शहरीकरणाचा एक भाग झाल्याने आमची अवस्था यंत्रवत झाली आहे. आमची स्पर्धा आमच्यातील उत्तमपणा, चांगूलपणा यासाठी नसून आमची स्पर्धा घडयाळातील काटे आणि पैसा यांच्याशी असते.

भौतिक सुखाच्या आहारी आपण गेलो आहोत हे कळतं पण
आता खूप उशींर झाला आहे हे देखील माहिती असतं. आनंद देणा-या यंत्रांना घरात आणण्याची स्पर्धा आमची जिंदगी केव्हा 'किश्तोंपर' आणून ठेवते तेच आम्हाला कळत नाही कर्ज आणि त्याच्या ईएमआय साठी आम्ही पैसे कमावण्याची धावपळ करायला लागतो मग आनंद कशात आहे हेच लक्षात येत नाही.

रात्रीच्या गर्भातून पूर्वेला तांबडं फुटतं आणि पक्षांचा किलबिलाट सुरू होतो त्याच्या अनुभूतीत आनंद आहे...पण आमची सकाळ मात्र ट्वीटरच्या चिवचिवाटाने आम्ही करतो. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यात आनंद आहे पण आम्ही त्याला कमाईत जमेल का.. या पटटीवर तोलण्याचा प्रयत्न करतो. लहान मूल तुमच्या दोन शब्दांनीही आनंदून जातं पण त्यासाठी तुम्हाला वेळ नसतो. तुम्हाला त्याची भरपाई चॉकलेट किंवा आईस्क्रीमने करण्यात आनंद वाटतो आणि मूलं दुरावतात..कदाचित कायमची..

आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हाव हा आपला आनंद आपण मानतो मात्र त्याचा आनंद नेमका कशात आहे हे आपण विचारत नाही. कदाचित त्याला चित्रकलेत आनंद वाटेल पण नाही आम्ही घरात कुटुंब प्रमुखाची जबाबदारी 'मॅनेजर' च्या रूपात बघतो आणि कुटूंबातील सारे आपले 'एम्प्लॉयी' आहेत या भूमिकेतून मॅनेजमेंट गुरू बनतो एका अर्थाने घराचं रुपांतर आपण 'फॅक्टरीत' करतो.

घरात स्वयंपाकाच्या रूपाने कॅन्टीन, टिव्ही, आणि कॉम्प्युटरच्या रूपाने मनोरंजन आणि पॉकेटमनीच्या रुपाने पगार आपण आपल्या या एम्लॉयीला देतो आणि आपल्या इच्छेनुसार त्यांनी आनंदाचं प्रॉडक्शन द्यावं ही अपेक्षा बाळगतो तिथं त्यांना आनंद मिळत नाही
आणि आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून आपल्याला आनंद मिळत नाही.

तूमच्यासाठीच मी दिवसभर राबतो ना असं म्हणून तुम्ही तुमची पालकाची भूमिका पार पाडता पण आपण हे सारं करतोय ते आपल्या स्वत:साठी आहे हे आपण मानत नाही. आपली पुढची पिढी म्हणजे आपलाच अंश आहे याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यांच्यातील मिश्कीलपणा आपल्याला खोडी वाटते आणि आपल्या मिश्कीलीवर हमखास दाद मिळलीच पाहिले ही आपली डिमांड असते.

बहुसंख्य कुटूंबात आज थोडयाफार फरकाने हाच प्रकार दिसतो. आम्ही वयाने आणि अनुभवाने मोठे आहोत तर याचा फायदा आपल्या पुढच्या पिढीला देणे ही जबाबदारी आपलीच आहे. ही जबाबदारी पार पाडणे हा खरा आनंद.... पण इथं वेळ आहे कुणाला... आम्ही तर आनंदाचा परिस शोधण्यात बिझी आहोत ना....

ज्यांचं उत्पन्न अतिशय कमी आहे अशा लोकांना मोठया अपेक्षा असत नाहीत 'दो वक्त की रोटी' आणि त्यासाठीची धावपळ इतकं छोटं ध्येय्य त्यांना असतं. त्यामुळेच आपल्या गरिबीने पाकिस्तान आणि बांगलादेशात आनंदी लोकांची संख्या अधिक आहे असं म्हणता येईल. मानवाच्या मूलभूत गरजा रोटी, कपडा और मकान यातच त्यांचा आनंद आहे. हाच आनंद नेमकेपणे नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेल्या मनोजकुमारने आपल्या याच नावाच्या चित्रपटातील एका गाण्यात सांगितलाय..तोच खरा आनंद...

अरे हाय हाय ए मजबूरी
ये मौसम और ये दूरी
मुझे पल पल है तडपाये
तेरी दो टाकियाँदी नौकरी में
मेरा लाखोंका सावन जाये.....

मेरा लाखोंका सावन जाये

-प्रशांत अनंतराव दैठणकर



९८२३१-९९४६६

No comments: