Thursday 19 April 2012

माठ

उन्ह वाढायला लागली आता पाण्याची गरजही वाढली. पाणी हवं ते गारच हवं वाटतं. माठ घ्यायचा विचार दोन आठवड्यांपासून करतोय पण सोबत कोणी नसल्यानं माठ टू व्हीलरवर आणणं अवघड होतं. आज अपार्टमेंटच्या खालीच गाडीवर माठ विकायला आले आणि महाग पडला तरी चालेल पण घेऊन टाकू म्हणत घेतला.. दहा लिटरचा तो माठ चक्क बारगेन करीत निम्म्या किंमतीला अर्थात १०० रूपयांना घेतला.. काय ही महागाई.. घरात आणल्या आणल्या माठाची रवानगी नळाखाली.. भिजला पाहिजे चांगला......
      माठात पाण्याची धार पडायला लागली आणि डोक्यात माठाचे उपयोग तरळायला लागले. पहिले आठवला तो कन्या जान्हवीच्या हातून फुटलेला माठ. असाच घरी आणला आणि पाणी  भरायचं म्हणून तिची एकच घाई. वय आठ आणि हातात न मावणारा माठ.. झालं.. तोल गेला आणि माठही, पन्नास रूपयांचा माठ आणि तिचं रडणं पाचशे रूपयांचं.. तिला समजावता समजावता नाकी नऊ.. दहा,, अकरा.. सगळे एकदम आले.
कितीही चांगले फ्रीज आले तरी माठाच्या पाण्याचा गोडवा आणि गारवा याची तोड त्याला येतच नाही. मातीतून घडवलेला हा माठ आपल्या भारतीय जीवनशैलीचं एक अभिन्न अंग आहे.
कृष्ण गोपिकांची खोडी काढताना मटकी फोडणारा जसा समोर येतो तसाच तो बाळगोपाळांना गोळा करून दही हंडी  दही पळवणाराही समोर येतो.
हिंदी सिनेमात जितेंद्र आणि कंपनीला घेऊन दहा वर्षे चित्रपटांचा रतिब लावणा-या दाक्षिणात्यांनी आपल्या चित्रपटात माठाचा भरपूर वापर केलेला आहे.
वर्गात एखाद्याला सर.. काय माठ आहे असं म्हणायचे त्यावेळी सारा वर्ग हसायचा आणि ते माठाचं लेबल एखाद्या गोंदणाप्रमाणे आयुष्यभरासाठी चिटकायचं... त्यावेळी गंमत वाटायची. आता ती मंडळी माठाप्रमाणे गोल झालेली पाहून सरांच्या दूरदृष्टीचं कौतुकच वाटतं....
लग्न असो की अंत्यसंस्कार तिथं माठाचं महत्व आहे नावात फरक पडतो इतकंच. लग्नात वापरताना त्याला मंगलमाथनी म्हणतात तर संक्रांतीच्या पूजेत सुगडे. जगाचा संबंध कायमचा संपल्यावर उरतं ते शव. याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात त्यावेळी मडक्यात पाणी भरून प्रदक्षिणा मारून ते मडकं मागील बाजूस टाकून फोडतात. याच्या आवाजाला घटस्फोट म्हणतात. आता लग्नसंबंध तोडण्याच्या कृतीला हा शब्द कधीपासून आणि का वापरला जातो याची मात्र माहिती मला नाही.
मातीचं हे भांड म्हणजे माठ. याला आवा देखील म्हणतात हे अनेकांना माहिती नसेल. संक्रांतीला गावातल्या कुंभाराला सांगून अनेक माठ व इतर भांडी बनवायची. तिथं सर्व सुवासिनींना हळद कुंकू कार्यक्रमासाठी बोलवायचं. त्यानंतर त्या प्रत्येकीने आपल्याला हवं ते भांड लुटायचं म्हणजे आवा लुटायचा ही पध्दत आहे. काळाच्या ओघात हे अनेकांना माहिती नाही हे खरं.
आकाराप्रमाणे हा मातीच्या भांड्याचे नावही बदलते. छोटा आकार असेल तर बोळके हे दिवाळीत वापरतात. संक्रांतीला याचं नाव सुगडे होते. माठाची छोटी बहिण सुरई तर मोठा भाऊ म्हणजे रांजण होय. ग्रामीण भागात रांजण अर्धा जमिनीत गाडण्याची पध्दत आहे. तंदूरसाठी देखील याचप्रकारचा तोंड नसणारा रांजण वापरला जातो. कधी मडकं कधी माठ, हिंदीत याला मटका किंवा मटकी म्हणतात. हा मटका रतन खत्री नावाच्या वल्लीनं मराठीत आणला तो वेगळ्या रुपात. त्या मटक्यानं लाखोंना बरबाद केलय.
माठाचा माझा परिचय हा अगदी बालपणीचा.. पहिल्या पावसातला..
ये रे ये रे पावसा म्हणत पावसाला लाच देण्यापासून घर-घरात या जगात जगायचं कसं याचा धडा गिरवला जातो. यातच पावसाच्या सरीला मडके भरण्याचं आर्जव आहे... ये गं ये गं सरी.. माझे मडके भरी.. ते आर्जव  ऐकून सर धावून येते आणि मडके वाहून जाते... बालपणाचंही असंच असतं ते असच शिक्षणाच्या पावसात कधी वाहून जातं ते कळत नाही.
बुध्दी नाही तो माठ मात्र बुध्दीमत्ता काय हे समजावी यासाठी सांगण्यात येणा-या कथेत कावळा आणि माठच आहे. बिरबलाने माठात वाढवलेल्या भोपळ्याची बुध्दीमत्ताही या निमित्ताने आठवते. मानवी शरीरालाही देवानं घडवलेला माठच म्हणतात.. जसं
फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार..
विठ्ठला तू वेडा कुंभार..
सारं आठवताना माठ कधीच भरून वहायला लागला होता.. आपणही एका मर्यादेपर्यंतच कमवावं.. बाकी सारं वाहून जाणार असतं असा एक विचार मनात आला आणि मन  तिकडे वळलं..

No comments: