Wednesday 11 December 2019

आई..




   ते नातं काही आगळं.. आई... एक शब्द नाही तर ते आयुष्य असतं आणि त्याही पलिकडचा तो साठा म्हणता येईल. ती आली त्यावेळी तिचं महत्व नाही कळालं मात्र ते तिच्या जाण्यानं अधिक कळालं आणि आजही ते जाणवतं.. काळ येतो आणि जातो मात्र तिच्या जाण्याने तिची आठवण अधिक गहिरी होत जाते.. तिच्या बोलण्याप्रमाणे ती वागली आणि तिचं जाणं हा तिचाच निर्णय होता तो तिने पुर्ण केला.

आजही तिचं ते वाक्य कानात कायम आहे.. ती ICU मध्ये होती आणि मी तिच्याशी बोलत होतो.. कुठे चाललास पशा..? ‌ मला या नावाने बोलावणारे मोजकेच.. ती तर आई होती तिचा तो हक्क होता जन्मदाती या नात्याने.. आई मी जरा घरी जाऊन येतो.. जानूला शाळेत सोडायचं आहे... त्यावर ती म्हणाली अरे नको जाऊस.. आता मी घरी येणार ना..! दहा दिवसात दोनवेळा मेंदू शस्त्रक्रिया झालेली.. आता आयुष्यभर पांगळं होऊन रहावं लागणार हे तिने जाणलं होतं.. असं जगणं हे रोज मरणं ठरणार याची तिला जाणिव एव्हाना झाली होती...

आता जगतोय आणि पुढच्या क्षणी मरण आलं पाहिजे हे तिने अनेकदा बोलून दाखवलं होतं ..
त्या क्षणी तिच्या भावना काय होत्या हे मला कळत होतं पण ती हवी होती कायम मला.. ती व्हेंटीलेटरवर होती... तिला जगवण्याचे सारे प्रयत्न सुरू होते..त्याचीही तिला जाण होती.. मी काळजावर दगड ठेवून सारं निर्विकारपणे बघत होतो.. माझ्या चेह-यावर आतली कळ दिसू नये याचा मी प्रयत्न करीत होतो मात्र ती आई होती ना.. डोळ्यातून तिला सारं कळत होतं. आणि त्याच नात्याने मला तिच्या डोळ्यातील भाव कळत होते.

दुस-या दिवशी सकाळी मी निर्णय घेतला.. डॉक्टरना मी भेटलो आणि सांगितलं की आपण तिला व्हेंटीलेटरवर कितीही दिवस जगवू शकतो हे मान्य आहे मात्र त्यानं तिच्या वेदना काही कमी होणार नाहीत .. तिला व्हेंटीलेटरवरून काढा आणि नैसर्गिकरित्या तिचा मार्ग मोकळा करा... घरातील सा-यांचा याला विरोध होता कारण आशा होती.. आईनं दिेलेलं बाळकडू मला चांगलं आठवत होतं.. आशाय.. केशनाशाय..

माझा निर्णय पक्का होता .. तिला रोज बेडवर पडून असहा्य होऊन मरणयातना देणं मला समोर दिसत होतं.. त्याही स्थितीत डॉक्टरांनी तासभर वाट वघू असा निर्णय घेतला... अवघ्या दहा मिनिटांनी मला डॉक्टरांनी बोलावलं आणि त्या यंत्रांकडे बघा..त्यांना कार्डीयाक अरेस्ट येतोय असं सांगितलं.. माझ्या डोळ्यासमोर तिचा आत्मा शरीर सोडून जात होता... बाहेर बहिण आणि इतर नातेवाईकांचा गोतावळा आणि पाणावलेले डोळे... माझे डोळे मात्र कोरडे... तिची नेत्रदानाची इच्छा पुर्ण करण्याची माझी धावपळ एव्हाना सुरू झाली... नेत्रदान झाल्यावर घरी नेण्याची वेळ आली...

जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण येणं हा प्रवास आहे
आणि तो कोणालाही चुकलेला नाही.. इथं कुणी अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही.. तिचे अंतिम संस्कार सन्मानात व्हायला पाहिजे याची धावाधाव.. चुकूनही रॉकेलचा वापर नको.. साजुक तुपात आणि चंदनात तिचे अंत्यसंस्कार झाले पाहिजे माझ्या सूचना सुरू होत्या मित्रांनी त्यानुसार व्यवस्था केली.... ती आता तिच्या मार्गावर अग्नीच्या अधीन झाली...

12 डिसेंबर आयुष्यात कायमचं कोरलं गेलं.. आता 16 वर्षे झाली... ती शरिरानं घरात नाही मात्र मनानं घरात आणि माझ्याही मनात आहे.. सा-यांच्या आठवणीत स्थिरावली आहे.... अगदी अखेरच्या क्षणापर्यंत माझे डोळे कोरडेच होते... आज मात्र लिहिताना शब्दागणिक अश्रू ओघळत आहेत..

ती जगली असती.. चमत्कार झाला असता.. अनेक भावना मनात आहेत.. मी तिचा मार्ग मोकळा केला की तिने ...?... आज ती असायला हवी होती .. 52 हे काय मरणाचं वय नाही.. आज ती असती तर काय स्थिती असती... मन विचारत रहातं आणि मी माझ्या मनाला त्यात बुडवून टाकतो...

तिचं जाणं...ओशोच्या संदेशानुसार रात्री मी जवळच्या मित्रांसोबत सेलिब्रेट केलं... घरातील नात्याच्या गोतावळ्याला ते रूचलं नाही.. मी रडलं पाहिजे यावर ते ठाम होते पण माझे डोळे त्याही क्षणी न पाणवता कोरडेच राहिले...

दिवस जात राहिले..
त्या डिसेंबरच्या अखेरीस पाकिस्तान विरूद्ध वन-डे सामना होता... सामना रंगत गेला.. आणि आपण त्या रोमांचक सामन्यात आपण चमत्त्कारीकरित्या जिंकलो.. टेरेसवर जाऊन फटाके फोडताना सा-या शहरभर होणारी आतषबाजी दिसत होती आणि माझ्यातला मी मोकळा झालो.. आज ती असायला हवी होती.. किमान दोन तास मी मोकळा होत आसवांना वाट करून देत होतो... त्या क्षणी तिचं नसणं जाणवलं.. ती नेमकी त्या क्षणी कळली..

ती बाबरीच्या आंदोलनात आयोध्येला गेली होती ..ती श्रीनगर मधील लाल चौकात तिरंगा फडकावताना तिथं होती... आज कलम 370 झालं... आयोध्या प्रकरणी निवाडा आलाय.. आज ती असती तर किती आनंदी झाली असती... आज ती असायला हवी होती..

कदाचित त्यासाठीच म्हणतात


आई... जी उरत नाही आणि पुरतही नाही

आई.. अंगाई आयुष्यात दर रात्री आठवण

आई.. ज्यांना आहे त्यांना मनापासून सांगणं.. अरे सांभाळा आणि सेवा करा कारण ती असताना कधीच कळत नाही जाणवत नाही पण ती जाते त्यानंतर कळायला लागते.. ती ... आई.. गेल्यावर सारं जग जिंकलं तरी ती परत येत नाही  Miss You Mom  असं ‍Mothers Day ला बोलणं वेेगळं आणि खरं Miss करणं वेगळं असतं.. आज ती आठवण ताजीच आहे आणि आयुष्यभर ती राहणार  हे काही वेगळं सांगायला नकोय.
आला दिवस... विसर पडला तर आठवणं वेगऴं आणि सतत आठवण न विसरणं वेगळं असतं.. त्यातील तिची Exit मात्र आता नेमकेपणाने जाणवत राहते.. मलाच नाही तर तिला कुणीही विसरणार नाही याचीही जाणिव सोबत असते...


प्रशांत दैठणकर

9823199466

1 comment:

Blogger said...

Strange "water hack" burns 2 lbs in your sleep

Over 160 000 men and women are hacking their diet with a simple and secret "water hack" to drop 2lbs every night as they sleep.

It is effective and it works on everybody.

Here's how you can do it yourself:

1) Take a glass and fill it with water half the way

2) Then follow this weight loss HACK

and you'll become 2lbs lighter as soon as tomorrow!