Tuesday 26 June 2018

मेरा पती मेरा देवता ...?

मी लहानपणापासून पुराणातल्या सात चिरंजीवी ची कथा ऐकत आलोय. त्यात सर्वांना प्रकर्षाने लक्षात राहतो तो अश्वस्थामा ...
तो देखील त्याच्या भाळावरल्या जखमेमुळे ... ती जखम घेऊन जगण अशक्य अशा स्थितीत त्याला अमरत्व दिल्याने त्याच्या त्या वेदना देखील युगानुयुगे सुरु आणि वेदनांना देखील मरण नाही... कसं असेल ते जगणं...

ही जखम आठवण्याचं कारण म्हणजे वटपौर्णिमा अर्थात वड पौर्णिमा ... ती सावित्री सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी सृष्टीचा नियम बदलायला लागली आणि ते तिनं केलं.... पण आजच्या सावित्रींकडे मी बघतो तेंव्हा मला त्यांच्याही भाळावर ती जखम दिसायला लागते....!

पंरपरा कुठं सुरु झाली ठाऊक नाही... का करायची पूजा तर त्यामागे कथा आहे.... पण आजच्या सावित्रीच्या आयुष्यात असलेला व्यथेचं काय ? घरा घरात अशा सावित्रीच्या हो प्रत्येक सावित्रीच्या व्यथेचीच कथा आहे... तरी परंपरा सुरु आहे....

भला है बुरा है जैसा भी है मेरा पती मेरा देवता है.....!

हा देवता आहे ही मानून भारतीय नारी या जन्मीच्या साऱ्या वेदना उरात कवटाळत खरच मनापासून जन्मोजन्मी हाच पती मागत असतील का ? आणि लगेचच दुसरा सवाल का म्हणून मागावा. ती कलयुगातल्या सावित्रींची जखमही मग भळभळत रहाते... आपलं घरदार सोडून स्वत:चं अस्तित्व पूर्णपणे बदलून परक्या घरात आजची सावित्री येते... किती जणींना चांगली वागणूक मिळते .. कालपर्यंत न बघितलेला, त्याला सत्यवान मानायचं, त्याला देवाचं स्थान द्यायचं आणि पूजा करायची.


सतयुग केंव्हाच संपलं हे कलीयुग आहे. त्या सावित्रीचा तो सत्यवान होता... तुझा कोण आहे गं पती कलियुगात बेवडा, जुगारी, ....गुन्हेगार .... काही का असेना कुंकुवाचा धनी आहे म्हणतं त्याची पुजा करायची... त्याचं मानसिक व्यंग लपवायचं ..... कोण कसा हे सगळयांना कळत नाही म्हणूनच पत्नीला अर्धांगिनीचा दर्जा दिलाय. शब्दाने प्रत्यक्षात ती अर्धांगिनी असते का? त्याचं सारं खरेपण पोटात घालून समाजात त्याला चांगलं म्हणायचं... मेरा पती ....देवता म्हणायचं.

असं ऐकलं होतं कोणत्याही दगडाला शेंदूर पासून देव होत नाही... मुळात त्या दगडात देवपण असावं लागतं.

...सत्यवान किती आहेत आज म्हणून त्यांच्या सावित्रीनं जन्मोजन्मीची साथ मागायची ..... ती अबला आहे असं म्हणत पती-पत्नीच्या नात्यात बहुतेक कलयुगी सावित्री दुय्यम जिणं जगताहेत. Male dominant culture .. पुरुष प्रधान संस्कृती ... किती जणींना बरोबरीचा दर्जा मिळालाय आणि किती जणी केवळ.... अर्धांगिनीच्या ऐवजी अंगवस्त्र म्हणून बघितल्या जात आहेत... मग त्यांनी का म्हणायचं ... मेरा पती मेरा देवता ...?

सप्तपदीच्या प्रत्येक फेऱ्यात दिलेली वचनं ही समारंभाचा भाग आहेत का... आता तर विवाह समारंभ कमी आणि इव्हेंटच जास्त झालाय.. त्याचा फायदा घेत व्यावसायिक गणितं मांडत धुमधडाका केला जातो... DJ च्या गलक्यात कुठे ऐकू येतात ती सप्नपदीची वचने ....!

कलियुग ....घोर कलियुग ... सप्तपदीची पावलं देखील आज दारुच्या धुंदीत अडखळतच पडताना दिसतात... संसार कसा सरळ होणार नंतर...!

आपली भारतीच संस्कृती निश्चितपणे जगात सर्वात्तम आहे... ती टिकून आहे कारण इथं अर्ध्या समाजाला विवाहाच्या साखळदंडानं बांधून भिंतीला जखडलय संसार नावाच्या .... ही सक्तीची जन्मठेप आहे आणि त्या गुंगी गुडियाला बोलायला बंदी आहे... सक्ती आहे म्हणून अधिक प्रमाणात विवाहसंस्था टिकून आहे... विवाहसंस्था ही संस्कृती नव्हे.... स्त्री - पुरुष यांना समानपणे जगण्याचा अधिकार ही संस्कृती आहे.... ती विसर्जित करुन घराघरात कलयुगातली ती घरची मालकीण (?)….!


घे उंच भरारी घे.... मुक्तपणे आयुष्य जग असं सांगताना घरात 'पिंजरा' आणून ठेवणारे कमी नाहीत... आणि हा पिंजरा ... दोन्ही अर्थानं.... मग तो सत्यवान तर नक्की नाही पण ... परंपरा....!

होळीला मी बोंब मारतो, का मारतो .. माहिती नाही....! पूर्वापार चालत आलय... परंपरा.... !

त्याला सत्यवान बनता आलं नाही पण त्याला सत्यवान मानत ती सावित्री पुन्हा निघते वडाच्या त्या झाडाला रेशम धाग्यांचे गुंफण घालून साता जन्माची साथ मागायला ....

मला मात्र भळभळणारी जखम आणि तळमळणारी मनं दिसत राहतात... !

- प्रशांत दैठणकर

9823199466

No comments: