Tuesday, 24 April 2012

Life On Hold... Please..

याला काय म्हणायचं हे मात्र कळलं नाही.. जन्माला आणि मृत्यूला आपण आपल्या ताब्यात मिळवलं... काही प्रमाणात तरी आपण हे साध्य केलय मात्र याचा गैरफायदा तर आपण घेत नाही ना असं वाटलं...
      दवाखान्यातला तो क्रिटीकल केअर युनिटचा भाग.. स्क्रीन लावलेले.. यावर –हदयाचं आलेखन चालू होतं दुस-या बाजूला विविध यंत्रांमधून आयुष्य उधारीवर ओतून त्या देहात प्राण फुंकले जात होते.. का.., जगणं संपलं की नाही याची कल्पना नाही अशा स्थितीत व्हेंटीलेटरवर ठेवलेले ते शरीर.. माझ्या शरीरावरच रोमांच आले.. मन मला आठ वर्षे मागे घेऊन गेले.. आई.. हो आई होती ती माझी..
      आई.. झालं  तर ते संपवावं.. एका क्षणात संपायला हवं.. आप मरे दुनिया डुबे असं ती नेहमी सांगायची.. ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन होवून  आठ दिवस झालेले.. पण आता ते जगणं रोजचं मरणं होतं.. अपंग होवून जगणं .. रोजचंच मरण ठरावं.. तिच्या मनानं ठरवलं आणि सर्व उपचारांना प्रतिसाद पुर्ण बंद झाला.. तिची इच्छा.. आपण त्याचा आदर केला पाहिजे.. नाही पटला हा निर्णय सा-यांना पण तो खंबीरपणाने घ्यावाच लागतो.. आज दोन्ही चित्र मनात उभी आहेत..     
काय बरं आणि काय चांगलं.. मनात प्रश्नांनी फेर धरला होता. मन वारंवार त्याच बाबीकडे धावत होतं. आपणास काय अधिकार आहे मरण रोखण्याचा.. मरणा-यालाही आपण वेटींगवर ठेवायचं हे मनाला पटत नाही. कृत्रिम यंत्रांनी माणसाला होल्डवर टाकता येतं.. हा काय मोबाईल फोन आहे का.. मरण हे देखील सुखानं यावं लागतं.. आज त्यालाही माणुस पारखा झालाय.. हेच खरं..
काळ आला पण वेळ आली नाही ...
हे मरण टळण्याचं कारण आपण अनेकदा बघतो आणि सांगतो.. पण आता
काळ आला आणि वेळही आली तरी त्यालाही पॉझ देता येतो ही स्थिती आणि आलेलं हे स्थित्यंतर मनाला सुन्न करणारं असंच होतं.. इथल्या व्यावहारीक जगात भावनांना महत्व नाही आहे ते आजच्या व्यवस्थेला आणि आपल्या सोईला.. त्यासाठी नैसर्गिक मरणही गैरसोय होता कामा नये इतकी सोय विज्ञानानं केलीय त्या फायदा घेतला तर वावगं ते काय ही प्रतिक्रीया देखील अशीच सुन्न करणारी.. आपण त्यात केवळ प्रेक्षक ही आणखी त्रास देणारी बाब इतकच..
प्रशांत दैठणकर

No comments: