Wednesday, 13 February 2013

रेडिओचं कात टाकणं ...!

       काळ झपाट्याने बदलतोय त्यासोबत बदलणारं तंत्रज्ञानही बदलत आहे. या गतिमान बदलाच्या काळात गेल्या 3 दशकात खुप मोठे बदल झाले याचे स्वागत झाले. कधी विरोध झाला पण बदल होतच राहिले कधी-काळी जिवनाचा अविभाज्य भाग बनलेला रेडिओ, टि.व्ही. आल्यानंतर अडगळीत गेला मात्र आता पुन्हा कात टाकून हे संवाद संपर्क माध्यम आता पुन्हा नव्या रुपात झपाट्याने आपलं महत्व सिध्द करीत आहे.

            कधी काळी हा रेडिओ संपन्नतेचं लक्षण होता गावातल्या तालेवार व्यक्तीकडेच रेडिओ असे. नंतर हा रेडिओ इराण्यांच्या हॉटेलचं आकर्षण बनला. या आकर्षणातून इराणी हॉटेल्स खच्चून भरलेली असायची त्याकाळात रेडिओला स्पर्धा होती ती केवळ ग्रामोफोन अर्थात फिरत्या तबकडीची याला रेकॉर्ड म्हणायचे नंतरच्या काळात टिव्हीच्या आगमनापूर्वी ग्रामोफोनचं युग मॅग्नेटीक कॅसेटनी सरकवलं हा काळ मेड इन जापान च्या लोकप्रियतेचा होता.

            टेपरेकॉर्डर वर कॅसेट टाकून गाणी ऐकायची आणि आपलाही आवाज  आपण ध्वनीमुद्रीत करुन ऐकायचा याही काळात रेडिओची क्रेझ अबाधित असल्याने रेडिओ आणि टेपरेकॉर्डर असा टू-इन वन घराघरात दिसायला लागला ज्यावेळी बुधवारी आवाज की दुनिया के दोस्तों अशी साद ऐकण्यास सारे अतुर असायचे त्याचवेळी टिव्हीचा चंचूप्रवेश झाला परंतु तो उमरावांच्याच दिवाणखाण्याची शान होता.

            या बदलाच्या काळात अनेक गोड स्मृती या रेडिओने अनेक पिढ्यांच्या मनात जागवल्या. रेडिओ सिलोनवर दर महिन्याच्या एक तारखेला आज पहिली तारीख.. खुश है जमाना हे गाणं जितक्या आवर्जून ऐकायचे तेच चाकरमानी के.एल.सहगल या गायकीतल्या भिष्मपितामहाचं 7.55 चं सकाळंचे गाण ऐकल्याशिवाय दिवस सुरुच करीत नसत.

            ऑल इन्डिया रेडिओ की उर्दु सर्व्हीस असो की विविध भारती, रेडिओ सिलोनच्या बरोबरीने सारा दिवसच संगीताच्या सुत्रात बांधला गेलेला तो काळ होता भाटापारा झुमरीतलैया ही गावं अख्ख्या जगाला याच रेडिओमुळे कळाली.

            रेडिओ ऐकणं हा आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेल्या काळातच टिव्हीनं प्रवेश केला आणि हा इडियट बॉक्स घराघरात शिरायला लागला त्यावेळी रेडिओ अडगळीत पोहचला. आधी कृष्णधवल व नंतर रंगीत झालेल्या या टिव्हीची मोहिनी इतकी होती की अगदी कृषीदर्शनही सारे बघत बसायचे... हा मुंग्या टू मुंग्या टिव्ही ऑन ठेवण्याचा सुरुवातीचा काळ, नंतर यानं तुमची आमची संध्याकाळ कायमची चोरुन घेतली.

            दूरदर्शनच्या मोनोपलीनंतर आकाश खुलं होताच चॅनलचा पूर आला यात आघाडी घेणाऱ्या झी वाहिनीला आता 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या झी ने खूप मोठं नेटवर्कच उभारलय आता म्हणाल त्या विषयावर आपणाला चॅनल दिसतात फूड ते फॅशन, भक्ती ते संजीवन वृत्त ते मनोरंजन काय म्हणाल ते अगदी खेळाच्या वाहिन्यांमध्येही क्रिकेटला वाहिलेल्या वाहिन्यांचा काळ आला.

            या काळात रेडिओची काही काळ पिछेहाट झाली असली तरी एफ.एम. वाहिन्यांच्या रुपात रेडिओने जोरदार कमबॅक केलं आणि चालता-बोलता मनोरंजन अन माहिती देण्यातली आपली उपयुक्तता सिध्द केली. वर्ल्डस्पेस रेडिओ सारखी कंपनी प्रतिसादाअभावी दिवाळखोरीत गेली असली तरी एफ.एम.च्या क्रांतीने पुन्हा नव्या पिढीच्या कानांचा ताबा घेतलाय. हातात आवश्यक झालेल्या स्टाईल स्टेटमेन्ट असणाऱ्या मोबाईलमधला रेडिओ आणि त्यावर चालू काळातली चालू गाणी असा योग या रेडिओने साधला असल्याने रेडिओ पुन्हा एकदा लाईम लाईट मध्ये आलाय. चटर-पटर करीत निवेदन करणाऱ्या आर.जे.नी आकाशवाणीचे धीमे गतीके बुलटीन कधीच मागे टाकले. आता चटपट-झणझणीत पिढीचा हा काळ आहे. येत्या काळात समुदाय अर्थात कम्युनिटी रेडिओ वाढीस लागणार हे स्पष्टच दिसतय शासनही सकारात्मक पध्दतीने स्पेक्ट्रम शुल्क माफ करण्याच्या विचारात आहे असं झाल्यास महाविद्यालय स्तरावरली रेडिओ केंद्र उदयास येतील.. तो दिवस दूर नाही हे स्पटच दिसत

                      --                                                                  -प्रशांत दैठणकर-

1 comment:

Alok Jatratkar said...

Prashant ji, You made me very nostalgic..! Very nice article.- Alok