Thursday 2 August 2012

“ इक राधा इक मीरा.. दोनोंने श्याम को चाहा..

अंतर क्या दोनोंकी प्रितमें बोलों...? ”

गाण्याच्या या ओळी आठवण्याचं कारण अगदीच वेगळं.. औरंगाबादहून मी बुलडाण्याला येत होतो. जेवणासाठी चिखली येथे एका हॉटेलमध्ये पोहोचलो. छानपैकी जेवण झालं. तडका दाल आणि तंदूर रोटी हे माझं आवडतं भोजन. जेवण झालं आता मस्तपैकी पान खाण्याचं ठरवलं. पानाच्या टपरीवर त्याला पान सांगून उभा होतो. एक शाळकरी मुलगा टपरीवर आला.

‘मीरा आहे का ?’ अशी त्याने विचारणा केली... पानटपरी चालकाने त्याला “नही है…!” असं राष्ट्रभाषिक उत्तर दिलं.... लगेच त्या पोराने “ मग राधा आहे का? “ असा सवाल केला.. दुकानदाराने आपला सूर कायम ठेवत “ वो भी नही है “ असे उत्तर दिले.

त्या दोघांचा हा संवाद संपला. तो पोरगा लगेच दुस-या पानटपरीकडे निघाला. एव्हाना माझं कुतूहल जागं झालं होतं. राधा काय मीरा काय... मी त्या टपरीचालकाला विचारलं. त्याचं उत्तर ऐकून मी चाटच झालो. राधा आणि मीरा ही बंद पाकिटात विकल्या जाणा-या धनाडाळ प्रॉडक्टची नावे होती... राधा आणि मीरा यांचं श्रीकृष्णवरलं प्रेम सा-यांना माहिती आहे.. पण पानटपरीवर विकल्या जाणा-या पाकिटांवर ही नावं याचा धक्काही बसला... दुस-या खेपेत मला राधा आणि मीरा शेजारी शेजारी पाकिटांच्या माळांच्या रूपात लटकताना दिसल्यावर मी लगेच त्याचा फोटो काढला.

कोणी कशाचे नाव काय ठेवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र यातून होणा-या गमती.. विसंगती.. विनोद याचं भानही आपण ठेवलं पाहिजे असं वाटतं.

नागपूर शहरात एक कपड्याचे दुकान आहे त्याचं नावं विसंगती आणि विनोद यांचा संगम आहे.. दुकानाचं नाव आहे... “ दिगंबर वस्त्रालय... “ ये हुई ना बात... बुलडाणा जिल्ह्यात धाड या गावाजवळ एक पाटी बघितली... “ गणपती वॉशिंग सेंटर “.... औरंगाबादकडे जाताना मेराचौकी गावाजवळ एक हॉटेल आहे त्याचं नाव आहे हॉटेल आठवण.... औरंगाबादेत एक दातांचा दवाखाना आहे श्रीराम चौकाजवळ... त्या डॉक्टरचं मला कौतुक वाटतं... त्या डॉक्टरांनी दवाखान्याचं नाव ठेवलं आहे “ एकदंत दातांचा दवाखाना “... आता बोला.. शेक्सपियर भारतात आला तर नक्की पुन्हा म्हणेल.... What’s in the NAME..!

प्रशांत दैठणकर
२ ऑगस्ट २०१२

No comments: