Sunday, 15 April 2012

जिंदादिल ललितदादा

काही घटना अचानक घडतात आणि आपण काही क्षण काय घडतय.. ते का घडतय असं आपल्याला विचारत राहतो.. उत्तर मात्र आपणाकडे काय तर कुणाकडेच असत नाही याचं उत्तर फक्त काळ हेच असतं. आजची सकाळ अशीच उजाडली... वर्तमानपत्र वाचत होतो.. अर्थात याला वर्तमानपत्र हा शब्द वापरणं चुक आहे असं माझं मत आहे. यात जे छापलेलं असतं ते घडून गेलेलं असतं म्हणजेच ताजा भूतकाळ यात असतो.. वृत्तपत्र हा काहीसा योग्य शब्द ठरावा... फेसबुकवर अनिरूद्दने लिहीलेलं वाचताना आपण काय वाचत आहोत हा सवाल मला पडला होता..
      काही व्यक्ती खरच इतरांपेक्षा वेगळया असतात.. जिंदादिल या शब्दाची व्याख्या जगणारं व्यक्तीमत्व असलेल्या ललित देशपांडे .. ललितदादा पुण्याला जाताना त्याला अपघात झाला आणि त्यात त्याचं या जगातलं भौतिक अस्तित्व संपलं... काही क्षण मन सुन्न होतं... दादा .. खरा दादा होता. आपण आपल्या आयुष्यात अनेकांना भेटतो. यातील अनेकजण आपल्या आयुष्यात बदल होईल अशी घुसखोरी करताना दिसतात. आपण त्यांना नाकारतो... काही असे की त्यांना आपण नकळत स्वीकारतो.. का.. याचं उत्तर देता येणार नाही पण हे घडतं... असं ललितदादाला माझ्या मनानं पहिल्याच भेटीत स्वीकारलं होतं हे आज जाणवतं. त्याचा स्वभावच मुळात तसा लाघवी होता..
      आयुष्याचं गाणं गायचं की त्याबाबत कुरकुरत रहायचं ही ज्याची त्याची मानसिकता असते. आव्हानं कमी नसतात.. ती स्वीकारणारी माणसं खुपच कमी असतात त्यापैकी दादा हा एक होता. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आव्हानांची मालिकाच दैवानं मांडली होती... यासाठी नशीबाला बोल न लावता आणि देवाशी न भांडता आहे त्यात आयुष्य किती सुंदर आणि ते उत्तमरित्या जगायचं कसं याचा परिपाठ तो घालत होता. हो... असही जगता येतं हे त्याच्याकडूनच मी शिकलो आहे असं सांगायला काहीच हरकत नाही.
      दादाची भेट अश्वीन देशपांडे या माझ्या मित्रामुळे झाली. ललित त्याचा चुलत भाऊ एकाच भेटीत तो माझाही भाऊच झाला.. परभणीला जायला निघताना पहिला फोन दादाला ही नंतर सवयच होवून गेली होती. तासा दोन तासांच्या भेटीत तो प्रसन्न करुन टाकायचा... दादा खरा दादा.. अचानक अर्ध्यावर मैफल सोडून निघाला यावर या क्षणीही विश्वास बसत नाही हे वेगळं सांगायला नको.. एक सलाम.. एक श्रध्दांजली.. दादा अलविदा...
प्रशांत दैठणकर

No comments: