Monday 21 October 2013

रस्ते सुरक्षा साक्षरतेची निकड


रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या वर्षाभरामध्ये भारतात रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या साधारण दीड लाख इतकी होती.मात्र अपघात जखमी झालेल्यांची संख्या त्याहीपेक्षा जास्त आहे. त्याखेरीज चिंतेचा विषय म्हणजे राष्ट्राची अब्जावधींची संपती यात नष्ट झाली. या सर्व पार्श्वभूमीवर विचार करताना एकच बाब जाणवते ती म्हणजे रस्ता सुरक्षा विषयक जागृती आपल्याकडे जवळपास नाही. 
चित्रपट आणि वास्तव यात फरक असतो पण चित्रपटात भन्नाट वेगाने गाडी चालवताना बघून त्या धूम चे अनुकरण रस्त्यावर केल्‍यास अपघात होतो. यामुळेच रस्त्‍यावरील अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण  अधिक आहे. त्याहीपेक्षा अधिक चिंताजनक बाब म्हणजे यात 18 ते 30 वर्षे वयोगटातील तरुण मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
रस्त्यांवर वाहन चालवताना ज्या प्रकारची काळजी घ्यायला हवी त्‍याप्रकारची काळजी घेतली जात नाही. याला कारण अर्थातच प्रशिक्षणाचा आभाव हेच आहे. चारचाकी वाहन परवाना मिळवायचा असेल तर काही प्रमाणात त्याला प्रशिक्षणाची जोड आपणाकडे देण्यात आलेली आहे. मात्र दुचाकीच्या बाबतीत असं औपचारिक प्रशिक्षण दिलं जात नाही.
चारचाकी वाहनात चालवताना किमान संतुलन करण्याची आवश्यकता नसते. संतुलन दुचाकीवर आवश्यक ठरते. यामुळेच गतीचे वाहन चालविताना अचानक खड्डा आल्‍यास किंवा गतीरोधकावर संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता असते. खड्डे चुकविताना होणारे अपघात आणि रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी वाहणाचे नियंत्रण व वाहन चालविण्याचे कौशल्य महत्वाचे असते. प्रशिक्षण नसल्याने कौशल्य येत नाही आणि गती असल्याने नियंत्रण जमत नाही त्यामुळे अधिक अपघात घडतात.
धाडस हे देखील अशा अपघांताच्या कारणांपैकी एक कारण आहे. अतिघाई इतकाच अपघाताचा धोका विनाकारण धाडस दाखविल्याने होतो. तरुण वयात ही धाडसाची प्रवृत्ती प्रबळ असते. आपण एकदम कुशल चालक आहोत या फाजिल आत्माविश्वासापोटी असे धाडस आणि त्यातून अपघात हा प्रवास असतो.
अपघाताच्या कारणांमध्ये आणखी एक कारण ते मद्य आणि वाहन. मद्य पिल्यानंतर वाहनाचा अपघात होण्याची शक्यता 8 पट अधिक वाढते हे लक्षात न घेता मद्यप्राशन करुन वाहन चालविण्या-यांची संख्या खूप मोठी आहे. अपघाताच्या कारणांमध्ये मद्यासोबत आता भर पडली ती मोबाईलची. आपण जगात सर्वात महत्वाचे आहोत असा भाव आणून मोबाईलवर बोलत वाहन चालविल्याने हल्ली अपघात अधिक प्रमाणात आहेत.  
मध्येंतरी कोल्हापूरवरुन गोव्याला जाताना निवास व्यवस्थेसाठी ट्रॅव्हल एजन्टला मोबाईल केला. त्याने माहिती दिली व फोन बंद करताना सांगितले मला सव्वातास फोन करु नका मी बाहेर जातोय आणि कार चालवताना फोन बंद असतो. चला एक तर सुरक्षा साक्षर भेटला. पण अशी साक्षरता सर्वांपर्यत पोहचली तरच रस्त्यांवर  कुत्ते की मौत मरणं बंद होईल.


                                     -प्रशांत अनंत दैठणकर-

No comments: