Tuesday, 22 July 2014

पाऊस झेलतांना.......!

गर्द काळया ढगांची गर्दी येणा-या पावसाची वर्दी देत होती घरापासून चार पावलं चाललो नाही की त्यानं बरसायला सुरुवात केली होती. सारे आसपासच्या झाडांचा आणि आडोशांचा आधार घेऊन पावसापासून अंतर ठेवून होते मी माञ तसाच पाऊस अंगावर झेलत पायी चालत राहिलो. नाक्याच्या त्या ठेल्यावरल्या भज्यांच्या वासाने मन एकदम कॉलेजात पोहोचलं.
 अशीच ती एक भिजलेली दुपार ती आणि मी माझ्या TVS वर पाऊस झेलत असं धुंदपणे रस्त्यावरुन जात होतो. नाही म्हणायला दोघांनाही भिजायला आवडतं. भिजण्यात देखील तिचं लॉजिक असायचं. सर्व आटोपून घराबाहेर पडताना पाऊस आला म्हणजे तो नकोसा असतो माञ सर्व कामे आटोपून परत येताना तो आला म्हण्जे चिक्कार मज्जा……… मग धुंद भिजायचं. 
ती श्रावणातली दुपार होती. एल.आय.सी. च्या पदभरतीची परीक्षा देवून ती परतली आणि तिला घेवून मी शहराच्या मध्यवस्तीत चिंब भिजत चाललोय. आडोशाला लपून पावसाला टाळणा-या प्रत्येकाला कदाचित आमचा हेवा वाटत होता. किमान त्यांची नजर तरी तसं बोलत होती. चिंब चिंब भिजल्यावर औरंगपु-याच्या एका हॉटेलमध्ये गरम कॉफीचे घोट थंडी कमी करत होते. अगदी रोमँटीक असा क्षण
पावसाचं आणि माझं काही आगळं नातं आहे. प्रेमात पडल्यावर प्रश्न् पडला की याला पडणं का म्हणतात. किती सुंदर भावना आहे ही………या पडण्यावर आम
च्या वेदांतने मागच्या महिन्यात विचारलेला सवाल आठवतो बाबा घराचा स्लॅब बांधतात मग सगळे स्लॅब पडला का असं का विचारतात. जाऊ दे पडणं………तेही पावसाच्या साक्षीनं
ती नंतर पत्नीच्या आणि आईच्या भूमिकेत शिरली असली तरी तिचा मिश्कील स्वभाव गेलेला नाही माञ हल्ली पावसात तिच्यातली आई जागृत होते त्यावेळी मुलं फोन करतात बाबा छान पाऊस पडतोय……..आई ओरडणार हे ठाऊक असल्यानं मला फोन करायचा मग उत्तर………फोन काय करताय जा पळा भिजायला……..!येरे येरे पावसा........म्हणत बालपण चिंब भिजलं पाहिजे आणि “रिमझिम गिरे सावन” म्हणत तारुण्य् धुंद झालं पाहिजे. 
म्हणतात ना, 
ऐ बारिश इतना ना बरसके वो आ ना सके………!और उनके आनेके बादइतना तू बरस…….के वो जा ना सके.
पुन्हा वळून बघताना 26 वर्षांपूर्वीची माझी वाक्ये मला पुन्हा आठवली.
उदयाच्या वर्तमानात रम्य् आठवणी हव्या असतील तर आजच्या वर्तमानात तसं आपण जगायला हवं………मनसोक्त्……मनमोकळं होवून…….!
पावसाच्या पाण्यात पापण्यांच्या कडा ओलावल्या तरी कुणाला कळणार आहे की हा पाऊस नभीचा आहे की अंतरीचा……..आपण आपलं चालत रहायचं…….न थकता……पाऊस झेलत…….!

No comments: