Monday, 9 January 2012

उड चली रे पतंग...


      साधारण पाचवी-सहावी दरम्यानचं तो काळ 1980-81 च्या आसपासचा सकाळी थंडीत काकडणं दुपारपर्यंत थंडी रहायची आणि उब वाढतेय वाटत असताना सुटणा-या वा-याने पुन्हा वाढायची. हा डिसेंबर संपल्यानंतर जानेवारीत सुटणारा मंद आणि थंड वारा.
     त्याकाळी टिळकपथावर बढई गल्लीत मी रहायचो गल्लीत एकाच वयोगटातल्या 30 ते 32 जणांची गँग. टिव्ही नाहीत. मनोरंजनासाठी फक्त रेडिओच असायचा. मग काय खेळण्याची धूम असे. एका कंपूची आवड गोट्या खेळण्याची काचेच्या त्या चमकदार गोट्या एका छोट्या हौद्यात फेकायच्या आणि नेम धरुन सांगितलेली गोटी अलगद मारायची की सारा डाव तुमचा. गँग इतकी मोठी होती की गोट्या हातांनी नाही तर ताटात घेऊन फेकायला लागायच्या.
     गल्लीत राममंदिरालगत एक विहिर होती त्या विहिरीच्या मोकळ्या जागेत पिंपळाच्या पाटालगत हा गोट्यांचा डाव रंगायचा. त्या खेळात गती नसल्याने आम्ही एक वेगळा कंपू घेऊन कोप-यावर असलेला ठाकूरांच्या बिल्डींगवर पतंगबाजीत रंगायचो.
    पतंग अर्थात कागदी तावाला बांबूच्या कामट्यांनी विशिष्टपणे बांधून त्याला दोरा लावून या जानेवारीच्या हवेत उडवायचं. त्यामुळेच संक्रांतीच्या या काळात पतंगबाजी जोरात चालायची.
    दोरा गुंडाळायची ती चक्री. ढीलका मांजा आणि काट का मांजा अशा दोन प्रकारचा मांजा वापरला जायचा. पतंगबाजीचे काही खास शब्द होते. `ढील देना` घिसतमतानी, रिग्गा, चिपडी, डुग्गा, रखते ही साफ, पोक्का, हिलगाना असे ते काही शब्द.
     पतंगबाजीत कटलेल्या पतंगाला आपल्या पतंगाच्या सहाय्याने हिलगावून खाली आणणे ही एक कला होती. रस्त्यावर उंच काठ्यांनी कटलेले पतंग हवेत पकडले जावे यासाठी विशिष्ट प्रकारची लग्गी घेऊन अनेकजण फिरायचे. या पतंगांवरुन भांडण आणि सशस्त्र हाणामा-याही व्हायच्या. मला तेंव्हाही पतंग उडवता आला नाही आणि आजही येत नाही पण तासनतास हातात चक्री पकडून पतंग उडवण्यास मदत करणे ही माझी खासियत होती वेळीच ढील देणे आणि गुंता न करता व्यवस्थित दोरा गुंडाळणे ही देखील एक कलाच आहे. त्यात मी त्यावेळी एक्स्पर्ट होतो.
      याच पतंगबाजीतून गल्लीतला गणेश दाभाडे आमचा गण्या, सामगांचा अमोल, नाईकांचा सुन्या आणि मी यांनी वयाच्या 12 व्या वर्षी पहिला व्यवसाय केला तो मांजा बनवण्याचा 2 रुपये 65 पैशांची गुंतवणूक प्रत्येकी केली होती. कोरपडीचा रस थम्सअपच्या बाटलीच्या काचेचा चूरा आणि धागा हा कच्चा माल.... त्या पतंगबाजीनं त्या वयात व्यवसायचं एक वेड दिलं ते आजतागायत कायम आहे.
           कागज अपनी किस्मतसे उडता है
           पतंग अपनी काबिलीयतसे ....
असं म्हणतात त्यामुळे आयुष्याच्या पतंगबाजीत काबिलीयत आणण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षणी सूरु राहतो. आठवतात बालपणीच्या आकाशातले अपेक्षांचे ते पतंग.

-         प्रशांत दैठणकर

No comments: