Thursday 30 April 2020

ऋषी कपूर ... Timelass पोस्टर बॉय...!



समय रहतें ही समय का पता नही चलता...
गुजरता हैं वक्त तो हर लमहा याद आता हैं..
prashant
काही असंच झालंय किंवा त्याची सुरूवात झाली कालपासून. कालची सकाळ उजाडली ती मुळी इरफान खानच्या निधनाच्या वार्तेने आणि आज सकाळी ऋषी कपूरच्या निधनाची बातमी... आला तो जाणारच आणि त्याला पर्याय असत नाही मात्र कोण कधी जाईल याची खात्री नाही आणि सारं काही चांगलं आहे असं वाटत असताना एखाद्यानं जाणं नक्कीच धक्का देणारं असतं... तो अनुभव आपण वारंवार घेतो आणि तो येतच राहणार असं वाटतं. आता या जाणा-यांना विदा करायला गर्दी मात्र दिसणार नाही कारण ते कोरोनाचं संकट आहे.

आपणाकडे
आयुष्यात काय कमावलं याचं गणित आपल्या अंतिम संस्काराला किती जण येतात यावर मांडलं जातं असाही एक रिवाज आहे. आता येणं आणि जाणं यातलं अंतर अगदीच कमी कालावधीचं असलं तरी यात मरणानंतर जगणारे अनेक जण आहेत आणि त्यात कलाकार ही व्यकती येते. जगण्याचं खरं मर्म हे म़ृत्यूनंतर आपलं नाव कायम ठेवण्यात अधिक आहे हे सांगायला नको वेगळं.

ऋषी कपूर मनात बसला तो त्याच्या अमर अकबर  अॅन्थनी मधल्या अकबरच्या भुमिकेतून .. कारण अर्थात तोच लहानपणी पाहिलेला त्याचा पहिला चित्रपट होता. त्याच बॉबी आला त्यावेळी वय काही कळण्याचं नव्हतं आणि त्यावेळी पाहून कोणी आवडावी अशी परिस्थीतीही नव्हती.. मी आजवर जे ऋषी कपूरचे चित्रपट पाहिले त्यातून जी भुमिका समोर आली ती म्हणजे नव्या नायिकांना चित्रपटात लॉन्च करायचं आणि त्यांना पहिल्या चित्रपटात यशस्वी करायचं तर ऋषी कपूरसोबत भुमिका द्यावी हेच उत्तम ... तो तितका ग्लॅमरस प्रतिमा जपणारा नायक होता.

कपूर घराण्याचा वारसा असला तरी त्याला पहिल्या संधी पलिकडे काहीच उपलब्ध नव्हते. शोमन राज कपूरने आपला ड्रीम प्रोजक्ट असणा-या मेरा नाम जोकर चित्रपटात ऋषी कपूरला ती संधी दिली होती. राजकपूरच्या लहानपणीचा रोल जराशा तरूण दिसणा-या या आपल्या मुलाला देऊन राजकपूर यांनी खरं तर त्यावेळी कॉस्ट कटींग केली होती.. मेरा नाम जोकर तिकिटबारीवर कमाल करू शकला नाही. प्रदीर्घ लांबी आणि दोन मध्यांतरे असणा-या या चित्रपटाने राजकपूरच्या कारकीर्दीला पूर्णविराम लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

अपयशाने खचून न जाता राजकपूर यांनी नवा मार्ग शोधला आणि तो होता प्रेमकथेचा...
समाजिक आशय बाजूला ठेवून आता केवळ तिकिटबारीवर नजर होती. चित्रपट होता बॉबी... नवी सोळा वर्षाची नायिका डिम्पल कपाडियाची निवड झाली आणि नायक होता त्यावेळचा हार्टथ्रॉब राजेश खन्ना... चित्रपट काढताना राजेश खन्नाला देण्याइतकी मानधनाची रक्कम राजकपूर यांच्याकडे नव्हती आणि पुन्हा एकदा कॉस्ट कटींग करत ऋषी कपूरला कास्ट करण्यात आलं आणि चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडला... अशा प्रकारे ऋषी कपूर अपघाताने सिनेमात आला असला तरी 1973 पासून 2019 पर्यंत या नायकाने आपली आगळी ओळख निर्माण केली... जपली आणि ठसाही उमटवला.

नायिकांचा नायक या अर्थाने ऋषी कपूरची अधिक ओळख आहे असं माझं मत आहे. पहिल्या चित्रपटात डिम्पल कापडिया नंतर त्याचा प्रवास सुरुच राहिला. आधी चित्रपटात आणि नंतर आयुष्यात नायिका बनलेली नीतू सिंग .. ऋषी कपूर आणि नीतू सिंगची जोडी त्या काळात खूप गाजली होती.

नायिकांचा नायक या भूमिकेतून सरगम चित्रपटात जयाप्रदासोबतची त्याची जोडी देखील खूप गाजली हा चित्रपट नवे विक्रम नोंदवणारा चित्रपट होता. मुकी नायिका आणि त्याचा डफलीवाला.. गाजला.

दरम्यान मल्टीस्टार चित्रपटात त्याने अमिताभ बच्चन सोबत केलेली अकबरची भूमिका आणि त्याचं ते .. तय्यब अली प्यार का दुश्मन.. हाय हाय हाय गाणं
आणि परदा हैं परदा ही कव्वाली लोकप्रिय ठरली.. अमिताभ बच्चन सोबत त्याचे जे चित्रपट आले आणि गाजले त्यात कभी कभी तसेच अमर अकबर अॅन्थनी नंतर नसीब तसेच अमिताभ बच्चनसाठी दुसरं जीवन देणा-या अपघातकाळातील कुली आणि भारत आणि रशियाच्या कलाकारांनी बनविलेला अजुबा यांचा उल्लेख करता येईल. 27 वर्षांच्या कालावधीनंतर त्या दोघांनी एकत्र भूमिका केलेला नॉट आउट 102 हा चित्रपट ( 2018 ) शेवटचा होता. या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालं नसलं तरी याची चर्चा खूप झाली.

त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकताना आपणास जाणवेल की नव्या नायिकांचा नायक का म्हणता येईल. सरगम- जयाप्रदा,
कर्ज- टिना मुनीम, प्रेमरोग- पद्मिनी कोल्हापूरे, हिना - झेबा बख्तियार आणि सर्वात अधिक गाजलेला दिवाना- दिव्या भारती.  दिवाना हा चित्रपट जसा शाहरूख खानचा पहिला चित्रपट होता तसाच तो दिव्या भारतीचा देखील पहिलाच चित्रपट होता. त्याआधी तिने तमिळ चित्रपटात भुमिका केल्या होत्या मात्र हिंदीत तिला ओळख याच दिवाना चित्रपटामुळे मिळाली.  ऋषी कपूरची भुमिका या दोघांपेक्षा अधिक गाजली.

याखेरीज नायिकांच्या उतरत्या काळात ज्या नायिकांनी ऋषी कपूरसोबत चित्रपट केले त्यांनाही त्याच्या इमेजचा फायदाच झाला. नगिना- श्रीदेवी, बोल राधा बोल- जुही चावला..

चित्रपटात आपली आगळी ओळख बनविणा-या या नायकाने शेवटच्या काळात आपली इमेज तोडून भुमिका केल्या यातली ऋत्विक रोशन नायक असणा-या अग्नीपथ चित्रपटातील त्याची भूमिका सर्वांचं लक्ष वेधणारी ठरली.

त्याच्या चित्रपटाच प्रवास कसा होता असं सांगायचं तर तो झुठा कहींका पासून झुठा कहींका असा होता असं म्हणता येईल. नीतू सिंग सोबतचा त्याचा हा चित्रपट 1979 साली आला होता. यातील गाणी खूप गाजली आणि चित्रपट देखील चर्चेत होता त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी याच नावाने चित्रपट आला ज्यात देखील त्याची भुमिका होती.
आपल्या चित्रपट प्रवासात ऋषी कपूरने एक चित्रपट दिग्दर्शित केला तो होता आ अब लौट चले.. आणि यात राजेश खन्नाची भुमिका होती. ज्या चित्रपटात राजकपूरने राजेश खन्नाला नायक घेऊन बॉबी काढायचा ठरवला त्यात ऋषी कपूरला संधी मिळाली आणि त्याच ऋषी कपूरने दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात राजेश खन्ना.. अर्थात राजेश खन्ना या चित्रपटात चरित्र नायक होता आणि यात नायकाची भुमिका विनोद खन्नाचा मुलगा अक्षयला
मिळाली होती आणि नायिका होती ऐश्वर्या राय.

पृथ्वीराज आणि राजकपूर यांचा वारसा समर्थपणे चालवणा-या या नायकाने आपली जागा रसिकांच्या मनात निर्माण केली ती कायमची कारण त्याने जे चित्रपट दिले ते आजही सा-यांच्या स्मरणात राहणारे आहेत .. त्यापैकी सर्वोत्तम होता तो त्याचा चांदनी हा चित्रपट.. सफेद साडीत वावरणारं ते श्रीदेवीचं तारुण्य आणि एव्हरग्रीन ऋषी कपूर.. त्यातली गाणी आणि कथानक गेल्या 30 वर्षात जे आयकॉनिक चित्रपट आले त्यातला हा प्रेमाचा आयकॉन ठरलेला चित्रपट.. यात विनोद खन्नाचीही भुमिका होती... आज त्या दोघांच्या पाठोपाठ ऋषी कपूरचाही जीवनपट संपला ही रसिकांसाठी वाईट बातमी आहे... मात्र इहलोकाची यात्रा संपली असली तरी चांदनी आणि त्यासारख्या इतर चित्रपटांचं गारूड निर्माण करणा-या ऋषी कपूरने रूपेरी पडद्यावर मात्र आपल्या मृत्यूनंतरही आपलं नाव राहणार अशी कामगिरी केलीय.. लाखोंच्या या हरदील अजीज अदाकारास अलविदा....



प्रशांत दैठणकर

9823199466