Tuesday, 24 April 2018

दिवस पुस्तकांचा

 कामात गुंतत गेलं की जग विसरायला होते. बहुतप्रसंगी आपण विनाकारण व्यस्त होवून जातो. व्यस्त झाल्यावर व्यक्त होणं बंद होतं. काल सोशल नेटवर्कवर काल जागतिक पुस्तक दिनाची Post टाकताना मला जाणवलं की कामाच्या व्यापात आपलं लिखाण पुर्णच बंद झालाय.

व्यक्त व्हावं … मनातलं मांडावं यासाठी मी हा ब्लॉग सुरु केला होता पण हळू हळू लिखाण कमी होत गेलं आणि बंदच झालं. सरकारी लिखाणाशिवाय काही सूचत नाही, असं तर होत नाही. पण कामामुळे येणारा थकवा आणि मनातंल पानावर मांडायला लागणारा मूड यांचा मेळ बसत नाहीय. आपण लिहायचं ठरवतो आणि कुणीतरी व्यत्यय आणतं.. मात्र आज पुस्तक दिनी संकल्प की वाचनासोबत आपण लिहायचं देखील.

' र ' ला ' ट ' आणि ' ट ' ला ' प ' म्हणजे लिखाण असू नये त्याला काही निश्चित दिशा, शैली आणि शब्दसंग्रह व त्याचा वापर याची जोड दिली, म्हणजे लिखाण खुलायला लागतं. आपण मनापासून आणि प्रामाणिकपणाने भावना शब्दात मांडल्या तरच त्या इतरांना रुचतात असं असलं तरी लोकांना रुचेल यासाठी न लिहिता आत्मसंवाद म्हणून केलेले लिखाण उत्तम .

समाज माध्यमांमध्ये कट - पेस्ट चे प्राबल्य आहे. शर्विलकी वाढलीय आणि सर्वात खेदजनक म्हणजे प्रतिक्रियात्मक लिखाणाचं प्रमाण खूपच वाढलय असं जाणवंत . फेसबुक सारख्या माध्यमाने व्यक्त होणारे व्यासपीठ दिले आणि अभिव्यक्तीची त्सुनामी आली आता प्रश्न निर्माण झालाय ' दर्जा ' काय ? याचा आणि दर्जाहिनवृत्तीचे लिखाण त्यावर अधिक दिसते असं लिखाण वाचायला नको वाटतं. मूळ लिखाण कसं याच्या वादात मी जाणार नाही पण आताही शैलीत लिहून स्वत:ची ओळख निर्माण करणारे कमी झाले आहे.

कधी काळी फेसबुक वर मराठी लिखाण करा असा आग्रह मी धरला आणि त्या माध्यमात जवळपास सर्वच मराठी मुलुख आपल्या मायबोलीत लिहितोय हे बघून निश्चितपणे आनंद होतो.

 पुस्तक दिनी पुस्तकांची आठवण करताना अनेकांनी भावी पिढी वाचन करीत नाही असा सूर धरला आहे. याबाबत माझं स्वत:चं मत मात्र वेगळं आहे. नवी पिढी आपल्यापेक्षा अधिक जागृत आहे, जागरुक आहे फरक फक्त बदललेला तंत्रज्ञानाचा आहे. वाचन ती पिढी करते पण आता माध्यमं बदलली आहेत.

नव्या पिढीतील अनेकांचे ब्लॉगवरील लिखाण वाचताना जाणवंत की त्यांच्या लिखाणातही प्रगल्भता आहे. त्यांचे विचार देखील चांगले आहेत. मुळात व्यक्त होणं त्यांना कळतय आणि जमतय देखील.

चला अल्पसं चिंतन आवश्यकच होतं या ब्लॉगवर पुन्हा लवकर लवकर भेट होईल ही अपेक्षा.


- प्रशांत दैठणकर

9823199466

No comments: