Monday 8 June 2020

माझिया प्रियाला प्रीत कळेना

पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महिना... माझिया प्रियाला प्रीत कळेना... माझिया प्रियाला.. सकाळी टी.व्ही.वर अपडेट्स बघताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला...सतत काही ना
काही कानावर यायची सवय म्हणून रेडिओचा कान पिळला.... आकाशवाणी रत्नागिरीवर शोभा गुर्टु यांचा आवाज आणि त्यातलं गाणं 5-6 दिवसांची सततची धावपळ विसरून फ्रेश वाटायला लागतं.

भरभरून निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या कोकणाला याच नावाच्या वादळानं अक्षरशः ओरबाडून काढलं. त्याला झोडपलं हा शब्द कमी पडेल इतकं नुकसान नजरेसमोर असताना एक खिन्नता येणं हा मनाचा स्थायीभाव त्याच स्थितीत मी वादळखुणा पाहून काल रात्र परतलो. मूड त्याच पद्धतीचा... पण गाण्यातल्या शब्दांची जादू आणि बाहेर बरसणाऱ्या पाऊस धारा यांनी वेगळ्याच विश्वात नेलं...

मुड हा मनाचा झोका कधी इकडे तर कधी तिकडे. त्याची आंदोलने चालूच असतात... शब्द त्यावर कधी फुंकर घालण्याचं काम करतात तर कधी आग फडकवण्याचं.. सारा काही शब्दांचा खेळ मात्र आज याची सकारात्मकता अधिक जाणवली... दो बूँद जिंदगी के प्रमाणे चंद अल्फाज सोच बदलने की... शब्दांची शक्ती..

आयुष्यात आपण अनुभवी असण्याचा दाखला ज्या पहिलेल्या अधिकच्या पावसाळयांनी देतो त्या पावसाळ्याला होणारी सुरुवात त्याची दोन भिन्न रूपे दाखवणारी होती.
मात्र त्याचं अस्तित्व जीवनासाठी महत्त्वाचा आहे ही जाणीव असलेलं मन त्याच्या आगमनानं आनंदीत होणं अगदीच सहाजिक...

औरंगाबाद सारख्या अवर्षणत कधीसा उपकार केल्यागत पडणारा पाऊस आणि कोकणचा पाऊस याची तुलना शक्य नाही आणि ती न केलेली बरी... एक पावसाळा कोकणात काढल्यानंतर हे जाणवलं की पाऊस काय आणि कसा ते कळण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी इथचं यायला पाहिजे.

आता पाऊस आणि प्रेम मला वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू... तारुण्यातच असं नव्हे तर प्रेमातल्या प्रत्येकांना पावसाचं येणं आणि त्याचं धुंद होऊन बरसणं हे स्वप्नवत असतं आणि स्वप्न सत्यात उतरण्याचा प्रत्यक्ष काळ अर्थात त्याचं धारांनी धुंद होऊन बरसणं सुरू होण्याचा..

प्रीतीचं गीत गाताना संदर्भ पावसाचे जुने नाहीत पण प्रत्यक्षात त्याच्या येण्यानं सुखावण्याची भावना येणार नसेल तर भिजण्यातही अर्थ नाही..

चिंब भिजलं तन माझं... मन रे राही कोरडे... त्या कोरडेपणाची ती भावना व्यक्त करताना हे गाणं आलेलं असणार...

आयुष्याचे अनेक पैलू एका वाक्यात उलगडून दाखविण्याची किमया या गाण्याच्या बोलांमधून आलीय हे देखील जाणवतं.... झालेल्या आनंदाला कारुण्याची किनार अशी शोभा देत नाही .. पण हेच जगणं आहे.

आपण रचलेला बेत पार पडेल आणि सुखरूप पार पडेल असं होत नाही.
कोणत्याही समारंभात हेच अनुभवायला मिळतं मग आयुष्य तर आशा समारंभांची आणि उत्सवांची मालिका आहे... रात गयी बात गयी म्हणत नव्याला आरंभ करताना देखील वाटत राहिलं की एक तेवढं जमलं नाही आयुष्यात... मग वाटचाल होत नाही... पावलं अडखळतात... चाल मंदावते... आणि अशाच क्षणी उभारी देणारा..

पावसात भिजणारा सुखाचा श्रावण हवा वाटते तिला प्रित कळे..ना नाही तर नाही पण तिला कळेपर्यंत आलेल्या क्षणी का जगणं सोडायचं... तक्रारींचा हा पाऊसही मग बरसतो... तिला कळली तर ती देखील लटक्या रागानं प्रतिबोल लावणारय...!

तेरी दो टकियाँ दी नौकरी में

मेरा लाखोंका सावन जाये..

प्रशांत दैठणकर
9823199466

No comments: