Saturday, 19 January 2013

औपचारिकतेकडून औपचारिकतेकडे

       झपाट्याने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात काय  आणि कसं घडेल याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. संवाद साधनांमधील मोठी क्रांती जग जवळ आलं हे सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र आपण अधिक औपचारिकहोत आहोत आणि दुसऱ्या बाजूला खुलेपण स्वीकारत आपली स्वत:ची पर्सनल स्पेस घालवत आहोत असं फेसबुकवर बघताना जाणवतं.
            मुंबैकरांचं अधिक आयुष्य लोकलच्या प्रवासात जातं म्हणून त्या प्रवासात जिवाभावाचे मैत्र होणं त्यातून लोकलच्या उब्यात गणेशोत्सव साजरा करणं हे समजण्यासारखं आहे. पण आज फेसबुकवर जी पोस्ट दिसली ती निश्चितपणानं विचार करायला लावणारी होती.. लिहिलं होतं मैत्रिणींनो फेसबूकवर संक्रांत हळदीकुंकू कार्यक्रम ठेवला आहे...! छानच म्हणजे एकमेकांच्या घरी जाण्याचे निमित्त देखील नाकारणं असं याला म्हणावं का. नाण्याची दुसरी बाजू.. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सखींसोबत हळदीकुंकू करता येईल.
            या व्हर्च्युअल दुनियेत आपण किती गुंतायचं हा खरा सवाल आहे.. हे म्हणजे एक व्यसनच आहे. कालच गप्पांच्या ओघात सातत्याने फोनचा अडथळा आल्यावर माझे एक पत्रकार मित्र झटकन म्हणाले, साहेब या मोबाईल फोनलाही लोडशेडींग असायला पाहिजे.
            संवाद साधनं जीवनात उपयोगी आहेत हे खरं पण ही साधनं आपल्यातला औपचारिकपणा वाढविण्यासोबतच आपला प्रामाणिकपणाही संपवत आहेत... फोन वर पहिला प्रश्न असतो.. कुठे आहात..? फोन हे संपर्काचं साधन आहे ते पत्ता विचारण्याचं किंवा सांगण्याचं साधन नाही. आपणास नको त्या व्यक्तीचा फोन आल्यावर आपलं स्थान खूप दूर आहे, बाहेरगावी आहे असं खोटं सांगणं आताशा सर्वांना अंगवळणी पडलय.
            मोबाईलचा वापर प्रतिष्ठेचं लक्षण झालय मात्र पैसा नसल्यानं केवळ मिसड् कॉलवर भर देणारे अनेकजण इथं आहेत. तीच बाब फेसबूकची इथं खरा कोण हे ओळखणं खरच अवघड आहे. फेक प्रोफाईल असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्यातूनच सारे एकमेकांशी अंतर राखून असतात. सारे औपचारिक असतात.
            आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नवा वैश्विक टप्पा म्हणून फेसबूककडे बघतो मात्र औषधाच्या परिणामांसोबतच दुष्परिणामांकडेही तितक्याच सजगपणे आपण बघायला हवं असं मला वाटतं.
 
                                                                                              -प्रशांत दैठणकर

No comments: